News Flash

वसुंधरेच्या लेकी : पाण्यालाच जीवनदान

 अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या पाण्याभोवती या लोकांचे कायदे, हक्क, करार आणि निर्बंध गुंफले गेले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

सिद्धी महाजन

जगाच्या अनेक भागांमध्ये, अगदी प्रगत देशांमध्येही काही ठिकाणी सहजासहजी शुद्ध पाणी मिळणं दुरापास्त आहे. इतकं , की पाणी कायम उकळून पिण्याशिवाय पर्यायच नसावा. कॅनडामधील पाण्याला पवित्र मानणाऱ्या समुदायातील लोकांना पाण्याची ही स्थिती अस्वस्थ करत होती. त्यातूनच उभी राहिली ती लाडक्या ‘निबी’ला म्हणजे पाण्याला जीवनदान देण्याची चळवळ! एका लहान मुलीचाही त्यात समावेश होता. पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ही मुलगी धाडसानं सर्वासमोर बोलू लागली. थेट पंतप्रधानांनाही या प्रश्नाची जाणीव करून द्यायला ती कचरली नाही. या मुलीचं नाव ऑटम पेल्टिएर. तिच्या कामाविषयी..

‘पानीयं परमं लोके जीवानां जीवनं समृतम्।’  पाणी ही पृथ्वीवरील अमूल्य संपत्ती! उत्तर अमेरिकेला पंचमहाजलाशयांच्या (द ग्रेट लेक्स) रूपानं अमाप नैसर्गिक जलवैभव लाभलं आहे. हजारो वर्षांपासून कॅनडा आणि उत्तर अमेरिकेतील एतद्देशीय अथवा मूळ रहिवासी हे पाण्याला आत्मा असतो, असं  परंपरेने समजत आले आहेत. त्यांनी पाण्याला ‘निबी’ असं नाव दिलं. या निबीभोवती त्यांनी सुरस कथा गुंफल्या, गाणी रचली. निबी भवतालातील साद-प्रतिसाद ऐकू शकते, मानवी भावभावना अन् संवेदना प्रतिबिंबित करते, अशी त्यांची धारणा आहे. पाणी ही मानवजातीला मिळालेली एक पवित्र भेट आहे, असा त्यांचा दृढ विश्वास आहे.

अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या पाण्याभोवती या लोकांचे कायदे, हक्क, करार आणि निर्बंध गुंफले गेले आहेत. पाण्यानं त्यांचा इतिहास घडवला, नवा भूगोल आखून दिला. कोलंबस अन् त्याचे साथी दर्यावर्दी उत्तर अमेरिका खंडावर पोचले असता नजरचुकीनं त्यांनी तिथल्या रहिवाशांना ‘इंडियन’ असं संबोधन बहाल केलं. आज त्यांना ‘फर्स्ट नेशन’ किंवा ‘प्रथम रहिवासी’ असं संबोधलं जातं. या जमातींनी आधुनिकतेची कास धरण्याबरोबरच निसर्गाशी नातं सांगणाऱ्या आपल्या अस्मिता आणि परंपरा जपल्या आहेत. त्यांना आरक्षित करून दिलेल्या प्रदेशात तिथल्या निसर्गाला धक्का न लावता आपल्या वसाहती त्यांनी वसवल्या आहेत. आपल्या संस्कृतीतून वर्षांनुवर्ष वाहात आलेल्या परंपरांना आधुनिकतेच्या अर्कात बेमालूमपणे मिसळवत या भूमिपुत्रांनी नव्या प्रवाहाला जन्म दिला. मातीशी नाळ जपलेल्या फर्स्ट नेशन समाजानं पाण्याशी लोभस नातं अबाधित ठेवलं.

स्त्रीप्रधान कुटुंबपद्धती असलेल्या या समाजसमूहात जलसंवर्धनात सर्वात महत्त्वाचा सहभाग असतो तो स्त्रियांचाच. इथल्या पारंपरिक समजुतीप्रमाणे स्त्रिया ‘पाण्याच्या राखणदार’ मानल्या जातात. वीस वर्षांपूर्वी याच फर्स्ट नेशन समूहातील अनिशिनाबे जमातीतील ‘एल्डर’ म्हणजे जाणत्या स्त्रियांनी पाण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी नव्यानं खांद्यावर घेतली. त्याला कारणही तसंच होतं. इथल्या परिसरात पाण्याचे मुबलक स्रोत उपलब्ध असूनही फर्स्ट नेशन रहिवासी क्षेत्रांत शुद्ध पिण्याच्या पाण्याची वानवा होती. सांडपाण्याची गळती आणि कारखान्यांनी सोडलेला प्रदूषित मैला यामुळे इथले पाण्याचे स्रोत कमालीचे हानिकारक बनले होते. याचा परिणाम म्हणून इथल्या लोकांना पिण्याच्या पाण्यावर सुरक्षेखातर घातले गेलेले तब्बल पाचशेवर निर्बंध सहन करावे लागत होते. स्थानिकांना पिण्यासाठी उकळलेल्या पाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय स्वीकारता येत नव्हता. शेवटी स्थानिक स्त्रिया या गैरसोयीविरोधात उभ्या राहिल्या अन् उभी राहिली ती लाडक्या ‘निबी’ला म्हणजे पाण्याला जीवनदान देण्याची चळवळ!

ही गोष्ट सुरू होते कॅनडामधील मनितुलिन बेटावर राहाणाऱ्या अनिशिनाबे जमातीतील जोसफिन मांदेमिन या एका जाणत्या आजीबाईंपासून. त्यांनी सुरू केलेल्या अखंड जलपरिक्रमेपासून या कहाणीला सुरुवात होते. २००३ मध्ये ग्रँडमा जोसेफिन यांनी ‘लेक सुपीरियर’ या जगातील सर्वात मोठा भूकिनारा लाभलेल्या महाजलाशयाच्या काठाकाठानं पहिली परिक्रमा पूर्ण केली. ‘जळाच्या कळा’ समजून घेत त्यावरचे अत्याचार आणि अपमान थांबवायला हवे होते. मानवजातीच्या उगमापासून मानवाचं पाण्याबरोबर असलेलं पवित्र नातं पुनरुज्जीवित करण्याची गरज त्यांना जाणवत होती. २०१७ मध्ये शेवटची परिक्रमा करेपर्यंत, एकूण सोळा वर्षांत ग्रँडमा जोसेफिन यांनी २३ हजार किलोमीटर- म्हणजे पृथ्वीच्या अर्ध्या परिघाएवढं अंतर पायी चालत पूर्ण केल्याचं सांगितलं जातं. या परिक्रमेदरम्यान त्या पाण्यासाठी प्रार्थना करत जलसंवर्धनासाठी जनजागरण करत होत्या. लोकांना पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी झगडत होत्या. ग्रँडमा जोसेफिनना अतिशय मानाचं ‘अनिशिनाबे चीफ वॉटर कमिशनर’ हे पद बहाल करण्यात आलं आणि त्यांनी त्या पदाला आयुष्याच्या अंतापर्यंत सार्थ न्याय दिला. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. जाताना त्यांनी त्यांच्या पंधरा वर्षांच्या नातीला मोलाचा कानमंत्र दिला, की चांगलं काम मन लावून करताना समाजाची भीडभाड ठेवू नकोस. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांची पर्वा करत डबक्याप्रमाणे साचून न राहाता खळाळत्या निर्झराप्रमाणे वाटचाल करत राहा.‘लेक हयुरोन’ या जगातील सर्वात मोठा गोडय़ा पाण्याचा स्रोत असलेल्या जलाशयाच्या मानिटुलीन या वैशिष्टय़पूर्ण बेटावर असलेली ‘विकवेमकुंग’ ही फर्स्ट नेशन वसाहत. तिथे लहानाच्या मोठय़ा झालेल्या कुणा सामान्य मुलीला कदाचित ग्रँडमा जोसेफिनच्या शब्दांमधला गर्भितार्थ समजला नसता. मात्र वयाच्या आठव्या वर्षीच र्सपट नदीकाठी फर्स्ट नेशन समुदायाच्या एका जलवंदन समारंभात ‘दूषित पाण्यापासून दूर राहा’ अशा नाइलाजास्तव लावलेल्या सूचनांनी या मुलीला अस्वस्थ के लं होतं. त्यामुळे आजीच्या म्हणण्याचा अर्थ तिला नीट समजला हे वेगळं सांगायला नको. त्या शब्दांचा माग धरून ती वाटचाल करणार होती. अनेक शाब्दिक लढाया लढणार होती, फक्त पाण्यासाठी!  या नीरवीरांगनेचं नाव ऑटम पेल्टिएर.

लहानपणापासून आईकडून आणि आजीकडून पर्यावरण संवर्धनाचं आणि पाण्याची शुद्धता जतन करण्याचं बाळकडू मिळालेल्या ऑटमला शुद्ध  पाण्याचं महत्त्व माहीत होतं, मात्र परिस्थितीची तीव्रता ध्यानी येण्यासाठी तिला त्या समारंभातील अनुभवानं मदत केली. स्वच्छतागृह आणि इतर ठिकाणी लावलेले ते सूचना फलक पाहून तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तिनं आईपाशी धाव घेतली. आईकडून तिला समजलं, की कॅनडामधील ५६ वेगवेगळ्या फर्स्ट नेशन वसाहतींमध्ये पाणी धोकादायक पातळीपर्यंत प्रदूषित झालं होतं. तब्बल दहा वर्ष त्या वसाहतींतील रहिवासी उकळलेल्या पाण्याच्या आधारावर जगत होते. तिला कळून चुकलं की, शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेबाबत सगळीकडे समान परिस्थिती नाही. तिच्या परिसरात जरी शुद्ध पाणी उपलब्ध होत असलं तरी कॅनडामधील काही प्रदेशांत पिण्याच्या शुद्ध पाण्याची चैन परवडत नाही. याबाबत सामान्य माणसासाठी सार्वजनिक स्तरावर आवाज उठवणं गरजेचं होतं. खरं तर लहान मुलांनी हे करणं अपेक्षित नाही, पण जिथे वडीलधाऱ्या लोकांकडून यावर काही बोललं जात नाही, तिथे लहानांनी आपले बोल सुनावलेच पाहिजेत.

त्यानंतर ऑटमनं वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांत सहभाग घेण्यास सुरुवात केली. कधी भाषणातून, पारंपरिक विधींतून आणि गाण्यांतून तिनं शुद्ध पाण्याचं महत्त्व लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली. ग्रँडमा जोसेफिनप्रमाणे जल परिक्रमा करत गावागावांतून जनजागरण करण्यास सुरुवात केली. जलसंवर्धनाबाबत तिची आस्था बहुआयामी आहे. ते करताना ती कधी पारंपरिक अभिव्यक्ती जपते, तर कधी आधुनिक मार्गाचा अवलंब करते. तिनं आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न मांडला आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात, स्वीडनमध्ये ‘चिल्ड्रन्स क्लायमेट कॉन्फरन्स’मध्ये आणि २०१६ मध्ये ‘असेम्ब्ली ऑफ फर्स्ट नेशन्स’ संमेलनात खुद्द पंतप्रधान जस्टिन टड्रो यांच्यासमोर तिनं आपलं म्हणणं मांडलं आहे.

‘‘कॅनडा हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. तरीही इथले लोक या परिस्थितीत का जगत आहेत?’’ ऑटमनं पंतप्रधान टड्रो यांना जाहीररीत्या हा प्रश्न विचारला होता. जेव्हा तिला त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी मिळाली तेव्हा तिनं त्यांना सूचित केलं, की सरकारनं पर्यावरण आणि जलसंवर्धनासंदर्भात घेतलेल्या निर्णयांबद्दल ती अत्यंत असमाधानी आहे. त्यांनी आपल्याला तिचं म्हणणं समजलं असल्याचं सांगितल्यावर तिला रडू फुटलं. तेव्हा पंतप्रधानांनी तिला पाण्याचं ‘संरक्षण’ करण्याचं वचन दिलं. पंतप्रधानांना सार्वजनिकरीत्या सौम्यपणे ‘सुनावल्यामुळे’ तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली.

ऑटम पाणी आणि निसर्गातील इतर घटकांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. पाण्याप्रति असलेल्या तिच्या अतूट बांधिलकीमुळे आणि त्याविषयीचं पारंपरिक ज्ञान, जरुरीची असलेली समज तिच्याकडे असल्यामुळे २०१९ मध्ये ग्रॅण्डमा जोसेफिन गेल्यानंतर ‘चीफ वॉटर कमिशनर’ म्हणून सर्वानुमते तिची निवड करण्यात आली. २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये मानाच्या आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठी सलग तीन वर्ष तिची निवड करण्यात आली होती. तिच्या जलाधिकार चळवळीतील योगदानामुळे कॅनडातील सर्वात प्रभावशाली वीस व्यक्तींमध्ये तिची गणना करण्यात आली.

आज ऑटम पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या प्रश्नावर जागतिक पातळीवर आवाज उठवते आहे. या प्रश्नांवर बोलण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी पुढे यायला हवं, असं तिला वाटतं. ज्यांना आपला आवाज ऐकला जाईल याची मनोमन खात्री आहे, आत्मविश्वास आहे, त्यांनी ज्यांचा आवाज पुरेसा बळकट नाही त्यांची बाजू मांडली पाहिजे. प्रत्येकानं शुद्ध पाणी, शुद्ध पर्यावरण, वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनप्र्रक्रिया या गोष्टींचा प्रचार केला पाहिजे. समुद्रकिनारे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यातून, छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून लहान मुलं पर्यावरण संरक्षण करू शकतात. शिक्षक आपल्या वर्गातील काही वेळ पर्यावरणाबाबत चर्चा करण्यासाठी देऊ शकतात. त्यांनी हा विषय वरचेवर मुलांसमोर काढलाच पाहिजे, अन्यथा त्याचं महत्त्व मुलांच्या मनात बिंबवलं जाणार नाही, असं ती वरचेवर सांगते.

‘करोना’काळात कॅनडामधील शुद्ध

पाण्याचा प्रश्न पुन्हा बिकट झाला. स्वच्छतेसाठी आणि जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या या स्रोतावर प्रचंड ताण आल्यामुळे अनेक भागांत रोगाचा प्रसार वाढला. तिथल्या सरकारनं मार्च २०२१ पर्यंत पिण्याच्या पाण्यावर घालण्यात आलेले काही दीर्घकालीन निर्बंध उठवायचा विचार, पाच वर्षांनंतरही आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांवर कोटय़वधी खर्च करूनसुद्धा पुन्हा रखडवला आहे. अनेक वसाहतींना प्रदूषित पाणीपुरवठय़ामुळे स्थलांतर करावं लागलं आहे. अनेक वसाहती वर्षांनुवर्ष पाणी उकळून वापरण्याच्या कट्टर निर्बंधाचं पालन करत आहेत. पूर्ण देशात, जगाच्या कानाकोपऱ्यात पाणी जोपर्यंत आपल्या

नैसर्गिक अवस्थेत पिण्यालायक आणि पुरेसं शुद्ध नसेल, तोपर्यंत ऑटमचा लढा चालूच राहणार आहे.

शुद्ध पाण्यासाठी लाचार होण्याची वेळ कुणावरच येऊ नये, त्यासाठी या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीला कुणीही आणि कुठेच गृहीत धरून त्याची हेळसांड करू नये, इतकंच तिचं म्हणणं आहे.

snmhjn33@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:31 am

Web Title: article on autumn peltier work abn 97
Next Stories
1 गद्धेपंचविशी : ‘स्व’च्या शोधात..
2 शुभ्र काही करपलेले..
3 शारीरिक + मानसिक ताण = दुभंग
Just Now!
X