जागतिक कर्करोग दिवस

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

४ फेब्रुवारी २०२०

हेमा भाटवडेकर

hema@sirmaxochem.in

कर्करोग..  कुणाला साक्षात्कारी वाटणारा, कुणासाठी गुरू ठरलेला .. कुणाला खूप काही देऊन गेलेला..  सरळ एका रेषेत सुरू असलेलं आयुष्य कर्करोगरुपी अडथळ्याने काही काळ का होईना थांबतं..  सुरू होतो संघर्ष शारीरिक आणि मानसिक पातळीवरही.. वेदनेच्या अखंड आणि एकाकी प्रवासात इच्छाशक्तीच प्रबळ ठरते अनेकदा आणि कर्करोगाला पराभूत व्हावं लागतं. परंतु तो संघर्ष अविरत आणि जीवघेणा असतोच.. अशाच काही या संघर्षकहाण्या ..

४ फेब्रुवारीच्या जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने.

आपल्या आयुष्यात अशा काही अनपेक्षित घटना व आघात होतात की ज्याच्याबद्दल आपण कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. एका सरळमार्गी जीवनक्रमाला अचानक खीळ बसते. आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि आपल्याला जगण्याची नवी दिशा दिसू लागते. मला कर्करोग झाल्यावर मी विचार करू लागले तेव्हा मला अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ज्या गोष्टींचे पूर्वी अनन्यसाधारण महत्त्व वाटत होते त्या अचानक अर्थहीन वाटू लागल्या. मागे वळून पाहताना, मी माझ्याकडे नव्याने पाहण्यास शिकले. अनेक गोष्टींचा जणू साक्षात्कारच झाला!

सर्वसामान्य आयुष्यातील टप्पे – शिक्षण, लग्न, मुलं, करिअर हे घडत असताना, आयुष्य एका सरळ रेषेत जाताना दिसत असतं, पण ते वरकरणी. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा, आवड यांना सतत मुरड घालत असतो. कधी कौटुंबिक तर कधी करिअर तर बरेचदा सामाजिक संकेत या सगळ्याच्या जोखडात आपण आपल्याला अडकवून टाकतो. बहुतेकदा आपणच आपल्याभोवती या तटबंदी घालून घेतलेल्या असतात. आपल्याला काय हवे, काय आवडते याचा आपल्यालाच विसर पडतो.  समाजात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात असंच घडत असल्यानं त्याचं विशेष काही वाटत नाही. बरेचदा आपण आपल्या कामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशाचा विचार करत नाही. त्याच अनुषंगाने वाचन, भेटी आणि चर्चा करत जातो. पण हे एकसुरी पठडीतले आयुष्य जगत असताना, आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक अंगांकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करत राहतो. अशा एकांगी जीवनशैलीमुळे अनेक इच्छा, आवडी मनात सतत साचत जातात. अधूनमधून त्यांनी डोकं वर काढलं की मनात द्वंद्व चालू होतं. या ताणामुळे आपल्या आंतरशक्तीचा ऱ्हास आणि शरीरात लपून बसलेला रोग डोकं वर काढतो. कर्करोगनं मला आयुष्याकडे बघण्याचा हा नवीन दृष्टिकोन दिला..

डिसेंबर २०११ मध्ये कर्करोगचं निदान झाल्यावर मला धक्का बसला, पण मृत्यूचं भय वाटलं नाही. मी डॉक्टरांशी चर्चा करून मला झालेल्या आजाराबद्दल आणि उपचाराबद्दल माहिती घेतली. शिवाय माहितीचं भांडार आपल्यापुढे सदा सर्वकाळ उघडणाऱ्या आपल्या ‘गुगल’ मित्रानं मला ‘धैर्यानं यशस्वीपणे कर्करोगवर मात केलेल्या अनेक रुग्णांच्या गोष्टी’  वाचायल्या दिल्या. आमच्या एका मित्रानं मला कर्करोगाला धीरानं सामोरं जाण्यासाठी खूप मदत केली. माहिती तर दिलीच शिवाय आपण कशा प्रकारे उपचारादरम्यान होणारा त्रास कमी करू शकतो ते वेळोवेळी सांगितले. माझ्याकडून नियमित ध्यान करून घेतले. खरं तर आमचा हा मित्र गेली दोन वर्ष मला वेळोवेळी सांगत होता की तू व्यवसाय आणि कुटुंब यापलीकडच्या जगाला विसरली आहेस. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले.

मला ‘क्लासिकल हाचकीन लिंफोमा’ (Classical Hodgkin Lymphoma) या प्रकारचा रक्ताचा कर्करोग झाला होता. सुदैवाने हा कर्करोग उपचाराने बरा होणारा आहे. उपचाराच्या गाइडलाइन्सनुसार केमोथेरपीच्या सहा सायकल्स म्हणजे १५ दिवसांच्या अंतराने १२  केमोथेरपी घेतल्या. केमोथेरपी म्हणजे जीवघेणा हल्लाच! केमोथेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशींबरोबर आपल्या शरीरातील वेगाने वाढणाऱ्या चांगल्या पेशीसुद्धा मारल्या जातात. त्यामुळे केस गळणे, आतडी व पोटातील पेशींवर आक्रमण झाल्यानं भूक न लागणं व अतिसाराचा त्रास होणं, तोंड  येणं, रक्तपेशींना फटका बसल्यामुळे ब्लड काऊंटमध्ये उलथापालथ होणं, असे दुष्परिणाम होतात. त्यासाठी प्रत्येक केमोनंतर इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पहिल्या केमोथेरपीच्या वेळी शरीरामध्ये जसे ते औषध मिसळले तसा माझ्या शरीरानं जिवाच्या आकांताने विरोध केला – शरीरातून आगीचे लोळ उडू लागले, नाका-डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं, शिरा तडतडू लागल्या, शरीर अक्षरश: बेडवर उडायला लागलं. शेवटी केमो देणं थांबवावं लागलं. त्यानंतर जसजशी औषधांची मात्रा शरीरात वाढू लागली तसं प्रत्येक वेळी केमो घेताना आणि  त्यानंतरचे २४ तास सतत उलटय़ा होत, पाणीसुद्धा पोटात टिकत नसे, कुठलाही वास सहन होत नसे लगेचच ओकांबे येत. तोंड येऊन जिभेवर फोड येत, तोंडात, शरीरात आगआग होई. पूर्वी कधी न टोचणारे दात तोंडात जखमा करत, पोटातून व डोक्यातून आगीचे लोळ उठत, अशा प्रकारचे कितीतरी भयंकर दुष्परिणाम सहन करावे लागले.

अशा सगळ्या जीवघेण्या अनुभवानंतर बारावी केमो ३० ऑक्टोबर २०१२ला संपली आणि  महिन्याभरातच दोन ते तीन डिसेंबरला मला मानेवर डाव्या बाजूला एक गाठ आल्याचं जाणवलं. डॉक्टरांना सांगितल्यावर ते मानायलाच तयार नव्हते, असं होणं शक्यच नाही, म्हणाले. मी फारच आग्रह केल्यावर त्यांनी तपासलं. माझी शंका खरी ठरली. मला झालेला कर्करोग बारा केमोंना पुरून उरला. उपचाराचा काहीही उपयोग झाला नाही, पण प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास, शेकडो वेळा रक्ततपासणी, इंजेक्शनचा मारा आणि शरीरात उलथापालथ हे मात्र भोगायला लागलं. आता शेवटचा उपाय म्हणजे ‘स्टेमसेल ट्रान्सप्लांट’ ही उपचार पद्धती. या  थेरपीमध्ये पहिल्या टप्प्यात ३ हाय डोस केमोथेरपी – प्रत्येकी ३ सलग दिवस केमो, अशा २१ दिवसांच्या अंतराने ३ केमो, नंतर माझ्याच शरीरातल्या स्टेम सेल काढून त्यातील निरोगी सेल वेगळ्या करून परत माझ्या शरीरात घालायच्या ही प्रक्रिया. त्यासाठी रुग्णालयात ४ ते ५ आठवडे मुक्काम, ६ दिवस २४ तास हाय डोस केमोथेरपी अशी उपचार पद्धती. या सगळ्या उपचार पद्धतीला साधारणपणे  सात-आठ महिने आणि मग तीन-चार महिने संसर्ग होऊ  नये म्हणून कमीतकमी संपर्क होण्यासाठी घरातच आराम, असा साधारण वर्षभराचा कार्यक्रम होता. डॉक्टर म्हणाले, ‘‘लगेच ‘स्टेमसेल ट्रान्सप्लांट’ करण्याची गरज नाही, कारण कर्करोगाची गाठ काढली आहे. काही महिने किंवा कदाचित काही वर्षे कर्करोग डोकंवर काढणार नाही.’’

पहिल्या बारा केमोंच्या वेळी मी भरपूर वाचन केलं होतं. त्यातील ‘पॉवर ऑफ नाऊ ’ आणि  डॉक्टर दीपक चोप्राचे ‘क्वांटम हीलिंग’ आणि डॉक्टर मनोज भाटवडेकरांचे  ‘एका पुनर्जन्माची कहाणी’ या पुस्तकांनी मला नवी दिशा दिली. मी स्वत:साठी खूप वेळ देऊ  लागले, स्वत:वर प्रेम करू लागले. स्वत:च्या शरीराबद्दल कृतज्ञता वाटू लागली. मी नियमितपणे माझ्या शरीराचे आभार मानायला सुरुवात केली. आपल्यात वेदना सहन करण्याची प्रंचड शक्ती आहे याबद्दल परत परत स्वत:ला प्रोत्साहित करायला शिकले. त्यामुळे वेदनेचे दु:ख करत बसले नाही. वेदना पूर्णपणे सहन करायच्या आणि विसरून जायचं. उगाच ते उराशी बाळगून बसायचं नाही की आपल्या नशिबाला दोष द्यायचा नाही. डोक्यावरचे, भुवईचे आणि पापणीवरचे केस गळून पडले तरी मला त्याचे कधी वैषम्य किंवा लाज वाटली नाही.

आयर्वेदिकही उपचार सुरू केले होतेच. त्यामुळे माझी रोगप्रतिकारकशक्ती व पचनशक्ती नेहमी उत्तम राहिली.  या संपूर्ण कालावधीत मला कधी कुठलाही संसर्ग झाला नाही. केमोचा आणि त्यानंतरचा एक दिवस सोडला तर नियमित योगासने व प्राणायाम करत असे. माझ्या शारीरिक अवस्थेनुसार आसनामध्ये योग्य ते बदल माझी योग शिक्षिका करत असे. ‘ब्रह्मविद्या’ या श्वसनप्रकारची ओळख माझ्या बहिणीने करून दिली. ती माझ्याकडून नियमितपणे श्वसनप्रकार करून घेत असे.  हळकुंड घालून सिद्ध केलेल्या तेलाने दररोज मसाज, गुळवेलीचा रस, शतावरीचे सूप आणि पार्सली व कोथिंबिरीचे सूप असं नित्यनेमाने घेत असे.

या सुमारास चित्र काढायची हौस पुरी केली, गाणे शिकण्याचा प्रयत्न केला, ‘यूटय़ूब’वर असंख्य मुलाखती ऐकल्या. यापूर्वी कधीही न जाणवलेले किंवा दुर्लक्ष केलेले पक्ष्यांचे गाणे, सूर्योदय-सूर्यास्ताचे सौंदर्य, अगदी शांततेचाही  आनंद घेतला.  कोणी येऊन सहानुभूती दाखवावी अशी कधी गरजच वाटली नाही. कोणी भेटायला आलंच तर कर्करोग, आजाराव्यतिरिक्त दुसऱ्या चांगल्या विषयांवर मी बोलत असे.  हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या ओळखीच्यांना जेवण पाठवत असे, काहीना काही माझ्या आनंदासाठी मी सतत करत असे.

परत कर्करोगनं डोकं वर काढून ‘स्टेमसेल ट्रान्सप्लांट’ करायला मध्ये एक वर्ष गेलं. या काळात मी भरपूर हिंडून घेतलं. अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारत फिरले. ओशो मेडिटेशन, श्री श्री रविशंकर योगाभ्यास, विवेकानंद योग सेंटर अशा कितीतरी ठिकाणी जाऊन आले. डिसेंबर २०१३ मध्ये आम्ही बहिणींनी श्रीलंकेला जायचं ठरवलं होतं. पण मला परत त्रास होऊ  लागला. डॉक्टर म्हणाले, ‘‘तुम्ही ट्रिपला जाऊन या मग आपण उपचार सुरू करू.’’  मनाचा हिय्या करून मी सात दिवस मस्त भटकून आले, खूप मजा केली, ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आनंदात ट्रिप पूर्ण केली. परतल्यावर ‘स्टेमसेल ट्रान्सप्लांट’साठी हाय डोस केमोथेरपी चालू केली. या उपचार पद्धतीत रुग्णाच्या हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट हे सर्व शून्यावर आणून ठेवतात.  त्यामुळे त्याला सर्व प्रकारचे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. ठरावीक पातळीवर ब्लड काउंट पोहोचेपर्यंत रुग्णालयातच एकांतात राहावं लागतं. यासाठी किती दिवस लागतील हे रुग्णाचे वय व तब्येत यावर अवलंबून असतं. २६ दिवसांनंतर मी घरी परतले तेही माझ्या जबाबदारीवर, कारण माझे ब्लड काउंट अपेक्षेनुसार वाढत नव्हते.

कर्करोगच्याच नव्हे तर कुठल्याही आजारात रुग्णाला जेव्हा फार काळ उपचार घ्यावे लागतात तेव्हा रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्याकडे खास लक्ष देणं गरजेचं असतं. आयुष्य जर उत्तम असेल तरच रुग्णाची तब्येत भरभर सुधारते. पण बहुतेक वेळी या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. रुग्णालयामध्ये औषधे आणि इतर उपचारांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मग रुग्ण होणाऱ्या प्रचंड त्रासाबद्दल जीव तोडून सांगत असला तरी ठरलेल्या उपचारांमध्ये सहसा बदल केला जात नाही. त्यामुळे रुग्ण उपचारांना मनापासून प्रतिसाद देत नाही आणि म्हणून बरेचदा उपचारांचा अपेक्षित उपयोग होत नाही. सुदैवाने माझ्या डॉक्टरांनी माझं म्हणणं काही बाबतींत ऐकलं. उपचारांदरम्यान रुग्ण हा मन असलेला जीव आहे हे कोणाच्या खिजगणतीतही नसतं. रुग्णाचा ‘बेड नं. अमुक अमुक’ म्हणून उल्लेख होतो. कामातल्या सुसूत्रतेच्या दृष्टीने जरी ते आवश्यक असले तरी तपासताना, चौकशी करताना नावाने संबोधलं तर रुग्णाला आपुलकी वाटते आणि उभारी येते.

मी आमच्या व्यवसायात माझ्या नवऱ्याबरोबर पूर्णवेळ जबादारीचे काम करत होते. अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सिस्टीम, फायनान्स आणि ह्य़ुमन रिसोर्स हे माझे आवडते विषय. पण पडेल ते काम अंगावर  घ्यायची सवय आणि आवड.  या कामांचे मला कधी ओझे वाटलेच नाही किंबहुना मला त्यात खूप आनंद मिळत असे.  (नुकतीच १ जानेवारी २०२० पासून मी कार्यकारी जबाबदाऱ्यांमधून निवृत्ती घेतलीय.) डिसेंबर २०११ मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यावरही मी मार्च २०१२ पर्यंत ऑफिसला नियमित जात असे. कर्करोगाचा त्रास जसा वाढू लागला आणि वेदना वाढल्या तसे मी ऑफिसला जाणे बंद केले. अधिकृतपणे मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना माझ्या आजाराबद्दल कळवले आणि मला झालेला कर्करोग उपचाराने बरा होणारा आहे त्यामुळे काळजीचे कारण नाही, हेही आवर्जून सांगितले. एप्रिल २०१२ ते मे २०१५ या माझ्या उपचाराच्या कालावधीत मी व्यवसायापासून सहजगत्या मला मोकळे केले. मलाच कधी कधी आश्चर्य वाटे की जो व्यवसाय माझा श्वास होता त्यापासून मी मनानेही सहज मुक्त झाले.  माझा मुलगा २००२ पासूनच आमच्या व्यवसायात पूर्णवेळ काम करू लागला होता. मुली लहान असल्यामुळे सून तोपर्यंत काही वेळ ऑफिसला येत असे. मी आजारी पडल्यावर तीही जास्त वेळ ऑफिसच्या कामाला देऊ  लागली. माझ्या आजारपणाचा ताण आणि व्यवसायाची अचानक पडलेली अधिकची जबाबदारी यामुळे कुटुंबीयांसाठी हे दिवस कठीण होते.  सुदैवाने आमच्या मित्राची भक्कम साथ आणि नातेवाईकांची मदत यामुळे या सगळ्यातून तरून जाणे सहज शक्य झाले. माझ्या नाती या माझ्या आनंदाच्या स्रोत होत्या आणि आहेत.

आपल्या मनाची ताकद अफाट आहे. आपण आपलं मन पाहिजे तेव्हा वापरले पाहिजे, जसं आपण आपल्या हाताची आवश्यक तेव्हाच हालचाल करतो. काही ठरावीक आजार सोडले तर आपल्या हातांच्या हालचालीवर आपले नियंत्रण असते,  तसेच आपल्या मनावर आपले नियंत्रण असले तर आपल्यातील अगाध शक्तीची आपल्याला प्रचीती येते. मन आपल्यावर आरूढ झाले की सगळा गोंधळ चालू होतो. ते मग आपल्याला भूतकाळ आणि भविष्यात अडकवतं. राग, लोभ, अहंकार या चक्रात आपण फसतो. जर आपण आपल्या मनाकडे वा विचारांकडे त्रयस्थासारखं बघितलं की त्याच्या माकडचेष्टा बंद तरी होतात किंवा कमी होतात. आणि आपल्या आत्मशक्तीचा आपल्याला प्रत्यय येऊ  लागतो. आपण कर्करोगाचे किंवा एखाद्या असाध्य आजारावर मात केलेल्या रुग्णाकडे बघून ‘चमत्कार’ झाला असं म्हणतो पण खरंतर चमत्कार त्यांच्या आत्मशक्तीचा असतो.

कर्करोगाच्या आजारात मला प्रकर्षांने जाणवलं की – आपल्या शारीरिक आणि मानसिक वेदना आपल्याला वारंवार सूचना देत असतात त्याकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या पाहिजेत, कारण दडपल्यामुळे त्यांचे शमन होत नाही. स्वत:वर प्रेम करायला सुरुवात केली की जगावर प्रेम करायला आपोआप जमते. आपल्या नजीकच्या व भरवशाच्या नातेवाईक आणि मित्रांबरोबर दु:ख आणि मनातील सल आणि आनंद वाटल्याने वेगळा दृष्टिकोन मिळतो. मी भाग्यवान ठरले कारण माझ्या या पूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय आणि आमचा मित्र माझ्या सोबत सतत एक भक्कम आधार होऊन राहिले, त्यामुळे कर्करोगला मी सहज बायबाय करून नवीन आयुष्याला सुरुवात केली. जणू माझा पुनर्जन्मच झाला.