29 March 2020

News Flash

कर्करोग माझा गुरू

पण एक दिवस कर्करोगानं मला घेरलं आणि वेदनेचा अखंड एकाकी प्रवास सुरू झाला..

मनीषा कोईराला

मनीषा कोईराला 

chaturang@expressindia.com

नेपाळच्या कोईराला या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक-राजकीय कुटुंबात मी जन्मले, वाढले.. जगातील कुठलीही वस्तू मला अप्राप्य नव्हती.. चुटकी वाजण्यापूर्वी माझ्या मागण्या, गरजा पूर्ण होत असत. माझे आई-वडील, भाऊ , आजोबा, आजी सगळेच अवतीभवती होते. संपत्ती, वैभव कशाचीही कमतरता नव्हती.. पण एक दिवस कर्करोगानं मला घेरलं आणि वेदनेचा अखंड एकाकी प्रवास सुरू झाला..

तत्पूर्वी, नेपाळमधल्या आईच्या एका मैत्रिणीने मला एका जाहिरातीत मॉडेलिंगची संधी दिली आणि या जाहिरातीत झळकलेला माझा चेहरा नेपाळच्या घराघराने उचलून धरला. आजीने मला अभिनय क्षेत्रात पाठवण्याची उत्स्फूर्त इच्छा व्यक्त केली. मुंबईत सुभाष घई यांनी मला १९९१ मध्ये ‘सौदागर’ चित्रपटाद्वारे अभिनयाची संधी दिली, आणि १९९४ पासून आलेल्या ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘बॉम्बे’, ‘अग्निसाक्षी’सारख्या चित्रपटांनी मला अभिनेत्री म्हणून नाव मिळवून दिलं. कामं वाढत गेली.. एकामागोमाग एक.. सतत चित्रपटांचं चित्रीकरण.. पण त्याचबरोबरीने येणारी या व्यवसायातील वाढती स्पर्धा, असुरक्षितता यामुळे हळूहळू येणारे वैफल्य.. दरम्यान, नेपाळच्या एका व्यक्तीबरोबर झालेलं माझं लग्न अयशस्वी ठरलं.. मनाने-शरीराने मी थकून गेले. मी परत मायदेशी, नेपाळला आले आणि प्रचंड आजारी पडले. माझ्या आजाराचं निदान होईना. शेवटी काही चाचण्यांसाठी पुन्हा मुंबई गाठली.

ध्यानीमनी नसताना २०१२ मध्ये मला ओव्हेरियन कर्करोगाचं निदान झालं.. एका क्षणात सारं होत्याचं नव्हतं झाल्यासारखं वाटलं मला.. मात्र माझं कुटुंब माझ्यामागे ठामपणे उभं होतं. मला त्वरित अमेरिकेत नेण्यात आलं.. उपचार सुरू झाले..

आणि वेदनेचा अखंड प्रवास सुरू झाला.  माझ्या अमेरिकेतल्या वास्तव्यात आईने दिवस-रात्र माझ्यासोबत घालवला..

तिच्या प्रेमळ सहवासामुळेच मी लवकर बरी होऊ शकले..

या सगळ्या उपचाराच्या दरम्यान माझ्या हाती आरसा लागणार नाही याची व्यवस्था आईने केली होती, पण एकदा मी मला आरशात पाहिलंच.. अक्षरश: कोसळले..  माझ्या डोक्यावरचे केस गेले होते. १९९१ ची मनीषा आणि २०१२ ची मनीषा.. या दोन प्रतिमा माझ्याच का? असा प्रश्न मला पडला.. आरशातली माझीच प्रतिमा मला भयावह वाटू लागली..  न्यू यॉर्कच्या स्लोन्स हॉस्पिटलमध्ये माझ्यावर तब्बल ११ तास सर्जरी सुरू होती.. या सर्जरीनंतर ४ ते ५ महिन्यांनंतर पुन्हा केमोथेरपी.. हा प्रवास एकाकी होता.. मनात अंधाराचं जाळं आणि शरीर उपचारांनी थकलेलं! माझी कुणी विचारपूस करतोय का, मला कुणी भेटायला येतोय का .. हे जाणून घेण्याची क्षमताच माझ्याकडे नव्हती त्या काळात. आजार वाढतच चालला होता,  हाडांच्या वेदना पेनकिलर्स गोळ्यांनीदेखील थांबत नसत. मीच डॉक्टरांना विचारत असे, ‘‘माझ्याकडे किती दिवस शिल्लक राहिलेत?’’ आजार आपल्याला शरीराने खचवतो, पण कर्करोग आधी मनाची क्षती करतो.. त्यातून वेदना अखंडपणे चालूच राहतात. शरीर असं अखंड वेदना पेरत असताना तुमचं मन शाबूत असणं गरजेचं असतं.. ते कोसळत राहिलं तर मग तुम्हाला शारीरवेदनेतून कुणीच बाहेर काढू शकत नाही. माझा कर्करोग इतका बळावला होता की त्यातून माझं वाचणं म्हणजे चमत्कार होता, असं डॉक्टरही म्हणाले..

२०१२ ते २०१५..! माझ्या उमेदीची ३ वर्षे मी कर्करोगाशी झुंज दिली.. पण परमेश्वराची कृतज्ञ आहे मी, त्याने मला हे आक्रमण परतून लावण्यास भाग पाडलं..

या ३ वर्षांत माझं चित्रपट करिअर संपुष्टात आलं. कर्करोगावर उपचार घेत असतानाही मनात अनेक विचार येत असत.. ‘मी बरी झाले तरी पुढे काय करणार आहे? माझ्याकडे आता चित्रपट नाहीत, माझं कसं होणार?  माझेच विचार मला निराश करत होते.. पण त्याच

वेळी एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली, ‘सर सलामत तो पगडी पचास.’ आधी जिवंत असणं गरजेचं होतं..

एक प्रकारे कर्करोग माझा गुरू ठरला.. आयुष्य कसं असावं आणि कसं असू नये हे मला कर्करोगने शिकवलं.. जगणं हा उत्सव आहे.. ते जगताना त्यात असोशी असली पाहिजे.. हे लक्षात येत गेलं आणि कर्करोगाने एका नव्या मनीषाला जन्म दिला.. कर्करोगाने मला जगायला शिकवलं.. माझे हे सारे अनुभव मी ‘हीलिंग’ या माझ्या पुस्तकात मांडले आहेत.. हेतू हाच की आयुष्याच्या कुठल्याही गाफील क्षणी कर्करोग आपल्यावर झडप घालतो, ती घालण्यापूर्वीच कर्करोगला हद्दपार करायला हवं.

मी पूर्ण बरी झालेय.. पुन्हा करिअर सावरतेय. अनेक वर्षांनी मी ‘माया’ हा चित्रपट केला.. त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.. पण २०१८ मध्ये ‘संजू’ या चित्रपटात

नर्गिस दत्त यांची व्यक्तिरेखा केली.. या चित्रपटाला उत्तम यश लाभलं..

कर्करोगने मला आमूलाग्र बदलून टाकलं..

आता आयुष्याकडे वेगळ्या नजरेने बघते आहे. म्हणून सांगावंसं वाटतं, जीवनातल्या पूर्वी क्षुल्लक वाटणाऱ्या किंवा किरकोळ भासणाऱ्या गोष्टींमधला आनंद घ्यावा, शोधावा. अगदी वाऱ्याची थंड झुळूकदेखील मोठा आनंद देऊन जाते.. पहाटे सहज ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट, प्रात:कालचं कोवळं ऊन घेणं, सूर्योदय, सूर्यास्त पाहणं, संथ वाहणारी नदी, सागराच्या लाटांचा नाद सारं अनुभवावं. अशा कित्येक नैसर्गिक गोष्टींत अपरिमित आनंद असतो, पण आपण ते कधीही ध्यानात घेत नाही. मी कर्करोगमुक्त झाले आणि माझा जणू पुनर्जन्म झाला..

आज निसर्गाच्या विविध रूपांचा आनंद किती आणि कसा घेऊ  असं होतं मला.. मी वारंवार निसर्गरम्य स्थळी धाव घेते.. गवतावरचा अनवाणी पायांना होणारा स्पर्श किती मखमली असतो हे मला नव्यानं जाणवू लागलंय.. थंडगार हवेत, गवतावर पहुडून आकाशातील असंख्य तारका न्याहाळणं हा माझा अलीकडचा छंद झालाय. असं वाटतं जी संधी मला ईश्वराने आता दिलीये ती मी भरभरून श्वासांत घ्यावी.. जगून घ्यावा पुन्हा पुन्हा हा क्षण.. उद्याचा सूर्योदय मला दिसेल अथवा नाही याची शाश्वती नाही, पण निसर्गाची उधळण, त्याचं लेणं, निसर्गाचे विविध आविष्कार माझ्या यापूर्वी का नाही लक्षात आले? निसर्गाच्या मौनाचं अस्तित्व असतं हे यापूर्वी माझ्या कसं लक्षात आलं नाही..

पण आता ते आलंय .. आयुष्य पुन्हा समरसतेने जगतेय.. शुभेच्छा असू द्या!

कर्करोग झालेल्या किंवा कर्करोगमुक्त रुग्णाने आहारात काही गोष्टी ठेवाव्यातच. पानकोबी, ब्रोकोली, टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, पालक, कच्च्या हळदीचं लोणचं, आल्याचं लोणचं, अ‍ॅव्हॅकॅडो, स्ट्रॉबेरी, संत्री नियमित खावीत. तंबाखू, मद्य पूर्णत: टाळावे. आपला आहार सकस, आरोग्यपूर्ण असावा. योगाभ्यास, प्राणायाम दैनंदिन जीवनात करावेत. धावपळीची जीवनशैली टाळावी – किमान आटोक्यात आणावी.

शब्दांकन – पूजा सामंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 12:18 am

Web Title: article on cancer struggle stories by manisha koirala abn 97
Next Stories
1 ..खूप काही देऊन गेला
2 जीवन विज्ञान : श्रेयस आणि प्रेयस आहार
3 पुरुष हृदय ‘बाई’ : पुरुष : माणूसपणाच्या वाटेवरचा..
Just Now!
X