नफिसा अली-सोढी

chaturang@expressindia.com

माझं दैनंदिन आयुष्य नेहमीच धावपळीचं गेलं. माझ्या विवाहाआधी माझं शिक्षण, कॉलेज, वाद-विवाद स्पर्धा, मिस इंडिया स्पर्धेची तयारी, पुढे माझा सोढी यांच्याशी झालेला विवाह. त्यातून मातृत्वाची जबाबदारी.. एकामागोमााग एक वाढत गेल्या जबाबदाऱ्या. प्रपंच, दैनंदिन रहाटगाडगं हे अव्याहतपणे चालूच होतं, आणि नोव्हेंबरमध्ये (२०१८) पेरिटोनियल कर्करोगाचं निदान झालं. कळला तेव्हाच तिसऱ्या टप्प्यावर होता. पण औषधोपचार त्वरित सुरू केले आणि सकारात्मक वृत्ती कायम ठेवली. म्हणूनच आज मी माझे अनुभव मांडू शकतेय..

नोव्हेंबरमध्ये माझ्या पोटात दुखू लागलं होतं.. या वेदना मी आणि माझ्या कुटुंबीयांनी नेहमीच्या समजून किरकोळ उपचार सुरू केले. पण उतार पडत नव्हता. शेवटी रेडिओलॉजिस्टकडे गेलो, मग सीटी स्कॅन, काही इंजेक्शन्स हे सुरू झालं, पण पोटदुखी थांबली नाही.. आधी डॉक्टरांना अपेंडिक्स वाटलं, मग त्यावर उपचार केले. दुखणं जरा कमी झालं, पण पुन्हा वाढलं. मग अल्ट्रासाऊंड केलं.. डॉक्टर जनरल वेणू नायर, डॉक्टर गीता यांचे उपचार सुरू होतेच, सोनोग्राफी करून घेतली.. एकामागोमाग दुसरी.. चाचण्यांवर चाचण्या.. हे चक्र थांबत नव्हतं. ओटीपोटावर लक्ष केंद्रित केल्यानंतर अथक तपासण्यांनंतर डॉक्टर जुल्का, डॉक्टर नितेश रोहतगी या दिल्लीच्या डॉक्टरांनी कर्करोगाचं निदान केलं. यामुळे कर्करोगाचं निदान होण्यात खूप वेळ वाया गेला. जेव्हा कळलं तेव्हा तो तिसऱ्या टप्प्यावर होता. केमोथेरपीच्या काही सेशन्सनंतर माझ्यावर झालेल्या सर्जरीमध्ये ओव्हरीज, अपेंडिक्स, युटरस सगळे अवयव काढून टाकण्यात आले.

कर्करोग हा असाध्य नक्कीच नाही आणि त्याचं निदान, त्यावरील उपचार जितके लवकर सुरू कराल तितक्या लवकर तो बरा होतो. सध्याच्या काळात कर्करोगाला फार घाबरू नये, पण दुर्लक्षही करू नये. मला कर्करोग झालाय याबाबत मी गुप्तता न बाळगता त्याविषयी जाहीरपणे बोलले. कारण कर्करोगाची लक्षणं जी मला समजली नाहीत आणि काही प्रमाणात मी गाफील राहिले तसं इतरांबाबत होऊ  नये, असं मला नेहमी प्रकर्षांने वाटत राहिलं. संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या स्त्रिया स्वत:च्या आरोग्याबाबत खूपदा उदासीन असतात. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे, याबाबत प्रत्येक स्त्रीने दक्ष राहिलं पाहिजे..

अधिकाधिक स्त्रियांनी सजग आणि जागरूक व्हायला हवं आहे म्हणून मी माझ्या कर्करोगाबाबत उघडपणे बोलू लागले, व्यक्त होऊ  लागले.. वयाच्या ६१व्या वर्षी माझ्या कर्करोग उपचारांच्या केमोथेरपीचे तीन राऊंड्स पूर्ण झालेही आणि गेल्या वर्षी याच फेब्रुवारीमध्ये माझ्यावर सर्जरी आणि पुन्हा केमो सायकल्स सुरू झाल्यात.. एकूण केमोथेरपीचे सहा सेशन्स मला उपचार म्हणून करावे लागलेत.. या उपचारांनंतर मला इतका थकवा जाणवू लागला होता की, एक पाऊल टाकणं कठीण होतं.. त्या वेळी एक क्षणभर नक्की वाटलं, झालं.. सगळं संपलं आता! मला माझ्या पायांवर उभं राहणं शक्य नाहीये. अधू अवस्थेत मी कशी राहू?

कर्करोग बरा होण्यासाठी केमोथेरपी अत्यावश्यक मानली जाते मेडिकल सायन्समध्ये! या केमोची सगळ्यांना भीती वाटते, जे साहजिक आहे.. केमो उपचारांमध्ये बहुतेकांचे केस गळू लागतात, केसांना कंगवा लावणं नकोसं होतं, जसं ते माझ्याबाबतही झालं! केसांचे पुंजके हातात येऊ  लागले.. त्या काळात माझ्याकडे २-३ चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. डेट्सही देऊन बसले होते, शूटिंग सुरू करावं म्हटलं तर डोक्यावर केस उरले नव्हते. मी नाव घेत नाहीये, पण मी विग वापरावा, असं जेव्हा सांगण्यात आलं, तेव्हा मी ठामपणे विग वापरण्यास नकार दिला. माझ्या केशविरहित अवतारामुळे मला काम अजिबातच मिळणार नाही, असं बहुतेकांनी सांगितलं. पण मला कर्करोग झालाय हे मला दडवून ठेवायचं नव्हतं, समस्त स्त्रियांना हे दाखवून द्यायचं होतं, कर्करोग झाला म्हणजे आयुष्याचा पूर्णविराम होत नाही.. कर्करोग म्हणजे असाध्य असं आता नाही, तो त्रासदायक आहे, पण त्याचा सकारात्मकतेने धीर- संयमाने सामना केल्यास तो समूळ नाहीसा होऊ  शकतो, इच्छाशक्ती दृढ हवी हे मला जर समस्त स्त्रियांना दाखवून द्यायचंय, पण चित्रपटासाठी विग लावणं, कृत्रिमपणे वावरणं मला पटत नव्हतं. आणि हो, मला कर्करोग झालाय ही माध्यमांसाठी ब्रेकिंग न्यूज ठरण्याआधी मी ‘ट्विटर-इन्स्टा’ आणि ‘फेसबुक’च्या माझ्या अकाऊंटवरच मला कर्करोग झाल्याचं मीच घोषित केलं. केमो घेताना केस खूप गळतात हे खरंय, पण पुढे ते येतातही. माझ्या डोक्यावरचे केस पुन्हा छान आलेत.

मला असं प्रकर्षांनं जाणवतंय की, हल्ली कर्करोगचं प्रमाण वाढतं आहे, पण त्यासाठी आपले पूर्वज जी स्वत:ची काळजी घेत असत ती आपण घेत नाही. कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरात रोगप्रतिकारकशक्ती असली पाहिजे. गुटखा, मद्य, तंबाखूचं सेवन समाजात वाढलं आहे, ही गंभीर बाब आहे. जंक फूड कायमच दूर ठेवायला हवं. पुदिना, कोथिंबीर, गूळ, मध, तुळशी, हळदीचा वापर दैनंदिन जीवनात असावा. ताज्या भाज्या-फळं नेहमी असावीत आहारात.

मी कर्करोगमुक्त झालेय कारण माझ्या कुटुंबानं मला मोलाची साथ दिली. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांत मी यातून मुक्त झाले. आता मी मला अनुरूप अशा भूमिकांच्या शोधात आहे.. पण, त्याहीपेक्षा मी जीवनोत्सव साजरा करतेय.. अगदी मनापासून!

शब्दांकन- पूजा सामंत