सोनाली जोशी

sonaliprj@gmail.com

खरं तर कर्करोग हा शब्द माझ्या आयुष्याच्या कॅमेऱ्यामध्ये ‘कॅप्चर’ होईल आणि मला त्याच्याकडे इतक्या वाइड अँगलनं बघावं लागेल असं कधी वाटलं पण नव्हतं. मी व्यवसायाने एक कलावंत, कलाशिक्षक, आर्ट थेरपिस्ट, एक स्वच्छंदी फोटोग्राफर आणि त्याही पलीकडे.. एक बॉर्न फायटर!

आज या क्षणी भूतकाळात मागे वळून पाहिलं तर जाणवतं की माझं आयुष्य कधी सर्वसामान्य माणसासारखं गेलंच नाही. आधी वडील, मग पती यांच्या नोकरीच्या जागी सततच्या होणाऱ्या बदल्यांनी आधी गाव फिरले, मग देश बदलले. बारा गाव व बारा देशांतलं पाणी प्यायले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे आयुष्यात येणारे व होणारे अचानक बदल याची जणू सवयच होऊन गेली होती. माझं कलाकाराचं मन आयुष्यातले हे नवीन बदल कधी ब्रश तर कधी लेखणी तर कधी कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्यक्त होत होते.. निसर्गाशी मुक्तसंवाद साधत ते बदल टिपत होते.. त्यातच कला आणि मानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय. त्यात काम करायला मिळत होतं.  सततच्या येणाऱ्या आव्हानांना तोंड देताना आयुष्याच्या शब्दकोशात,  नाही.. येणार नाही.. जमणार नाही.. या शब्दांना स्थानच राहिलं नव्हतं. त्यात धाडसी आणि जिद्दी स्वभाव या सर्व गोष्टींना पूरकच ठरत होता.

अशातच नवऱ्याची टांझानिया येथे बदली झाली आणि वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करण्याची संधी चालून आली. वन्यप्राणी आणि त्यांच्या भावना हा माझ्या संशोधनाचा विषय, तो घेऊन मी जंगलांमध्ये काम सुरू केलं. सगळं सुरळीत चालू होतं पण काळाच्या उदरात काही वेगळंच लिहून ठेवलं आहे याची त्यावेळी कल्पनाही नव्हती. सर्दीचं निमित्त झालं. गळ्यावर गाठ आली. टांझानियात निदान करणं शक्य नसल्यानं भारतात परतले, चाचण्या झाल्या आणि निदान झाले ते.. कर्करोगाचं!

कर्करोग.. नाव ऐकताच काळजाचा ठोका चुकला, पायाखालची जमीन सरकली, एका क्षणात उठलं ते फक्त विचारांचं प्रचंड काहूर. मीच का? माझं काय होणार? माझ्या कुटुंबाचं काय होणार? मुलांचं कसं होणार? माझं काम थांबणार का? असंख्य प्रश्न आणि पुढे वाढून ठेवलेलं दिशाहीन भरकटलेलं अंधारमय भविष्य..! अन् अशा कमजोर क्षणी मनाचा ताबा घेतला तो माझ्याच कणखर मनानं.. मन सांगत होतं, तू दुबळी नाहीएस, आजपर्यंत तू जे निसर्गातून शिकलीस, ते वापरायची वेळ आलीए.. कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी जणू हा निसर्गच माझ्या मदतीला धावून आला. जणू तो मला सांगत होता, ‘‘बघ जरा नीट. वादळ माझ्या इथेही होतात. पण कितीही मोठं वादळ आलं तरी वादळात काही झाडं उन्मळून पडतात तर काही वाकतात, पण वादळ गेलं की परत ताठ उभी राहतात.. माहिती आहे का? कारण त्यांची मुळं जमिनीला घट्ट धरून ठेवतात. अगं वेडे, अशी हतबल काय होतेस. तुझं मन ती मुळं आहेत. घट्ट धरून ठेव आणि हे वादळ शमण्याची वाट बघ..’’ खरंच संपूर्ण लढायची एक नवीन उमेद.. जगण्याचा एक नवीन मार्गच देऊन गेला हा निसर्ग मला.

.. आणि खरंच, शांतपणे विचार केला, तर काय खोटं होतं त्यात? मी जर निसर्गाचाच एक भाग असेन तर निसर्ग जसा बदलतो तसा बदल माझ्याही आयुष्यात होणारच की.. आजपर्यंत हिवाळ्यातला उबदारपणा अनुभवत होते. आता कर्करोगरूपी उन्हाळा आयुष्यात आलाय.. या उन्हाळ्यात झाडाची जशी अवस्था असते.. ते वाळतं..पानगळ होते..पुन्हा पालवी फुटते.. उपचार घेताना माझंही तसंच काहीसं होणार, पण हा उन्हाळा कायम न राहता पुन्हा पावसाळाही येणारच ना.. नवीन आयुष्य मिळणारच, पालवी फुटणारच.. पुन्हा माझं आयुष्यरूपी झाड टवटवीत होणार.. बहरणार…कारण निसर्गातही कायम एकच ऋतू राहात नाही. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. आणि आपल्याही आयुष्याचा. आणि मग कात टाकल्यासारखं मी फोटोग्राफर म्हणून टांझानियाच्या जंगलामध्ये काम करताना असे एक नाही तर अनेक प्रसंग कॅमेऱ्यात टिपले आणि मनाच्या कॅमेऱ्यातही..

उपचार सुरू झाले.. शस्त्रक्रिया.. किमो.. रेडीएशन अशा चक्रातून फिरत असताना होणारा शरीरिक व मानसिक त्रास बरेच वेळा हतबल करायचा.. उदास करायचा.. जगण्याची उमेद हिरावून घ्यायचा.. पण  तोपर्यंत मी या जंगलाच्या विश्वात इतकी हरवून गेले होते की, मला माहीत होतं, याचंही उत्तर मला हे जंगलच देणार..आणि त्याने ते दिलंही.  ते शिकारीच्या प्रसंगातून. सिंह कायम बलाढय़, शक्तिवान, जंगलचा राजा.. अफाट ताकदीचा, त्याच्यापुढे हरीण ते काय बिचारं करणार? जेव्हा हा जंगलचा राजा शिकारीस निघतो तेव्हा सहज वाटतं की हरणाची शिकार होणारच.. पण हरीण कितीही बिचारं, कमी ताकदवान असलं तरी जर ते विरुद्ध दिशेला जीव खाऊन धावत सुटलं तर त्याची शिकार होत नाही, ते वाचतंच. थोडक्यात काय, तर जर तुम्हाला जगायचं असेल तर संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि हातपाय गाळून बसाल तर हा कर्करोगरूपी सिंह तुम्हाला खाणारच.. मग तुम्ही ठरवा संघर्ष करायचा का हतबल व्हायचं? निसर्ग मला असं बळ देत होता..

हे सारे उपचार चालू असताना डॉक्टरांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं, उपचारामधे येणाऱ्या अडचणी, होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल समजवून घेताना या आजाराशी असलेल्या आपल्या शारीरिक लढय़ाबरोबरच मानसिक लढा मोठा आहे हे उमगलं आणि माझं दुसरं शस्त्र बाहेर आलं ते कलेचं. आत्तापर्यंत कला आणि मानसशास्त्र यात मुलांबरोबर काम केलं होते. डिसलेक्सिया, स्लो लर्नर्स, हायपर अ‍ॅक्टिव्ह मुलांवर कलेच्या माध्यमातून काम केलं होतं. पण याच काळात मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला तो कलेकडे केवळ मनोरंजनाचं माध्यम म्हणून न बघता एक उपचार पद्धती म्हणून बघण्याचं. यातूनच सुरू   झाला नवा अभ्यास.. आर्ट थेरपीचा उपयोग कर्करोगाच्या रुग्णांना कसा करता येईल याचा.

कला हे भावना व्यक्त करण्याचं मुक्त साधन. अनेक प्रकारच्या भावना आनंद, दु:ख, भीती, उदासीनता, राग, प्रेम हे कलेच्या माध्यमातून शब्दांशिवाय व्यक्त करता येतात. पण आपण सर्वसामान्य माणसं एकदा का व्यावहारिक जगाच्या रहाटगाडग्यात आडकलो की कलेची, आपल्या आवडीनिवडीची साथच सोडून देतो आणि धावत राहातो, या स्पर्धामक युगात. कळत नकळत या नकारात्मक भावनांशी लढण्याचं साधनच हरवून बसतो आणि आपल्याच मनात सतत तयार होणाऱ्या या नकारात्मक भावनांना सकारात्मकतेकडे कशा पद्धतीने वळवायचे ते आपल्याला कळतच नाही. परिणामी मानसिक ताण वाढत जातो. आणि त्याचा परिणाम शरीरावर होतो. हे उमगलं.

क्लेवर्क, मंडला थेरपी, कलर थेरपी, कलर मेडिटेशन.. ठरावीक रंग वापरून रंगकाम करून घेणं, चित्र व रंग यांच्या माध्यमातून शब्दात व्यक्त न करता येणाऱ्या भावना व्यक्त करणं अशा अनेक आर्ट थेरपींचा शास्त्रशुद्ध अभ्यास याच उपचार काळात सुरू केला. अर्थातच हे सगळे प्रयोग मी आधी स्वत:च माझ्यावर केले आणि जाणवलं की रोग तर शरीराला झालाय मनाला नाही. मन भक्कम केलं तर त्यात इतकी ताकद आहे की, ते शरीरालाही भक्कम करण्यास मदत करतं. आणि कर्करोगासारखं आव्हानही पार करायला मदत करतं. मुख्य म्हणजे आर्ट थेरपीसाठी तुम्ही कलाकार असण्याची गरज नाही. कारण यात कलाकृतीपेक्षा कलानिर्मितीची प्रक्रिया जास्त महत्त्वाची असते. आणि ही आर्ट थेरपी कर्करोग रुग्णांचे उपचार घेण्याआधी, उपचारांदरम्यान व उपचार संपल्यावरही आयुष्य पूर्ववत होताना येणारे मानसिक अडथळे पार करण्यास नक्कीच मदत करते. जे मला समजलं.. उमगलं.. मिळालं.. ते माझ्यासारख्याच अनेक रुग्णांना मिळणं आवश्यक आहे. या ध्येयानं माझे पाय परत भारतात वळले.

नासिक शहराने माझ्या स्वप्नांना पुन्हा एकदा उंच भरारी घ्यायची संधी दिली. आज नासिकमधील बऱ्याच कर्करोग रुग्णांसाठी वेगवेगळ्या सपोर्ट ग्रुपमधून या थेरपीचा प्रसार करते आहे. अनेक रुग्णांना विषेशत: लहान मुलांना या थेरपीचा उपयोग करून द्यायची संधी डॉ. राज नगरकर यांनी ‘एच.सी.जी. मानवता कर्करोग सेंटर’ येथे उपलब्ध करून दिली. आणि परत एकदा एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.

आज जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून बघते तेव्हा जाणवतं, की माझाही कर्करोग माझ्याही आयुष्यात खूप उतार चढाव घेऊन आला, पण जाता जाता माझ्याजवळचं काही घेऊन न जाता खूप काही नवीन गोष्टी देऊन गेला. कर्करोग हा माझ्यासाठी शाप न ठरता जणू एक वरदानच ठरला. कारण मीही त्याला समजावून घेत त्याच्याशी दोस्ती करत त्यावर मात केली. याच काळात माझा ‘आर्टिस्ट ते आर्ट थेरपिस्ट’ हा प्रवास झाला व माझीच मला नव्याने ओळख झाली.

माझ्यासारख्या अनेक कर्करोग रुग्णांना मानसिकरीत्या भक्कम करून लढण्याची नवीन उमेद देण्याचा संकल्प करून माझी पुढील वाटचाल अशीच सुरू राहील, हे नक्की..