मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
ग्रामविकासाची कहाणी
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

कुणाची तरी, नाही तर कशाची तरी वाट बघत घरी थांबणं, घर सांभाळणं, हा चिरंतन ‘गृहिणीउद्योग’ त्या चौघी-पाची जणींच्या मागे लागलेला. आयुष्य, संसार कितीही पुढे जावो, त्या थांबलेल्याच! थांबणंही असं, की ज्याची कुणी नोंदही घेणार नाही; पण न थांबल्यास ओढवणारा गोंधळही कुणी थांबवणार नाही. साधं एक दिवस मैत्रिणींना भेटून गप्पा मारण्यासाठी वेळ ठरवता-ठरवता दमछाक होत होती. तेव्हा त्यातल्या एकीनं ‘व्वा’च्या वत्सलावहिनींना फोन लावला. त्यांचा प्रश्न चोख होता, ‘‘आम्ही गृहिणी वर्गातल्या बायका काय आयुष्यभर ‘सिंड्रेला’ असतो का?..’’

तसं बघायला गेलं तर फारच छोटी गोष्ट करायची होती. म्हणजे त्या चार-पाच मध्यमवयीन मैत्रिणींना कुठे तरी दोन-तीन तास एकत्र बसून मनसोक्त गप्पागोष्टी करायच्या होत्या. गप्पांसोबत गैरहजर मैत्रिणींबद्दल नको ते बोलणं, नको ते अरबट-चरबट खाणं ओघानं येणारच होतं; पण सर्वाच्या दृष्टीनं सोईची अशी एक वेळ ठरवताना दमछाक होत होती. पहिल्यांदा, सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्याला भेटायचं चाललं होतं, तर ‘मैत्रीण क्रमांक दोन’नं खोडा घातला.

‘‘ए.. सकाळी नको बाई, अकरा वाजेपर्यंत कामवाल्या बायांचा खोखो चालतो आमच्याकडे. एकीचा निरोप समारंभ की दुसरीचा स्वागत समारंभ..’’

‘‘मुलं घरी असतील तर बघतील ना.’’ एकीचा उपाय.

‘‘नको बाई. ती दार लावून ‘झुंबा’चे ऑनलाइन लेसन्स घेते आणि तो फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जातो.’’

वास्तविक ‘तिला’ लाइनीवर आणणं, दार उघडं ठेवून काय तो नाच शिकणं काही अशक्यप्राय नव्हतं; पण घराच्या तालावर नाचण्याच्या नादात क्रमांक दोननं तो पर्याय विचारातच घेतला नाही. ‘नको बाई’च्या घोकंपट्टीत नाश्त्याचा बेत बारगळला. मोलकरणी गमावत बाहेर बागडून यावं आणि घरात पाय ठेवताच ‘सहस्र भांडी दर्शन’ घडावं हा पर्याय कुणालाच कधी परवडला नसता. शिवाय किती झालं तरी मोलकरणी पगार घेऊन तरी चार-पाच घरची कामं करणाऱ्या. मालकिणी एकाच  घरचं काम करणार, तेही मोफत. त्यांच्या वाटेकडे डोळे लावून कोण बसणार?

मग जेवणाच्या वेळी एकत्र जमायचं ठरत होतं; पण ‘मैत्रीण क्रमांक तीन’नं नकारघंटा वाजवायला घेतली. तिच्या नवऱ्याचं ऑफिस घराच्याच आऊटहाऊसमध्ये होतं. तो म्हणे जेवायला घरी यायचा. दुपारी १ ते ३ या वेळेत तो केव्हाही आला तरी धर्मपत्नीनं (काल्पनिक) ओचापदर बांधून ‘इकडच्या स्वारी’ला ‘ऊनऊन’ जेवण वाढावं लागायचं. नाही तर स्वारी उपाशी राहायची. वास्तविक ‘चार्टर्ड अकाऊण्टंट’च्या उद्योगात सतत बसून दुसऱ्यांच्या नाना फिगर्स तपासता तपासता या स्वारीची खुद्द स्वत:ची ‘फिगर’ अशी झाली होती, की थोडं उपाशी राहणं फायदेशीर ठरलं असतं! पण मैत्रीण क्रमांक तीनच्या गळी हे उतरवणं सोपं नव्हतं. एखाद्या दिवशी ती जेवण वाढायला नसेल ,तर तो भाजी-आमटीऐवजी भांडय़ातल्या पाण्याशी पोळ्या खाईल, या भीतीनं तो स्नेहभोजनाचा बेतही बारगळला.

भेटीसाठी संध्याकाळचे ५ चालतील का ?.. यावर मग सुमारे १५ फोन आणि ३० मेसेजेस झाले; पण ‘मैत्रीण क्रमांक चार’ला मोठीच अडचण होती. तिच्या मुलाच्या ‘टय़ूशन’ची ती वेळ. त्याच्या शिक्षिका येत. त्यांना चहा देणं, मुलाला लक्ष देण्यासाठी दम देणं, बाहेरून शिट्टय़ा मारून बोलावणाऱ्या त्याच्या मित्रांना रोखणं, ही जबाबदारी तिचीच होती. संध्याकाळच्या ५ ऐवजी ४ वर वेळ खाली आणावी, तर ‘मैत्रीण क्रमांक एक’ला पाण्याचा पंप सुरू करायला तोच मुहूर्त होता. तेव्हा महानगरपालिका पाणी सोडायची. ते पंपानं गच्चीवरच्या टाकीत चढवण्याची जोखीम या मैत्रिणीचीच असे. घरात सगळ्यांना वापरायला पाणी लागे; पण पाण्यासाठी जीव सुकणार तो फक्त तिचाच. काळजाचं पाणीपाणी होणार फक्त तिचंच. मग ५ ऐवजी ६ वर वेळ थोडी खेचावी, तर कुणाच्या घरी सासूचा भजनाचा क्लास. दुपारी दोन-अडीचपर्यंत खाली घसरावं, तर कुणाकडे तरी नेमकं ‘अ‍ॅमेझॉन’वर काही तरी मागवून ठेवलेलं. अशा एकामागून एक ‘दुर्घट’ समस्या सगळ्यांसमोर ठाकलेल्या!

मुलं, नवरा, पाहुणारावळा, गडी-नोकर, पोस्टमन-कुरिअरवाला, प्लंबर-सुतार, महापालिकेचं पाणी- महावितरणची वीज, खिडकीवर बसणारा कावळा, बाहेरच्या पाइपावरून घरात घुसणारा उंदीर हे सगळे आपापल्या मर्जीनं केव्हाही घरात येऊ-जाऊ शकत होते. घरच्या बाईला मात्र तशी परवानगी मिळणं कठीण होतं. अंगानं सुटलात तरी चालेल, बंधनातून सुटण्याची आशा नाही. कुणाची ना कशाची वाट बघत घरी थांबणं, घर सांभाळणं, हा चिरंतन ‘गृहिणीउद्योग’ मागे लागलेला. आयुष्य, संसार कितीही पुढे जावो, ही थांबलेलीच. असं थांबणं, की ज्याची कुणीही नोंद घेणार नाही; पण न थांबल्यास ओढवू शकणारा गोंधळ, घोटाळा कुणीही थांबवणार नाही.

दिवसातल्या सर्व घटिका अशा प्रकारे चाचपून झाल्यावर शेवटी ‘अमावास्येच्या किर्र्र मध्यरात्री पावणेदोन किंवा सव्वातीनला स्मशानातल्या पिंपळाखाली भेटायला जमेल का बायांनो?’ असं विचारण्याची वेळ आली, तेव्हा सर्वानी माफक बंडखोरी वगैरे करून शुक्रवार संध्याकाळी साडेपाच ते साडेसात अशी वेळ मुक्रर केली. ठरलं. आता या वेळेत भेटायचंच.

तरी ‘क्रमांक दोन’चे साडेपाच हे त्या दिवशी जरा उशिरानं- म्हणजे ६ वाजता वाजले. ती निघणार होतीच, तेवढय़ात तिच्या भाच्याच्या स्थळाची चौकशी करणारा फोन आला. एवढे दिवस लग्नासाठी रखडणाऱ्या भाच्याला आता तरी कुणी बायको मिळू शकते, ही शक्यता तिला गमवायची नव्हती. ती त्याच्या जन्म-लग्न कुंडलीचा फोटो ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर पाठवण्याच्या झटापटीत अडकली, तर ‘क्रमांक चार’ला साडेसहालाच परत जावं लागलं. तिच्या घरची व्यायामाची सायकल दुरुस्त करायला नेमका ७ वाजता माणूस येणार होता. आंघोळ केल्यानंतर ओला टॉवेल वाळत घालायला तिला ती सायकल फार उपयोगी पडायची. तासचे तास ओला जड टॉवेल वाहिल्यानं त्या सायकलचाही थोडा व्यायाम व्हायचा.

सुरुवातीच्या गळाभेटी आणि ‘गरीब बिचारी मी’ची आळवणी झाल्यावर त्या गरिबीचेच एकेक पदर उलगडले गेले. गोड तक्रारी ते हताशा.. निराशा.. उद्विग्नता.. त्रागा.. वगैरेंचे!

‘‘मला मुळी हे कळतच नाही.. आपलंच असं का होतं?’’

‘‘आपण मनात आलं की सरळ चपलेत पाय सरकवून घराच्या बाहेर का पडू शकत नाही?’’

‘‘आपणच सवयी लावल्या, आपण मूर्ख होतो.’’

‘‘‘विवाहबद्ध’ होणं हा शब्द आपण नको इतका सीरियसली घेतला. आपण संसारात पडलो.’’

‘‘पडलो म्हणजे काय? तोंडघशीच पडलो. पहिला मुलगा झाल्यावर नोकरी सोडली मी. माहितीये?’’

‘‘माझी बदली केली होती कंपनीनं. पण यांनी पोरंबाळं सोडून कुठे गाव सोडताय? म्हटल्यावर मी दिला बाई राजीनामा. पुढे नवरा मात्र सहा वर्ष दुबईत एकटा राहिला.. मी घरीच बसले- मुलं, घरदार सांभाळत.’’

‘‘आमच्या सासरचे लोक खेडवळ सगळे. कुणीही केव्हाही आलं तरी घरात चारीठाव जेवण मिळायला हवं म्हणे. मी म्हणायचे, ‘स्टार हॉटेलं’सुद्धा ठरावीक वेळी बंद होतात म्हणावं.’’

‘‘आताच्या मुली आपल्यापेक्षा शहाण्या ठरल्या. वट्ट वाजवून घेतात आपल्या करिअरचं नाणं.’’

‘‘असेल.. पण कामावरून घरी आल्या की त्यांच्याही अंगावर घर, संसार कोसळतातच. सगळे जसे वाटच बघत असतात, ती घरी कधी येत्ये आणि सगळं उरावर घेत्ये याची.’’

जमल्यावर सगळ्यांनी खा-खा खाऊन पोटं जड करता-करता मनं हलकी केली. शिक्षण, नोकरी, करिअर, कोणत्याही टप्प्यावर असो, संसारात खेळल्या जाणाऱ्या चेंडूंचा शेवटचा टप्पा नेहमी घरच्या बाईच्या पायाशीच पडणार. काय तो उचलावा, झेलावा, अडवावा, पुसावा तो फक्त तिनंच. लाथाडून चालतं होण्याला मात्र संसाराच्या ‘पिनल कोड’मध्ये परवानगी नाही!

तरी बरं, कुणाचीही हलाखीची परिस्थिती नव्हती. सगळ्या सुखवस्तू. उद्याच्या जेवणाची जराही चिंता नसणाऱ्या. तरीही स्वत:चा खात्रीचा मोकळा वेळ सहजासहजी काढू न शकणाऱ्या. काढलाच तर कुणाला तरी त्याचं समर्थन द्यावं लागणाऱ्या. ‘कुणाला तरी’मध्ये त्या स्वत:ही आल्याच. आइस्क्रीम चापत असूनही या विचारानं सगळ्यांची तोंडं कडू झाली आणि हे नुसतं आपापसात बोलून फार उपयोग नसतो, आता कोण त्या वत्सलावहिनी निघाल्याहेत त्यांनाच विचारून बघू या, असं म्हणून त्यांच्यापैकी एकीनं सरळ ‘व्वा’ हेल्पलाइनला फोन लावला.

‘‘वत्सलावहिनी.. आम्हा सर्वानाच एका समस्येवर उतारा हवाय हो..’’

‘‘बोला. मी तुम्हाला काय मदत करू शकते?.. मात्र आम्ही एका वेळी एकच केस  घेतो हं!’’ वत्सलावहिनी.

‘‘नाही नाही.. इथे आम्हा सर्वाची केस सारखीच ‘होपलेस’ आहे. एकत्र घेतलीत तरी चालेल.’’ सगळ्यांनी कलकलाट केला.

‘‘समस्येवर लवकर या मॅडम..’’ वहिनी ‘प्रोफेशनली’ म्हणाल्या.

‘‘मग ऐका. म्हणजे सांगा.. आम्ही गृहिणी वर्गातल्या बायका या आयुष्यभर ‘सिंड्रेला’ का असतो?’’

‘‘काय सांगता? अजूनही सावत्र आईचा जाच?’’

‘‘नाही हो. सतत कोणत्या ना कोणत्या अदृश्य घडय़ाळाच्या तालावर चालण्याचा जाच. मग घरात कितीही माणसं असोत, लग्नाला कितीही वर्ष झालेली असोत, धरसोड चालेल, पण घरसोड चालणं कठीण. चिमुकल्या

‘१ बीएचके’पासून ‘टोटल संस्कृती पॅकेज’ सांभाळण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या बाईच्याच!’’

‘‘तुम्ही काळाच्या मागे पडलाहात का? आताच्या पुष्कळ करिअरवाल्या बायका मुळीच लावून घेत नाहीत संसाराची खेकटी. मस्त मोकळ्या असतात बाहेरची आव्हानं पेलायला..’’

‘‘असं फक्त बाहेरून बघणाऱ्यांना वाटतं. त्यांच्यात खूप जणींना अपराधगंड असतो. आपण अपुरं पडल्याची भावना असते. त्यांची तशी चुकामूक.. आमची अशी! म्हटलं तर आम्हीही काही कमी पडलो नसतो करिअरमध्ये..’’

‘‘शक्य आहे; पण घरं चांगली चालवणं, आल्या-गेल्याला आधार, सुरक्षा देणं, तोंड भरून ‘या’ म्हणणं, आपल्या मागे आपलं घर आवरून सावरून आपली वाट बघत असेल हा विश्वास.. त्याला काहीच महत्त्व नाही?’’

‘‘आहे.. असेल.. म्हणजे असायला हरकत नाही.. पण ते काय ‘प्रमोशन्स’, ‘पोस्ट्स’ देणारं करिअर आहे?  इथे म्हणजे साधं कौतुकसुद्धा येत नाही वाटय़ाला.’’ एक जण मनापासून म्हणाली. ‘‘जरा थांबा. एकसष्टी किंवा पंचाहत्तरी गाठा, की समारंभात उदंड होईल कौतुक. त्यापूर्वी बायकांचं कौतुक वगरे करायचं नसतं आपल्यात!’’ वत्सलावहिनी म्हणाल्या.

‘‘म्हणजे आम्हाला कसली आशाच नाही म्हणायची.’’

‘‘प्रयत्न करून बघा. आपली वेळ झाली की चालायला लागण्याचा. पाहुण्याला बंद कुलपासमोर उभं राहायला लावण्याचा.’’

‘‘छे छे! किती झालं तरी आपलीच माणसं.. आपलाच लिप्ताळा. त्यांची कुठे गैरसोय करा?’’

‘‘हे असं असतं तुमचं. तुमचा जीव ज्यात-त्यात अडकणार. मग तुम्ही कशा सुटणार?.. मग भोगा आपल्या कर्माची फळं!’’

‘‘तुम्ही शाप द्यायला बसता की सल्ला द्यायला? काही तरी आशावादी सांगा ना.’’

‘‘सांगते. तुम्ही स्वत:च स्वत:ची पदं, पोस्ट्स वगरे ठरवा. मुलं लहान असताना म्हणा, मी ‘चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर’ आहे. मोठा प्रपंच हाकत असाल तर स्वत:लाच म्हणून घ्या, ‘सीईओ, अ‍ॅडमिन’, मुलांची लग्नं जमवत असाल तर म्हणा मी ‘ह्य़ूमन रिसोर्स डेव्हलपमेंट’ची ‘लायझनिंग पर्सन’ आहे. घरात आजारपणं काढावी लागली की म्हणायचं, ‘हेल्थ एक्झिक्युटिव्ह’. तशा तर तुम्ही रोज एक ‘एनजीओ’ चालवताच! सणावारांची तयारी करता तेव्हा ‘प्रोग्रॅमर’ असता. नवरे खर्चीक असले (म्हणजे ते असतातच) की तुम्ही होता ‘फायनान्स कंट्रोलर’. वाट्टेल तेवढय़ा पोस्ट्स घेता येतील. वचने किं दरिद्रता?..’’

वत्सलावहिनी भलत्याच सुटल्या होत्या. त्यांना समस्या सोडवता आली नसली तरी घटकाभर या बायांची ताणातून सुटका करता आली होती. ‘हेल्पलाइन’नं दिलेली इतपत ‘हेल्प’ त्यांना पुरेशी होती! मनात मात्र प्रश्न होते.

आता या पुढे एकमेकींना फोन करताना कोण बोलतंय म्हणून सांगावं?.. ‘जी. एम. एक्स्टर्नल अफेअर्स’?.. की ‘डेप्युटी चीफ ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’?