17 January 2021

News Flash

आमचा ‘काको’!

‘काको’ उपक्रमानुसार प्रत्येक घरात मुलांसाठी एक ‘कामाचा कोपरा’ करायचं ठरवलं.

रती भोसेकर

शिक्षिका

एका विशिष्ट लयीत जगणारे आपण  मार्चनंतर निराळ्याच जगात गेलो. ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर मुलांचं काय करावं.. विचारांचं चक्र जोरात चालू झालं. पण ‘स्क्रीन’वरच्या ऑनलाइन शिक्षणाचा मात्र अजिबातच विचार नव्हता, तर त्यापलीकडे जाऊन मुलांशी घट्ट नातं जोडून थांबलेला संवाद आम्हाला सुरू करायचा होता.

त्यातून जन्म झाला आमच्या- म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट- पूर्व प्राथमिक विभागा’च्या ई-माहितीपुस्तिकेचा आणि त्यातील ‘काको’ उपक्रमाचा. आमच्या मुलांसाठी घराघरांतून आम्ही ‘काको’- ‘कामाचा कोपरा’ उपक्रम सुरू केला आणि बालशिक्षणाचं एक सुंदर विश्व घराघरांत उभं करण्याचा चंग बांधला. यासाठी मदतीला धावून आले, ते संपर्काचे परंतु कधी कधी कंटाळवाणे, वैताग वाटणारे ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट. हे व्हॉट्सअ‍ॅप गट पूर्ण क्षमतेनं पालक आणि वर्गशिक्षिका यांच्या शैक्षणिक संवादासाठी आणि समन्वयासाठी वापरायचं ठरवलं. बरोबर १५ जूनला आमची ई-माहितीपुस्तिका या गटांमार्फत पालकांपर्यंत पोहोचवली आणि सुरू झाला आमच्या ‘काको’चा सुंदर प्रवास.

‘काको’ उपक्रमानुसार प्रत्येक घरात मुलांसाठी एक ‘कामाचा कोपरा’ करायचं ठरवलं. त्याला ‘काको’ असं छानसं नाव दिलं. हा ‘काको’ मुलांनी पालकांच्या मदतीनं सजवायचा होता. त्या कोपऱ्यात पालक मुलांसाठी त्यांच्या वर्गताईनं दिलेली कामं करण्यास ठेवत आहेत. ही कामं म्हणजे आमच्या ई-माहितीपुस्तिकेतील मुलांच्या विकासकृतींवर आधारित विविध शैक्षणिक खेळ असतात. पालक हे खेळ वाचून मुलांबरोबर आपल्या सोयीनुसार आणि मुलांच्या ‘मूड’नुसार खेळ घेतात किंवा करायला सांगितलेली कामं करायला देतात. घराघरांत भाषा, गणित आणि इतर शैक्षणिक कृतींनी मुलांचे ‘काको’ सजले आहेत. ‘काको’मध्ये अक्षरं, अंक, लहान-मोठं, कमी-जास्त, जड-हलकं, रंग, आकार यानुसार घरातील वस्तू जमा होत आहेत. कागदकाम, फाडकाम, चिकटकाम, मातीकामाच्या कलाकृती आहेत. घरातील पुस्तकांचं छोटं बालवाचनालयही आहे. पालकांनी ‘शब्दचक्र’, ‘अक्षरचक्र’ अशा संकल्पना समजून घेऊन लावल्या आहेत. मुलांच्या आवडीच्या शब्दांची ‘शब्दपेटी’ आहे. या अशा भरपूर शैक्षणिक खजिन्यानं ‘काको’ भरलेला आहे. शिवाय विविध सण-उपक्रमांनुसारची कामंही मुलं ‘काको’त करतात.

मुलांसाठीचा हा प्रवास पालक आणि वर्गताई यांच्या सुसंवादातून होत आहे. यासाठी आमच्या विभागातला शिक्षकवर्ग अपार मेहनत घेतो. वर्गताई पालकांशी सतत संपर्कात राहातात. त्यांच्या अडचणी जाणून मदत करतात. दररोज पूर्णपणे घराशी जोडलेले नवनवे खेळ तयार करतात. यामुळे शाळा आणि घर यांच्यामध्ये भक्कम सेतूबांधणी होत आहे.याशिवाय मुलांसाठी रोज एक नवी गोष्ट ताई स्वत: रेकॉर्ड करून पाठवते. कारण ‘रोज एक गोष्ट’ असंही आमच्या ‘काको’साठी ठरलं आहे. ऐकलेल्या गोष्टींची छान चित्रं काढून मुलांनी ‘काको’त लावायची असतात.  बालशिक्षणात आमचा ‘काको’ आमच्या शाळेपुरता मर्यादित न राहाता सर्वत्र ‘अनुकरणीय’ ठरू शकेल असा सार्थ विश्वास आम्हाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:06 am

Web Title: article on children study in corona background article by teacher rati bhosekar abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 अर्थहीन जगण्यातला अर्थ
2 ज्येष्ठांचे लिव्ह इन : हात तुझा हातात..
3 व्यर्थ चिंता नको रे : जन्म : माणसाचा आणि अस्वस्थतेचा!
Just Now!
X