05 April 2020

News Flash

मानसिक उलथापालथीचा ‘करोना’

अतिसंवेदनशीलता कमी करणं- सध्या वर्तमानपत्रं, टीव्ही, प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं सर्वत्र फक्त ‘करोना व्हायरस’ हा एकच एक विषय आहे

(संग्रहित छायाचित्र)

डॉ अंजली जोशी

anjaleejoshi@gmail.com

आजघडीला ‘कोविड १९’ या  विषाणूबद्दलच्या प्रश्नांची निश्चित उत्तरं कुणापाशीच नाहीत. हा इतका सर्वदूर पसरला आहे की तो ‘जागतिक, सामाजिक, मानसिक’ आजार झाला आहे. करोनाची साथ जेवढय़ा वेगानं पसरत आहे, त्यापेक्षाही जास्त वेगानं या आजारामुळे निर्माण झालेल्या मानसिक उलथापालथीला आपण सामोरं जात आहोत. काय आहेत, साथीच्या आजाराच्या मानसिकतेची वैशिष्टय़ं.. कोणती काळजी घ्यायला हवी या काळात,  हे सांगणारा खास लेख.

आज ‘कोविड १९’ या विषाणूनं जगात हाहाकार उडवला आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगाला हादरवून सोडणाऱ्या या आजारानं उद्योगधंद्यांपासून ते जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरे दिले आहेत. सगळी जगरहाटीच ठप्प झाली आहे. गर्दीनं आणि ऊर्जेनं ओसंडून राहणाऱ्या शहरांच्या सर्व व्यवहारांना अचानक खीळ बसली आहे. ऑफिसमधले कर्मचारी घरून करता येणाऱ्या कामाशी जुळवून घेत आहेत. रस्त्यांवरची वाहतूक तुरळक झाली आहे. किराणामालाच्या दुकांनांव्यतिरिक्त इतर दुकानं ओस पडली आहेत. पुढं काय, भविष्यात काय होणार, व्यवहार सुरळीत कधीपासून होणार अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत.

या घडीला या प्रश्नांची निश्चित उत्तरं कुणापाशीच नाहीत. रोज नवीन अंदाज बांधले जात आहेत, तर्क-वितर्क लढवले जात आहेत. हा विषाणू कसा आहे, त्याची लक्षणं काय, प्रतिबंधात्मक काळजी काय घेतली पाहिजे, याची नवनवीन माहिती विविध माध्यमांतून आपल्यापुढं रोज येत आहे. या सगळ्या बाह्य़ व दृश्य गोष्टी घडत असताना एक चटकन दिसून न येणारी गोष्ट आपल्या सगळ्यांमध्ये घडत आहे. ती म्हणजे मानसिक उलथापालथ! करोनाची साथ जेवढय़ा वेगानं पसरत आहे, त्यापेक्षाही जास्त वेगानं या मानसिक उलथापालथीला आपण सामोरं जात आहोत. करोनासारखा जेव्हा एखादा साथीचा आजार येतो, तेव्हा त्या आजाराला तोंड देताना एकटय़ा-दुकटय़ा व्यक्तीच्या मानसिकतेत नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेत बदल घडतो. व्यक्तीच्या वैयक्तिक व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांवर ही सामाजिक वैशिष्टय़ं कुरघोडी करतात आणि समाजातले सर्वजण बहुतांशी समान भावना अनुभवतात व समान वर्तन करतात. याला म्हटलं जातं, ‘साथीच्या आजाराची मानसिकता’. सध्या जागतिकीकरणामुळं जग इतकं जवळ आलं आहे की ही मानसिकता एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित राहिली नसून ‘जागतिक सामाजिक मानसिकता’ असं व्यापक स्वरूप त्याला आलं आहे. ही मानसिकता काय असते याचा अभ्यास काही सामाजिक शास्त्रज्ञ करत आहेत. करोनासारख्या साथीच्या आजाराला हाताळणं जेवढं आव्हानात्मक आहे तेवढंच साथीच्या आजाराच्या मानसिकतेचे सामाजिक, मानसिक आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्यांना हाताळणंही आव्हानात्मक आहे.

साथीच्या आजाराच्या मानसिकतेची तीन प्रमुख वैशिष्टय़ं दिसून येतात. त्यातलं पहिलं वैशिष्टय़ म्हणजे भीती, संशय, अविश्वास, चिंता, हतबलता अशा नकारात्मक भावना क्रमाक्रमानं समाजमनावर स्वार होतात. जेवढी आजाराबाबत अनिश्चितता जास्त, तेवढय़ा अधिक वेगानं या भावना पसरत जातात. हा आजार आपल्याला होईल का, ही भीती तर असतेच पण आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार असेल की काय असा संशयही निर्माण होतो. परिचयातल्या व्यक्तींबाबतही अविश्वास निर्माण होतो. सध्या आपण सगळेच अनुभवतो की खोकणं किंवा शिंकणं या साध्या नैसर्गिक क्रियाही संशय निर्माण करतात. जर कुणी खोकत किंवा शिंकत असेल तर सगळे दचकतात व चार पावलं दूर जातात. व्यक्तीच नाहीत तर नेहमी सहजपणं हाताळली जाणारी दरवाजाची मूठ किंवा दिव्याची किंवा लिफ्टची बटणंही आता संशयाच्या फेऱ्यात अडकतात. या आजारावर खात्रीलायक औषध नसल्यानं येणारी हतबलता व त्यातून निर्माण होणारी चिंता समाजमनाला वेढून टाकते.

ही मानसिकता निर्माण होण्याचं कारण म्हणजे आजूबाजूच्या परिस्थितीवरचं आपलं नियंत्रण ढासळलं गेलंय असं वाटणं. आपल्या सभोवतालची परिस्थिती आपण बऱ्यापैकी नियंत्रित करू शकू, असं जोपर्यंत आपल्याला वाटत असतं तोपर्यंत साथीच्या आजाराची मानसिकता आपला कब्जा घेत नाही. पण या आजारामुळं इतकी अनिश्चितता निर्माण होते की परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाईल अशी भीती वाटते. त्यामुळं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण धडपड करतो. त्यातूनच अनेक वस्तूंचा भरमसाठ साठा करण्याची प्रवृत्ती वाढीला लागते. म्हणून आपल्याकडच्या किराणा मालाच्या दुकानांत तोबा गर्दी उसळलेली दिसते.

साथीच्या आजाराच्या मानसिकतेचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे पूर्वग्रहांना उधाण येतं. याचा अर्थ ठोस पुरावा नसताना एखाद्या समूहाबद्दल दूषित मत करून घेणं. साथीच्या आजाराला एखादा विशिष्ट समूह जबाबदार आहे, असं वाटून त्या समूहाबद्दल पूर्वग्रह जोपासला जातो. पूर्वी एड्सबाबत समिलगी लोकांबद्दल पूर्वग्रह जोपासला गेला होता. एबोलाच्या साथीत आफ्रिकी लोकांबाबत तर सध्या चिनी लोकांबाबत असे पूर्वग्रह जोपासले जात आहेत. लंडनमध्ये चिनी दाम्पत्यावर झालेला हल्ला याच पूर्वग्रहातून झाला होता. आपल्याकडेही असं सर्रास बोललं जातं की चिनी लोक काहीही खातात आणि जगाला वेठीला धरतात. अन्य संस्कृतीबद्दलचा भयगंड (xenophobia) यातून मूळ धरतो. पूर्वग्रहांची व्याप्ती फक्त संस्कृतीपुरती मर्यादित राहात नाही तर आजाराची बाधा झालेल्या व्यक्तींबाबत किंवा ती बाधा झाली आहे अशी शंका असलेल्या व्यक्तींबाबतही असे पूर्वग्रह जोपासले जातात. अशा अनेक घटना रोज घडत आहेत, की करोनाबाधित असल्याच्या संशयावरून काही जणांवर सामाजिक बहिष्कार घातला जात आहे.

साथीच्या आजाराच्या मानसिकतेचं तिसरं वैशिष्टय़ म्हणजे मानसिक आजारात होणारी वाढ. नकारात्मक भावनांच्या फैलावामुळं ही वाढ होते.  विशिष्ट नित्यक्रम उदा. स्वच्छतेच्या क्रिया पुन्हा पुन्हा करणं, त्याबद्दलच्या विचारांनी पछाडलं जाणं. यांसारख्या अनिवार्य कृती व विचार (obsessive-compulsive disorder) या आजारात दिसून येणाऱ्या वर्तनाचं प्राबल्य साथीच्या आजारात वाढतं. थोडा सर्दी, खोकला, ताप आला तर आपल्यालाही आजाराची लागण झाली आहे असे आभास होणाऱ्यांची तसेच चिंतेचे झटके (panic attack) येणाऱ्यांची संख्याही वाढत जाते. समाजातल्या काही लोकांपर्यंत मर्यादित असलेल्या या आजारांची लागण सामाजिक मानसिकतेमुळं पाहता पाहता अनेकांना होताना दिसते. समाजाचं मानसिक स्वास्थ्य त्यामुळं ढवळून निघतं.

पूर्वीच्या संशोधकांचं म्हणणं असं होतं की साथीचा आजार आला की लोक आत्मकेंद्री होतात. फक्त स्वत:च्या सुरक्षिततेचा विचार करतात व स्वत:च्या पदरात जास्तीत जास्त फायदे पाडून घेण्याचा प्रयत्न करतात. हल्लीच्या संशोधकांचं म्हणणं याच्या नेमकं उलट आहे. त्यांच्या मते, अशा वेळी सर्व लोक एकत्र येतात, समान भावना अनुभवत असल्याने त्यांच्यात सह-अनुभूती (empathy ) वाढते. ते एकमेकांची अधिक काळजी घेतात. आजाराला तोंड देण्यासाठी मतभेद विसरून एकत्र येतात. आपण एक कुटुंब असल्याची भावना त्यांच्यात रुजते. सामाजिक मानसिकतेची ही चांगली बाजू असली तरी या मानसिकतेमुळं समाजाच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचं पारडं बरंच जड आहे. जर आपण वैयक्तिक व सामाजिक पातळीवर प्रयत्न केले तर या दुष्परिणामांना आळा घालू शकतो व सामाजिक मानसिकता सुदृढ ठेवू शकतो. त्यासाठी पुढील प्रतिबंधक उपाय अवलंबता येतील.

अतिसंवेदनशीलता कमी करणं- सध्या वर्तमानपत्रं, टीव्ही, प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं सर्वत्र फक्त ‘करोना व्हायरस’ हा एकच एक विषय आहे. आपण त्याबाबत मानसिकदृष्टय़ा  इतके अतिसंवेदनशील झालो आहोत, की आपण आपल्या नकळत त्याबद्दलच जास्त वाचतो, तेच जास्त पाहतो, तेच जास्त ऐकतो, क्षणोक्षणी सावध राहतो, एकच एका विषयाची चर्चा करत राहतो. जणू काही आपण जीवनाच्या इतर बाजू विसरून गेलो आहोत. याचा अर्थ त्याकडे दुर्लक्ष करून बेफिकीर राहणं असं नव्हे, तर टोकाची संवेदनशीलता कमी करणं. आपल्या मानसिकतेत करोनाव्यतिरिक्त इतर विषयांनाही पुरेसा वाव दिला तर नकारात्मक भावनांच्या छायेतून आपण बाहेर येऊ शकतो.

अनिश्चिततेची सहनशीलता (Uncertainty tolerance) वाढवणं- आपल्या सर्वानाच निश्चिततेची व सुरक्षिततेची ओढ असते. परंतु अशाश्वती व असुरक्षितता या जीवनातल्या वास्तवाचा स्वीकार जर आपण सन्मुखतेनं केला तर अनिश्चिततेमुळं धास्तावून जाणार नाही. अनिश्चिततेची सहनशीलता वाढवणं म्हणजे तिच्यापासून पळ काढणं नव्हे तर तिला सन्मुखतेनं तोंड देणं होय. आपण कितीही काळजी घेतली तरी आजूबाजूच्या प्रत्येक धोक्यापासून आपली सुटका होणार नाही, हे लक्षात घेतलं तर अतिकाळजी घेण्याच्या सवयीतून सुटका होईल. सध्या प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी आपल्या प्रवासाच्या, खाण्याच्या, स्वच्छतेच्या, कामांच्या, करमणुकीच्या अशा सगळ्या सवयींत एकाएकी बदल करावा लागला आहे. पण अशी अनिश्चितता सदासर्वकाळ राहणार हे समजून घेतलं तर ही सहनशीलता वाढू शकते. अनिश्चिततेचे काही फायदेही असतात, हेही कळू शकतं. मुख्य म्हणजे अशी सहनशीलता  आव्हानांना तोंड द्यायला खंबीर करते.

विवेकी विचार करणं- साथीच्या आजारात आपण विघातक भावनांमध्ये वाहून जाण्याचा धोका जास्त असतो. मनाच्या अनिश्चित अवस्थेत या भावना मनावर कब्जा करतात. सध्या सर्वत्र करोनाच्या माहितीचा पूर आला आहे. पण विघातक भावनांचं आधिपत्य असेल तर त्यातल्या कुठल्या खऱ्या व कुठल्या खोटय़ा बातम्या आहेत हे ठरवणं कठीण जातं. त्यामुळं या आजाराबद्दल रोज पसरणाऱ्या अफवांना आपण बळी पडू शकतो किंवा प्रसारमाध्यमांतून फैलावणाऱ्या नकली औषधांचा वापर करण्याची मानससिकता रुजू शकते. विवेकानं विचार करण्याची सवय आपण लावून घेतली तर फक्त विश्वासार्ह माहिती स्रोतांवरच भरवसा ठेवू.

पूर्वग्रहांपासून दूर राहणं- पूर्वग्रहांमुळं आपला दृष्टिकोन संकुचित होतो. विचार एकारलेले होतात. हा एकारलेपणा वाढत गेला तर मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं. आपण स्वत:ला पूर्वग्रहांपासून जितकं दूर ठेवू, तेवढं आपलं मानसिक आरोग्य सदृढ राहतं.

‘कोविड१९’ मुळं जगात उलथापालथ झाली आहे हे खरं असलं तरी त्यामुळं होणारी मानसिक उलथापालथ आपण या उपायांनी कमी करू शकतो आणि सध्याच्या आव्हानाला समर्थपणे टक्कर देण्यासाठी एकदिलाने लढू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 1:18 am

Web Title: article on corona of mental reversal abn 97
Next Stories
1 तृषार्त जिण्याचा शाप?
2 गर्जा मराठीचा जयजयकार : माघार की मात?
3 हेल्पलाइनच्या अंतरंगात : आगीपासून संरक्षण
Just Now!
X