05 August 2020

News Flash

जीवन विज्ञान : पचनसंस्था -एक जैविक सयंत्र

आठ ते दहा वेळा अन्नाचा घास इकडून- तिकडे गेला पाहिजे आणि चावल्यामुळे निर्माण झालेला त्याचा रस हळूहळू गिळला पाहिजे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. स्मिता लेले

dr.smita.lele@gmail.com

तोंडामध्ये घास घेऊन जेव्हा चावण्याची क्रिया होते, तेव्हा इडलीचे पीठ करताना उडदाची डाळ आणि तांदूळ दळतात त्या पद्धतीने चावले जाणे आवश्यक असते. दाताच्या मदतीने घास थोडासा चावला जातो, पण दाढांच्या मदतीने अन्न रगडले जाते. दोन्ही बाजूंच्या दाढा जर शाबूत असतील तर जिभेच्या मदतीने अन्न डावीकडून उजवीकडे फिरवत राहिले पाहिजे म्हणजे सर्वात उत्तम प्रकारे त्याचे चर्वण होते. निदान

आठ ते दहा वेळा अन्नाचा घास इकडून- तिकडे गेला पाहिजे आणि चावल्यामुळे निर्माण झालेला त्याचा रस हळूहळू गिळला पाहिजे. सगळ्यात शेवटी तोंडात शिल्लक राहिलेला भाग गिळला पाहिजे.

प्रोबायोटिक म्हणजे नेमके काय हे पाहण्याआधी मानवी पचनसंस्था ही एखाद्या जैविक सयंत्राप्रमाणे कसे काम करते हे समजणे आवश्यक आहे. मानवी पचन- संस्थेमध्ये खाल्लेले अन्न कसे पचते हे शाळेत विज्ञान विषयात शिकवले जाते. खूप भूक लागली तर बका-बक खाऊ नकोस, छोटे घास घे, नीट चावून खा, असा उपदेश ऐकण्याची सवय मुलांना आहे. इंटरनेट माध्यमामुळे आहाराविषयी इतकी माहिती रोज वाचनात येते की, मेंदूमध्ये माहितीची जणू वाहतूक कोंडी होते. या लेखामध्ये पचन संस्थेची जैविक सयंत्राबरोबर तुलना करून एक थोडासा वेगळा दृष्टिकोन वाचकाला देण्याचा प्रयत्न केला आहे.

तोंडामध्ये घास घेऊन जेव्हा चावण्याची क्रिया होते, तेव्हा इडलीचे पीठ करताना उडदाची डाळ आणि तांदूळ दळतात त्या पद्धतीने चावले जाणे आवश्यक असते. दाताच्या मदतीने घास थोडासा चावला जातो, पण दाढांच्या मदतीने अन्न रगडले जाते. दोन्ही बाजूच्या दाढा जर शाबूत असतील तर जिभेच्या मदतीने अन्न डावीकडून उजवीकडे फिरवत राहिले पाहिजे म्हणजे सर्वात उत्तम प्रकारे त्याचे चर्वण होते. निदान आठ ते दहा वेळा अन्नाचा घास इकडून तिकडे गेला पाहिजे आणि चावल्यामुळे निर्माण झालेला त्याचा रस हळूहळू गिळला पाहिजे. सगळ्यात शेवटी तोंडात शिल्लक राहिलेला भाग गिळला पाहिजे. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर रवंथ करताना गायी, म्हशींचा जबडा हलतो ती क्रिया रगडण्यासाठी आवश्यक असते. खूप जणांना याची जाणीव नसते की अन्नाचा घास चावताना फक्त दात आणि दाढा नाहीत तर जिभेला एक काम दिलेले आहे. अन्नाचा घास गोळा केल्यासारखे इकडून तिकडे जसे हाताने पीठ दळताना करतो तसे काम जीभ करते. म्हणूनच खाताना कधी-कधी आपली जीभ चावली जाते. तसेच पानं, सुपारी, विडा किंवा चुना खाल्ल्यामुळे किंवा जिभेला काही कारणाने कातरे पडले असतील तर आपल्याला नीट खाता येत नाही. यावरून हे सिद्ध होते की खाण्याची क्रिया, चावण्याची क्रिया करताना दातांना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जिभेलासुद्धा आहे. केवळ चव घेणे हे एकच काम जिभेला नसून, खाण्याच्या क्रियेमध्येदेखील भाग घेण्याची जबाबदारी जीभेवर आहे. किंबहुना असे म्हणता येईल की आपल्या शरीरात असा कोणताही अवयव नाही ज्याला फक्त एकच काम दिलेले आहे. ‘मल्टीटास्किंग’ ही हल्लीची संकल्पना निसर्गाला चांगल्या प्रकारे कळलेली आहे. आपल्या प्रत्येक अवयवाला कमीत-कमी २ किंवा काही वेळेस ४ पेक्षा अधिक कार्ये सोपविलेली आहेत.

अन्नाचा घास तोंडात घालून त्याचे चर्वण होताना आकारमान कमी होते आणि पदार्थाचे लहान-लहान कण बनतात. लाळेतल्या एंझाइम द्रव्यांचा पिष्टमय अन्नावर परिणाम होऊन साखरेची निर्मिती होते. म्हणूनच पोहे, भाकरी असे पदार्थ नीट चावून खाल्ले तर गोड लागतात. अशा प्रकारे पचनाची सुरुवात तोंडात अन्न घास घ्यातल्यापासून होते. पुढे अन्न जठरामध्ये येते. जठर किंवा पोट ही एक स्नायूंची पिशवी आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (गॅस्ट्रिक ज्यूस) तयार झाला की आपल्याला भुकेची भावना होते. मागील लेखात जैविक घडय़ाळ म्हणजे काय हे आपण पाहिले. जठरासाठी अशा प्रकारे संगणक प्रोग्राम असलेले दैनिक चक्र ठरावीक वेळेला भूक लागावी म्हणून सूर्याच्या गतीप्रमाणे नैसर्गिकरीत्या नियोजित असते. थेंब थेंब अ‍ॅसिड जर सतत तयार झाले तर छोटय़ा आतडय़ाची आंतरत्वचा फाटून जाईल व अल्सर होईल. खूप वेळा चहा पिणे, वारंवार सिगारेट ओढणे आणि त्यावेळेस इतर काही न खाल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. चहा प्यायल्यावर जठराला वाटते की पाठोपाठ अन्न येणार, म्हणून हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड तयार होण्यास सुरुवात होते. पुढे काही अन्न खाल्ले नाही तर अशा प्रकारे चुकीचा सिग्नल आपल्या शरीराला मिळतो. हा झाला रासायनिक परिणाम. आता बघू या तांत्रिक भाग. या जठररूपी पिशवीला आकुंचन-प्रसरण क्षमता असते. म्हणजे थोडय़ा प्रमाणात एकमेकांत अन्नद्रव्य मिसळणारा हा बायोरिअ‍ॅक्टर आहे. घरच्या मिक्सरसारखे मोठय़ा प्रमाणात ढवळणे व मिसळणे आपल्याला सहन होत नाही. म्हणून खाऊन जर तुम्ही मोठय़ा पाळण्यात बसलात किंवा मोठा झोका घ्यायला लागलात तर उलटी होते. तसेच काहीजणांना बस, विमान व बोट लागते. (सोबतची आकृती बघा).

जठरामधून अर्धवट पचन झालेले अन्न जेव्हा पुढे सरकते तेव्हा ते आम्ल असते. हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडची आम्लता सहन व्हावी म्हणून जठर हे भक्कम स्नायूंचे असते, परंतु लहान आतडे मात्र नाजूक नळीप्रमाणे आहे. लहान आतडय़ाच्या त्वचेला आम्लता सहन होणार नाही. कारखान्यामध्ये जैविक सयंत्र चालवताना जसे ‘पीएच’ नियंत्रण केले जाते तसे कडू रस (अल्कली) म्हणजेच पित्त याच्या साहाय्याने योग्य प्रकारे आम्लता नष्ट करून हे अर्धे पचलेले अन्न लहान आतडय़ामध्ये जाते. हे काम पित्ताशय करते. यकृताला अनेक प्रकारची महत्त्वाची कार्ये सोपविलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पित्त तयार करणे. म्हणून पित्त तयार करून पित्ताशयात साठवले जाते व आवश्यकतेनुसार त्याचा वापर होतो. याला पोटाची ‘पीएच कंट्रोल सिस्टम’ असे म्हणायला हरकत नाही. पोटातून अन्न जसे थोडे थोडे बाहेर यायला लागते तेव्हा योग्य प्रमाणात पित्त त्यात मिसळते आणि आम्ल-अल्कली समतोल साधला जातो. जरुरीपेक्षा अधिक प्रमाणात पित्त बाहेर आले तर काही वेळा ते उलट दिशेने जठरात येते, कधी कधी तोंडापर्यंतसुद्धा येऊ शकते व उलटीची भावना होते. हा कडू पित्ताचा त्रास. उन्हात गेले, खूप तेलकट पदार्थ खाल्ले, तसेच रात्रीचे जागरण काही जणांना सोसत नाही. जास्त बाहेर आलेल्या पित्तामुळे ओकारी येते किंवा काही वेळेला पित्त रक्तात मिसळल्यामुळे शरीरावर पूरळ येणे, डोकं दुखणं अशी लक्षणे दिसतात.  याला पित्त चढले असेही म्हणतात. यकृत बिघडल्यास काविळीसारखे आजार होतात. स्निग्ध पदार्थाच्या पचनामध्ये पित्त व कोलेस्ट्रॉल या दोन रसायनांची मदत होते. प्राणिजन्य पदार्थामध्ये कोलेस्ट्रॉल असल्यामुळे अशा अन्नामधूनदेखील आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉल मिळते. यकृतरूपी कारखान्यात आवश्यकतेनुसार कोलेस्ट्रॉलदेखील बनविले जाते. याविषयी अधिक माहिती नंतरच्या लेखांत.

अल्कलाईन कडूपणा आपल्या पचन संस्थेला सोसत नाही आणि आंबट अ‍ॅसिडिटीसुद्धा धोकादायक आहे. म्हणून छोटय़ा आतडय़ापासून पुढील सर्व पचन अवयव हे न्यूट्रल म्हणजे ‘७पीएच’ला काम करतात. तोंडामध्ये यांत्रिक, जठरामध्ये रासायनिक आणि त्यानंतर पुढे मात्र अन्नपचन जैविक पद्धतीने होते. विविध ग्रंथी इन्सुलीन, पॅनक्रियाटिक रस असे एन्झाइम बनवून कबरेदक व प्रथिनांचे पचन होते. छोटय़ा आतडय़ामध्ये थोडय़ा प्रमाणात पचन झाले आहे असे पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, चोथा आणि पित्त असे मिश्रण आगगाडीतून हळूहळू जावे अशा प्रकारे पुढे ढकलले जाते. याला केमिकल इंजिनीअरिंगच्या दृष्टिकोनातून आदर्श ‘प्लगफ्लो रिअ‍ॅक्टर’ म्हणतात. जे आधी आले ते आधी पुढे गेले. याच वेळी इतरही पचन प्रक्रिया व पचलेल्या अन्नाचे शोषण होते. सगळ्यात शेवटी राहिलेले अन्न मोठय़ा आतडय़ामध्ये येते. या आतडय़ाचे तीन भाग आहेत. वर, आडवा आणि खाली. सर्वांत शेवटी पचन न झालेल्या गोष्टी मलाद्वारे बाहेर टाकण्याची व्यवस्था आहे. छोटे आतडे २५-३० फूट लांब नळी आहे. परंतु मोठे आतडे लांबीला कमी, पण आकाराने मोठे असते. शेवटी न पचलेले अन्न, चोथा व कोंडा असे पदार्थ थोडय़ा प्रमाणात पचनाची क्रिया लक्षावधी जीवाणूंच्या मदतीने मोठय़ा आतडय़ामध्ये होते. वय वाढत गेले की, या स्नायूंचे आकुंचन प्रसरण कमी होते, स्नायू शिथिल पडतात आणि म्हणून बहुतेक वृद्ध व्यक्तींना मलावरोधाची तक्रार असते. संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की मोठय़ा आतडय़ातील लक्षावधी जीवाणू नेमके कोणत्या प्रकारचे असतात हे विविध व्यक्ती, वंश आणि भौगोलिक परिस्थिती तसेच पिढय़ान्पिढय़ा खाल्ले जाणारे अन्न याच्या एकत्रित परिणामांनी ठरते. या मित्र जंतूचे एक प्रकारे विरजण प्रत्येकाला त्याच्या मातेकडून गर्भावस्थेत मिळते. हा झाला इंटेस्टाईनचा प्रोबायोटा. आपल्या आहारामध्ये मुद्दाम काही चांगल्या मित्र जंतूंचा समावेश करायचा असेल तर प्रोबायोटीक अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत. हे मित्र जंतू ज्या खाद्यपदार्थामुळे जास्त चांगले वाढू शकतात अशा गोष्टींना प्रीबायोटिक म्हणतात. ज्या अन्नामध्ये मित्र जंतूसहित त्यांना लागणारे अन्न असते त्या पदार्थाला ‘सिनबायोटिक’ असे म्हणतात. याविषयी अधिक माहिती पुढच्या लेखात असेल.

मोठय़ा आतडय़ामध्ये आल्यावर विविध प्रकारे ‘किण्वन’ प्रक्रिया होताना जैविक आम्ल व काही वायू तयार होतात. चांगले मित्र जंतू थोडय़ाशा हवेच्या माध्यमात (मायक्रो एईरोफेलिक) वाढतात. दोन महत्त्वाचे मित्र जंतू आहेत- लॅक्टोबॅसीलस आणि बीफीडस आणि या दोघांनाही शून्य ऑक्सिजन चालत नाही. अगदी कमी प्रमाणात पण त्यांना ऑक्सिजनची गरज आहे. एरोबिक सिस्टमला कधीच दरुगधी नसते आणि अ‍ॅनारोबिकमध्ये दरुगध असतो. जर योग्य प्रकारे चौरस आहार खाल्ला तर मोठय़ा आतडय़ामध्ये साधारण १पीपीएम ऑक्सिजन असू शकतो. एचटूएस गॅसला कुजक्या अंडय़ाचा अतिशय घाणेरडा वास असतो. आपले पोट बिघडले तर असे होते. सर्वसाधारणे तुमचे शरीर तंदुरुस्त असेल, तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर अतिशय घाणेरडा वास तयार होत नाही. एचटूएससारखे वायू होत नाही. एचटूएस बनणे सल्फरशी निगडित असते. खूप प्रमाणात कांदा लसूण खाल्ले तर त्याच्यात सल्फर असल्यामुळे दरुगधीयुक्त गॅस बनतो.

शरीराच्या बाहेर पचनक्रियेचे प्रयोग करण्यासाठी एका प्रयोगशाळेत एक कृत्रिम पचनक्रिया प्रणाली, कृत्रिम पचन अवयव बनविलेले आहे. जठरासारखे दिसणारे हे चंचुपात्र – परंतु तेथे जठरात जे- जे काही होते ते सर्व- (रसायने, आकुंचन-प्रसरण) इथे घडते. अशा प्रकारे प्राण्यावर अथवा प्रत्यक्षात मानवावर प्रयोग न करता विविध अन्नाचा- न्युट्रास्युटिकल पदार्थाचा अभ्यास करता येतो. अशा पद्धतीने फक्त जठरच नव्हे तर संपूर्ण पचन संस्थेचे शरीराबाहेर कृत्रिम अभ्यास करण्याचे विज्ञान आहे.

माझ्या विद्यार्थ्यांनी दुधी, कोहळा अशा वेलीच्या फळभाज्यांवर या प्रकारचे काम करून शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत आणि त्यांचा उपयुक्तपणा सिद्ध केला आहे. याबद्दलचे आणखी तांत्रिक विवेचन पुढच्या लेखात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:12 am

Web Title: article on digestive system jivan vidnyan article abn 97
Next Stories
1 मनातलं कागदावर : श्रींची इच्छा..
2 पुरुष हृदय ‘बाई’ : पुरुषपण ओलांडताना..
3 अपयशाला भिडताना : युरेका
Just Now!
X