सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

‘दोघी’च्या कथानकाच्या मांडणीत सुमित्राची एक धारणा निश्चित होती. गौरीचं शहरातलं भयानक आयुष्य आपण प्रेक्षकांना दाखवायचं नाही. कारण त्यात गौरीचा सन्मान धोक्यात येईल. गौरी इतक्या भीषण वास्तवाला सामोरं जाऊनही एक प्रकारे निरागस आहे. स्वतचं बलिदान त्रयस्थपणे देऊन तिनं स्वतला कुटुंबासाठी जगवलं आहे. प्रश्न आला तो चित्रपटाच्या शेवटाचा. इथे आमच्या मनातल्या चित्रपटनिर्मितीच्या भूमिकेला वळण देणारा एक महत्त्वाचा निर्णय आकार घेऊ लागला..

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
Review of Rohini Nilekanis book Shambharital Shahanapan on durgabai Nilekani
शंभरीतलं शहाणपण!

आमच्या ‘चाकोरी’ला उदयपूरच्या बालमहोत्सवात परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला. तिथे एक गृहस्थ येऊन सुमित्राला कार्ड देऊन गेले आणि ‘काही स्क्रिप्ट असेल तर भेटा’, म्हणाले. सुमित्रानं ते कार्ड ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात उघडून बघितलं तर ते ‘एनएफडीसी’ या सरकारी चित्रपट निर्मिती संस्थेचे संचालक रवी गुप्ता यांचं आहे असा शोध लागला. नंतर आमच्या त्यांच्याकडे ‘दुर्लक्ष’ करण्याची चेष्टा करत त्यांनी पुन्हा आमंत्रण दिलं.

तोपर्यंत पूर्ण लांबीचा चित्रपट-फीचर फिल्म आपण बनवावी असं वाटलंच नव्हतं. त्या वेळी एका वेगळ्याच विषयावर माहितीपट करायच्या प्रयत्नात आम्ही होतो. शरीरविक्रय करणारी स्त्री ही जेव्हा आई होते तेव्हा काय होतं, हा आमचा विषय होता. त्यासाठी विजयाताई लव्हाटे यांच्या ‘अशा स्त्रियांच्या मुलांसाठी’ असलेल्या वसतिगृहात आम्ही गेलो. तिथं आम्ही अशा अनेक स्त्रियांना भेटलो. मातृत्वाचा गौरव करणाऱ्या आपल्या संस्कृतीत शरीरविक्रय करणारी स्त्री ही तिला दिवस जाताच ‘कामासाठी’ निरुपयोगी ठरते आणि तिला मिळणाऱ्या तथाकथित सोयीसुविधाही काढून घेतल्या जातात, असं त्या स्त्रिया सांगत होत्या. त्या सगळ्या जणी पडद्यावर मात्र यायला तयार नव्हत्या. अनेक जणी म्हणाल्या, गावाकडे असणाऱ्या त्यांच्या कुटुंबांना त्या पोसत होत्या. पण त्या ‘हा’ व्यवसाय करतात हे एक उघडपणे मान्य न केलं गेलेलं पण सर्वाना माहीत असलेलं गुपित होतं. त्यांच्या कुटुंबांना त्यांचं अस्तित्वच काय, सावलीसुद्धा नको होती. पण त्यांचे पैसे हवे होते. आणि यात तथाकथित वरच्या जातीतली कुटुंबंही होती. त्या सगळ्या जणी कॅमेऱ्यासमोर येणार नसल्यामुळे तो माहितीपट करणं शक्य नव्हतं. पण सुमित्राच्या मनात ‘दोघी’ या आमच्या पहिल्या फीचर फिल्मच्या कथानकाचा जन्म झाला होता.

बघता बघता तिनं पूर्ण लांबीची पटकथा लिहून काढली आणि रवी गुप्तांनी म्हटल्याप्रमाणे खरंच काही महिन्यांत ‘एनएफडीसी’च्या समितीने संमती देऊन काम सुरू करण्याची अनुमतीही दिली. पहिली फीचर फिल्म करण्याची संधी अशी सरळ चालत येऊन पोचली. जेजुरीजवळच्या खेडय़ातल्या गौरी आणि कृष्णा- दोघी बहिणी. बापानं गौरीच्या लग्नासाठी कर्ज काढलेलं. गौरीच्या सासरच्या वऱ्हाडाला अपघात होऊन ट्रक उलटून सगळी माणसं दगावतात. गौरीवर अपशकुनीपणाचा शिक्का बसतो. मुंबईला गिरणीत कामाला असलेल्या मामाबरोबर आई गौरीला मुंबईला धाडते. गौरीच्या पशावर कुटुंब तगून जातं. बहिणीच्या अपशकुनीपणामुळे कृष्णेच्या लग्नाचीही परवड होत राहाते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकत्रे गावी भेट देतात आणि त्यातला एक कृष्णेच्या स्थळाचा विचार करायला तयार होतो. पण आता या लग्नाला गौरीनं येऊ नये असं जन्मदात्या आईलाच वाटायला लागतं. तरीही गौरी येते. अपमानित होते.. पण शेवटी आई आणि कुटुंब तिला सन्मानाने स्वीकारतात.

या कथानकाच्या मांडणीत सुमित्राची एक धारणा निश्चित होती. गौरीचं शहरातलं भयानक आयुष्य आपण प्रेक्षकांना दाखवायचं नाही. कारण त्यात गौरीचा सन्मान धोक्यात येईल. गौरी इतक्या भीषण वास्तवाला सामोरी जाऊनही एक प्रकारे निरागस आहे. स्वतचं बलिदान त्रयस्थपणे देऊन तिनं स्वतला कुटुंबासाठी जगवलं आहे. प्रश्न आला तो चित्रपटाच्या शेवटाचा. कुटुंबानं गौरीचा सन्मानानं स्वीकार करणं हा एक ‘सुखांत’ होईल- त्यापेक्षा गौरीला परत मुंबईला तिच्या अभागी विश्वात परत पाठवलं तर तो कलात्मक शेवट होईल असं रवीजींना आणि काही इतर हितचिंतकांना वाटत होतं. इथं आमच्या मनातल्या चित्रपटनिर्मितीच्या भूमिकेला वळण देणारा एक महत्त्वाचा निर्णय आकार घेऊ लागला.

त्या काळी ‘माहेरची साडी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि चालला होता. जेमतेम हजारात मोजला जाणारा चित्रपटाचा फायदा या चित्रपटानं कोटींच्या घरात नेऊन ठेवला होता. आम्ही सगळ्यांनी तो चित्रपट मुद्दाम चित्रपटगृहात जाऊन पहिला. बायाबापडय़ा पडद्यावरच्या नायिकेचे हाल पाहून टिपं गाळत होत्या. ते पाहताना असं लक्षात आलं की, आपला प्रेक्षक म्हणाल तर हाच आहे. त्यांना नायिकेचं दुख पाहून हळवं व्हायला आवडतं आहे, हे खरंय.. कदाचित आपलाही चित्रपट त्यांना ते समाधान देणार आहे. पण त्यानंतर मात्र आमची दिशा अशा लोकप्रिय चित्रपटापेक्षा वेगळी असणार आहे. तो वेगळेपणा असेल मूल्यव्यवस्थेचा. स्त्रीला हौतात्म्य देऊन अंधश्रद्धेच्या आहारी प्रेक्षकाला नेत नेत बाईला अधिकाधिक हतबल दाखवणं हा मनोरंजनाचा सोपा मार्ग आहे. त्यातून अशा सोसणाऱ्या बाया ना कुठल्या बंडखोरीकडे वळतात, ना आपल्या सोसण्याविषयी जागृत होतात. त्यामुळे असे चित्रपट समाजाला ‘जैसे थे’ ठेवतात. आम्हाला आमच्या प्रेक्षकातल्या छळाला बळी पडलेल्या बायांना हे उमजायला हवं होतं की, तुम्ही खोटय़ा दैवतीकरणाच्या पोकळ पुरस्काराला कवटाळून बिचारेपणात अधिक मश्गूल होऊन राहू नका. अशी बेगडी देवी होण्यापेक्षा जितं-जागतं माणूस म्हणून सन्मानानं जगा. तो तुमचा अधिकार आहे. त्यामुळेच ‘दोघी’ हा आम्हाला साध्या स्त्रियांना समजेल असा सोपा, पण बटबटीत भावनांच्या महापुरापासून दूर असा बनवायचा होता. आणि म्हणूनच ‘दोघी’च्या शेवटी गौरीला कुटुंबानं सन्मानानं स्वीकारणं महत्त्वाचं होतं. कलात्मक म्हणवला जाणारा शेवट गौरीला तिच्या हक्काच्या आनंदी जगण्यापासून दूर नेत असेल तर ती ‘कलात्मक उंची’ हवी कशाला आमच्या चित्रपटाला? कलात्मक असो वा समाजप्रिय- कुठलाच शेवट, जो गौरीला न्याय देत नाही, तो आम्ही नाकारायचं ठरवलं. बाप्यांना हसवणं आणि बायांना रडवणं हा हुकमी यशाचा मार्ग..! आम्हाला बाप्यांच्या डोळ्यात पाणी यायला हवं होतं आणि बायांना समाधानी करायचं होतं.

‘दोघी’च्या पहिल्या शॉटचा क्षण अजून नजरेसमोर आहे. मराठी चित्रपटाचा वैभवशाली काळ पाहिलेले सूर्यकांतजी आपण पटका बांधलेले पाटील नसून साधे टोपी घालणारे शेतकरी आहोत हे पचवू शकत नाहीयेत.. नव्यानं उमेदवार साहाय्यक म्हणून आलेली सचिन कुंडलकर आणि उमेश कुलकर्णी ही पोरं, व्यावसायिक अभिनेत्री म्हणून ज्यांचा एक आब राखला जातो अशा मधू कांबीकर आणि दिल्लीच्या एनएसडीची पार्श्वभूमी घेऊन आलेल्या अभ्यासू, गंभीर उत्तरा बावकर यांच्याशी कसं वागू या गोंधळात आहेत. ना. धों. महानोर मला मध्येच एका देवळात बोलावून घेऊन आनंद मोडकांनी संगीतबद्ध करून आणलेली ताजी गाणी कॅसेटवर ऐकून आनंद व्यक्त करताहेत. (स्त्री-गीतं किंवा लोकगीतं या पुरुषानं लिहिली आहेत हे मलाच खरं वाटत नाहीये..!) सुमित्रा घर, वस्तू, पोशाख सगळं खरं वाटतंय ना, हे पुन्हा पुन्हा तपासून पाहते आहे. मोहना, गीतांजली, प्रमोद काळे या साहाय्यकांना असंख्य सूचना देते आहे. रंगभूमीचा आणि आता एक-दोन चित्रपटांचा अनुभव असणारी सोनाली कुलकर्णी आणि आमच्या लघुपटांमधून तयार झालेली रेणुका दफ्तरदार आपापल्या संवादांच्या आणि लहेजाच्या तालमी करत आहेत. खलनायक म्हणून सर्वाना ज्ञात असणारे सदाशिव अमरापूरकर कुठल्याही तक्रारी न करता बलगाडीत बसून आहेत..! त्यांच्याबरोबर बालकलाकार पार्थ उमराणी दोस्ती करतो आहे.. माझा  FTII मधला मित्र- ‘चाकोरी’चा कॅमेरामन- त्याचीही पहिली फीचर फिल्म असल्यानं खूप सावकाश काम करतो आहे.. पण त्याला वेळ द्यायला हवा, असं सुमित्रा सर्वाना सांगते आहे.. अभिनेता अभय कुलकर्णी दिग्दर्शन साहाय्यक म्हणून धावाधाव करतो आहे.. फिक्शन ही गोष्ट आम्हाला नवीन नव्हती. कारण याआधीचे लघुपट हे छोटे कथात्मक चित्रपटच होते. त्यामुळे फीचर फिल्मचा म्हणून काही बडेजाव करायचा नाही, हेही नक्की होतं. पण तरीही हा डोलारा पहिल्याच दिवशी उभा करताना हे आपल्याला झेपणार आहे ना, अशी भीती सुमित्राच्या नाही पण माझ्या मात्र मनात येत होती..!

‘दोघी’मध्ये हे उमजत होतं की, फीचर फिल्म खेचून न्यायला दिग्दर्शकाला अधिकच चिकाटीचं असावं लागतं. आमचं चोख पेपरवर्क आम्हाला पदोपदी उपयोगी पडत होतं. आणि हेही कळत होतं की, प्रत्येक क्षणी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि तो पडद्यावर पक्का, कायम होणार आहे.. त्यामुळे जे म्हणायचं आहे त्याच्याशी आपल्याला ठाम राहावं लागणार आहे. एका प्रसंगाच्या चित्रीकरणामध्ये प्रकाशयोजना कशी हवी यावर माझ्या छायाचित्रकार मित्राशी सुमित्राचा वाद झाला. कटूपणा स्वीकारून त्याला दूर करावं लागलं. आणि योगायोग म्हणजे ‘माहेरची साडी’चे छायाचित्रकार चारुदत्त दुखंडे, त्यांचा साहाय्यक संजय मेमाणेसहित ‘दोघी’च्या कामावर रुजू झाले! (हा लेख लिहिता लिहिता दुखंडे यांच्या अकाली निधनाची बातमी समोर आली..! ‘दोघी’च्या चित्रीकरणाला पुन्हा उभं करण्यात त्यांचा खूप मोठा हात होता. दुखंडे, अमरापूरकर, मोडक, सूर्यकांतजी या आपल्यात आज नसलेल्या सर्वाच्या आठवणी दाटून आल्या..!)

‘भुई भेगाळली’ (ज्या गाण्यासाठी अंजली मराठेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला) ते चित्रित होताना सुमित्रा कटाक्षानं सोनालीला सांगत होती, ‘तुझ्या डोळ्यात पाणी येता कामा नये, तर प्रेक्षकांच्या डोळ्यांत येईल..!’ हाच अभिनयाचा संयम गौरी मुंबईहून परत आल्यावर कृष्णाला भेटते तेव्हा या दोघी अभिनेत्रींकडून अपेक्षित होता. गौरीचं जे भयानक विश्व आपण दाखवलं नाही, ते तिच्या पोशाख आणि नजरेत झालेल्या बदलातून जाणवणं आणि दोघींमध्ये प्रत्यक्ष बोलणं न होता नि:शब्द संवाद होणं- हाही एक धाडसी निर्णय होता. त्या दोघींकडून आम्ही ‘मनातल्या संवादांची’ तालीम करून घेतली होती. ते संवाद मनात म्हणत त्यांनी तो मूक प्रसंग अभिनित केला. आईनं गौरीला ‘परत ये’, म्हटल्यावर गौरीनं फोडलेला हंबरडा हा तिच्या तोवरच्या गप्पपणाचा स्फोट म्हणून दाखवायचा होता. गौरीच्या अंगावरच्या जखमा- डाग अंघोळ घालताना आईनं पाहणं पण दोघींनी गप्प राहणं हाही असाच एक क्षण.. ‘दोघी’त अनेक ठिकाणी व्यक्त आणि अव्यक्त क्षणांचा शोध संहिता, अभिनय, छायाचित्रण आणि संकलनातही चालूच राहिला.. वऱ्हाडाला झालेल्या अपघाताच्या बातमीनं झालेली वाताहत ही प्रत्यक्ष प्रसंग स्वरूपात चित्रित केली होती, पण संकलनाच्या टेबलावर ते प्रसंग मोडून आम्ही त्याचं ‘फाल्गुन मास येता’ या माधुरी पुरंदरेंनी गायलेल्या गीतात रूपांतर केलं. (‘दोघी’चं संकलनही आम्ही दोघं दिग्दर्शकच करत होतो..!) घरासमोरची कोरडी विहीर, रहाट ओढणं, भिंतीवर पडलेल्या पताकांच्या काळ्या सावल्या, घरावर वाढलेलं वाळकं गवत, जातं, बलगाडी, विझलेली तेलाची चिमणी या गोष्टींमध्ये दृश्य प्रतिमा सापडत होत्या. त्यातून संयमित अभिव्यक्ती सापडत होती.

‘दोघी’च्या निमित्तानं अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या, परिसंवाद झाले. यातल्या काही ठिकाणी न चुकता एखादा पुरुष प्रेक्षक एक प्रश्न विचारात असे, ‘गौरीच्या आईनं असं केलंच कसं?’ खरं तर मामावरसुद्धा आरोप होऊ शकला असता. पण तो व्हायचा आईवरच..! कारण आई या व्यक्तिरेखेचा अनाठायी गौरव..! आई चुकूच शकत नाही, असा अट्टहास!! एक-दोन ज्येष्ठ समीक्षकांनीही असा सूर लावला. खरं तर आमचं असं म्हणणं होतं, की आई ही गौरीइतकीच बळी आहे. ‘दोघी’ ही कदाचित या आई-मुलीची गोष्टही मानता येईल. आम्ही प्रेक्षकांना विचारत असू- आज शहरा-शहरात शरीरविक्रय करणाऱ्या मुली या आई-बापाविना आहेत? ग्रामीण जीवनात अपशकुनीपणाचा शिक्का आणि कर्जबाजारीपणाचा शाप भोगणाऱ्या कुटुंबाची परवड या प्रश्नकर्त्यांना कोण समजावणार? सामाजिक सत्यापासून दूर असणारे हे प्रश्न फक्त पुरुष प्रेक्षक आणि समीक्षक विचारत होते. एकाही बाईनं हा प्रश्न कधीही विचारला नाही..!

इटलीच्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्यावर झालेल्या चर्चेत एक फिलिपिनो स्त्री-प्रेक्षक म्हणाली, की युद्ध-काळात अशा बळी गेलेल्या ‘गौरी’सारख्या मुली आठवत होत्या. सुमित्रानं ‘दोघी’ जपानमध्येही दाखवला. तिथले एक ज्येष्ठ पुरुष उठून म्हणाले, ‘जपानी पुरुष फार कठोर मनाचा असतो. त्याला रडवणं कठीण असतं. पण तुमच्या चित्रपटानं माझ्या डोळ्यात पाणी आलं..!’

‘दोघी’चा पहिला विशेष खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात होता. पु.लं. आणि सुनीताबाई प्रेक्षकांत होते. मध्यंतरात पु.लं.नी सुमित्राला जवळ बोलावलं आणि म्हणाले- ‘‘पिंट्र बरोबर नाहीये का? सगळं फार धूसर दिसतंय..!’’ आम्ही गडबडलो! कारण तांत्रिक घोटाळा तर काहीच नव्हता. पु.लं. मिश्कीलपणे म्हणाले, ‘‘अरे हां.. माझ्याच डोळ्यात पाणी येऊन चष्म्यावर वाफ जमा होतेय. म्हणून वाटलं असेल..!’’

sunilsukthankar@gmail.com

chaturang@expressindia.com