01 March 2021

News Flash

शारीरिक + मानसिक ताण = दुभंग

सामाजिक भान असणाऱ्या आणि स्त्री आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. किशोर अतनूरकर यांचा गेल्या ३२ वर्षांतल्या अनुभवांवरचा हा लेख.

(संग्रहित छायाचित्र)

पूर्वीच्या तुलनेत स्त्रियांचं शिक्षण वाढलं, नवऱ्याच्या बरोबरीनं स्त्रिया कमवू लागल्या. पण एकं दरीत स्त्रियांच्या आयुष्यात आणि त्यांच्या दिनक्रमात किती फरक पडला?  स्त्रियांच्या म्हणून ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या सुटल्या तर नाहीत, उलट वाढतच चालल्या आहेत.  हा वाढता शारीरिक आणि मानसिक ताण स्त्रियांच्या आरोग्याला दिवसेंदिवस घातक ठरतोय.. याबद्दल अनेकदा बोलूनही  झालंय आणि लिहूनही आलंय, तरीही तिच्या परिस्थितीत ना बदल घडतोय ना तिची दगदग थांबतेय. या मनोकायिक समस्यांनी तिची अवस्था दुभंग होत चाललेली आहे. हे चांगल्या समाजाचं लक्षण नाही.. सामाजिक भान असणाऱ्या आणि स्त्री आरोग्यासाठी काम करणाऱ्या डॉ. किशोर अतनूरकर यांचा गेल्या ३२ वर्षांतल्या अनुभवांवरचा हा लेख.

‘स्त्री’पण निभावणं ही सहज सोपी गोष्ट नाही. मुलगी म्हणून जन्माला आल्यावर ‘स्त्री’पणाला सामोरं जाणं म्हणजे स्त्री म्हणून असणाऱ्या सहनशक्तीची परीक्षाच आहे. वयात येणं, लग्न, गर्भधारणा, अपत्यजन्म, संततीनियमन, रजोनिवृत्ती या नैसर्गिक चक्राबरोबरच गर्भपात, वजनवाढ, मूल न होणं, या गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आहेतच. आयुष्यातील ३०-४० वर्ष या चक्रात अडकूनही सुदृढ शरीराची आस बाळगत जगत राहाणं, हे स्त्रियांपुढचं आव्हान ठरतंय, कारण आता स्त्रियांच्या शारीरिक त्रासात भर पडली आहे ती मानसिक ताणाची. शारीरिक कष्ट आणि वाढत चाललेले मानसिक ताण यात आजची स्त्री मनोकायिकदृष्टय़ा दुभंगत चालली आहे.

गेल्या ३२ वर्षांत अनेक स्त्री-रुग्णांच्या व्यथा फक्त कान देऊन नाही, तर मन लावून ऐकल्या. स्त्रियांवर उपचार करताना केवळ त्यांच्या शारीरिक त्रासाचा विचार करून चालत नाही, तर त्यांची मानसिक, लैंगिक, कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन संवाद साधावा लागतो. अशाच काही रुग्णांशी झालेल्या संवादातून केवळ स्त्रियांच्या आरोग्याबद्दलच नव्हे, तर एकंदरीत स्त्री-जीवनाबद्दल काही गोष्टी पुन्हा एकदा ठळकपणे लक्षात आल्या.  संध्याकाळची वेळ. क्लिनिकमध्ये रुग्ण तपासत असताना एक स्त्री आपल्या दोन छोटय़ा मुलांना घेऊन प्रवेश करते. काही क्षण मी तिला ओळखलं नाही.

‘‘काय डॉक्टर, मला ओळखलं नाही वाटतं?’’  मी आठवण्याचा प्रयत्न करतो..

‘‘अहो, माझे दोन्ही सीझर तुम्हीच तर केलेत!’’

‘‘अरे हो! मुक्ता ना तू? राईट ?’’

‘‘हो.’’

‘‘किती बदल झालाय तुझ्यात. वजन खूप वाढलंय. चेहरा खूप थकल्यासारखा दिसतोय. बस. काय त्रास होतोय?’’

कोणत्याही एका आजारात फिट न बसणाऱ्या अनेक तक्रारी मुक्तानं सांगितल्या. मान, पाठ, कंबर दुखते, डोकं अधूनमधून जड होतं, पायाला गोळे येतात, सारखी चिडचिड होते, रात्री लघवीला जाण्यासाठी दोन-तीन वेळेस उठावं लागतं, शांत झोप लागत नाही, वगैरे. मी तिला तपासलं, तिच्या दैनंदिनीबद्दल विचारपूस करताना तिचं नेमकं काय बिघडलंय याचा वेध घेऊ लागलो. काही औषधं लिहून दिली, काही सूचना दिल्या. एक महिन्यानंतर परत येऊन भेट असं सांगितलं. ‘‘ ठीक आहे डॉक्टर, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं.’’ असं म्हणून ती निघून गेली.

मुक्ता, वय वर्ष ३५. शिक्षण-एम.ए., बी.एड. नांदेडपासून १७ किमी अंतरावर असलेल्या शाळेत शिक्षिका. नवरा महानगरपालिकेत कारकून. दोन शाळेत जाणारी मुलं. घरात अधूनमधून आजारी पडणारे आणि अधूनमधून बरे असणारे सासू-सासरे. मुक्ताला दररोज सकाळी साडेचार-पाच वाजता उठावंच लागतं. स्वत:चं आवरणं, स्वयंपाक, मुलांचे डबे वगैरे कामं करण्यात सात वाजतात. साडेसातची ट्रेन पकडणं, शाळा संपवून घरी चार-पाच वाजता येणं, घरी परतल्यानंतर घर आवरणं, संध्याकाळचा स्वयंपाक, नवरा, मुलं, सासू-सासऱ्यांशी दिवसभराच्या वृत्तांताची देवाणघेवाण, वगैरे. कौटुंबिक आघाडीवरील प्रश्न सोडवत असताना मतभेद, चिडचिड, वैताग, कधी-कधी डोळ्यांत पाणी. नॉर्मल हसणं, बोलणं खूप कमी वेळेस. नाराज होऊन बसण्यासाठी तर वेळच नाही. उद्या जे काही शाळेत शिकवायचं आहे त्याची तयारी करणं, मुख्याध्यापकांनी विनाकारण कटकट करायला नको याचा ताण सांभाळत, सासू-सासरे, नवरा किंवा मुलांनी पाहू दिली तर टीव्हीवरची एखादी मालिका पाहाणं, मुलांच्या अभ्यासाची विचारपूस, रात्रीचं जेवण, हा तिचा दिनक्रम आहे. एवढं सगळं करून भिंतीवरच्या घडाळ्याकडे नजर टाकली की तोंडातून शब्द बाहेर पडतात, ‘‘वाजलेच रात्रीचे अकरा. या घडय़ाळाला तर लाजच नाही! सारखं पळत असतं. संपला दिवस.’’

मुक्तानं सांगितलेली ही दैनंदिनी ऐकून, ‘‘मुक्ता स्वत:कडे जरा लक्ष दे, मॉर्निग वॉकला जात जा, वेळेवर जेवण करत जा. माणसानं एखादा छंद जपावा, म्हणजे मन कसं शांत राहातं बघ..’’ माझ्या या सर्व सूचनांना काही अर्थच उरला नाही की काय, असं वाटून गेलं. विचार करताना मला वाटलं, की मुक्ताच जणू मला प्रश्न विचारतेय, ‘‘माझ्या रुटीनमध्ये तुमचा तो व्यायाम, ध्यानधारणा, छंदाची जोपासना करायला वेळ कुठे आहे? मी काय करू डॉक्टर? या महागाईच्या जमान्यात महिन्याला ४२ हजार रुपये पगार देणारी नोकरी सोडून देऊ? नवऱ्याच्या एकटय़ाच्या पगारावर घर व्यवस्थित चालेल? एवढे कष्ट करून शिक्षण घेतलं हे कसं विसरू? शाळेत मुलांना काही शिकवण्याचा, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्याचा आनंद सोडून देऊ? घरी बसू? मला उत्तर द्या डॉक्टर..’’ मुक्ताचं समाधान होईल असं उत्तर माझ्याकडे नव्हतं.  खूप खिन्न वाटलं. अन् आई आठवली. मागच्या वर्षी वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळानं ती गेली. ती गेल्यानंतर असं वाटलं, की काय ते आईचं आयुष्य.. फक्त कष्ट आणि मानसिक कुचंबणा. रीतसर शिक्षण नाही. नोकरी-व्यवसाय काही नाही. कधी हातात चार आगाऊचे पैसे नाहीत. नवऱ्याच्या आणि मुलांच्या आवडीचा स्वयंपाक करणं, सणवार, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचं चहापाणी, यातच तिचा दिवस जात असे. पिताश्रींनी नेलं तर तुळजापूर, पंढरपूरसारख्या ठिकाणी देवदर्शनाला जाणं हेच काय ते ‘साईटसीईंग’. नाही नेलं तर नाराजी व्यक्त न करणं. वर्षांला दोन-तीन ठरावीक साडय़ा, एखादी अधिकची साडी आवडली तरी ती न घेता येण्यासारखी परिस्थिती. त्याबाबत कधी तक्रार नाही. मुली, बायकांचं असंच असतं, हे लहानपणापासून मनावर कोरलं गेलं असल्यामुळे त्रास झाला तरी दाखवायचा  नाही.  माझी आई सुशिक्षित नव्हती. आर्थिक स्वावलंबन तर नाहीच. उलट सारखा काटकसरीचा विचार करत जगण्याची अवस्था. तरीही, मुक्तापेक्षा जास्त तणावमुक्त जीवन जगत होती का? मुक्ता मुलगी असूनही भरपूर शिकली, घराबाहेर पडली, नोकरी करतेय. आपल्याला आवडलेली वस्तू खरेदी करण्यासाठी तिला नवऱ्यापुढे हात पसरावे लागत नाहीत. घरात सर्व सुखसोयी आहेत. तरीही मला मुक्ता माझ्या आईच्या तुलनेत जास्त तणावग्रस्त जीवन जगत आहे, हे लक्षात आलं. स्त्री शिक्षणानं आणि आर्थिक स्वावलंबानं तिच्या आयुष्यातील ताण वाढला? हे असं कसं झालं? काहीतरी बिघडलंय. स्त्री शिक्षण तर अनिवार्य आहे. आर्थिक दृष्टीनं तर स्त्रियांनी परावलंबी राहूच नये यावर कुणाचं दुमत नाही. स्त्रियांना आनंदी, तणावमुक्त जीवन जगता यावं या संदर्भात कुणाचं तरी काहीतरी चुकतंय. पण नेमकं  काय?

वास्तविक पाहता स्त्रियांनी दमदार प्रवेश केला नाही, असं क्षेत्रच शिल्लक नाही. असं असलं तरी निसर्गानं तिचा पिच्छा सोडला नाही. ‘मी आता शिक्षिका म्हणून नोकरी करते, मला महिन्याला ४२ हजार रुपये पगार मिळतो, म्हणून मला आता मासिक पाळीची कटकट नको,’ असं ती म्हणू शकत नाही. ‘माझा पगार माझ्या नवऱ्याइतकाच आहे, म्हणून माझं दुसरं बाळ नवऱ्याच्या पोटात वाढू दिल्यास मी आपली अत्यंत आभारी राहीन,’ असा अर्ज ती निसर्गाकडे करू शकत नाही. दुसरी अडचण अशी, की आपण, आपलं कुटुंब, आपलं स्वयंपाकघर, या भावनिक बंधनातून तिला सुटका मिळत नाही, किंबहुना तशी सुटका व्हावी हा तिचा स्वभावदेखील नाही. नोकरी करत असताना तिला तिच्या कार्यालयप्रमुखाच्या लहरी स्वभावाला सांभाळून घ्यावं लागतं, हा ताण माझ्या आईला नव्हता. माझ्या आईला स्वत:लाच लिहितावाचता येत नव्हतं. त्यामुळे तिनं कधी माझा अभ्यास घेतला नाही. मुक्ताला मात्र तिच्या मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो. मी अभ्यास करून ‘मोठं’ व्हावं एवढीच माझ्या आईची इच्छा. पण मुक्ताला तिच्या मुलांसाठी कोणती शाळा योग्य, कोणत्या ‘कोचिंग क्लास’मध्ये घालावं याचा विचार तिला करावा लागतो. अशा कितीतरी गोष्टी आज मुक्ताला कराव्या लागतात, ज्या माझ्या आईला कराव्या लागल्या नाहीत. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत आहे. मुक्तानं शिकलं पाहिजे, पैसे पण कमावले पाहिजेत, निसर्गानं दिलेल्या जबाबदाऱ्या तर पार पाडण्याशिवाय गत्यंतरच नाही, स्वयंपाकघरामधील व्यवस्था नीट आहे का नाही हे पाहाणं ही तिची भावनिक गरज आहे. ही सर्व धावपळ करताना ती थकून जात आहे. काही स्त्रिया तर कोलमडून जात असताना आपण बघतोय.

हे जर असंच चालू राहिलं तर मुक्तासारखं जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या जगात ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी विचित्र ओढाताणीची परिस्थिती निर्माण होईल. शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि लग्न इथपर्यंतचा मुलांचा आणि मुलींचा प्रवास वरवर पाहाता सारखा वाटत असला तरी मुलींना शिक्षण घेताना मासिक पाळीच्या कटकटी सांभाळत शिक्षण पूर्ण करावं लागतं. मुलग्यांना हे विसरून चालणार नाही. शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसाय सुरू होतो, लग्न होतं. यानंतर मासिक पाळीबरोबरच गर्भधारणा, बाळंतपण आणि मुलांचं संगोपन, या जवळपास अनिवार्य असलेल्या घटनांना सामोरं जावं लागतं. या सर्व गोष्टी स्त्रियांच्या करिअरसाठी गतिरोधक आहेत. सततच्या ओढाताणीमुळे शरीरावर परिणाम होऊन अनेक स्त्रिया मुक्तासारख्या मनोकायिक समस्यांना बळी पडत आहेत. मनावर असलेला सततचा ताण, जेवणाच्या वेळा न पाळणं आणि व्यायामाचं महत्त्व माहिती असूनदेखील त्यात सातत्य राखता न येणं, याचे दूरगामी परिणाम उच्च रक्तदाब, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, निद्रानाश असे आजार  जडण्यात होत आहेत. स्त्री शिक्षणामुळे आणि त्यांच्या आर्थिक हातभारामुळे कुटुंब घरातील सुखसोईंच्या दृष्टीनं मजबूत होतंय, पण स्त्रीमन कमजोर होत आहे. मुक्तासारख्या तणावग्रस्त असलेल्या स्त्रियांची संख्या समाजात वाढल्यास मजबूत समाजनिर्मितीला खीळ बसू शकते.

हा तणाव दूर करण्यासाठी एकच जालीम उपाय आहे, तो म्हणजे पुरुषांनी हे सर्व समजून घेऊन तिला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. पुरुष म्हणजे फक्त नवरा नाही. तर तिचा भाऊ, वडील, मुलगा, सासरा, कार्यालयातला सहकारी पुरुष वा मुख्य अधिकारी वगैरे, प्रत्येक पुरुष. शालेय वयापासून मुलांना ‘सेक्स एज्युके शन’ द्यायला हवं या बाबत आत्तापर्यंत अनेकवेळा बोलले गेले आहे. काही प्रमाणात ते दिलेही जाते. मात्र ते कशासाठी आवश्यक आहे याची पालकांना कल्पना नसते. मुलगा साधारणत: आठवी किंवा नववी वर्गात शिकत असताना त्यांच्या लैंगिक भावना जागृत होतात. मुलांचं मुलींबद्दल शारीरिक आकर्षण असणं नैसर्गिक आहे. त्याच वयात, शाळेत शिकत असताना निसर्गानं मुलींवर मुलांच्या तुलनेत प्रजननसंस्थेशी संबंधित मोठी जबाबदारी दिलेली असते. मुली ती जबाबदारी निमूटपणे स्वीकारतात आणि मुलांची याबाबत निसर्गानं सुटका केली आहे याचं भान मुलांना म्हणजेच भावी पुरुषांना शालेय जीवनापासूनच करून दिलं पाहिजे. एवढंच नव्हे तर मुलींच्या या नैसर्गिक क्षमतेबद्दल मुलांच्या मनात आदर निर्माण करायला शिकवलं पाहिजे. असं केल्यानं पुरुषांना पत्नीकडेच नव्हे, तर बहीण, मुलगी, आई, सून यांच्याकडेही स्त्री म्हणूनच न पाहाता माणूस म्हणून पाहाण्याची सवय लागेल.

पुरुष स्त्रियांना त्यांच्या नैसर्गिक जबाबदारीतून मुक्त करू शकत नसले तरी तिला सहकार्य करू शकतात. तिच्याकडे, ती करत असलेल्या कामांकडे सजगतेने बघून तिला समजून घेऊ शकतात. तिला मदत करू शकतात, जी तिला अधिक चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य देईल, तरच आजची ‘मुक्ता’ तणावमुक्त होईल!

atnurkarkishore@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:36 am

Web Title: article on dr kishore atanurkar who is socially conscious and works for women health abn 97
Next Stories
1 स्मृती आख्यान : अद्वितीय मेंदू
2 जगणं बदलताना : त्यात काय एवढं?
3 पुरुष हृदय बाई : भूमिका मोडताना..
Just Now!
X