अपर्णा देशपांडे

adaparnadeshpande@gmail.com

‘फोबो’ला (फिअर ऑफ बेटर ऑप्शन) कुठल्याही क्षेत्राचं वावडं नाहीये. लग्न करायचंय? सतराशे विवाह नोंदणी अ‍ॅप आणि हजारो उपवर स्थळं. ‘अजून काही ‘बेटर’ मिळतंय का बघूया..’ म्हणत तरुण पिढी लवकर योग्य निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. कपडे घ्यायचेच? मॉलमध्ये असंख्य पर्याय, चार मित्र एकत्र जमले, की टीव्हीवर नेमकं काय बघायचं? पार्टी करायची तर कोणते वेगवेगळे पदार्थ कुठल्या हॉटेलमधून मागवायचे? कोणत्या ‘अ‍ॅप’द्वारे मागवायचे? समजा एका निर्णयावर एकमत जरी झालं तरी तिसऱ्याच ठिकाणाहून मागवलं असतं, तर बरं झालं असतं का? हा त्रासदायक विचार.. त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता आणि मग शेवटी काय, तर असमाधान!

‘फिअर ऑफ बेटर ऑप्शन्स..’ सतत सर्वोत्तम मिळवण्याच्या या ओढीतून येतं ‘निर्णयपंगुत्व’! युवा पिढीने वेळीच यावर विचार करायला हवा.

उन्हाळ्याच्या सुटीत बच्चेकंपनी जमली, म्हणून मी उत्साहानं आइस्क्रीमचा एक लिटरचा फॅमिली पॅक आणला. मुलं आडवी-तिडवी पडून टी. व्ही. बघत होती. मी आपली (बावळट) जोरात ओरडले, ‘आइस्क्रीम..’

‘‘ये…’’ मुलं ओरडली आणि भर उन्हात जाऊन आइस्क्रीम आणण्याचं सार्थक झालं, असं वाटलं मला. पण ते तसं नव्हतं.

( बिच्चारी मी!) मी कुठल्या संकटाला आमंत्रण दिलंय, याचा मला लगेचच बोध झाला..

‘‘कोणतं आइस्क्रीम आहे?’’ उठण्याची तसदी न घेता माझ्याकडे फेकण्यात आलेला प्रश्न.

‘‘चॉकलेट!’’ इति मी.

‘‘अजून काय ‘ऑप्शन्स’ आहेत?’’

‘ऑप्शन्स?’ आइस्क्रीम मिळतंय यात आनंद नाही? त्यातही ‘ऑप्शन’?

‘आइस्क्रीम मिळणार’ म्हटलं, की आम्हाला लहानपणी ‘आनंदी आनंद गडे’ व्हायचं. त्यातही ‘व्हॅनिला का पिस्ता’ असं जर विचारलंच (कारण त्यापेक्षा जास्त ऑप्शन्स जन्मलेच नव्हते तेव्हा)..तर, क्षणात निवड करून चमच्याच्या टोकावर किंचित-किंचित आइस्क्रीम घेऊन निवांतपणे त्याचा आस्वाद घेतला जायचा. ती चव आठवून-आठवून पुढचे काही दिवस आनंदात जायचे.

त्या दिवशी मुलांनी आइस्क्रीम खाल्लं खरं, पण ‘आपण उद्या यापेक्षा छान आइस्क्रीम आणू, बाजारात किती वेगवेगळे आणि उत्तमोत्तम ‘ब्रँड्स’ आहेत याची त्यांनी यादीच वाचली..मग दुसऱ्या दिवशी भाचे मंडळीला खूश करण्यासाठी आम्ही त्यांना ‘आइस्क्रीम पार्लर’मध्ये घेऊन गेलो. तिथे खिसा रिकामा करणारे असंख्य पर्याय होते. एकाचाही निर्णय पटकन झाला नाही. त्यांना निवड करण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. इतकंच नाही, तर त्यांनी शेवटी आपल्या पसंतीनं निवडून खाल्लेल्या ‘फ्लेवर’पेक्षा दुसऱ्याचाच ‘फ्लेवर’ छान वाटतोय हे जवळपास प्रत्येकाचं मत होतं. इतकी मोठी किंमत मोजूनही मी हतबल होऊन हे सगळं उघडय़ा डोळ्यानं बघत होते. कारण मला अपेक्षित समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलंच नाही..

दुसऱ्या दिवशी, मत्रिणीच्या लग्नात घालण्यासाठी लेकीला एक ‘एक्सक्लुजिव्ह’ ड्रेस घ्यायचा होता म्हणून बाजारात गेलो होतो. पहिल्याच दुकानात आम्हाला एक गाऊन खूप आवडला. मी हुश्श केलं.. पण नाही, लेक म्हणाली, ‘‘हा राखून ठेवू आणि आणखीन यापेक्षा वेगळं काही नवीन डिझाइन दुसरीकडे मिळेल, ते बघून येऊ.’’ इथपर्यंत ठीक होतं, पण हिंडून-हिंडून पायाचे तुकडे पडले, मात्र विषयाचा तुकडा पडलाच नाही. ती इतकी गोंधळून गेली, की तिला योग्य निवडच करता येईना. मग आम्ही काहीच न घेता घरी परत आलो. पैसे वाचले याचा आनंद मानावा, की तिला चटकन निवड जमली नाही आणि नुसताच वेळ वाया गेला याचा खेद मानावा, याचा मीच विचार करत बसले.

लग्नासाठी जोडीदार निवडताना तर मुला/मुलींच्या आईवडिलांची स्थिती फार दयनीय होते. हजारो विवाह नोंदणी अ‍ॅप आणि हजारो उपवर स्थळं. त्यावेळी आपल्या सगळ्या अपेक्षांच्या चौकटीत बसणारं स्थळ असलं तरी ‘अजून काही ‘बेटर’ मिळतंय का बघूया..’ म्हणत तरुण पिढी लवकर योग्य निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. त्यात काही वेळा लग्नाचं वय निघून जातं. कधी-कधी तर लग्नानंतरदेखील ‘‘ती आधीची मुलगी/मुलगाच जास्त योग्य ठरला असता नाही का?’’ असंदेखील बोलून दाखवतात. त्यामुळेच मग ‘नांदा सौख्य भरे’ असं का म्हणत असावेत, ते समजतं. ‘जीवनसाथी निवडताना विचार आणि मनं जुळणं सर्वात महत्त्वाचं. बाकी गौण असतं’, हे समजेपर्यंत बराच वेळ वाया गेलेला असतो.

काही जणांकडे उत्तम पगाराची नोकरी असते, पण हातात असलेल्या नोकरीत कायम असमाधानी राहत ते नव्या नोकरीच्या शोधात असतात. हेसुद्धा एकवेळ मान्य! अडचण तेव्हा येते, जेव्हा त्यांना चार-चार प्रस्ताव येतात आणि त्यापलीकडे आणखी आकर्षक ‘ऑफर’चा त्यांना ध्यास लागलेला असतो. सगळ्याचे फायदे-तोटे याची चर्चा करत नेमकं काय स्वीकारावं याचा समाधानकारक निर्णय ते घेऊच शकत नाहीत. हे असं प्रत्येकाचं होतं, असं अजिबात नाही. पण समाजातील असंख्य उदाहरणं याच संभ्रमावस्थेचं प्रतिनिधित्व करतात.

हे असं फक्त लहान मुलांचं किंवा तरुणांचंच होतं का? तर नाही. आपल्या अवतीभवती समाजात छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने निर्णयक्षमतेचा अभाव असणे, ही सगळ्या वयोगटांत अत्यंत सामान्य बाब झाली आहे. मानसशास्त्रात याला ‘फोबो’, (F.O.B.O) म्हणजे ‘फिअर ऑफ बेटर ऑप्शन’, असं म्हणतात. शेकडो पर्यायांतून नेमका आपल्याला चोख लागू पडेल तो पर्याय निवडता न येणं, त्या बाबतीत निर्णयच न होणं किंवा त्यामुळे एक ‘निर्णयपंगुत्व’ येणं हे एक प्रकारचं झपाटय़ानं पसरणारं मानसिक दौर्बल्य आहे. वेळेत योग्य निर्णय न घेण्याची जबरदस्त किंमत अनेकदा अगदी जवळच्या नात्यातही द्यावी लागते. पायाच डळमळीत असलेलं नातं पुन्हा उभं करण्यात इतकी ऊर्जा आणि वेळ खर्च होतो, की नंतर ती ऊर्जा आणि तो वेळ योग्य नात्यात गुंतवणेदेखील दुरापास्त व्हावं. याउलट कधी नात्यातील दोन व्यक्ती कुठल्याही वचनबद्धतेला कचरतात. ‘आज आपण शब्द देऊन बसलो तर उद्या यापेक्षा सरस नातं मिळण्याचा मार्गच बंद होईल’, ही भीती. पुन्हा ‘फीअर ऑफ बेटर ऑप्शन्स..’ सतत सर्वोत्तम मिळवण्याची ओढ.

‘फोबो’ला कुठल्याही क्षेत्राचं वावडं नाहीये. राजकारण, मनोरंजन, क्रीडा, शिक्षण असो की अर्थशास्त्र, सगळीकडेच त्याचे परिणाम दिसून येतात. चार मित्र एकत्र जमले, की ‘नेटफ्लिक्स’ वा ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ किंवा ‘हॉट स्टार’वर नेमकं काय बघायचं, हा निर्णय तर फारच अवघड!  कारण तिथे तर प्रचंड मायावी दालनं आहेत. त्याशिवाय छोटेखानी पार्टीसाठी कोणते वेगवेगळे पदार्थ कुठल्या हॉटेलमधून मागवायचे? नेमके कोणत्या ‘अ‍ॅप’द्वारे मागवायचे? मग कोणता पर्याय जास्त चांगला? एका निर्णयावर समजा एकमत जरी झालं तरी मग कुण्या तिसऱ्याच ठिकाणाहून मागवले असते, तर बरं झालं असतं का? हा त्रासदायक विचार..त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता आणि मग शेवटी काय, तर असमाधान! म्हणजे जे आत्ता उपलब्ध आहे, त्यापेक्षा आणखीन आकर्षक, वेगळं आणि भन्नाट असं काहीतरी मिळू शकेल यापायी कुठल्या पक्क्या निर्णयाला न पोहोचता येणे म्हणजे ‘फोबो.’ सोशल मीडियाने जन्माला घातलेल्या वात्रट ‘फोमो’चं (‘फिअर ऑफ मिसिंग आऊट) ‘फोबो’ हे जुळं भावंड!

जेव्हा अनेक पर्याय कमरेवर हात ठेवून समोर उभे ठाकतात तेव्हा एक प्रचंड सुखावणारी आणि स्वायत्तता देणारी भावना निर्माण होते. ‘आपल्या भावी आयुष्याच्या सगळ्या नाडय़ा आपल्या हातात आहेत आणि त्या दोऱ्यांनी आपण कठपुतळीसारखे त्याला नाचवू शकतो.’ ही स्वामित्वाची भावना डोकं वर काढते. त्यानंतर सर्वोत्तम पर्यायाचा न संपणारा शोध सुरू होतो जो माणसाच्या निर्णय क्षमतेला सुरुंग लावतो. इथे ‘फोबो’चा चंचुप्रवेश आपल्या आयुष्यात झालेला असतो.

हार्वर्ड विद्यापिठातल्या पॅट्रिक मॅकगिनिझ यांनी ‘फोबो’ ही संज्ञा प्रकाशात आणली आणि मग अनेकांनी या विषयाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. मनुष्याच्या जनुकात हा ‘फोबो’चा किडा आधीपासून होताच, फक्त तो क्रियाशील तेव्हा झाला, जेव्हा त्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य बाबीत अनेक पर्याय उपलब्ध झाले.

झपाटय़ाने झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे तुफान वेगानं जोडल्या जाणाऱ्या जगात सगळंच कसं सहजप्राप्य, तेही अनेक आकर्षक ‘ऑफर्स’सहित उपलब्ध झालं आहे. परिणामस्वरूप आपण त्या पर्यायांच्या ओझ्याखाली दबतो, त्याची भुरळ पडते आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता आपण गमावतो. असं हे अभ्यासक सांगतात.

अनंत शक्यतांमुळे निवडस्वातंत्र्य वाढत असलं तरीही प्रत्यक्ष निर्णय घेणं ही क्रिया मंदावतेच. शिवाय कमी शक्यता आणि पर्याय समोर असलेली माणसं जास्त प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतात आणि आनंदीही असतात, हे सिद्ध झालेलं आहे. मेंदूला जी काही कौशल्यपूर्ण कामं करायची असतात त्यात निर्णयप्रक्रिया हे एक गुंतागुंतीचं काम आहे. हे काम आधीच्या पिढीतील लोकांना तुलनेने सोपं होतं, कारण तेव्हा आयुष्यात आता इतकी सुबत्ता आणि त्यामुळं इतके बेसुमार पर्यायच अस्तित्वात नव्हते; मग ते जेवणातील पदार्थ, कपडे, वाहन, करिअर, असो की जोडीदाराची निवड असो.. योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यानं त्यांचं जीवन समृद्ध होत गेलं आणि त्याची गोड फळं पुढच्या पिढीलाही चाखायला मिळाली. त्याने जीवनस्तर आमूलाग्र बदलला. अनेक बाबींसाठीचा झगडा संपला. सगळं कसं ताटलीत सजवून पुढय़ात सहज हजर. त्यात संगणकीकरणाची भर पडली आणि मनुष्य सुखासीनतेच्या अधीन होत उत्तमोत्तम मिळवण्याच्या मागे लागला.

रिक क्लेमन या प्रसिद्ध लेखक-समुपदेशकानं माणसं आयुष्यातील छोटे-मोठे निर्णय घेताना किंवा करिअर घडवताना कुठलाही धाडसी निर्णय का घेऊ शकत नाहीत, याची कारणमीमांसा केली आहे. बेरी श्वार्ट्झ यांनीदेखील ‘द पॅराडॉक्स ऑफ चॉईस’ या पुस्तकात यावर प्रकाश टाकलाय. माणसं निवड प्रक्रियेत दुबळी का पडतात? तर..

त्यांना सतत वाटतं, की आपण निवडलेल्या मार्गापेक्षा आणखी चांगले परिपूर्णतेकडे नेणारे मार्ग असू शकतात.  कुठल्याही निर्णयानंतर प्रचंड अपुरेपणाची भावना असणे.   आधीचाच पर्याय जास्त योग्य होता का,    याची बोचरी शंका.

स्वप्रीती. स्वत:च्या इच्छेला अतिप्राधान्य देत आपलीच निकड सर्वप्रथम उद्दिष्ट म्हणून समोर ठेवणे.  अतिविचार. (ओव्हर थिंकिंग) क्रियाशीलतेचा अभाव, फक्त विचारच करणे.

आलेल्या संधीची मोजावी लागणारी किंमत.  कशालाच नाही म्हणावे वाटत नाही. सगळेच पर्याय हाताळून बघण्याची इच्छा. कुठलाच पर्याय सोडून देण्याची तयारी नसणे.

हे विशेषत्वाने करिअर निवडीबाबत किंवा नोकरीसंदर्भात घडते. मग काहीच नीट करावंसं वाटत नाही. यात आणखीन एक मानसशास्त्रीय संज्ञा दडलीये. ती म्हणजे FODA, ‘फिअर ऑफ डुइंग एनीथिंग’. काहीही काम करण्याची भीती वाटणे. अशावेळी काहीही न करता निर्णय फक्त लांबणीवर टाकले जातात. चालढकल केली जाते.

आपल्याला ‘फोबो’ची लागण झाली आहे का, हे प्रत्येकाने वेळोवेळी तपासून पाहावे. त्याची ढोबळ लक्षणं म्हणजे..

व्यक्तिमत्त्वात आलेला बुजरेपणा.

क्षुल्लक गोष्टीसाठी निर्णय क्षमतेचा अभाव.

कमालीची छोटी बाब, जशी, आज काय कपडे घालू हेदेखील ठरवता येत नाही. त्यात प्रचंड मौल्यवान वेळ वाया गेला तरीही!

कायम गोंधळलेली मानसिक अवस्था आणि चिंता. अशाने मेंदू कुठेच नीट एकाग्र होऊ शकत नाही.

घेतलेल्या निर्णयावर पश्चात्ताप. मग ‘तो निर्णय योग्यच होता.’ असं कुणी कितीही डोकं फोडून सांगितलं तरीही!

असलेल्या स्थितीत कायम असमाधान.

आपल्या सुरक्षित चौकटीबाहेर काही करण्याची अजिबात तयारी नसणं. त्याबद्दल एक प्रकारचं भय असणं, मात्र खूप काही चांगलं घडावं, ही कायम अपेक्षा असणं.

पर्याय निवडताना अपयशाची भीती असणं.. इतकी, की थोडीही जोखीम उचलायची हिंमत नसणं.

कुटुंबात, व्यावसायिक जगात पुढाकार घेऊन कुठलीही जबाबदारी न उचलणं आणि त्या कमतरतेची जाणीवही नसणं.

ही ढोबळ लक्षणं दिसली, की सावध होणं गरजेचं आहे. वरवर अतिसामान्य दिसणाऱ्या या समस्या सुरुवातीला किरकोळ वाटल्या तरी वेळेत ठोस पाऊल नाही उचललं तर गंभीर मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागते.

निर्णयाच्या मुद्यावर मनुष्याची दोन प्रकारांत विभागणी केली जाते. पहिला ‘मॅक्सिमायझर्स’ आणि दुसरा ‘सॅटीस्फायझर्स’. ‘जास्तीत जास्त’ आणि ‘गरजेपुरतं’ हा त्यातील मुख्य फरक. पहिल्या प्रकारातील लोक आपल्या आर्थिक आणि बौद्धिक कुवतीचा विचार न करता भविष्यात जास्तीत जास्त फायदा होईल, अशा प्रकारचे पर्याय निवडतात. ते आपल्या निर्णयाशी प्रामाणिक असतीलच, असं नाही. दुसऱ्या प्रकारात व्यक्ती आपली कुवत आणि सध्याची गरज यानुसारच निर्णय घेतात आणि त्याची कास सोडत नाहीत. ते पहिल्या प्रकारच्या व्यक्तींपेक्षा कधीही जास्त समाधानी असतात

‘फोबो’च्या चक्रव्यूहात न अडकता, जगणे सोपे करण्यासाठी आपल्या गरजा, क्षमता, मर्यादा आणि स्वभावदोष विचारात घेऊन डोळसपणे, चटकन योग्य पर्याय निवडावा. त्यावेळी अति उपलब्धता ही बाब मारक ठरू नये, याचे तारतम्य ठेवावेच लागेल. ‘मी निवडलेल्या पर्यायाने खरंच इतकं नुकसान होतंय का? त्याचा एवढा बागुलबुवा करण्याची खरंच गरज आहे का?’ हे स्वत:ला विचारावे.

एकुणात, परिपूर्णता ही परिस्थितीसापेक्ष असते, याचे भान ठेवल्यास आजचा  निर्णय ‘परफेक्ट’च आहे याचे समाधान मिळेल. अनावश्यक, अव्यवहार्य पर्याय यादीतून छाटून नेमक्या-मोजक्या मार्गाचाच विचार करावा. आनंदी जगण्यासाठी स्वप्नातील परिपूर्णता आणि वास्तवातील अपूर्णतेची गोडी याची सांगड घालता आलीच पाहिजे..