डॉ. मृदुला बेळे

mrudulabele@gmail.com

भारतातच नव्हे तर जगभरात अनेक देशांमध्ये मग ते प्रगत असले तरी सारख्या स्वरूपाचं काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या मोबदल्यात किंवा पगारात तफावत दिसून येते. स्त्रीच्या घरातल्यांप्रमाणेच तिच्या पुरुष सहकाऱ्यांचाही तिच्या नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच सकारात्मक असतो असं नाही.

१२ जानेवारीला ब्रिटिश पत्रकार समीरा अहमद यांनी ‘बीबीसी’ या वाहिनीविरोधात खटला जिंकला. हा खटला होता लिंगभेदामुळे मिळणाऱ्या मोबदल्यात असणाऱ्या तफावतीविरोधात. ही तफावत केवळ नोकरीच्याच ठिकाणी आढळते असे नाही. ती कलाक्षेत्रासह स्त्री-पुरुष एकत्र काम करतात त्या सगळ्याच क्षेत्रात आहे. समीरा अहमद खटल्याच्या निमित्ताने एकूणच असमान मोबदला आणि मोबदल्यातला लिंगभेद या दोन्हीची चर्चा व्हायला हवी.

समीरा अहमद. एक ब्रिटिश पत्रकार. ‘बीबीसी’साठी काम करणारी. २०१३ पासून ती ‘न्यूज वॉच’ या ‘बीबीसी’वरच्या एका कार्यक्रमाची सादरकर्ती आहे. ठरावीक काळात ‘बीबीसी’ने केलेल्या वेगवेगळ्या घटनांच्या, बातम्यांच्या, त्यासंबंधित कार्यक्रमांच्या प्रक्षेपणाबद्दल प्रेक्षकांची काय मतं होती आणि त्या मतांबद्दल कार्यक्रमाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांचं काय म्हणणं आहे ते सांगणं, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येकी भाग असतो १५ मिनिटांचा आणि तो भाग सादर करण्यासाठी मोबदला म्हणून समीराला मिळतात ४६५ पाउंड! (४३ हजार २०० रूपये)

जेरेमी व्हाईन हाही एक ब्रिटिश पत्रकार. ‘बीबीसी’मध्येच काम करणारा. ‘पॉइंट्स ऑफ व्ह्य़ू’ नावाच्या कार्यक्रमाचा सादरकर्ता. या कार्यक्रमात असतं काय? तर ‘बीबीसी’ने सादर केलेल्या कार्यक्रमांचं प्रेक्षकांनी केलेलं कौतुक किंवा त्यावर केलेली टीका. कार्यक्रमाचा कालावधी किती? तर १५ मिनिटे. म्हणजे ‘न्यूज वॉच’ आणि ‘पॉइंट्स ऑफ वू’ हे दोन्ही कार्यक्रम जवळपास सारखेच आहेत असं म्हणता येईल, नाही का? पण तरी ते सारखे नाहीत. एका महत्त्वाच्या बाबतीत त्यांच्यात एक मोठी तफावत आहे. ती बाब कोणती? तर सादरकर्त्यांला मिळणारा मोबदला. या कार्यक्रमाच्या एका भागाच्या सादरीकरणासाठी व्हाईनला ‘बीबीसी’ देतं तब्बल तीन हजार पाऊंड. (२ लाख ७९ हजार रूपये) म्हणजे समीराच्या मोबदल्याच्या तब्बल सहापटीपेक्षाही थोडे जास्त.

या तफावतीबद्दल अनेक वेळा ‘बीबीसी’शी हुज्जत घातल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये समीराने इंग्लंडमधल्या रोजगार लवादाकडे (कोर्टाकडे) ‘बीबीसी’च्या विरोधात खटला भरला. समीराच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही कार्यक्रम सारखेच असूनही दोन्ही सादरकर्त्यांच्या मोबदल्यात जमीनअस्मानाचा फरक असल्याचे कारण आहे लिंगभेद. समीरा एक स्त्री आहे आणि स्त्री असल्यामुळे एका पुरुष सादरकर्त्यांएवढा मोबदला मिळण्याची तिची पात्रता नाही, या एकमेव कारणामुळे तिला कमी पैसे दिले जातात असं तिचं म्हणणं आहे. ब्रिटनमध्ये २०१० मध्ये अस्तित्वात आलेल्या ‘इक्वल पे अ‍ॅक्ट’नुसार हा गुन्हा आहे. आजपर्यंत ‘बीबीसी’ने तब्बल सात लाख पाऊंड कमी दिले आहेत, ते आपल्याला देण्यात यावेत, अशी तिची मागणी होती.

गेल्या आठवडय़ात, १२ जानेवारीला या खटल्याचा निकाल लागला आणि समीरावर होणारा अन्याय हा केवळ लिंगभेदामुळे आहे हे रोजगार लवादाने एकमुखाने मान्य केलं. ‘पॉइंट्स ऑफ वू’ या कार्यक्रमाचा सूर काहीसा विनोदी आहे. असे कार्यक्रम सादर करण्यासाठी सादरकर्त्यांत विनोदबुद्धी असली पाहिजे, त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक असली पाहिजे.. जी व्हाईनमध्ये आहे आणि म्हणून त्याचा मोबदला जास्त आहे,’’ हा ‘बीबीसी’चा युक्तिवाद या लवादाच्या तीन न्यायाधीशांच्या समितीने साफ फेटाळून लावला. आता या निकालाविरोधात ‘बीबीसी’ने अपील केलं नाही तर त्यांना समीराला तब्बल सात लाख पाउंड (साडेसहा कोटी रूपये) द्यावे लागणार आहेत.

या खटल्याचा निकाल समीराच्या बाजूने लागला असला तरी साधारण अशाच प्रकारचे तब्बल २० खटले न्यायालयात दाखल होऊ घातले आहेत. केरी ग्रेसी या आणखी एका स्त्री पत्रकाराने २०१८ मध्ये ‘बीबीसी’मधल्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. केरी ही ‘बीबीसी’च्या चीन विभागाची संपादक होती. तब्बल ३० वर्षांपासून ती ‘बीबीसी’साठी काम करत होती आणि ‘बीबीसी’ची एक अत्यंत नावाजलेली पत्रकार असा तिचा नावलौकिक होता. ‘बीबीसी’मधल्या रोजगार संस्कृतीत कमालीचा लिंगभेद आहे आणि अनेकदा तक्रार करूनही व्यवस्थापन ही समस्या सोडवण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीये. याचा निषेध म्हणून आपण नोकरी सोडतो आहोत’’, असं केरी म्हणाली. केरीच्या समर्थनार्थ ‘#आयस्टॅन्डविथकेरी’ अशी हॅश्टॅग मोहीम सोशल मीडियावर चालवली गेली आणि ‘बीबीसी’मध्ये काम करणाऱ्या कितीतरी स्त्री पत्रकार या मोहिमेत सहभागी झाल्या.

ज्या कायद्यानुसार हा खटला दाखल करून घेतला गेला तो आहे ‘इक्वल पे अ‍ॅक्ट’ किंवा ‘समान मोबदला कायदा.’ समान वेतन म्हणजे इक्वल पे आणि मोबदल्यातला लिंगानुसार केला जाणारा फरक (जेंडर पे गॅप) यात फरक आहे. समान वेतन म्हणजे समान कामासाठी समान मोबदला. जेव्हा दोन किंवा अधिक लोक एकाच प्रकारची नोकरी करत असतात, एकच किंवा एकसारखं काम करत असतात, किंवा एकाच प्रकारचं कौशल्य लागेल अशी वेगवेगळी कामं करत असतात तेव्हा त्यांना सारखाच मोबदला मिळाला पहिजे, असं हा कायदा सांगतो. ‘जेंडर पे गॅप’ म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना मिळणाऱ्या सरासरी वेतनामधला फरक!

भारतात या बाबतीत कायदे आहेत का? तर अर्थातच आहेत. १९७६ मध्ये भारतात ‘इक्वल रेम्युनरेशन अ‍ॅक्ट’ संमत करण्यात आला आहे. शिवाय घटनेतल्या अनेक कलमांनुसारही सारख्या स्वरूपाचं काम करणाऱ्या

स्त्री-पुरुषाच्या मोबदल्यात किंवा पगारात तफावत असता कामा नये. जर या दोघांच्या शैक्षणिक पात्रतेत, त्या कामाच्या गुप्ततेत, त्यात दोघांवर असलेल्या जबाबदारीत फरक असेल तर त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात तफावत असू शकते. पण बाकी सगळं समान असताना ही तफावत केवळ लिंगभेदामुळे असेल तर ते मात्र या कायद्यानुसार चुकीचं आहे. अशा स्वरूपाच्या काही खटल्यांचे निकालदेखील स्त्रियांच्या बाजूने लागले आहेत. १९८७ मध्ये ‘मॅकिनॉन मॅकेंझी’ खटल्यात स्त्री आणि पुरुष स्टेनोग्राफर्सना सारखाच पगार दिला गेला पाहिजे, असं न्यायालयाने सांगितलं.

तरी आज भारतात स्त्री-पुरुषांना सारख्या कामासाठी समान मोबदला मिळतो आहे का? दुर्दैवाने याचं उत्तर नाही असं आहे. २०१९ मध्ये ‘मॉन्स्टर’ या कंपनीने याबाबतीत एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. इंटरनेटवरून नोकरी मिळवून देण्याचे काम करणाऱ्या संस्थांचा हा अहवाल आहे. या नुसार भारतात स्त्री-पुरुषांच्या मिळकतीत १९ टक्के इतका फरक आहे. इथल्या पुरुषांना दर तासाला २४२ रुपये इतके सरासरी वेतन मिळत असेल तर स्त्रियांचे वेतन असते तासाला सरासरी १९६ रुपये.

आणखी एक धक्कादायक निष्कर्ष असा की वेतनातली ही लिंगभेदामुळे पडलेली दरी जसजशी कौशल्याची पातळी वाढेल तसतशी रुंदावत जाते. म्हणजे कमी कौशल्याची कामे करणाऱ्या स्त्री-पुरुष कर्मचाऱ्यात हा फरक अगदी किरकोळ आहे. कौशल्याची कामे करणाऱ्या स्त्री-पुरुषात २० टक्के इतका, तर अधिक कौशल्याची कामे करणाऱ्या स्त्री-पुरुषांत ३० टक्के इतका. शिवाय ही दरी जसजसा अनुभव वाढेल तसतशी वाढत जाते. एक काम करण्याचा दहा वर्ष अनुभव असलेल्या पुरुषाचे वेतन तेच काम करण्याचा तेवढाच अनुभव असलेल्या स्त्रीपेक्षा १५ टक्के जास्त असते.

हॉलीवूडमध्ये मानधनातली ही तफावत आहेच.  एम्मा स्टोन या हॉलीवूडच्या सगळ्यात महागडय़ा अभिनेत्रीला अभिनेत्यांपेक्षा अडीच पट कमी मोबदला मिळतो, असं ती म्हणते. मेरील स्ट्रीपनेही याबाबत सतत आवाज उठवला आहे.

‘द पोस्ट’ या आपल्या ऑस्करविजेत्या चित्रपटाच्या जाहिरातीच्या वेळी तिने अनेकदा व्यासपीठावरून जाहीरपणे या विषयाला वाचा फोडली आहे.

समीरा अहमद खटल्याच्या निमित्ताने असमान मोबदला (अनइक्वल पे) आणि मोबदल्यातला लिंगभेद (जेंडर पे गॅप) या दोन्हीची चर्चा व्हायला हवी. स्त्री आणि पुरुषांना मिळणाऱ्या मोबदल्यात तफावत का आहे याबाबत अनेक अभ्यास झाले आहेत.

पुरुषाला जेव्हा एक रुपया मोबदला मिळतो तेव्हा स्त्रीला फक्त ५४ पैसे मिळत असतात. त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यातील ही तफावत दूर व्हायला तब्बल २०२ वर्षे लागतील, असं एका अहवालाचं म्हणणं आहे. बरेचदा तर पुरुषाने मिळवलेल्या शैक्षक्षिक पदव्या आणि स्त्रीने मिळवलेल्या पदव्या यातच तफावत असते. आजही बऱ्याच मुलींच्या घरच्यांसाठी तिच्या शिक्षणापेक्षा तिचं लग्न अधिक महत्त्वाचं असतं. त्यामुळे मुलीला मुलापेक्षा कमी शिकवलं जातं. त्यामुळे अर्थातच कमी शिकलेल्या मुलीला तिच्याहून अधिक शिकलेल्या मुलापेक्षा कमी पगार मिळतो. सुदैवाने ही तफावत आता कमी होऊ लागली आहे आणि बऱ्याच कुटुंबांत आता मुलीला मुलाइतकेच शिकवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रिया मुळातच पुरुषांपेक्षा वेगळे व्यवसाय निवडताना दिसतात. सर्वसाधारणपणे स्त्रियांचा कल इंजिनीयर होण्यापेक्षा नर्स किंवा शिक्षिका आदी होण्याकडे अधिक असतो. हे व्यवसाय मुळातच कमी मोबदला मिळवून देणारे असतात. त्यामुळे स्त्रियांची सरासरी मिळकत पुरुषांपेक्षा कमी असते. पण स्त्रियांनी जरी पुरुषप्रधान व्यवसाय निवडले तरी त्यातल्या पुरुषांपेक्षा तिला कमीच पगार मिळतो, असे दिसून आले आहे.

शिवाय मुलं झाल्यावर स्त्रिया अर्धवेळ नोकरी करणं पत्करतात आणि त्यामुळे त्याच प्रकारचे काम पूर्णवेळ करणाऱ्या पुरुषापेक्षा अर्थातच त्या कमी पैसे कमावतात.  मुळात स्त्रीला नोकरी देताना ती तरुण आणि अविवाहित असेल तर ती लग्न होऊन केव्हाही नोकरी सोडून जाईल म्हणून आणि ती विवाहित असेल तर बाळंतपणाची रजा घेईल म्हणून तिला कमी पगार देऊ केला जातो, अशीही उदाहरणे आहेत. तिची मुलं लहान असतील तर ती स्त्री पुरुषाइतके तास काम करू शकणार नाही, कारण तिचं र्अध लक्ष मुलांत असेल म्हणूनही अनेक ठिकाणी तिला पगार कमी मिळतो. थोडक्यात काय तर वयाच्या कुठल्याही टप्प्यात स्त्री ही काम करण्यासाठी कमी उपयोगी समजली जाते आणि त्यामुळे तिला कमी मोबदला देऊ केला जातो.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांना मुळातच नोकरी सुरू करताना पगारासाठी घासाघीस करायला जमत नाही. आपल्या अनुभवाइतका अनुभव असलेल्या आणि आपल्या इतकेच शिक्षण असलेल्या समव्यावसायिक पुरुषाला किती पगार दिला जातोय हे जाणून घेणे आणि त्यानुसार स्वत:च्या पगार आणि भत्त्यासाठी घासाघीस करणे तिला जमत नाही. खरं तर स्त्रिया घासाघीस करण्यात पटाईत असतात. पण स्वत:च्या पगाराच्या बाबतीत ती करणं स्त्रियांना जमत नाही. कदाचित बऱ्याच स्त्रिया नोकरी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, एक वेगळी ओळख कमावण्यासाठी करत असतात. पशांपेक्षा त्यातून मिळणाऱ्या या ओळखीची त्यांना अधिक गरज असते. बरेचदा पसा दुय्यम असतो आणि मग बाजारपेठेला स्त्रीची ही वृत्ती नीट माहीत असल्याने तिला कमी पगार देऊ केला जातो. तो ती निमूटपणे स्वीकारते. मग पहिली नोकरी सोडून जेव्हा ती दुसरी नोकरी शोधू लागते तेव्हा इथला पगार ठरवताना संदर्भ म्हणून तिचा आधीच्या नोकरीतला पगार पाहिला जातो.  हा मुळातच पुरुषापेक्षा कमी असल्याने मग पुढचाही पगार कमी मिळतो. हे चक्र पुढे चालूच राहतं.

याशिवाय कमावणाऱ्या स्त्रीच्या पगाराकडे मुळातच कुटुंबात आणि समाजात दुय्यम आमदनी म्हणून पाहिलं जातं. पसा किंवा पगार वाढवून मागितला की, ‘तुला काय गरज आहे पगाराची. तुझा पगार तर कपडे आणि दागिन्यांवरच खर्च होत असेल.’ अशी मल्लिनाथी तिचा एक तरी पुरुष सहकारी करतोच करतो. या स्त्रीने नोकरी मिळवून एका पुरुषाच्या पोटावर पाय दिला आहे, असंही तिच्या बऱ्याच सहकाऱ्यांना वाटत असतं. कुटुंबातल्या माणसांचाही तिच्या नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदी आजही, घरदार, मुलं वगैरे सगळं सांभाळून तिने  नोकरी करावी असाच असतो. साहजिकच ती स्वत:च आपल्या नोकरीला, आपल्या कमाईला दुय्यम दर्जाची समजू लागते. आणि ती स्वत:च त्याला दुय्यम दर्जा देत असेल तर इतर कोण त्याला मान देणार, नाही का?

शेवट करताना एक साधं उदाहरण पाहू या. एकाच वर्गात, एकच प्रकारचं शिक्षण घेऊन बाहेर पडलेले मित्र-मत्रीण लग्न करायचं ठरवतात. दोघांना त्यांच्या क्षेत्रात असलेलं ज्ञान तोडीस तोड आहे. कदाचित ती त्याच्याहून थोडी जास्त हुशार आहे आणि कामसूही. लग्न करून हे नवराबायको साधारण एकसारख्याच क्षेत्रात नोकरी करतायत. अशा वेळी आपल्या बायकोला आपल्या इतकाच किंवा आपल्याहून जास्त पगार मिळतोय हे नवऱ्याला अगदी मोकळ्या मनाने स्वीकारता येईल का? आणि त्या पत्नीला याचा स्वीकार अपराधी भावना न येता करता येईल का?

या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जेव्हा ‘हो’ अशी येतील तेव्हा आणि तेव्हाच आपण स्त्री-पुरुषांना समान वेतन मिळण्याचा विचार करू शकतो. सगळे नमस्कार जसे एकाच देवापाशी

जाऊन पोचतात तसंच या आणि स्त्रियांच्या संदर्भातल्या इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत गेलं की एकाच उत्तरापर्यंत जाऊन पोचतं- ते म्हणजे ‘स्त्री-पुरुष समानता’. ती एकदा स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मनात

रुजली, रक्तात भिनली, की इतर सगळे प्रश्न आपसूकच सुटतील. मूळ मुद्दा आहे ती कधी रुजणार हा!

आज भारतात स्त्री-पुरुषांना सारख्या कामासाठी समान मोबदला मिळतो आहे का? दुर्दैवाने याचं उत्तर नाही असं आहे. २०१९ मध्ये ‘मॉन्स्टर’ या कंपनीने याबाबतीत एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. इंटरनेटवरून नोकरी मिळवून देण्याचे काम करणाऱ्या संस्थांचा हा अहवाल आहे. या नुसार भारतात स्त्री-पुरुषांच्या मिळकतीत १९ टक्के इतका फरक आहे. इथल्या पुरुषांना दर तासाला २४२ रुपये इतके सरासरी वेतन मिळत असेल तर स्त्रियांचे वेतन असते तासाला सरासरी १९६ रुपये.