योगेश शेजवलकर

yogeshshejwalkar@gmail.com

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

जिथे माणसं असतात तिथल्या बहुतेक ठिकाणी राजकारण असतंच. त्यातून कुणाचीच सुटका नाही; पण मग आपण पूर्ण प्रयत्न करूनही, उत्तम कामगिरी करूनही आपल्याला हवी ती संधी मिळेलच कशावरून?.. याचं खरं उत्तर म्हणजे अशी खात्री कुणीच देऊ शकणार नाही. अशा अनिश्चिततेच्या स्थितीत मनाला वाटणारी भीती कशी दूर सारायची?.. नेमकी हीच गोष्ट सतरा-अठरा वर्षांच्या मुलानं ‘सीनिअर’ला विचारली आणि ‘सीनिअर’नं स्वत: मोठी किंमत देऊन अनुभवातून शिकलेलं ‘सूत्र’ त्याच्यासमोर उलगडलं.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर किती तरी वर्षांनी आज पन्नाशीच्या आसपास असलेला ‘सीनिअर’ जिमखान्यात येत होता. निमित्त होतं, जिमखान्यावर पार पडणाऱ्या वार्षिक कार्यक्रमातल्या बक्षीस समारंभाचं! जिमखान्यात पाऊल ठेवताक्षणी त्याची नजर भिंतीवरच्या ‘रेकॉर्ड बोर्ड’कडे गेली. जिमखान्याच्या क्रिकेट मैदानावरच्या सामन्यात झालेल्या विक्रमांची नोंद त्या फलकावर असायची. त्यावर आपलंही नाव असावं, असं तिथं खेळणाऱ्या प्रत्येकाला वाटायचं. आजही त्या मैदानावर सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम आपल्याच नावावर आहे हे पाहून ‘सीनिअर’ला विलक्षण समाधान आणि आश्चर्यही वाटलं.

त्याच्या काळात शहरातल्या क्लब क्रिकेटमधला सर्वात ‘स्फोटक’ फलंदाज अशी त्याची ओळख होती. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे अशक्य वाटणारे सामनेही त्यानं आपल्या संघाच्या बाजूनं फिरवले होते. तो जिमखाना म्हणजे त्याचं ‘होम पिच’ होतं. क्रिकेटचं बाळकडू त्याला तिथेच मिळालं होतं. पुढे ‘रणजी ट्रॉफी’साठी राज्याच्या संघात त्याची निवड झाली. तिथेही ‘सीनिअर’नं आपल्या प्रतिमेला साजेसं असंच खेळाचं प्रदर्शन केलं. अनेक वर्ष तडाखेबंद खेळ केल्यामुळे आणि मोकळेपणानं ‘ज्युनिअर’ खेळाडूंना केलेल्या मार्गदर्शनामुळे त्याला कौतुकानं ‘सीनिअर’ हे नाव मिळालं होतं. वाईट गोष्ट एकच होती, ती म्हणजे कामगिरी उत्तम असूनही त्याची आंतरराष्ट्रीय संघासाठी निवड झाली नव्हती. त्या काळात ‘ट्वेंटी-ट्वेंटी’सारखे पर्याय नसल्यानं त्याची कारकीर्द पुढे जाऊ शकली नव्हती. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय संघात निवड होत नाही म्हटल्यावर वैतागून त्यानंच ती संपवली होती.

संध्याकाळी उशिरा कार्यक्रम संपल्यावर घरी जाण्याआधी दोन मिनिटं मैदानावर जाऊ या, असा विचार करून ‘सीनिअर’ एकटाच मैदानावर आला. रात्री सामने खेळवता यावेत यासाठी आता त्या मैदानाच्या बाजूला मोठे दिवे लावले होते. जिमखान्याचा वार्षिक कार्यक्रम असल्यामुळे त्यातले काही दिवे त्या दिवशी सुरू होते. त्यांच्या प्रकाशात मैदान उजळलं होतं. ‘सीनिअर’च्या बऱ्याच आठवणी त्याची तिथे वाट बघत होत्या.

काही क्षण शांतपणे मैदानाकडे पाहात उभं राहिल्यावर अचानक ‘सीनिअर’ला शब्द ऐकू आले, ‘‘मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.. अर्थात तुम्हाला वेळ असेल तर.’’ ‘सीनिअर’नं मागे वळून बघितलं, तर ‘तो’ उभा होता. त्याची तोंडओळख थोडय़ाच वेळापूर्वी बक्षीस समारंभात झाली होती. त्या वर्षी सर्वात जास्त बक्षिसं मिळवणारा तो फलंदाज होता. सतरा-अठरा वर्षांच्या या मुलाला आपल्याशी काय बोलायचं असेल, असा ‘सीनिअर’ला प्रश्न पडला; पण तरीही त्यानं होकार दिला आणि मैदानाला फेरी मारत गप्पा मारू, असं ठरवून दोघांनी चालायला सुरुवात केली.

‘तो’ काहीसा चाचरत म्हणाला, ‘‘अगदी खरं सांगायचं तर मला पुढे क्रिकेट चालू ठेवावं की नाही, असा प्रश्न पडला आहे. त्याबद्दल एखाद्या अनुभवी खेळाडूशी बोलायचं होतं. जिमखान्यात तुमचं नाव मी खूप ऐकलं आहे. आज वाटलं, तुमच्याशिवाय याबद्दल बोलण्यासाठी दुसरी योग्य व्यक्ती असणार नाही.’’

क्रिकेट सोडण्याची त्याची इच्छा ऐकून ‘सीनिअर’ चमकून म्हणाला, ‘‘अरे, इतका चांगला खेळतो आहेस.. तर हे काय अचानक? घरी काही प्रॉब्लेम आहे का?.. की ट्रेनिंगच्या खर्चामुळे ओढाताण होते आहे?’’ त्यावर तो चटकन म्हणाला, ‘‘नाही, तसा कोणताही प्रश्न नाही.. आणि मी सध्या चांगला खेळतोही आहे; पण पुढे काय होईल याचा मला काही अंदाजच येत नाही. माझीही ‘रणजी’साठी नक्की निवड होईल; पण त्यापुढे चांगलं खेळूनही मुख्य संघात खेळण्याची संधी मिळाली नाही, तर कशालाच काही अर्थ राहणार नाही. थोडक्यात सगळी मेहनत वाया.. नाही का?’’

त्यावर क्षणभर विचार करून ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘आता लक्षात आलं, की तुला माझ्याशीच का बोलावंसं वाटलं.’’ त्यावर काहीसा बावचळून तो म्हणाला, ‘‘म्हणजे.. निवड झाली नाही म्हणून तुम्ही क्रिकेट सोडलंत त्यासाठी नाही; पण तुम्ही या परिस्थितीचा अनुभव घेतला आहे म्हणून तुमच्याशी बोलावंसं वाटलं.’’

त्यावर ‘सीनिअर’ हसून म्हणाला, ‘‘हरकत नाही. माझ्या फलंदाजीमुळे नाही, पण न झालेल्या निवडीमुळे का होईना, तुला माझ्याशी बोलावंसं वाटलं ही चांगलीच गोष्ट आहे.. नाही का?’’ त्यावर काय बोलावं हे न सुचून तो म्हणाला, ‘‘सॉरी.’’

‘‘अरे, सॉरी काय? जे आहे ते आहे. लोकांना मी फिरवलेल्या मॅचेस्पेक्षा माझी मुख्य संघात निवड न होणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं आणि तसं म्हटलं तर ते बरोबरही आहे..’’अनुभवांना स्मरून ‘सीनिअर’ म्हणाला.

‘‘पण निवड करताना भरपूर राजकारण होत असेल, तर कशाची खात्री बाळगायची?’’ या त्याच्या पुढच्या प्रश्नातून त्याची नेमकी भीती समोर आली. त्यावर ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘जिथे माणसं असतात तिथल्या बहुतेक ठिकाणी राजकारण हे असतंच. त्यातून तुझीही सुटका नाही.’’ त्यावर वैतागून तो म्हणाला, ‘‘कितीही मेहनत घेऊन शेवटी विभागांसाठी ठरवलेल्या आकडय़ानुसारच निवड होणार असेल, तर कशालाच काही अर्थ नाही.’’

त्यावर शांतपणे ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘बक्षिसं, विक्रम, विविध संघांमधली निवड, ग्लॅमर हे क्षणभर बाजूला ठेव आणि एका प्रश्नाचं उत्तर मला सांग. तू क्रिकेट का खेळतोस?’’ त्यावर तो लगेच म्हणाला, ‘‘कारण मला आवडतं म्हणून.’’

‘‘मग खेळत राहण्यासाठी एवढं पुरेसं नाही?’’

‘‘पण मला त्यात करिअर करायचं आहे,’’तो. ‘‘तसं जर खरंच असेल, तर तू फलंदाजीबद्दल मला प्रश्न विचारायला हवे होतेस.. नाही का?’’ ‘सीनिअर’च्या त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. तेव्हा ‘सीनिअर’त्याला समजावत म्हणाला, ‘‘मी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा या सगळ्यातून गेलो आहे. तेव्हा  तुला असे प्रश्न का पडतात हे मी समजू शकतो; पण कसं आहे, सामन्यामध्ये ‘पिच’ फलंदाजीला अनुकूल नसेल तर आपण फलंदाजी सोडून देतो का? इथंही तसंच आहे. चांगलं खेळत असतानाही तेव्हा माझी निवड का झाली नव्हती, याचा विचार करताना राजकारणाच्या पिचवर न जाता फक्त खेळाचा विचार कर. मग कदाचित एक निष्कर्ष असाही निघेल, की त्या वेळी बाकीचे खेळाडूही तुल्यबळ होते.’’ ते ऐकून तो म्हणाला, ‘‘याबद्दल मी कधी फार विचार केला नाही.’’

त्यावर ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘अरे, तू काय, मीही कधी केला नव्हता. घाईघाईनं खेळ पूर्ण बंद केल्यावर काही महिन्यांनी डोकं शांत ठेवून विचार केला. निवड झालेल्या खेळाडूंचा खेळही बघितला. तेव्हा काही गोष्टी मला जाणवल्या. आपण अपयशी ठरल्यावर विषय कधीही सोडून द्यायचा नसतो. उलट यशस्वी झालेल्यांचं यश मान्य करून आपण खरंच कुठे कमी पडलो का, याचा विचार करायचा असतो. त्यानं बाकी काही नाही, पण अनेक नको त्या गोष्टींचा विचार करणं तरी बंद होतं.’’

‘‘पण समजा, फक्त आणि फक्त राजकारणामुळेच आपली निवड झाली नसेल तर?’’ त्याला ‘सीनिअर’चं बोलणं पूर्णपणे पटलेलं नव्हतं. त्यावर ‘सीनिअर’ स्पष्टपणे म्हणाला, ‘‘मग तुझ्या हातात तुझी बॅट आहेच ना? अशी कामगिरी दाखव की तुझ्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य होईल. कोणीही कितीही राजकारण केलं तरी तू फलंदाजी करत असताना तुझी बॅट पाठीमागून तर कोणी धरून ठेवू शकत नाही.. हे तरी मान्य आहे?’’ त्यावर त्यानं फक्त होकारार्थी मान हलवली.

तेव्हा ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘सॉरी, पण गरजेचं वाटलं म्हणून मी थोडं स्पष्ट बोललो. घाईघाईत निर्णय घेण्याची माझ्यासारखी चूक तू करू नकोस. आपल्याकडची निवड प्रक्रिया पाहता तुझे प्रश्न, तुला वाटणारी भीती अजिबात चुकीची नाही. फक्त तू तुझ्या गुणवत्तेपेक्षा त्या भीतीला जास्त महत्त्व देतो आहेस. तेवढं करू नकोस.’’ त्यावर ‘‘हं!’’ इतकंच तो पुटपुटला. सांगितलेलं त्याला अजूनही फारसं पटलेलं नाही म्हटल्यावर आता प्रश्न विचारण्याची वेळ ‘सीनिअर’ची होती. ‘‘बरं मला सांग, खेळताना एखादा धोकादायक गोलंदाज समोर आला तर तू काय करतोस?..’’ तो चटकन म्हणाला, ‘‘मी आधी अंदाज घेतो आणि मग सरळ त्याची गोलंदाजी फोडून काढतो. गोलंदाज कोण आहे, किती अनुभवी आहे, किती खुन्नस देतो आहे, अशा कोणत्याही गोष्टींच्या दडपणाखाली मी तरी खेळत नाही.’’

त्यावर ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘बरोबर. ही तुझी पद्धतच प्रश्न सोडवण्याचं नेमकं ‘सूत्र’ आहे. तेच तू निवडप्रक्रियेच्या बाबतीतही वापर. आपला नैसर्गिक खेळ कर. पिचवर तू टिच्चून उभा राहा. कोणतीही गोष्ट आपोआप घडणार नाही, तर तुला ती घडवावी लागेल याची जाणीव ठेवून खेळ. हे सगळं करूनही आंतरराष्ट्रीय संघात निवड होईलच असं कुणीही सांगू शकत नाही; पण निवड होण्याची शक्यता निश्चित वाढेल. मला वाटतं, या बाबतीत माझ्याकडे तरी तुला सांगण्यासारखं हेच आहे.’’

‘‘तुम्ही जे म्हणालात ते हळूहळू का होईना, पण मला पटतंय. वेडावाकडा विचार करण्याचा माझा भरपूर वेळ वाचवल्याबद्दल तुम्हाला कितीही थंॅक्स म्हटलं तरी कमीच आहे.’’ तो नम्रपणे म्हणाला. त्यावर ‘सीनिअर’ म्हणाला, ‘‘खरोखर थंॅक्स म्हणावंसं  वाटत असेल, तर सर्वात आधी तो माझा ‘रेकॉर्ड’ मोड. इतकी वर्ष ‘रेकॉर्ड’ टिकतो, हे तुम्हाला बघवतं तरी कसं?’’

त्यावर हसून तो म्हणाला, ‘‘मी तुमचा ‘रेकॉर्ड’ मोडायचा पूर्ण प्रयत्न करेन.’’

‘‘सूत्र लक्षात ठेव, म्हणजे ‘रेकॉर्ड’ हमखास मोडेल. ज्या दिवशी तू तो मोडशील त्या दिवशी स्टँडमध्ये उभा राहून तुझ्यासाठी पहिली टाळी मी वाजवीन. ऑल द बेस्ट!’’असं म्हणून ‘सीनिअर’नं त्याला शेकहँड केला, त्याच्या पाठीवर थाप मारली आणि मैदानावरून बाहेर पडत ‘सीनिअर’ अंधारात दिसेनासा झाला.

आता प्रकाशानं उजळलेल्या मैदानात फक्त तो उभा होता. आता कुठे खरा खेळ सुरू झाला आहे, याची त्याला जाणीव झाली होती..