साधना तिप्पनाकजे

२००० मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून रिताताई उभ्या राहिल्या. पण त्यांचा पराभव झाला. मात्र त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. त्यांनी स्त्रियांना संघटित करत त्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं. त्याचा फायदा झालाच. २०१४ मध्ये त्या बहुमताने विजयी झाल्या. विविध योजना राबवत असल्याने गावाला त्याचा फायदा होतो आहे. मानेगाव बाजार-जबारा गावच्या सरपंच रिता सुखदेवे यांच्याविषयी.

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

घटनादुरुस्तीनंतर लगेचच ग्रामपंचायत सदस्या झालेल्या रिताताई सुखदेवे आज मानेगाव बाजार-जबारा गावच्या सरपंच आहेत. या २६ वर्षांत गावविकासात पंचायतराजची भूमिका आणि सर्व घटकांना सत्तेत येण्याची मिळालेली संधी, या संधीचा त्या घटकांना झालेला फायदा, बदलतं पंचायतराज या सर्वाच्या रिताताई साक्षीदार आणि अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत.

१९९३ मध्ये ७३ आणि ७४ व्या घटनादुरूस्तीनंतर पंचायतराजमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. स्त्रियांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण मिळालं. घटनादुरूस्तीनंतर मानेगाव-जबारा या गट ग्रामपंचायतीची निवडणूक १९९५ मध्ये जाहीर झाली. पॅनलमधील स्त्रियांसाठीच्या राखीव जागेकरता गावकऱ्यांनी रिताताई सुखदेवे यांच्याकडे आग्रह धरला. त्या आग्रहामागचं कारण म्हणजे त्यांचं शिक्षण. त्यावेळी गावात सवार्ंत जास्त शिक्षित स्त्री होत्या रिताताई.

१९८५ मध्ये रिताताई लग्नानंतर मानेगावमध्ये आल्या. लग्नानंतर त्यांनी आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्याकाळात भंडाऱ्यातल्या एका खेडय़ाकरता ही खूप मोठी गोष्ट होती. यामुळे गावात रिताताईंना मान मिळत असे. गृहिणी असणाऱ्या रिताताईंना गावकऱ्यांचा आग्रह मोडवेना. घरच्यांनीही त्यांना पाठींबा दिला. त्यांनी निवडणूक लढवली आणि प्रचंड बहुमताने त्या विजयी झाल्या. पहिली तीन वर्ष शिकण्यातच गेली. हळूहळू त्या ग्रामपंचायतीत आपल्या प्रभागाच्या समस्या मांडू लागल्या. त्यावेळी गावात कामं आणावी लागायची. म्हणजे आपल्या गावात एखादं काम करायचं असेल तर जिल्हापरिषद, पंचायतसमिती सदस्यांकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून घ्यावा लागायचा. आता चौदाव्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध होतो. पंचायतसमिती आणि जिल्हापरिषदेकरता कामांच्या पाठपुराव्याकरता सतत चकरा माराव्या लागायच्या. यामुळे रिताताईंचं गावाबाहेर पडणं वाढू लागलं. अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं, आपल्या गावात नाले बांधणे, रस्ते यासारख्या आणखीही कामांचे प्रस्ताव तयार करणे, या कामांचा पाठपुरावा करणे आणि ही कामं गावात करवून घेणे या गोष्टींची त्यांना चांगलीच माहिती झाली. धीटपणा तर त्यांच्यात आधीपासूनच होता. पण प्रशासकीय कामकाजाची माहिती होऊ लागल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. त्यांचा सर्वागीण विकास, आताच्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांचं ‘ग्रुमिंग’ या काळात झाल्याचं रिताताई हसून सांगतात.

२००० मध्ये झालेल्या निवडणुकीत पॅनेलमधून उभ्या न राहता, रिताताई स्वतंत्र उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. रिताताईंनी आपलं काम थांबवलं नाही. त्यांनी स्त्रियांना संघटित करायला सुरूवात केली. स्त्रियांच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं. तालुका आणि जिल्हा पातळीवर निराधार, परित्यक्ता स्त्रियांकरता कोणत्या योजना आहेत याची माहिती त्या त्यांना देऊ लागल्या. स्त्रियांना उत्पन्नाचं साधनं मिळावं, याकरता सरकारी योजनेतून शिलाईमशीन आणि इतर साधनं मिळवून दिली. स्त्रियांचे अर्ज लिहून देणे, कागदपत्रांची  पूर्तता करणे तसेच कागदपत्र मिळवून देण्याकरता प्रयत्न करणे ही कामं त्या करू लागल्या. यामुळे सर्वच गावकरी रिताताईंकडे त्यांची प्रशासकीय कामं घेऊन येऊ लागले. रिताताईंनी स्त्रियांचे बचतगटही तयार करायला सुरूवात केली. माविमच्या (महिला आर्थिक विकास महामंडळ) सहकार्याने पेटीकोट शिवण्याचं काम बचतगटांनी केलं. बचतगटाच्या माध्यमातून लहान प्रमाणात दुग्ध व्यवसाय आणि शेळी व्यवसाय सुरू आहेत. बचतगटाकडून मदत घेऊन वैयक्तिक पातळीवरही काहींनी खाऊ विक्रीसारखे लहान उद्योग सुरू केलेत. सुरूवातीला त्यांनी दहा बचतगट तयार केले. हे दहा बचतगट सशक्त झाल्यावर त्यातील सदस्यांनी आणखी बचतगट बांधले. गावात आता स्त्री, पुरूष मिळून तीस बचतगट आहेत. २००४ मध्ये गावात तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली. यावेळी रिताताईंच्या नेतृत्वाखाली महिला बचतगटांच्या मदतीने गावात संपूर्ण दारूबंदी झाली. ही अवैध धंदा बंदी आजतागायत कायम आहे. बचतगटांच्या एकजुटीचं हे मोठं यश असल्याचं रिताताई सांगतात. बचतगटांच्या माध्यमातून काम करत असताना रिताताई ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या संपर्कात आल्या. पंचायतराजमधील स्त्री लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण आणि सक्षम, विकसित गावकारभाराकरता लोकांना जागरुक करण्याचं काम महिला राजसत्ता आंदोलन (मराआं) राज्यभर करतं. मराआंच्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये, गावशाखांमधील कामात त्या सहभागी होऊ लागल्या. यामुळे त्यांना प्रशासकीय कामांसोबतच पंचायतराजची सविस्तर माहिती होऊ लागली. त्यानंतर गावात महिलासभा व्हायला लागल्या. मानेगाव-जबाराची महिलासभा सशक्त असल्याचं रिताताई अभिमानानं सांगतात. ग्रामसभांना चांगला प्रतिसाद असतो. सध्या मराआंच्या तालुका संघटक म्हणूनही त्या काम करतात.

रिताताई पदावर नसल्यातरी त्यांची लोकसेवा सुरूच होती. पण सत्तेत नसल्यामुळे कामं करण्यात काही प्रमाणात मर्यादा येतात. सत्तेशिवाय पर्याय नाही, हे रिताताईंनी जाणवलं. त्यामुळे २०१४ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवायचं ठरवलं. सर्वसाधारण स्त्री सदस्याकरता त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि यावेळी त्या बहुमताने विजयी झाल्या. सदस्या म्हणून निवडून आल्या असल्या तरी ग्रामपंचायत कार्यालयात त्या रोज उपस्थित रहात. जिल्हापरिषद आणि पंचायतसमितीशी कामाच्या निमित्ताने नियमित संपर्कात रहात असत. चार हजार लोकवस्तीच्या या गटग्रामपंचायतीत अकरा सदस्यसंख्या आहे. सरपंचपद अनुसूचित जमातीकरता राखीव होतं. एक पुरूष सदस्य सरपंच झाले. पण वैयक्तिक शौचालयाच्या मुद्यांवरुन त्यांना  राजीनामा द्यावा लागला. इतर ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी रिताताईंना सरपंचपद स्वीकारण्याची विनंती केली. ऑगस्ट २०१७ मध्ये रिताताईंनी सरपंचपद स्वीकारलं. रिताताई सदस्य असताना त्यांनी गावात ‘ओपन जिम’चा प्रस्ताव जिल्हापरिषदेत दिला होता. रिताताई सरपंच झाल्यावर गावात ओपन जिम सुरू झालं.

गावात टेकेपार सिंचन व्यवस्थेतून पाणी पुरवठा होतो. त्यामुळे गावात पिण्याकरता आणि शेतीकरताही पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सरपंच झाल्यावर रिताताईंनी पिण्याच्या शुद्ध पाण्याकडे लक्ष दिलं. त्यांनी आंगणवाडी, प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतीत शुद्ध पाण्याकरता रिव्हर्स ओसमोसिस म्हणजेच आरओ प्लांट बसवले. त्यातून आंगणवाडी आणि प्राथमिक शाळेत मोफत तर ग्रामपंचायतीतील सार्वजनिक प्लांटमधून वीस लीटर शुद्ध पाण्याकरता पाच रुपये दर आकारण्यात येतो. गावात किशोरवयीन मुलींची संख्या मोठी आहे. रिताताईंनी सरपंचपदी आल्यावर गावातल्या सर्व किशोरवयीन मुलींशी मोकळ्या गप्पांचा कार्यक्रम करायला सुरूवात केली. मदानात खेळावसं वाटतं, पण घरातून परवानगी मिळत नसल्याची तक्रार मुलींनी रिताताईंकडे केली. त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्याकरता रिताताईंनी मुलींना खेळण्याकरता वेगळ्या मदानाच्या आरक्षणाचा प्रस्ताव जिल्हापरिषदेकडे दिला आहे. ठराविक काळाने किशोरवयीन मुलींकरता मोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यामुळे मुली त्यांच्या प्रश्नांविषयी मोकळेपणाने बोलतात, आपली मतं व्यक्त करतात. याच माध्यमातून मुलींना डॉक्टरांद्वारे स्त्री आरोग्याची माहिती करुन देण्यात आली. सॅनिटरी पॅड, त्याचा वापर आणि विल्हेवाट याविषयीही मार्गदर्शन करण्यात आलं. लवकरच ग्रामपंचायतीत सॅनिटरी पॅड  वेंडिंग मशिनही बसवण्यात येत आहे. त्याच्या देखभालीचं कंत्राट  महिला बचतगटाला देण्यात येणार आहे. महिला बालकल्याण निधीतून गावातील तीन आंगणवाडय़ातील मुलांना गणवेश देण्यात आले. याच निधीतून स्त्रियांच्या रक्तातील हिमोग्लोबिन पातळी तपासणे, स्त्रियांकरता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून आरोग्य मार्गदर्शन शिबिरं घेणे आदी आरोग्यविषयक कामे करण्यात येतात. गावात प्राथमिक आरोग्यकेंद्राची खूप गरज आहे. आरोग्यसेवेकरता गावकऱ्यांना १५ कि.मी. दूर भंडाऱ्याला जावं लागतं. यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. रिताताईंनी प्रस्ताव दिला आहे. लवकरात लवकर हे काम होण्याकरता त्या आमदार, खासदारांच्या तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्याही भेटी घेत आहेत. गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. पाचवी ते बारावीपर्यंत गावातच खाजगी शाळा आहे. २०१८ मध्ये लोकवर्गणी आणि चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून रिताताईंनी वर्गखोल्या बांधून घेतल्या, सर्व वर्ग डिजीटल करण्यात आले, शौचालयांची बांधणी करण्यात आली. या शाळेला २०१८ मध्ये शंभर वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने ग्रामपंचायतीतर्फे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रेरणा मिळावी याकरता आता मोठमोठय़ा पदांवर कार्यरत असणाऱ्या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांचा मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

आठवडी बाजाराला लागून नागरिकांच्या सोयीकरता सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे. त्याच्या स्वच्छतेकरता गावातीलच एका माणसाला नियुक्त केलं. गावात आता शंभर टक्के शौचालयाचा वापर होतो. गावात सिंचनव्यवस्थेसोबतच १८ हातपंपही आहेत. या हातपंपाच्या सभोवताली रिताताईंनी शोषखड्डे केले आहेत. यामुळे हातपंपातून वाहणारं अतिरिक्त पाणी जमिनीत मुरवलं जातं. पावसाचं आणि इतर माध्यमातलं पाणी संपूर्णपणे गावातच मुरवलं गेलं पाहिजे, असा रिताताईंचा मानस आहे. त्याकरता त्या प्रयत्न करत आहेत. पक्क्या स्लॅबची घरं आणि स्वत:ची विहिर असणाऱ्या लोकांमध्ये रिताताई पर्जन्यजल साठवणुकीबाबत जागृती करत आहेत. गावात प्लास्टिकचा वापर खूप कमी आहे. घंटागाडीतून ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती करण्यात येते. याकरता ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली आहे. तीन टक्के अपंग निधीतून रिताताईंनी अपंगांना २०१८ मध्ये तीन चाकी सायकल दिल्या. यावर्षी या निधीतून पाच हजार रुपयांचा निधी व्यवसायाकरता उपलब्ध करून दिला. जबारा गावात सोनामाता हे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर आणि आसपासच्या भागाचं सौंदर्यीकरण करुन पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव रिताताईंनी जिल्हा परिषदेकडे दिला आहे.

ही सर्व काम करत असताना गावकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांची चांगली साथ मिळत असल्याचं रिताताई आवर्जून सांगतात. त्यांच्या पाठिंब्यामुळेच गावात विकासाची काम होत आहेत. आणि काम होत असल्यामुळे गावकरी साथ देतात असं त्या म्हणतात. त्यांना आता जिल्हापरिषदेची निवडणूक लढवायची आहे. रिताताईंचा आत्मविश्वास, कामाची धडाडी आणि लोकसंपर्क पाहिला तर त्यांचं राजकीय स्वप्न नक्की पूर्ण होईल अशी आशा आहे.

sadhanarrao@gmail.com

chaturang@expressindia.com