वृषाली मगदूम

सामाजिक कार्यकर्त्यां

परदेशातून, देशातून, गावातून ‘करोना’ गेला की नाही माहिती नाही. अजूनही बातम्या धडकत असतात. माझ्या मनातून मात्र करोना हद्दपार झाला आहे. मास्क लावून, सॅनिटायझरची बाटली बरोबर घेऊन मी आमच्या कचरावेचक, कामगार स्त्रियांना भेटतेय. संवाद साधतेय. सामाजिक कार्यकर्तेपणाचं जगणं पूर्वपदावर आणल्याचा सुखद अनुभव अनुभवतेय..

मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात अकस्मात धाडकन् सर्व थांबलं. पहिले आठ ते दहा दिवस सर्वच कामांतून सुटका झाल्याचा, मनाला आणि शरीराला विश्रांतीचा सुखद अनुभव मिळाला. अस्ताव्यस्त, विस्कळीत दिवसही बरा वाटला. अन् मग आजूबाजूला करोनाची अनुभूती घेऊ लागले तशी भीती, बैचेनी, अस्वस्थता आतपर्यंत झिरपत गेली. आमचा बेचाळीस वर्षांचा खंदा कार्यकर्ता अशोक बरा व्हावा म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. पण.. तो गेल्यानंतर रुग्णालयाबाहेर दोन तास येरझाऱ्या घालत त्याच्या

रुग्णवाहिके ची वाट पाहात होतो तर एकाच वेळी चार मृतदेह घेऊन रुग्णवाहिका मागील दारानं निघून गेली. भेटण्याची तीव्र इच्छा आणि भेटता न येण्याची हतबलता भेदक होती. माणूस माणसापासून दुरावत चालला होता. एकमेकांकडे संशयानं पाहात सहा हात दूर राहात होता.

आमच्या ‘नारी प्रोजेक्ट’च्या ४७ स्त्रिया घरोघरी जाऊन कचरा घेणं, त्याचं वर्गीकरण आणि खत करण्याचं काम करतच होत्या. त्यांची काळजी आणि भीती सतत असायची.  एप्रिलच्या मध्यावर या स्त्रियांसाठी धान्य मिळालं. मंगळवारी वस्तीत जाऊन धान्य वाटायचं ठरलं. मी पुढे झाले तरच मी इतरांना हक्कानं या म्हणू शकते हे मला माहिती होतं. जावं लागलंच. प्रत्येक विभागात वाटप करताना खूप घाई, गडबड करावी लागत होती. गर्दी केली की स्त्रियांवर ओरडावं लागत होतं. वाटप संपलं. पण मनात खुपू लागलं. आपण या स्त्रियांना याचक केलं का? आपण दात्यांच्या अहंकारात गेलो का?

आमच्या समता नगरच्या प्रोजेक्टवरील एकीला करोना झाला. भयानं माझ्यावर आणि सहकारी रुक्मिणीवर चौकशीचा भडिमार झाला. करोना होणं म्हणजे कलंक आहे अशी धारणा होती. अस्पश्र्य वागणूक मिळते असं स्त्रियांचं म्हणणं होतं. शेवटी माझ्या विनंतीवरून त्या सगळ्यांना घरी न पाठवता ‘क्वारंटाइन’ करत एका ठिकाणी एकत्र आणलं. मी आणि रुक्मिणीनं आठ दिवस या स्त्रियांचे शिव्याशाप खाल्ले कारण अनेकींच्या घरी लहान मुलं, बाळंतीण मुलगी, म्हातारी आजारी आई, दारुडा नवरा अशा अनेक समस्या होत्या. स्त्रिया सारख्या रडायच्या आणि घरी जायचे म्हणायच्या. प्रचंड मनस्ताप. शेवटी बाकीचे प्रकल्पही बंद करून स्त्रियांना घरी बसवलं.

करोनाकाळात मी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काम करायचे त्यापेक्षाही जास्त काम केलं असं मी नेहमी म्हणते. या काळात आठशे स्त्रियांना पाच वेळा धान्य दिलं. एका रुग्णाचा प्रश्न मार्गी लागलाय म्हणून नि:श्वास सोडतेय, तोवर दुसरा तयारच असायचा. पण या काळात मदत करायला कोणीही नकार दिला नाही. कौटुंबिक सल्ला केंद्राच्या फलकावरील नंबर वाचून स्त्रिया मला फोन करायच्या. फोनवरून मी अनेकजणींना समुपदेशन केलं. रत्नागिरीहून एका कचरावेचक स्त्रीच्या मुलीची कौटुंबिक हिंसाचारातून सुटका केली. फोनवरून तास-तास बोलायचं, पण दिलासा दिल्याचं समाधान नसायचं. नाइलाजास्तव करावी लागणारी यातायात, जी अपुरी वाटायची. कधी बरं संपेल हे सारं, ही हुरहुर असायची.

वाट पाहणं संपलं आहे. ‘धास्ती ते आव्हान’ हा प्रवासही तसा संथ, हळुवार, नेणिवेतून मनात झिरपला. करोनाला बरोबर घेऊन जगण्याचा सराव मला झाली आहे. त्यासाठी नऊ महिन्यांचा दीर्घ पल्ल्याचा खडतर प्रवास मी सकारात्मकरीत्या पार पाडला आहे. भय इथले संपले आहे!