रती भोसेकर 

शाळेचा पहिला दिवस बहुसंख्य मुलांसाठी दु:खदच असतो. आईला सोडून पहिल्यांदाच अनोळखी जगात त्यांचा प्रवेश होत असल्याने भांबावलेल्या, गोंधळलेल्या मुलांना गरज असते ती भावनिक दिलाशाची. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक मुलांना आजी-आजोबांचा सहवास मिळणे कमी झाले आहे. पण ती गरज असतेच, हे एका शाळेतल्या प्रयोगाने दाखवून दिलं. काय होता हा प्रयोग आणि त्याने शाळेचं प्रेमळ आजोळ कसं झालं हे सांगणारा अनुभव या शाळेच्या शिक्षिकेच्या शब्दांत..

आमच्या शाळेतला मिनीशिशूचा तो पहिला दिवस होता. तीन-पावणेतीन वर्षांची मुलं शाळेत येत होती. सोडायला आलेल्या आई-बाबांचा हात सोडवत नव्हता. काहींनी भोकाड पसरून लोटांगण घातलं होतं. त्यांना बघून बाकीची त्यांची मित्रमंडळी रडक्या चेहऱ्याने ‘आता काय करायचं?’ या चिंतेत पडलेली. आई-बाबांचाही जीव वरखाली होत होता. शाळेत जायचं म्हणजे आता आई-बाबांपासून लांब जायचंय, या भावनेनं सगळ्या जणांना घेरलेलं. आणि आम्ही ‘दुष्ट’ माणसं त्यांना आत वर्गात आणत होतो. सर्वसाधारण सगळ्या शाळेत कायमच दिसणारं हे वातावरण, पण आमच्या शाळेतला फरक मात्र आत होता..

एक वर्ग म्हणजे जणू घराचीच प्रतिकृती होती. त्या वर्गात भरपूर आजी-आजोबा होते. जसे काही शाळेतून घरी येणाऱ्या नातवंडांची आतुरतेने वाट पाहत बसलेत. वर्गशिक्षिका रडणाऱ्या मुलांना वर्गात घेऊन येत होत्या. रडणारे कोवळे जीव कोणत्या ना कोणत्या आजी-आजोबांकडे आपसूक जात होते किंवा त्यांच्या बाई त्यांना आजी-आजोबांजवळ आणून सोडत होत्या. ‘आमचं नेहमीचं वातावरण सोडून आम्हाला इथे कुठे तरी आणून सोडलं आहे, आम्हाला त्यामुळे अजिबात सुरक्षित वाटत नाही.’ हे आपलं दु:ख या आजी-आजोबांना न सांगता नक्कीच कळेल या आशेने, ती त्यांच्याजवळ बसत होती. एकेका आजी-आजोबांच्या भोवती सहा मुलं आपलं बास्केट घेऊन बसली होती. नुसतं आजी-आजोबां- जवळ बसणंही त्यांना भावनिक आधार देत होतं हे जाणवत होतं. ‘बाबा’, ‘बाबा’ म्हणत, त्यांना आई-बाबांनी शाळेत सोडल्याची ‘दर्दभरी कहाणी’ सांगत होते. एक मुलगा एका आजीजवळ बसून थोडय़ा थोडय़ा वेळाने आपला रडका चेहरा तिच्यासमोर धरत होता. वर्गात जवळ-जवळ बारा आजी-आजोबा होते आणि प्रत्येकाजवळ ही अशी भरपूर ‘नातवंडं’ बसली होती.

गंमत म्हणजे, त्यातलं एकही त्यांचं स्वत:चं नातवंडं नव्हतं.

त्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या अर्ध्या तासाच्या घमासान रडयुद्धानंतर.. त्या वर्गातलं दृश्य बदललं होतं. त्या दिवशी आपल्याला समजून घेणारे कोणीतरी आहेत हे जाणवून ही सगळी लहानगी मंडळी आजी-आजोबांजवळ नुसती बसली होती, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर मात्र अनोळखीपणा कमी व्हायला लागला आणि काही जण आजी-आजोबांशी छान गप्पा मारायला लागले. तिथे मांडलेल्या स्वयंपाकाघरातून चहा किंवा काही तरी खायला आणून द्यायला लागले. लगेचच आजी आजोबा व त्यांच्या आजूबाजूला अतिशय सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात बागडणारी खूप सारी गोड नातवंडं असं आश्वासक वातावरण शाळेत निर्माण झालं.

मिनीशिशूसाठी गेल्या वर्षीपासून हा नवीन प्रयोग आम्ही सुरू केला. वय वर्ष पावणेतीन ते तीन, कधी-कधी अडीचपासून शाळेत जाण्याची प्रक्रिया सुरू होते. खरं सांगायचं तर पूर्व प्राथमिक विभागाची गरज पडण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांबरोबर घरात अनेक लहान-मोठी मंडळी असायची. त्यांच्याबरोबर वाढताना पूर्व प्राथमिक शिक्षणाची अनेक उद्दिष्टे आपसूक पूर्ण व्हायची. त्यामुळे मुलांचा वय वर्षे सातनंतर शाळेत प्रवेश होत असे. तसंच बदलत्या काळानुसार स्त्रियांचं बाहेर काम करण्याचं प्रमाण वाढलं त्यामुळे मुलांची अधिकाधिक काळ घराबाहेर राहण्यात जाऊ लागला. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दिवसाचा काही काळ का होईना घालवायचा. आतापर्यंत अगदी अनोळखी असलेल्या चेहऱ्यांशी ओळखी करून घ्यायच्या, हे नक्कीच सोप्पं नसतं. त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण देणं हे पूर्व प्राथमिक शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याच्या अनुषंगानेच ‘आजी आजोबा आमच्या दुसऱ्या घरी’ हा प्रयोग केला आणि त्याला आमच्या पालकांच्या पालकांनी अर्थात आजी-आजोबांनीही खूप छान साथ दिली.

गेल्या वर्षी थोडं उशिरा म्हणजे शाळा सुरू झाल्यावर तिसऱ्या आठवडय़ात आम्ही आजी-आजोबांना बोलावलं होतं. तोपर्यंत मुलं शाळेत रुळली होती. शाळा सुरू व्हायच्या आधीपासूनच ‘शाळेत जायचंय, शाळेत जायचंय.’ असं पालक जणू मुलांच्या मनावर बिंबवत असतात, त्यामुळे मुलांच्या मनात शाळेविषयी नकळत अढी निर्माण होते. ‘आपल्याला पालकांपासून दूर करणारे ठिकाण म्हणजे शाळा.’ असा काहीसा गैरसमज मुलांच्या मनात या वयात नक्कीच निर्माण होतो. पण त्यांना असं न वाटता, शाळा म्हणजे आपलं दुसरं घर वाटलं पाहिजे. तिथे येताना ‘आपण आपल्या घरीच जात आहोत.’ अशी भावना निर्माण झाली पाहिजे, या उद्देशाने या ज्येष्ठ पालकांना त्यावर्षी शाळेत बोलावलं.

घराची प्रतिकृती असलेल्या त्या घरात येणाऱ्या आजी-आजोबांना मी आधी भेटायला बोलावलं. ती मंडळी माझ्याशी संवाद साधायला लागली, तेव्हा एकदम मजा वाटली. प्रत्येक जण ‘आपण काय करणार’ हे मला हिरीरीने सांगायला लागले. एक आजोबा म्हणाले, ‘‘बाई, मी एक गाणं पाठ केलं आहे.’’ दुसरे म्हणाले, ‘‘मी एक गोष्ट सांगणार आहे.’’ गाणं पाठ करून आलेले आजोबा लगेच गाणं म्हणून दाखवायला लागले. माझ्याकडे एकदम कौतुकाच्या आशेने बघायला लागले. त्यांना वाटलं बाई एकदम खूश होऊन जाणार. त्यांच्या मेहनतीचं कौतुक करत, मी एकदम म्हटलं, ‘‘आपल्याला यातलं काहीच करायचं नाही.’’ ‘शाळेत यायचं म्हणजे मुलांना नक्कीच काही ना काही शिकवायचं.’ या भूमिकेने आलेले सगळे माझे हे ज्येष्ठ पालक चमकले. बाईंना नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांना कळेना. मी म्हटलं, ‘तुम्ही काहीही करू नका. फक्त तिथे ‘असा’. तुमची नेहमीची घरची कामं घेऊन या. तुमच्यासाठी गाद्या आहेत. त्यावर झोपून पेपर वाचा. पुस्तक वाचा. सोफे आहेत. त्यावर बसून आपापसात गप्पा मारा. आजी-आजोबा जोडीने भाजी निवडा. काहीही असं काम जे तुम्ही तुमच्या स्वत:च्या घरात करता. तुम्हाला मुलांना काहीही शिकवायचं नाही. गाणी-नाच करुन दाखवायचं नाही. फक्त आराम करा आणि मुलांना तुम्ही ‘असल्याचा’ दिलासा द्या.’’ गाणं तयार करून आलेल्या आजोबांचा जरा हिरमोड झाल्यासारखा वाटला. पण काहींना हायसंही वाटलं. कारण ते जरा विचारातच पडले होते की, ‘‘एवढय़ा वर्षांनी शाळेत आपल्याला काय शिकवायला लावतात कोण जाणे! एवढय़ा लहान मुलांबरोबर उडय़ा वगैरे मारायला लावतात की काय?’’ घरी प्रत्येकाचं एक नातवंड त्यांना घरभर नाचवतच होतं ना! त्यामुळे बाकी सगळे बहुतेक ‘हुश्श’ करत त्या घरासारख्या सजवलेल्या वर्गात गेले.

मग आम्ही एकेका वर्गातील मुलांना त्या वर्गात नेत होतो. मुलं शांत झाल्यावर आजी आजोबा आल्यामुळे रडणारे फारसे कोणी नव्हते. पण प्रांजल नावाच्या एका मुलीमुळे आजी-आजोबांना दर वर्षी पहिल्याच दिवशी बोलावले पाहिजे, हे नक्की झालं. त्याचं असं झालं, की शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते, पण प्रांजलने शाळेत आल्यापासून सर्व गोष्टींत असहकार पुकारला होता. पंधरा दिवस झाले तरी ती वर्गात अजिबात खाली बसायला तयार नसायची. आपली बास्केटही ती खाली ठेवत नव्हती की चपला काढू देत नव्हती. सतत रडत होती. जरा जरी तिच्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर रडण्याचा आवाज अधिकच वाढवायची. म्हणजे जवळ-जवळ पंधरा दिवस ती रोज दोन तास हातात बास्केट, पायात चपला आणि तोंडाने रडण्याचा आवाज काढत वर्गात उभीच राहिली होती.

पंधरा दिवसांनंतर आजी-आजोबांना वर्गात आणण्याचा दिवस उजाडला. शाळा सुरू झाली. पहिला अर्धा तास प्रांजल तशीच उभी होती. पण मग मात्र एका आजोबांजवळ स्वत:च जाऊन बसली. बास्केट आणि चपला तशाच होत्या. पण आमच्यासाठी तेही खूप होतं. रोज तिला उभं पाहून आमचेच पाय दुखायला लागले होते. तिला बसलेलं पाहून बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी ती तडक त्या वर्गातच जात त्याच आजोबांजवळ जाऊन तशीच बसली. पहिले तीन दिवस आजोबांजवळ बसून पूर्ण वेळ रडत होती, पण तिला आजोबांचा चांगलाच भावनिक आधार वाटतोय हे जाणवत होतं. चौथ्या-पाचव्या दिवसानंतर ती चक्क आजोबांजवळ डबा खाताना दिसली आणि नंतर तर रुळलीच. आम्ही सगळ्या जणी तिच्या नकळत तिला बघून जात होतो. तेव्हाच पक्कं केलं, की दर वर्षी या त्यांच्या घर ते शाळा या प्रवासासाठी आजी-आजोबांची मदत घ्यायचीच घ्यायची.

या वर्षीही शाळा सुरू झाल्यावर पहिले दोन दिवस नेहमीप्रमाणे पालक उपस्थित होते. नंतर तिसऱ्या दिवसापासून आजी-आजोबा पहिले दोन आठवडे मुलांसाठी शाळेत आले होते आणि शाळेचं ‘प्रेमळ आजोळ’ झालं. एका छोटय़ाने त्याला मिळालेल्या एका कागदाच्या तुकडय़ावर आजोबांचं इतकं छान चित्र रेखाटलं की, जणू त्याच्या मनातील ‘त्यांचं असणं’ त्याने कागदावर उतरवलं होतं. मुलांचा ‘भावनिक विकास’ इतक्या साध्या-साध्या गोष्टींमध्ये लपलाय. आपल्याला तो नेमका शोधता आला पाहिजे. नाही का?

ratibhosekar@ymail.com

chaturang@expressindia.com