News Flash

हा भारत माझा (?)

विचित्र निर्मिती

(संग्रहित छायाचित्र)

सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

‘हा भारत माझा’ चित्रपटाचं यश मला अनेकपदरी वाटतं. अण्णा हजारे यांनी देशाला भ्रष्टाचारविरोधी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलनाची हाक दिली होती. इतिहासात देशातल्या मध्यमवर्गाला जागं करणारं असं एक आंदोलन झालं होतं हे कुणी विसरू पाहिलं तर हा चित्रपट त्यांना तसं करू देणार नाही. आंदोलनामध्ये तेव्हा असणारे किंवा नसणारे- भलभलत्या लोकांना त्याचा फायदा झाला. आणि काहींचे प्रामाणिक कष्ट, विचार अडगळीत गेले. तरीही त्या वेळेचं आंदोलनाचं सत्त्व पकडून ठेवणारा  एक चित्रपट म्हणून तो कधीही काढून बघता येईल.

निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. आपली भाषाही वृत्तवाहिन्यांसारखी होईल, अशी भीती वाटते आहे. या निवडणूक नामक देशभर चालणाऱ्या हैदोसामध्ये आपण सामान्य माणसं आपलं सारं आयुष्य राजकारणाच्या दावणीला बांधल्यासारखे अस्वस्थ किंवा असहाय होऊन जातो. राजकारणी व्यक्तींच्या एकमेकांविरोधी चाललेल्या चिखलफेकीत आपण समर्थक म्हणून उतरतो आणि आपल्या आप्तेष्ट किंवा मित्रगणांवर भावनिक हल्ले करू लागतो. या पार्श्वभूमीवर मला आठवायला लागला आमचा चित्रपट, ‘हा भारत माझा..!’

२०११चा १५ ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर अण्णा हजारे यांनी देशाला भ्रष्टाचारविरोधी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’  आंदोलनाची हाक दिली. लोकपाल प्रस्थापित करण्याची मुख्य मागणी घेऊन ते दिल्लीत उपोषणाला बसले. समाज माध्यमं- विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर हे इतके बोकाळले नव्हते. पण त्यांचा नव्याने यशस्वी वापर करत झपाटय़ाने प्रसार होत हे आंदोलन देशव्यापी बनत गेलं. घरोघरी टीव्हीवर फक्त एवढंच दिसू लागलं. शेतकरी, महिला-वेगवेगळे समूह, खूप मोठय़ा प्रमाणावर युवक रस्त्यावर उतरले.. मेणबत्त्या घेऊन मोठमोठे मोर्चे निघाले.

आम्हीही घरी टीव्हीवर हे पाहात होतो. आमचा ‘संहिता’ हा चित्रपट निर्माते मध्येच अमेरिकेला ‘पळून’ गेल्यामुळे बंद पडला होता. सुमित्रानं ठरवलं, आपण या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा सांगणारा चित्रपट करू. भ्रष्टाचार हा फक्त राजकारणी करतात असं म्हणून आपली जबाबदारी झटकणाऱ्या मध्यमवर्गाची कथा. अण्णा सुखात्मे, त्यांची पत्नी, तीन मुलं, जावई असं कुटुंब.. अण्णांनी त्यांची एक वाडय़ातली खोली मुलीच्या लग्नाच्या वेळी विधवा भाचीला विकली. पूर्ण नाही पण बऱ्यापैकी पैसेही घेतले. त्यामुळे समजूत कायम राहिली तरी अधिकृत करार झालेला नाही. आज रिडेव्हलपमेंटमध्ये त्या जागेचा भाव प्रचंड वाढलाय. आता सुखात्मे कुटुंबाला मोह पडतो. शब्द वगरे ठीक आहे, पण कागद झाला नाहीये, तर या ताईला घालवून देऊन ती खोली विकली तर धाकटय़ा मुलाला डोनेशन देऊन इंजिनीअिरगला प्रवेश घेता येईल, बिनकमवत्या जावयाला आणि खटपटय़ा थोरल्या मुलाला व्यवसायाला भांडवल मिळेल. वर म्हातारपणाची थोडी सोयही होईल. समोर टीव्हीवर भ्रष्टाचारविरोधाची भाषणं सगळे ऐकताहेत. पण ते आपल्याला लावून पाहावं असं काही डोक्यात येत नाही. चालू सरकार पडलं की जणू सगळे प्रश्न सुटणार आहेत..

सुमित्रानं अशी कथानकाची रूपरेषा सांगितली. अण्णा आणि ताई आणि राहत्या जागेचे भाव – हा मुद्दाही एका जवळच्या नातेवाईकांच्या तिला आलेल्या अनुभवातूनच सुचला होता. मी थोडासा वैतागलो. आधीच आमचे ‘संहिता’चे निर्माते पैसे बुडवून पळालेले. त्यात नवा चित्रपट सुरू करण्याचा आतबट्टय़ाचा व्यवहार कशासाठी? त्या वेळी ५डी, ७डी असे कॅमेरे वापरून चक्क फीचर फिल्म करता येते असं जगात लोक बोलू लागले होते. फिल्म नाहीशी होत डिजिटलवर संक्रमित व्हायला नुकतीच सुरुवात होण्याचा तो काळ होता. महागडे डिजिटल कॅमेरे येऊ लागले होते, पण हे नवे स्वस्त कॅमेरेसुद्धा उत्तम काम करतात यावर विश्वास ठेवायचा का नाही असा संभ्रम होता. सुमित्रानं विक्रम गोखले यांना फोन केला. विक्रमजी सुमित्राला प्रेमानं ताई मानतात आणि त्या आदरानं ते हातातली कामं सोडून या विषयासाठी पुण्याला यायला निघालेदेखील! ते येणार हे ठरल्यावर सुमित्रानं एका दिवसात स्क्रिप्ट लिहिलं.

हजारे यांच्या आंदोलनाचा फक्त तिसरा दिवस होता. आंदोलनाचं भवितव्य माहीत नव्हतं. कथानकाचा शेवट त्यामुळे ठरू शकत नव्हता. नेहमी दोन महिने तयारीशिवाय कामाला हात न घालणारे आम्ही तडकाफडकी चित्रपट सुरू कसे करणार होतो? आमचे नेहमीचे सर्व छायाचित्रकार मित्र कामात अडकलेले. मी स्वत:चा चित्रपट ‘सुरू होण्यापूर्वी बंद पडला तर बरं’, अशा पराभूत मन:स्थितीत. कारण हातात लाखभर रुपयेही नाहीत. भोवताली मराठी चित्रपट आता दोन-तीन कोटी रुपयांशिवाय होत नाही अशी धारणा असलेली चित्रपटसृष्टी. कथानकानुसार कलाकारांना मी फोन करत सुटलो. आमच्या घरच्या रेणुका आणि देविका दप्तरदार, उत्तरा बावकर, दीपा श्रीराम, जितेंद्र जोशी, ओंकार गोवर्धन, राधिका आपटे, सागर देशमुख, आलोक राजवाडे, मदन देवधर, ओम भुतकर, किरण यज्ञोपवित- कुणी नकार द्यायलाच तयार नव्हतं. विना-मोबदला

स्व-खर्चानं प्रवास करून ही मंडळी यायला तयार होती. (नंतर किशोर कदमनं तर तक्रारीचा फोन केला, ‘यात मी का नाही?’ तेव्हा चित्रीकरण चालू असताना सुमित्रानं तो आणि अश्विनी गिरी यांच्यासाठी नवा सीन लिहिला). आमचा संकलक मोहित टाकळकर स्वत: उपलब्ध नव्हता. तो त्याच्या चित्रपटाच्या तयारीत होता. मग वीरेंद्र वळसंगकरनं ती जबाबदारी घेतली. पण मोहितनं त्याच्या छायाचित्रकार मित्राला- अमोल गोळेला पाठवून दिलं. अमोलनं नुकतंच त्याचे गुरू अमोल गुप्ते यांचा ‘स्टॅनले का डिब्बा’,  ‘७डी’ या छोटय़ा कॅमेऱ्यावर चित्रित केला होता. अमोल घरी आला तेव्हा विक्रमजी आणि काही कलावंत स्क्रिप्ट ऐकत होते. त्यालाही त्यात घेतलं. वाचन झाल्यावर त्यानं सांगितलं की, तोही या वेडय़ा प्रयोगाला तयार आहे – पूर्णपणे मोफत. स्वत:चा कॅमेरा घेऊन! चर्चा सुरू झाली – सुरुवात केव्हा करायची?

आंदोलन वेगानं पुढे सरकत होतं. दररोज गोष्टी घडत होत्या. सुमित्रा म्हणाली, ‘खरं तर आजच सुरुवात करायला हवी..!’ अमोलनं जाहीर केलं, ‘‘त्याच्या गाडीत आत्तासुद्धा कॅमेरा आहे.’’ आणि खरंच आम्ही सुरुवात केली.. कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या बिग-बजेट मराठी चित्रपटांसमोर हा आमचा ‘नो-बजेट’ चित्रपट उभा राहात होता. ‘मेक-अप’ आम्ही कधी करतच नव्हतो. पण कुठे अश्रू, घाम, रक्त अशा गोष्टी करायला रंगभूषाकार असायचा. आता त्यालाही फाटा दिला. सर्वाना त्यांचे घरचे कपडे दाखवायला सांगितले, त्यातून सुमित्रानं निवड केली. आम्ही कथानकानुसार घरं शोधत हिंडलो. मित्रमंडळी तर तयार झालीच, पण अनोळखी लोकांनीही आम्ही आणि आंदोलनाचं वारं या दोन्हींवर विश्वास ठेवून राहती घरं चित्रीकरणासाठी दिली. अगदी किर्लोस्करांचा कारखानादेखील..! हॉटेल किंवा युनिव्हर्सिटी कॅन्टीन अशा ठिकाणी किंवा रस्त्यांवर आम्ही धडाक्यानं चित्रीकरण करू लागलो. एक छोटा स्टील कॅमेरा, दिग्दर्शक धरून ४-५ लोकांचं युनिट.. जाणारे-येणारे आमच्याकडे ढुंकून पाहात नव्हते. दीपाताईंच्या घरी तर सहज भेटायला जावं तसं जाऊन आम्ही चित्रीकरण संपवूनही आलो. लाइट्स या गोष्टीलाही पूर्ण फाटा दिला. सूर्यप्रकाश आणि घरातला टय़ूब किंवा बल्बचा उजेड यातच आम्ही चित्रीकरण केलं. कॅमेरामनच्या खांद्यावर कॅमेरा. त्याला न कोणी साहाय्यक ना काही फौज..!

या कथानकात आणखी एक महत्त्वाचं पात्र होतं. घरोघरी चालू असणारा टीव्ही. आम्ही दररोजच्या बातम्या एका संस्थेकडून मिळवल्या. शेकडो तासांचं फुटेज जमा होऊ लागलं. सुमित्रा त्याचा अभ्यास करून योग्य तुकडे निवडत होती. राजकीय नेत्यांना सोडून विचारवंत जी मूलभूत, सार्वकालिक मांडणी करत होते, तीच आम्ही घ्यायचं ठरवलं. घरोघरी सीन्स टीव्ही गृहीत धरून चित्रित करायचे आणि मग त्या टीव्हीवर हवी ती दृश्य नंतर टाकायची असा उद्योग सुरू झाला.

त्यातच पाऊस सुरू झाला आणि गणेशोत्सवदेखील. त्यामुळे आवाजांचा कल्लोळ माजला. मग नाइलाजाने आम्ही आहे तो ध्वनी कसाबसा घेऊन नंतर डबिंग करायचं ठरवलं. (आमचा मित्र केदार आठवलेच्या स्टुडिओत ते नंतर पार पडलं.) या अशा धडाकेबाज चित्रीकरणानं मला खूप शिकवलं. हे बिनातयारीचं चित्रीकरण आमची परीक्षा घेत होतं. मी नेहमी प्रत्येक शॉटचं चित्र काढायचो. तसंच चित्रीकरण करण्याचा आमचा आग्रह असायचा. आता कसोटी होती ती उत्स्फूर्ततेची. असलेल्या परिस्थितीतून हवं ते मिळवणं आणि त्यातून दर्जेदार निर्माण करणं हे मोठंच आव्हान होतं. अभिनेते मात्र आनंदात होते. भोवताली लाइट्स किंवा कटर्सच्या भिंती नसल्यानं मुळातच नसर्गिक अभिनय करणारी ही मंडळी अधिकच साधा ‘घरगुती’ अभिनय करू लागली. एकूणच हा चित्रपट खऱ्या अर्थानं घरगुती- होममेड होता. संकलन आणि ध्वनी-मिश्रण हेही आमच्या घराच्या संगणकावर करून तो खरोखर बिना-बजेट तयार झाला. आंदोलन संपलं आणि आम्हाला शेवटही सापडला.

ताई स्वत:च्या हक्कांसाठी भांडायचं ठरवते. पण त्याच वेळी सुखात्मे कुटुंब तिच्यावर अन्याय न करण्याचा निर्णय घेतात. ज्याच्या इंजिनीअिरग प्रवेशासाठी हे सुरू होतं तो इंद्र हा घरचा धाकटा मुलगा आपल्या ताईवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करतो. असा पैसे देऊन घेतलेला प्रवेशच नको, असं ठरवतो. आणि हे घडत असताना समोर आंदोलन संपल्यावर ‘जन गण मन..’ म्हटलं जात आहे.. हा आमचा शेवट ठरला. (तेव्हा लक्षात आलं नाही की यातूनही पुढे प्रश्न उपस्थित होईल. हा चित्रपट सेन्सॉर समोर गेल्यावर राष्ट्रगीताचा असा प्रसंगाच्या मागे वापर करता येईल की नाही असा वाद सुरू झाला. आम्ही घटनेतल्या कलमांचा अभ्यास करून भूमिका मांडली. राष्ट्रगीत चित्रपटात अवमानकारक वापरायला हरकत आहे. इथे तर गौरवाने वापरलं जात होतं (इतकंच काय- घटनेत हेही नमूद केलंय की असं राष्ट्रगीत  चित्रपटाचा भाग म्हणून पडद्यावर वाजल्यावर उभं राहू नये.. चित्रपट म्हणून बसून पहावं.)

आम्ही ‘भारत माझा देश आहे’ हे शीर्षक निवडलं, पण चित्रपट महामंडळाकडे ते कुणीतरी ‘बुक’ केलं होतं म्हणे. मग आम्ही ‘हा भारत माझा’ हे नाव पक्कं केलं.. तो शीर्षक ‘बुक’ केलेला चित्रपट कधी आल्याचं आठवत नाही..

चित्रपटात राधिका आपटे एका सिनिकल श्रीमंत बाईची भूमिका करत होती. तिच्या तोंडी वाक्य होतं, ‘ये आंदोलन तो हप्तेभर की बात है..’ चित्रीकरण चालू असताना मला ते फार कुजकट वाक्य वाटलं. पण काळानं ते खरं करून दाखवलं. या चित्रपटाला पुणे महोत्सवात घेतील की नाही अशी मला शंका होती, पण त्याच महोत्सवात त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्या भारलेल्या वातावरणात चित्रपटाचे अनेक विशेष खेळ झाले. तरुणांनी त्याला डोक्यावर घेतलं. आंदोलनाच्या अनेक समर्थकांनी आम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सहकार्य आणि आर्थिक सहभाग देऊ केला. पण काही दिवसांतच आंदोलनाचा ज्वर ओसरला. आणि या समर्थकांनी तोंडं चुकवायला सुरुवात केली. खुद्द अण्णांनी तो चित्रपट पाहून समाधान व्यक्त करूनही आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करणाऱ्या या चित्रपटाच्या पाठीशी कुणीच उभं राहिलं नाही. एका मोठय़ा वाहिनीच्या मोठय़ा रिलीजसमोर फार जाहिरात न करता अडाणीपणे प्रदर्शित झालेला ‘हा भारत माझा’ दोन आठवडय़ांत खाली उतरला.

आज निवडणुकीवर आधारित लोकशाहीपुढे लोटांगण घेत राजकारण्यांवर आपलं सर्व भवितव्य लावून बसलो आहोत. स्वतंत्र भारताचे सुबुद्ध नागरिक म्हणून आपण काही करू शकू, असा आत्मविश्वास गमावून परिवर्तन करण्याची आपली क्षमताही आपण घालवून बसू की काय अशी भीती वाटते. ‘हा भारत माझा’चं यश मला अनेकपदरी वाटतं. इतिहासात देशातल्या मध्यमवर्गाला जागं करणारं असं एक आंदोलन झालं होतं हे कुणी विसरू पाहिलं तर हा चित्रपट त्यांना तसं करू देणार नाही. आंदोलनामध्ये तेव्हा असणारे किंवा नसणारे- भलभलत्या लोकांना त्याचा फायदा झाला. आणि काहींचे प्रामाणिक कष्ट, विचार अडगळीत गेले. जागा झालेला मध्यमवर्ग फक्त समाजमाध्यमांवर राजकारण्याची कुचेष्टा करणं यालाच आपलं लोकशाहीमधलं कर्तव्य मानू लागला. तरीही त्या वेळेचं आंदोलनाचं सत्त्व पकडून ठेवणारा एक चित्रपट म्हणून तो कधीही काढून बघता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण गेलं चुलीत – तुम्ही आम्ही नेमकं कसं जगतो आहोत – हे तपासून पाहण्याची प्रेरणा तो प्रेक्षकाला नक्की देत राहील..

sunilsukthankar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:11 am

Web Title: article on ha bharat maza marathi movie
Next Stories
1 स्वत:मधला माणूस शोधताना
2 शिक्षकांविना चालणारी शाळा सच की पाठशाला
3 ‘अवघड’ प्रसंगाचं भान
Just Now!
X