07 July 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : तिचं निरुद्देश भटकणं..

कशी कमाल असते बघा, आपण काही तरी विचार करत असतो आणि अगदी तेच आपल्या डोळ्यासमोर येतं.

स्त्रियांचे कपडे घालून फिरणारे पुरुष आणि त्यांच्या मैत्रिणी

प्रज्ञा शिदोरे

pradnya.shidore@gmail.com

आजही जेव्हा एखादी स्त्री एकटीनं सफरीवर जाते तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतात. मैत्रिणींचं ‘टोळकं’ अंधार पडल्यावर एखाद्या टपरीवर चहा पीत बसलंय, इतर कुठलंही काम नसताना मुद्दाम रात्रीचं शहर पाहायला बाहेर पडलंय, हे चित्र तर अद्यापही विरळा आहे. अशा वेळी काही उत्साही स्त्रिया मात्र ठरवून  केवळ भटकण्यासाठी  बाहेर पडू लागल्या आहेत. मात्र जेव्हा स्त्रियांना समाजात आताच्या एवढंही स्थान मिळत नव्हतं, त्या काळीही अशा काही निरुद्देश फिरणाऱ्या सख्या होत्याच. शहरं, सार्वजनिक ठिकाणांचा भाग होऊन ते अनुभवण्याची दृष्टी त्यांनी जगाला दिली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिना आजी-आजोबांच्या घरी जाणं हा आमचा नेम होता. आधी काही वर्ष मुंबई आणि मग पुण्याला जायचो. रेल्वे स्थानकावरून घरी पोहोचेपर्यंत आई शहरातल्या काय-काय खुणा सांगत राहायची. पहाटे रस्त्याच्या कडेला झोपलेली माणसं, दिवस सुरू व्हायची वाट बघत असलेल्या बसगाडय़ा, जोरात सायकल मारत जाणारे पेपरवाले, दुधाचा रतीब घालणारी मुलं यांच्याबद्दल सांगत राहायची. सकाळच्या गार वाऱ्यात परत आम्हाला डुलक्या लागू नयेत म्हणून ती तसं सांगत असेल कदाचित, पण आम्हाला त्या जाग्या होणाऱ्या शहराची गोष्ट खूप आवडायची. मुंबईत असताना मी कित्येक दिवस, असं वेगवेगळ्या रस्त्यांवरून चालत, हिंडत घालवले आहेत. लहानपणी जाग्या झालेल्या शहराबद्दलच्या कुतूहलामुळे मग जयपूर, सिमला, ठाणे ही शहरं असू दे किंवा सिडनी, मेलबर्न, मँचेस्टर अशी कित्येक शहरं पायी हिंडत अनुभवली. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अशाच एकदा गप्पा रंगल्या आणि भटकण्याच्या, इथे-तिथे रेंगाळण्याच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या.

कशी कमाल असते बघा, आपण काही तरी विचार करत असतो आणि अगदी तेच आपल्या डोळ्यासमोर येतं. एका मैत्रिणीची ‘इन्स्टाग्राम’ पोस्ट वाचत होते. त्यात ती फ्रान्समध्ये असतानाचा तिचा फोटो होता. एका छोटय़ा कॉफी शॉपमध्ये बसून ती बाहेरचं जग न्याहाळते आहे असा. खाली एक शब्द लिहिला होता- ‘फ्लानस्’. पहिल्यांदाच ऐकलेल्या त्या शब्दाचा अर्थ धुंडाळायला सुरुवात केली आणि एका शब्दावरून ज्ञानाचं भांडार खुलं झालं. आपण प्रत्येक जण कळत-नकळत जे सहज अनेक वेळा करत आलो आहोत, ती एक वेगळी संकल्पना आहे आणि त्याला एक नेमकं नाव आहे हे कळलं- ‘फ्लानर’.

‘फ्लानर’ हा मूळचा फ्रेंच शब्द. त्याचा अर्थ काहीही उद्दिष्ट समोर न ठेवता शहरात भटकणं आणि भटकताना शहर, शहरात होणारे बदल, तिथली माणसं, त्यांचा स्वभाव जाणून घेणं. या विषयावर, अशा भटकण्याच्या तत्त्वज्ञानावर पुढे अनेकांनी लिहिलं आहे, लिहीत आहेत. सतराव्या आणि अठराव्या शतकात नव्हती तेवढी या शब्दाची व्याप्ती एकोणिसाव्या शतकात वाढली. याचं प्रमुख कारण म्हणजे औद्योगिक क्रांती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोप आणि अमेरिकेतलं सार्वजनिक जीवन झपाटय़ानं बदललं. खेडय़ांकडून शहरांकडे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झालं. शहरांचं रूप बदललं आणि या सगळ्यातून हा ‘फ्लानर’ जन्माला आला.

मग फ्रें च भाषेचा अभ्यास असणाऱ्या मैत्रिणीशी बोलणं झालं. तिनं या विषयावर लिहिणाऱ्या वॉल्टर बेंजामिन, फ्रीड्रिक ग्रॉस, बोदलेर यांच्याशी ओळख करून दिली. बोदलेर यानं १८६३ मध्ये ‘द पेंटर ऑफ मॉडर्न लाइफ’ या निबंधामध्ये अशा ‘बघ्या’चं वर्णन केलं आहे- ‘तो’ काव्य-शास्त्र-विनोदात पारंगत असा, बदलत्या शहराकडे डोळसपणे बघणारा, या बदलांचं विश्लेषण करू शकणारा, कोणत्याही कोरणाशिवाय शहरात फिरत वेळ घालवू शकणारा, उच्चभ्रू असा पुरुष, असं ते वर्णन आहे. अशा पुरुषाच्या नजरेतून घडत गेलेल्या शहरांचं वर्णन आपल्याला अनेकांच्या लिखाणातून, चित्रकलेतून पाहायला मिळतं; पण यामध्ये कुठेही स्त्रीच्या नजरेतून शहर बघितल्याचा उल्लेख नाही. कारण स्त्री ही आधुनिकतेतून घडत गेलेल्या शहराचा भाग नाही, असंच मानलं गेलं होतं. एवढं की, फ्रेंच भाषेच्या शब्दकोशामध्ये ‘फ्लानर’ हा पुल्लिंगीच शब्द आहे. ‘फ्लानस्’ हा स्त्रीलिंगी शब्द वापरात यायला खूपच वेळ लागला. अठराव्या शतकातल्या  फ्रान्समध्ये किंवा कदाचित इतर कोणत्याही देशामध्ये सार्वजनिक जागांमध्ये एका स्त्रीलाही जागा असायला हवी अशी वा तिचं या बदलत्या शहरांबद्दल जे काही म्हणणं असेल ते ऐकू न घेण्याची कुणाला गरजच वाटली नाही. त्यामुळे स्त्रिया या शहरी सार्वजनिक जागांचा, आयुष्याचा केवळ एक अदृश्य भाग बनल्या. याचं बोलकं उदाहरण म्हणजे फ्रेंच लेखिका आमान्ताइन लुसील ऑररा डय़ुपीन यांनी जॉर्ज सँड या टोपणनावानं लेखन केलं. त्यांना जेव्हा १८३१ मध्ये पॅरिसचं शहरी जीवन अनुभवायचं होतं तेव्हा त्या पुरुषाचे कपडे घालून फिरायच्या. कारण त्यांना हे पक्कं ठाऊक होतं की, एका स्त्रीला स्वतंत्रपणे शहरात फिरता येणार नाही.

पुढे विसाव्या शतकात ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वुल्फसारख्या काही जणी त्यांच्या घरातून बाहेर पडून शहरांशी एकरूप होऊ लागल्या, शहरांबद्दल, शहरातल्या आपल्या भटकंतीबद्दल लिहू लागल्या. वुल्फ यांच्या लिखाणात त्यांना लंडन शहरात भटकणं किती आवडायचं हे वारंवार दिसून येतं. १९२५ मधल्या ‘मिसेस डॅलोवे’ या कादंबरीत त्यांची नायिका क्लॅरिसा डॅलोवे ही लंडन शहरातून चालता-चालता आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला लागते. १९२७ मध्ये लिहिलेल्या ‘स्ट्रीट हाँटिंग’ या त्यांच्या निबंधामध्ये एक साधी पेन्सिल घेण्याच्या निमित्तानं त्या कशा बाहेर पडतात आणि थंडीतल्या लंडन शहराचा अनुभव घेतात याचं सुरेख वर्णन आहे. त्या त्यांना स्वत:च्या आयुष्यातल्या, घरातल्या बंदिस्तपणाचा आणि ‘अतिसुरक्षितपणा’चा वैताग येऊन घराबाहेर पडतात. शहरात फिरताना त्या एकांताच्या शोधात असतात. असं फिरताना तुम्ही एकटेही असता आणि सगळ्यांमधले एकही. तुम्हाला अलिप्त, अनामिक राहून इतर लोकांच्या आयुष्याशी समरस होता येतं, असं त्या म्हणतात. या निबंधात वुल्फ त्यांना लंडन शहरात फिरताना दिसणाऱ्या एक-एक पात्राचं वर्णन त्यांच्या-त्यांच्या भूमिकेत जाऊन करतात.

मार्था गेलहॉर्न या पत्रकार स्त्रीनं युद्धाविषयी बातम्या देताना त्या जगभरातल्या ज्या शहरात असतील तिथल्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्याविषयी लिखाण केलं. १९३३-३६ मध्ये ‘स्पॅनिश सिव्हिल वॉर’दरम्यान माद्रिदमध्ये बातमीदारी करताना युद्धाच्या मोठय़ा बातम्यांपेक्षा युद्धात घेरल्या गेलेल्या शहराविषयी त्यांना लिहावंसं वाटलं. तेव्हा त्यांनी युद्धाचा तिथल्या लोकांच्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम होतो याविषयी लिहिलं. लोक आपलं रोजचं काम सुरू ठेवून कुठे, कधी बाँब पडेल याची वाट बघत बसलेले असतात. काही जणांना अशी वाट बघणं असह्य़ होतं आणि ते आपापल्या कामाला लागतात. असं शहरातल्या लहान-लहान गोष्टींचं वर्णन गेलहॉर्न यांनी केलं. दोन सैन्यप्रमुखांमधल्या वाटाघाटींपेक्षा माद्रिदच्या रस्त्यांवर फिरत, थांबत युद्धाच्या दरम्यानचं सार्वजनिक जीवन त्यांना टिपावंसं वाटतं.

फ्रेंच पुरुष लेखकांनी केलेल्या शहराच्या वर्णनापेक्षा हे खूप वेगळं आहे. त्या लेखकांनी तिऱ्हाईताप्रमाणे दोन हात लांब राहून वर्णन केलं, तर वुल्फ, गेलहॉर्नसारख्या लेखिकांनी लोकांच्या आयुष्यात समरस होऊन बदलत्या शहरांचं, माणसांचं वर्णन केलं, शहरी जीवनातले बारकावे टिपले. त्या अशा ठिकाणी जात जिथे त्यांनी जाणं अपेक्षित नाहीये. कदाचित हाच सर्वात मोठा फरक असेल पुल्लिंगी ‘फ्लानर’ आणि स्त्रीलिंगी ‘फ्लानस्’ या दोन संकल्पनांमधला.

स्त्रियांनी दिवसाच्या कोणत्याही वेळेला शहरात विनाकारण भटकणं हे दोन कारणांनी घडत नाही. एक म्हणजे सुरक्षेचा प्रश्न आणि दुसरं म्हणजे समाजाचा त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे साधंच बघा ना, संध्याकाळी टपरीवर जर काही मुलंमुली चहा पीत, सिगारेट ओढत उभी असतील तर आपल्यापैकी किती जणांची नजर तिकडे जाणार नाही? तिथे मुलगे असतील तर आपण सरळ दुर्लक्ष करू कदाचित. सिगारेटचं व्यसन वाईटच आणि सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं आणखीनच वाईट; पण मुलांकडे बघण्याची आणि मुलींकडे बघण्याची वेगळी दृष्टी असते.

२०१० मध्ये मुंबईत ‘महिला सुरक्षेचं वास्तव’ जाणून घेण्यासाठी शिल्पा रानडे, समीरा खान आणि शिल्पा फडके यांनी ‘जेंडर अँड स्पेस’ याविषयी अभ्यास केला. यात असं लक्षात आलं, की स्वत:च्या शहरात फिरताना जवळजवळ ८० टक्के स्त्रियांना असुरक्षित वाटतं. अभ्यासाचे निष्कर्ष पुढे आल्यावर त्यांनी ‘व्हाय लॉयटर’ ही एक ऑनलाइन मोहीम २०१४ मध्ये सुरू केली. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या निर्भया बलात्कार घटनेची पार्श्वभूमी या मोहिमेला होती. १६ डिसेंबर ते १ जानेवारी २०१४ या काळात एकटीनं अथवा इतर स्त्रियांसोबत दिवसाच्या कोणत्याही वेळी, विशेष करून ७ वाजल्यानंतर बाहेर पडायचं आणि त्याचा फोटो समाजमाध्यमांवर ‘शेअर’ करायचा, अशी ही मोहीम. पुरुष जसे शहरांमध्ये कोणत्याही वेळी सहज फिरायला बाहेर पडतात, तसं मुलींनी, स्त्रियांनी बाहेर पडावं, ही यामागची कल्पना. या मोहिमेला  केवळ मुंबईतूनच नव्हे तर जगभरातून उत्साहानं प्रतिसाद मिळाला. मुख्य म्हणजे,

१ जानेवारीनंतरही मोहीम विरून गेली नाही. अनेक ठिकाणी बायकांनी निरुद्देश भटकायला निघण्यासाठी प्रत्यक्ष भेटून गट सुरू केले. बंगळूरु, गुडगाव आणि मुंबईतही अनेक तरुण मुली असं भटकायला एकत्र जमत असतात. कधी टपरीवर चहा पितात, तर कधी एखाद्या बागेत रात्री झोपायला जातात. एकदा तर मुंबईमध्ये काही मुलं मुलींचे कपडे घालून शहरभर भटकली.  हे सगळे जण मुख्य म्हणजे शहरात काहीही कारणाशिवाय भटकण्याचा, सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणानं वावरण्याचा हक्क प्रस्थापित करतात. शिल्पा फडके यांनी याविषयी ‘व्हाय लॉयटर’ नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. त्यात त्या एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ‘स्त्रियांनी रात्रीबेरात्री घराबाहेर पडू नये याचा संबंध त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेशी लावला जातो; पण हे केवळ अंशत:च खरं आहे. कारण आकडेवारी असं सांगते, की स्त्रियांवरची  हिंसा,अत्याचार हे बाहेरच्यांपेक्षा घरच्यांकडूनच जास्त होतात. मग आपण त्यांना, ‘तू त्या घरी राहू नको,’ असं सांगतो का? त्यामुळे सुरक्षिततेपेक्षा समाजात काय बोललं जाईल, ती कोणत्या लोकांना भेटेल, ही खरी भीती असते.’

स्त्रिया विविध क्षेत्रांत काम करू लागल्या, उच्च पदं मिळवू लागल्या, तरी सहजपणे, शांतपणानं, दिवसाच्या कोणत्याही वेळी, कुणाचीही भीती न बाळगता, कोणत्याही कारणाशिवाय, केवळ शहराशी संवाद साधू बघणारी स्त्री सध्या तरी दुर्मीळ आहे.

‘फ्लानर’ आणि ‘फ्लानस्’ हा वाद तर केवळ शब्दांचा नाहीच. सार्वजनिक जागांवर स्त्रियांचं अस्तित्व, त्या शहराकडे काय म्हणून बघतात, त्यांच्या शहराकडून, समाजाकडून काय अपेक्षा आहेत हा सगळाच महत्त्वाचा विषय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 12:01 am

Web Title: article on her aimless wandering yatra tatra sarvatra chaturang abn 97
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : ‘गृहिणीउद्योगा’चं करिअर
2 अपयशाला भिडताना : सूत्र
3 निरामय घरटं : निरनिराळे सारे!
Just Now!
X