मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
journalism fellowships scholarships in journalism fellowship for the future of journalism
स्कॉलरशीप फेलोशिप : पत्रकारांसाठी फेलोशिप
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल

मराठी लग्नांमध्ये रडारड, उगाच सेंटी होणं हे जे चालतं ते या लग्नात कोणालाही चालणार नव्हतं. पंजाबी शादीमध्ये कसं संगीत असतं. बल्लेबल्ले नाच असतात तो माहौल हवा होता. म्हणून मग डीजे आला, ‘फक्त हिंदी गाण्यांचा स्वॅग आण’ अशी आज्ञा झाली. रुचिपालटासाठी मार्विन फ्रे ग्रुपचा लेटेस्ट जॅझही आला. अशा प्रकारे प्रांतोप्रांतीचा, देशोदेशीचा क्लास घालून घालून लग्नाचा लाजिरवाणा मराठीपणा टप्प्याटप्प्याने घालवण्यात आला.

अलीकडे आपल्या परिवारात, एकूण परिसरात जोशीकाकू ज्येष्ठ विचारवंत मानल्या जायच्या. केस पिकल्यामुळे ज्येष्ठ आणि कोणतीही, कणाचीही कृती करत नसल्यामुळे विचारवंत! मुलांची शिक्षणं, नोकऱ्या, परदेशातली स्थलांतरं, लग्न जुळणं, पुढं त्यांनीही ती न टिकवणं यांसारख्या दुर्घट विषयांवर गांजलेले आईबाप त्यांचा सल्ला घ्यायचे. घेतलेल्या सल्ल्याप्रमाणे वागण्याची हमी कोणी घेत नसे, पण माफक मंथनबिंथन होई. उभयपक्षी बरा ‘बरा टाइमपास’ होई.

अशाच बऱ्याच मंथनांनंतर जोशीकाकूं ची एक लांबची पुतणी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी लग्न करून एका बाप्याला ओढणीत घ्यायला तयार झाली होती. पण लग्न कसं, कुठे, किती वेळात, कोणत्या प्रकारे व्हावं याबद्दल तिच्या फारच ठाम कल्पना होत्या. फोनवर सांगत होती. ‘‘काकू, ते मराठी वेडिंग मला अजिबात नकोय हं.’’

‘‘मराठी वेडिंग म्हणजे?’’

‘‘म्हणजे तसलं हो.. हॉलभर माणसं कोंबायची.. मग आग लावायची.. सगळ्यांच्या डोळ्यात धूर घालायचा..’’

‘‘होमाबद्दल बोलतीयेस होय तू..  पवित्र अग्नी गं तो.. त्याच्या साक्षीने साताजन्मांचा वायदा करणं वगैरे..’’

‘‘गिम्मी अ ब्रेक काकू, इनफ विथ दोज वायदाज्. मला मुळात तुमचं ते आयुर्वेदिक लग्नच नकोय.’’

‘‘आयुर्वेदिक?’’

‘‘हो.. म्हणजे ते.. आधी सात फेरे.. मग पार्टिशन.. काय तो अंतर्पाट की काय..’’ सुकन्येला ‘वैदिक लग्न’ म्हणायचं असावं हे आता कुठे काकूं ना समजलं. अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक, युनानी जडीबुटी, फ्लॉवर रेमेडी वगैरे कोणत्याही पद्धतीने तिने लग्न केलं असतं तरी काकूंची हरकत असायचं कारण नव्हतं. पण तिला मराठी लग्न नको वाटावं? आपल्या सगळ्या अडाणी- बाबाआदमच्या जमान्यातल्या पद्धती लाजिरवाण्या वाटाव्यात हे त्यांना पचायला जड जात होतं. ज्या पद्धती तिच्या घरादाराने, परिसराने, मागच्या अनेक पिढय़ांनी पाळल्या, काही वेळा अभिमानाने मिरवल्या त्या एकदम एवढय़ा डाऊन मार्केट व्हाव्यात अं? (मराठी रीती-पद्धतींबद्दल ती सारखी ‘डाऊन मार्केट’ हा शब्द वापरत होती.)

शेवटी सर्वस्वी तिच्या अटींवर लग्न समारंभ करायचा ठरल्यावर विवाह- स्थळाचा शोध सुरू झाला. गावात मराठी माध्यमाची एक खानदानी शाळा अक्षरश: कालपरवापर्यंत प्रसिद्ध होती. पण ते माध्यम ‘डाऊन मार्केट’ झाल्याने शाळा दिवसेंदिवस आक्रसायला लागली आणि आपलं प्रशस्त पटांगण स्वागत-समारंभासाठी भाडय़ाबिडय़ाने देऊन गुजारा करण्याची वेळ आली. तिथल्या व्यवस्थेचा अंदाज घ्यायला हे लोक गेले असताना मॅनेजरने रुबाबात म्हटलं, ‘‘मराठी शाळेच्या नावाखाली एवढी स्पेस वेस्ट होत होती हो.. आम्ही तिचं बिझनेस पोटेन्शिअल ओळखलं..’’

‘‘वेस्ट का होत होती?’’

‘‘आता कोणाला हवंय मराठी मीडियम? जन्माचा शिक्का पडतो, शाळेच्या नावाचा, आणि इंग्लिश कच्चं राहतं ते राहतंच!’’

‘‘समजा राहिलं तर..?’’

‘‘नो इंग्लिश, नो फ्यूचर.. जन्मभर घासा भांडी.’’

‘‘जगभरात फक्त ३० टक्के लोकांना चांगलं इंग्लिश येतं हो.’’

‘‘मग उरलेले ७० टक्के काय भांडी घासतात?’’

‘‘ते टक्केबिक्के सोडा हो.. मराठी माध्यमाची लाज वाटते त्यात शिकणाऱ्यांना. त्यांच्या पालकांनाही. आमच्या ‘संत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालयाची कार्टी खुश्शाल ‘वुई आर फ्रॉम सेंट तुकडोजी’ असं सांगतात बाहेर, माहितीये?’’

हा माहितीचा अमूल्य तुकडा सोबत घेऊन जोशीकाकू नवरीच्या आईबापासोबत केटरिंग काँट्रॅक्टरकडे गेल्या तर संभाव्य मेन्यूत ‘वरणभात, मसालेभात, मटकीची उसळ’ वगैरे नावं काढल्यावर तो हसायलाच लागला. करुणेने म्हणाला, ‘‘आत्ता आपल्या लग्नांमध्ये असलं काही चालत नाही हो. छोले, व्हेज बिर्याणी, स्पिं्रग रोल्स असा क्लासी मेन्यू लागतो.’’

‘‘छोले म्हणजे कडधान्याची उसळच ना शेवटी? पुलाव-बिर्याणी-मसालेभात म्हणजेसुद्धा तेच घटक वेगळ्या मसाल्याने सजवलेले ना? त्यात क्लास कुठून घातलात तुम्ही?’’

‘‘नावापासून क्लास असतो हो! बाहेरच्या देशांमध्ये आपल्यासारखं.. ठय़ेच्या.. धपाटय़े.. आळवाचं फतफतं.. नसतं.’’

‘‘आता राकट, कणखर, दगडाच्या देशामध्ये फार नाजूकसाजूक होणं नसेल जमलं आपल्याला. पण आपणच सारखं आपल्या सगळ्याला हिणवत राहिलो तर जग आपला आदर का ठेवेल? सहज विचारते, ‘हॉट डॉग’ हे पदार्थाचं नाव काय फार काव्यात्म वगैरे म्हणायचं का?’’

यावर त्या कंत्राटदाराची मुद्रा क्षणभर पिसाळलेल्या ‘डॉग’सारखी झाली. पण धंदा देणाऱ्यापुढे लाळ गाळायची सवय असल्याने लगेच त्याने सावरून एक बुलंद गंगाजमनी मेन्यू सादर केला. त्यातल्या कोणत्याही दोन पदार्थाचं एकमेकांशी जुळणं शक्य नव्हतं. रबडीबरोबर कॉर्नटॉर्टिला खावा लागेल, बिशीबेळी भातावर थाई करी ओतून घ्यावी लागेल या कल्पना जोशीकाकूंना ‘क्लासी’ न वाटता अंमळ ‘थर्डक्लास’च वाटल्या. तोवर मॅरेज पार्टी ‘शादी में गानाबजाना तो चाहियेही’ इथवर आली होती.

मराठी लग्नांमध्ये रडारड, उगाच सेंटी होणं हे जे चालतं ते इथं कोणालाही चालणार नव्हतं. पंजाबी शादीमध्ये कसं संगीत असतं. बल्लेबल्ले नाच असतात तो माहौल हवा होता. म्हणून मग डीजे आला, ‘फक्त हिंदी गाण्यांचा स्वॅग आण’ अशी आज्ञा झाली. रुचिपालटासाठी मार्विन फ्रे ग्रुपचा लेटेस्ट जॅझही आला. अशा प्रकारे प्रांतोप्रांतीचा, देशोदेशीचा क्लास घालून घालून लग्नाचा लाजिरवाणा मराठीपणा टप्प्याटप्प्याने घालवण्यात आला.

प्रत्यक्ष लग्नाच्या समारंभामध्ये जंक्शन मजा आली. डीजेने कोणत्याही भाषेतलं कोणतंही गाणं बडवलं तरी बरीचशी मंडळी, ग्यानबा-तुकारामच्या चालीवर नाचल्यासारखीच नाचली. वर्षांनुवर्षे भल्याभल्या पोरीबाळींनी शेवटच्या ‘सावधान’ला थरथरत्या हाताने अंतरपाटाआडच्या इसमाला वरमाला घातली असेल. तो मागासलेपणा टाळण्यासाठी शेवटच्या ‘सावधान’ला बेसावध नवरीला लोकांनी चारपाच फूट उंच उचललं. लग्नानंतर अटळपणे नवराबायकोत पडणारी फूट इथेच पडल्याने नवरीचा तोल गेला. तोवर नवरदेवाचे जोडे लपवण्याची बातमी पसरली. त्याच वेळी ताशाचा कडकडाट संपल्याक्षणी कोणीतरी ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का?’ हे गाणं मोठय़ांदा लावलं. त्यामुळे स्टेजखाली लपवलेले  जोडे लाजले असतील तर तेवढंच लाजणं, संपूर्ण  लग्नात झालं. एरवी लाज लावणारा मराठीपणा टाळण्यात सगळे यशस्वी झाले.

क्रमाक्रमाने आपण, आपली भाषा, आपली राहणी, आपल्या रीतीभाती, आपली मूल्यव्यवस्था, आपलं रंजन, आपलं उद्बोधन हे सगळंच मोडीत निघत चाललेलं बघून जोशीकाकू अस्वस्थ झाल्या. परप्रांतातून खास लग्नासाठी आलेलं एक कुटुंब सोबत घेऊन गप्पा मारत बसल्या.

‘‘आम्हाला खास पारंपरिक मराठी जेवण जेऊन जायचंय.’’ त्यांनी इच्छा व्यक्त केली. सांस्कृतिक बालेकिल्ला वगैरे म्हणणाऱ्या आपल्या गावात पूर्ण मराठी जेवणाची थाळी देणारं एकही हॉटेल उरलं नाही हे सांगताना जोशीकाकूंना लाज वाटली, पण वस्तुस्थिती तीच होती. पर्याय म्हणून रात्री एखादा मराठी सिनेमा-नाटक बघण्याची कल्पना जोशीकाकूंनी मांडली. ती त्या लोकांनी हाणून पाडली. त्यांच्या मते, मराठी सिनेमा-नाटकांमध्ये आवर्जून बघण्याजोगं काही नसतं, तिकीट काढून जावं असं तर अजिबात नसतं. पुढेमागे फुकटात टीव्हीवर दिसलं तर येता-जाता बघून पुरतं यावर सर्वाचं एकमत दिसलं. त्यापेक्षा दबंग खान बघणं पुष्कळांनी मान्य केलं.

आश्चर्य म्हणजे, लग्नातला अटळ विधी म्हणजे फॅमिली ग्रुप फोटो काढणं या धार्मिक समारंभाला ‘ट्रॅडिशनल वेअर’ हा ड्रेस कोड जाहीर झाला आणि अर्ध्या तासात नऊवारी शालू, खोपे, नथी, बुगडय़ा, धोतर, उपरणी अशा सगळ्यांची हजेरी लागली. आपलं सगळं संचित एका क्लिकपुरतं उरावं, बाकी कशाशीही आपल्या लोकांना देणंघेणं नसावं, उलट ते नाकारण्यातच मोठी फुशारकी वाटावी या कल्पनेने जोशीकाकू हैराण झाल्या. ‘व्वा’ हेल्पलाइनबद्दल हल्ली त्यांच्या कानावर येत होतं. त्यांच्याकडे फुकटात मनातली खदखद मोकळी तरी करता येते. हा लौकिक आठवला तेव्हा त्यांनी वेळ मिळताच पहिल्यांदा ‘व्वा’वाल्यांचा फोन फिरवला. गहिवरून म्हणाल्या, ‘‘वत्सला वहिनी, मला सांगा.. आपण, आपलं करणं-जगणं सगळं इतकं फालतू आहे का हो?’’

‘‘कशाबद्दल बोलताय मॅडम? समस्या कळली तर उत्तर देणार ना?’’

‘‘आता काय सांगू? आपले सगळे पूर्वज.. मागचे लोक.. एवढे गयेगुजरे असतील का हो? की त्यांना कुठेच, काहीच चांगले पायंडे पाडता आले नाहीत?’’

‘‘कोण म्हणतं असं?’’

‘‘म्हणोत किंवा दाखवून देवोत.. आपलं सगळं डाऊन मार्केट, दरिद्री, लपवण्यालायक? दुसऱ्यांचं सगळं ग्रेट!’’

‘‘काय आहे ना मॅडम, आता आपले लोक काही नुसते कारकून राहिले नाहीत. खूप शिकतात.. जगभर फिरतात.. भव्य पटावर जगतात.. त्यामुळे आपल्यातल्या उणिवा त्यांना जाणवत असतील.’’

‘‘शक्य आहे, पटतंय. पण मग जगभरातलं चांगलंचुंगलं वेचून, अंगी लावून घेऊ या, समृद्ध होऊ या असंही म्हणता येईल की. सारखं सगळं खोडरबरने खराखरा खोडायला हवं का?’’

‘‘कुठे खोडताहेत? उलट चान्स मिळाला की कोकलून गातात सगळे.. लाभले आम्हास भाग्य.. बोलतो, खोलतो, झेलतो, डोलतो आणि काय काय करतो मराठी वगैरे..’’

‘‘ते फक्त गाण्यात हो.. चाल आवडते म्हणून, जगण्याची चाल पुरती बदललीये. सारखं मनोमन, लाजतो मराठी, लपवतो मराठी.’’

‘‘बघा बाई, आईच्या हातची आमटी वगैरे कसलं भरभरून लिहीत असतात लोक.’’

‘‘काही सांगू नका, पडद्यावर आई, हॉटेलात थाई..!’’

‘‘तुमचं म्हणणं, तुमचा प्रॉब्लेम काय आहे?’’

‘‘हाच की बै..  हे असं घालून पाडून बोलता करता खरं मराठीपण कुठे कधी उरेल का? सापडेल का?’’

‘‘वाट्टेल तेवढं आहे की तिकडे. सॅन होजेत, न्यू जर्सीत, झालंच तर सिअ‍ॅटलमध्ये.’’

‘‘उगाच काय झुलवता हो? जर्सी गायी असतात आपल्याकडे.’’

‘‘असू देत पण आता सगळ्या दुभत्या गायी न्यू जर्सीत गोळा होतात. आणि झाडून सगळं मराठीपण जपतात, टिपतात, सणावारी पुरवून पुरवून खातातही!’’

‘‘मी तळमळीने विचारतीये, तुम्ही चेष्टेवारी नेताय.’’

‘‘तेच तर सांगत्येय ना.. तिकडले आपले लोक वर्षांतले साडेतीनशे दिवस ग्रीनकार्डसाठी तळमळतात आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गणेश चतुर्थी, नवरात्र यांसारख्या दिवशी ‘सागरा..ला’ हाका मारून प्राण तळमळवतात. त्यांचा आदर्श घ्या.. सुख लागेल.’’

‘‘साधं आपलं पारंपरिक मराठमोळं जेवणसुद्धा..’’

‘‘बे एरियात जा हो.. दहा ठिकाणी तरी मिळेल..  इकडे जवळच्या जवळ हवं असेल तर आपण बॉस्टन ट्राय करा.’’  हेल्पलाइनवरून आत्मविश्वासपूर्ण सल्ला आला. नंतरच्या एखाद्या पुतणीच्या, भाचीच्या लग्नाच्या संध्याकाळी असाच कोणाला पुख्खा झोडावासा वाटला तर आपण बॉस्टन निवडू का सॅण्टा क्लारापर्यंत जाऊ या विचारात जोशीकाकू गढून गेल्या.