डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे

anuradha1054@gmail.com

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Marathi newspaper is not available in Tejas Express
मुंबई : तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठीचे वावडे
mini electric chili crusher machine viral video
Video : वाह! ‘दाढीच्या ब्लेडने’ बनवला ‘मिनी मिरची कटर’! जुगाड पाहून नेटकरी विचारतात, “आता…”

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा भस्मासुर दिवसेंदिवस सगळ्यांना खात सुटला आहे. यात लहान मुलांचा बळी जात आहे आणि त्या व्यसनामुळे मोठय़ांचाही. भारतात दर दिवशी १ लाख १६ हजार लोक ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ शोधतात. तज्ज्ञांनुसार असे व्हिडीओ भारतात प्रति ४० मिनिटाला एक या प्रमाणात तयार होतात. प्रतिसेकंद ३८० लोक पॉर्न बघतात, तर एकूण सर्च एजन्सीकडे याबाबत ६८ दशलक्ष वेळा चौकशी होते. केरळ राज्य असे व्हिडीओ नेटवर टाकण्यात आघाडीवर असून हरयाणात ते सगळ्यात जास्त बघितले जातात. उपलब्ध एकूण पॉर्नपैकी ३५ ते ३८ टक्के हे मुलांशी संबंधित असते. भारतात ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ बेकायदा असूनही भारतीय ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, कारण त्याची किंमत कमी आहे.

भारत हा ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा सगळ्यात मोठय़ा निर्माता व प्रसारक, तसेच सर्वात मोठा उपभोक्ता असल्याचे ‘इंडियन सायबर क्राइम डायरेक्टर’ किसले चौधरी यांनी नुकतेच निदर्शनास आणले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सतत मोठा होणारा सैतान आहे.

इंटरनेटवर प्रतिदिनी १ लाख १६ हजार लोक ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ शोधतात. तज्ज्ञांनुसार भारतात प्रति ४० मिनिटाला एक या प्रमाणात असे व्हिडीओ तयार होतात. केरळ राज्य असे व्हिडीओ नेटवर टाकण्यात आघाडीवर असून हरयाणात ते सगळ्यात जास्त बघितले जातात. उपलब्ध एकूण पॉर्नपैकी ३५ ते ३८ टक्के हे मुलांशी संबंधित असते. प्रतिसेकंद ३८० लोक पॉर्न बघतात, तर एकूण सर्च एजन्सीकडे याबाबत ६८ दशलक्ष वेळा चौकशी होते. बहुतेक असे चित्रीकरण मोबाइल फोनवर होते आणि साधारणपणे मोठय़ा शहरातून होते. मात्र ग्रामीण भागातील तसेच वंचित मुले यास अधिक बळी पडतात. अर्थात शहरातील शालेय विद्यार्थीसुद्धा याला अपवाद नाहीत. भारतीय ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे, कारण त्याची किंमत कमी आहे.

‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन’ (एनसीएमईसी), यांच्या माहितीनुसार (२८ जानेवारी २०२०) २५ हजार ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ चित्रफिती आंतरजालावर टाकल्या गेल्या. पैकी ३०१ केवळ महाराष्ट्रातील होत्या. हे भीषण आहे. कारण हे फक्त हिमनगाचे टोक आहे. मी अनेक स्तरांवरील लोकांशी बाललैंगिक शोषणाबाबत बोलायला वा प्रशिक्षण घ्यायला जाते. एकूणच या विषयावर अज्ञान सर्वदूर असल्याचे आढळते. अज्ञान आहे की ऐकायला नको, ऐकवत नाही म्हणून केलेले हेतुपुरस्पर दुर्लक्ष हा कळीचा मुद्दा आहे.

‘मुलांचे लैंगिक शोषण वाढते आहे का हो,’ हा नेहमी येणारा प्रश्न! पण कदाचित जसा स्त्रियांवरचे अत्याचार हा फक्त आधुनिक जगाचा प्रश्न नाही, तसा मुलांवरचे अत्याचारही आधुनिक नाही. एक प्रकारे हे ‘पॉवर गेम्स’ असतात. माझ्यापेक्षा दुर्बलावर माझी ताकद दाखविण्याचे साधन! यात एक अधिकारांच्या उतरंडीशी निगडित मानसिकता दिसून येते, तसेच ती हिंसा स्वीकारायचे सामाजिक शिक्षण- ज्याला गोड भाषेत ‘संस्कार’ म्हणतात, तीही आहेच. पुरुषाने स्त्रीवर आणि स्त्री-पुरुषांनी लहान मुलांवर अत्याचार करणे ही समाजमान्य पद्धत असते. यातलीच पुढची कदाचित सर्वात भीषण हिंसा म्हणजे बलात्कार वा लैंगिक शोषण. पुष्कळदा मारहाण करणे, बांधून ठेवणे, शिवीगाळ किंवा गलिच्छ भाषेत बोलून हे अत्याचार केले जातात. आताच्या काळात पुढची पायरी गाठली जातेय, या कृतींचे चित्रीकरण करण्याची. कदाचित गंमत म्हणून सुरू झालेल्या या गोष्टीचे प्रभावी हत्यारही होऊ शकते.

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ म्हणजे नेमके काय?

१८ वर्षांखालील मुलांचे कोणत्याही लैंगिक स्वरूपाचे चित्रण, आक्षेपार्ह स्थितीत काढलेले फोटो/ व्हिडीओ/ डिजिटल/ कॉम्प्युटरनिर्मित चित्रे यांचा समावेश ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’त होतो. मुलांचे लैंगिक शोषण करताना चित्रीकरण करून, त्याचे आंतरजालाच्या माध्यमातून प्रसारण करणे, वैयक्तिक उपभोगासाठी वापरणे, हीसुद्धा ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ होय. अलीकडच्या काळात असे शोषण करताना लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे प्रसारण केले जाते. यासाठी पैशांचा व्यवहार होतो. अगदी अलीकडे, जुलै २०१९ मध्ये पॉक्सो (बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा) मध्ये ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा समावेश करण्यात आला. ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ बाळगणे आणि त्याचा प्रसार करण्यास असलेल्या दंडामध्येही मोठी वाढही केली गेली.

भारत सरकारने ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ साइट्स शोधून बंद करण्यासाठी ‘इंटरपोल’ची मदत घेतल्यामुळे, अशा ३५०० वेबसाइट्स ४ महिन्यांत बंद करणे शक्य झाल्याचे सांगितले जाते. याबाबत जागतिक कायदा अतिशय कडक आहे. जागतिक संघटनेचा बालहक्क जाहीरनाम्यातील एका वैकल्पिक भागानुसार सर्व देशांनी ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ची निर्मिती, प्रचार, प्रसार, आयात, निर्यात, विक्री, जवळ बाळगणे हे बेकायदा असल्याचे निर्देशित करून, अशा कामांसाठी मुलांचा वापर होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करणे बंधनकारक केले आहे. भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम २९२/२९३ नुसार सर्व तऱ्हेची पॉर्नोग्राफी, तर आयटी अ‍ॅक्ट ७६ बीद्वारे ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ भारतात बेकायदा ठरविण्यात आली आहे.

असे पोर्न बघणारा वर्ग फक्त विशिष्ट मानसिक आजार असलेले रुग्ण किंवा शारीरिक त्रुटी असलेले आहेत, असे म्हणता येणार नाही. एकूणच ‘पोर्न अ‍ॅडिक्शन’चा भस्मासुर सगळ्यांनाच खाताना दिसत आहे. अनेक वर्षांपूर्वी एका शाळेतील कार्यक्रमात एका मुलाने माझ्याकडे मदत मागितली. तो व्हिडीओ कॅसेट्सचा जमाना होता. शेजारच्या कोणी काकीने त्याला व्हिडीओ लायब्ररीमधून ‘तशा’ कॅसेट्स आणायला सांगून त्या त्याच्याबरोबर पाहिल्या. पौगंडावस्थेतून जाणाऱ्या त्या मुलाला कुतूहल, उत्तेजना, आनंद या सगळ्या गोष्टींचा अनुभव त्या वेळी आला. फिल्म बघताना ती बाई त्याच्याबरोबर चाळेही करायची. त्याचा वेगळा आनंद या मुलाला वाटे. हे रोजचेच झाल्यावर मुलाला कंटाळा आला वा संस्कारांचा पोलीस जागा झाला म्हणून त्याने काकीला टाळण्यास सुरुवात केली. त्यावर, ‘तूच माझ्यावर अत्याचार केलास,’ असे मी सगळ्यांना सांगेन म्हणत तिने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. याची पुढची पायरी आता दिसते. चित्रीकरण फारच सोपे झाल्यामुळे ब्लॅकमेल क रण्याचे मार्ग मोकळे झाले, यापासून वाचवा म्हणत आत्महत्येपर्यंत पोचलेल्या मुला-मुलींचे फोन ‘चाइल्डलाइन हेल्पलाइन’ला यायला सुरुवात झाली.

याचा दुसरा स्रोत म्हणजे जी मुले पळविली जातात, मानवी वाहतुकीचे बळी होतात, त्यांच्याकडून कृती करून घेऊन त्याचे चित्रीकरण केले जाऊ शकते. बहुतेक वेळेला पॉर्नोग्राफी तयार करणारे लोक या पीडित बालकाच्या माहितीचे असतात. ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅन्ड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रेन’ (२०१३) नुसार अशी सामग्री तयार करणाऱ्यांपैकी १८ टक्के पालक किंवा काळजीवाहक असतात, १५ टक्के शेजारी वा परिचित असतात, तर १५ टक्के नेटवरून भेटलेले असतात. पॉनरेग्राफी करणारे हे पीडिताला भुलवून किंवा अन्य मार्गाने जबरदस्ती करून या गोष्टी करतात.

डेटिंग साइट्स आणि मेसेंजर अ‍ॅपमधून वैयक्तिक फोटो नकळत उचलले जातात आणि पॉर्न वेबसाइट्सवर टाकले जातात. सध्या मुलांना अशा डेटिंग साइट्स आणि सोशल मीडियाच्या अन्य अ‍ॅप्सचे प्रचंड वेड आहे. पौगंडावस्था ही काही तरी नवीन वेगळे विद्रोही करण्याचे वय असते. अशा वेळेस या साइट्सचा वापर करून नको त्या पोजेसमध्ये, नको त्या अवस्थेतील फोटोंची देवाणघेवाण होते. न्यूड सेल्फीज, स्वत:चे लैंगिक अवयव हाताळत असल्याचे व्हिडीओ, मित्र-मैत्रिणींना पाठवण्याचे फॅड जगभर असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबरीने सेक्सटेक्स्टिंग आणि सायबर स्पेसमध्ये एकदा गेलेले फोटो या गोष्टीवर ताबा मिळविणे फार कठीण असते. ‘फक्त तुलाच’ म्हणत ‘सख्ख्या’ मित्र-मैत्रिणीला पाठवलेले असे फोटो कुतूहलापोटी अथवा पुढील ‘सख्ख्या’ मित्र किंवा मैत्रिणीला ‘फक्त तुझे माझे सिक्रेट’ म्हणून पाठवले जातात. अशी अनेक प्रकरणे आमच्या ‘ज्ञानदेवी ‘चाइल्डलाइन’ने हाताळल्या आहेत. ही चित्रे नेटवर टाकण्याच्या धमकीपोटी लैंगिक संबंधाच्या मागण्या केल्या जातात. त्याही नाइलाजाने, तर कधी ‘त्यात काय झालं’ म्हणून पुरविल्या जातात. याचेही चित्रीकरण कधी समजून-उमजून तर कधी चोरून केले जाते. त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर होतो. इथे मुद्दा हा आहे की, असं कोणत्याही प्रकारे झालेलं चित्रीकरण,फोटो हे ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’च्या बाजारात सहज पोहोचू शकतात.

‘चाइल्डलाइन’ हेल्पलाइनकडे अशाही केसेस आलेल्या आहेत जिथे प्रत्यक्षात बच्चू अशा कशातही नसताना सोशल मीडियावरचा तिचा वा त्याचा फोटो उचलून कॉम्प्युटरद्वारा आक्षेपार्ह चित्रफिती बनविल्या गेल्या. या सर्व परिस्थितीत शोषित मुले आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त होतात. मुळात सायबर साक्षरता नसल्यामुळे, खेळ म्हणून अ‍ॅप्स वापरता-वापरता, या धोक्यांबद्दल अनभिज्ञ असल्यामुळे, निरागस बालके नकळत या पॉर्न बाजारात ओढली जातात. मुलांचे विकृत चित्रीकरण कायमस्वरूपी  ‘सायबर स्पेस’मध्ये राहणे या धोक्यापलीकडील गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. यात मुलाच्या शरीरावर/मनावर होणारे कायमस्वरूपी परिणाम, त्याचबरोबर अशा फिल्म्सपीडित मुलांच्या ब्लॅकमेलिंगसाठी वापर करून त्याचे किंवा तिचे अधिकाधिक शोषण करणे, याबरोबरच त्याच्या मित्रमंडळींना लैंगिक शोषणात, तर कुटुंबीयांना आर्थिक शोषणात ओढले जाणे संभवते.

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चे शोषण न संपणारे असते, कारण आंतरजालातील कोणत्याही गोष्टी कधीच पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि त्या एकाकडून दुसरीकडे अशा जातच राहतात. ज्या मुलांचा यासाठी वापर होतो, त्यांच्यावर अनेक दुष्परिणाम तात्कालिक अथवा दीर्घकाळ राहणारे दिसून येतात. लैंगिक शोषित बालकाप्रमाणेच ते असतात. ज्यामुळे वर्तणुकीतले बदल, स्वत:बद्दल राग, वैफल्य, आत्महत्येची प्रवृत्ती, व्यसनाधीनता, स्वत:ला अपाय करणे, अशा गोष्टी दिसून येतात. या सर्वाबरोबरच एक प्रकारचा अपराधी भाव दिसून येतो आणि जन्मभर आपले असले फोटो वा चित्रीकरण कुठे तरी कायम आहे याची भीती त्यांना वाटत राहते आणि घडलेल्या घटनेची चित्रे त्यांना सतत दिसत राहतात. काही दिवसांपूर्वी ‘वेलकम टू व्हिडीओ’ ही साइट पकडण्यात आली. यावर जवळजवळ दोन लाख पन्नास हजार मुलांचे लैंगिक शोषण दाखवणारे व्हिडीओज् सापडले. यात तान्ह्य़ा बाळांचाही समावेश होता. त्याचा व्यवहार सव्वीस कोटी रुपयांचा असल्याचे आढळले होते.

मुलांद्वारे मुलांचे लैंगिक शोषण हा एक नवीन वाढता प्रकार ‘चाइल्डलाइन’कडे  बालसेना’च्या माध्यमातून येतो आहे. मुले स्मार्टफोनवर पॉर्न बघतात आणि त्याचे प्रयोग आपल्यापेक्षा लहान मुलांवर करताना आढळतात. याचेही चित्रीकरण करून त्याचा वापर मित्रपरिवारात शेखी मारणे किंवा करमणूक यासाठी होतो. एकदा असे चित्रीकरण झाले की, त्याचा वरीलप्रमाणे चाइल्डपॉर्न बाजारात शिरकाव होणे अवघड नाही.

मुलांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची विकृती असणारे ‘पेडोफाइल्स’ मुलांना पॉर्न दाखवून आकर्षित करतात आणि त्यांच्याशी हळूहळू दोस्ती वाढवत लैंगिक संबंधासाठी अथवा लैंगिक स्वरूपाच्या कृतींचे फोटो घेण्यासाठी जाळ्यात ओढतात. चॅटरूममधून आपण मुलाच्याच वयाचे असल्याचे भासवत दोस्ती केली जाते आणि नंतर वेबकॅमवरून लैंगिक चाळे, नग्न फोटो काढणे, असे ‘खेळ’ खेळले जातात. ‘डेअर’सारख्या खेळातूनही मुलांना अशा कृतीत ओढले जाते आणि अशी चित्रीकरणे इतरांना उपलब्ध करून दिली जातात. बालवेश्याकडे जाणाऱ्यांकडूनही चित्रीकरण होते.

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चे गिऱ्हाईक नेमके कोण हे पाहता असे लक्षात येते की, निव्वळ कुतूहल म्हणून पाहणे जसे असू शकते तसेच पाहता-पाहता लागलेले व्यसनही असू शकते. स्मार्टफोनवर एकदा एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी साइट ओपन केली की, त्याच-त्याच प्रकारच्या लिंक्स येत जातात हे सर्वश्रुत आहे. पॉर्नसाइट्स उत्तेजक चित्र दाखवतात. एकदा कुतूहल म्हणून उघडल्यास अधिकाधिक उत्तेजक स्वरूपाच्या लिंक्स येत जातात. त्यातूनच विकृत पॉर्न, चाइल्ड पॉर्न सापडत जाते आणि कुतूहलाचे व्यसन कधी होते हे समजतही नाही. हे झाले सामान्य माणूस किंवा विशेषत: संप्रेरकाच्या उलथापालथीत सापडलेल्या पौगंडावस्थेतील मुलांचे; परंतु मुलांबरोबर संबंध ठेवायला आवडणारे ‘पेडोफाइल्स’ किंवा प्रत्यक्ष संबंध ठेवता न येणारे, पण बघण्याचे व्यसन असलेल्या व्यक्ती याचे गिऱ्हाईक असू शकतात.

पालकांकडे मुलांसाठी वेळ नसणे, मुलाचे एकटेपण, कुटुंबातील तुटलेला संवाद यात मूल स्वाभाविक बाहेर दोस्त शोधते. पॉर्न चित्रीकरण करणारे याचा फायदा बरोब्बर घेतात. एक उदाहरण बघू. सतत घरात एकटीच असलेल्या एका ८ वर्षांच्या मुलीची नेटवर चॅटिंग करताना एका आजोबांशी दोस्ती झाली. गप्पा-गोष्टी, शाळेत काय झाले अशा सर्वच गोष्टी ती आजोबांना सांगे. आजोबा खूप प्रेमाने विचारपूस करीत, गोष्टी सांगत. एक दिवस म्हणाले की, आपण नवा खेळ खेळू. ते करतील त्या कृती तिने करायच्या. या सर्व निरागस कृती होत्या-कपाळाला हात लावणे, नाक खाजवणे. हळूहळू लैंगिक अवयवाला हात लावून चाळे करणे सुरू झाले आणि एक दिवस कपडे काढ, मीपण काढतो असेही झाले. हे सर्व वेबकॅॅमवरून चित्रित होत होते.. ‘चाइल्ड पॉर्न’चे निर्माते अशाच प्रकारे मुलांना वश करतात.

लैंगिक शोषणाच्या अथवा हरविलेल्या मुलांच्या केसेस जेव्हा कायद्याच्या कक्षेत येतात तेव्हा त्या-त्या गुन्ह्य़ाव्यतिरिक्त इतर काही मुलांच्या बाबतीत घडले आहे का हे सहसा बघितले जात नाही. पळून गेलेली वा हरवलेली मुले ही पॉर्न बाजारासाठी कदाचित पळवलेली असू शकतात. ही प्रकरणे पॉक्सोखाली नोंदताना त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण झाले असेल याचा विचार न केल्याने तपासही त्या दिशेने होत नाही. मुलांचे सरकारी अथवा अन्य निवारे वा आश्रमशाळा यामध्ये घडणाऱ्या अनैतिक गोष्टी अनेकदा चव्हाटय़ावर येतात. जिथे मोठय़ा प्रमाणावर लैंगिक शोषण झालेले आहे तेथे असे चित्रीकरण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना असे आश्रम कदाचित त्यासाठीच निर्मित असू शकतात. पुणे ‘चाइल्डलाइन’ने पुण्याजवळच्या एका आश्रमात, सातत्याने दोन-तीन वर्षे विकृत लैंगिक शोषण झालेलं प्रकरण – मुलांना मुलांबरोबर, मोठय़ांबरोबर संबंध ठेवायला लावणे, त्यांना पॉर्न दाखवणे, याचा समावेश असलेली केस उघडकीस आणली. ‘चाइल्डलाइन’ने पॉर्न बाजारासाठी मुलाचे चित्रीकरण झाले असल्याची शक्यता मुलांच्या जबान्यांच्या आधारे व्यक्त करूनही सुरुवातीस त्या दृष्टीने तपास झाला नाही. असं झाल्यास अनेकदा त्यातला महत्त्वाचा पुरावा नष्ट होऊ शकतो.

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ बनविणे जसे सोपे तसा त्याचा प्रचार, प्रसार आणि व्यवहार करण्याचे मार्गही आंतरजालामुळे सोपे आहेत. वेबसाइट्स, ईमेल, समाजमाध्यमांच्या विविध साइट्स, गेमिंग साइट्स, इन्स्टन्ट मेसेजिंग (आयसीक्यू), इंटरनेट रिलाय चाट (आयआरसी), बुलेटिन बोर्ड, पियर टू पियर नेटवर्क हे काही स्रोत होत.

बाललैगिक शोषणाचे कोणतेही चित्रीकरण दिसल्यास पुढील ठिकाणी तक्रार करून मदत मागता येते. ‘नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड राइट्स’ ‘चाइल्डलाइन’ – २४ तास टोल फ्री नंबर १०९८, तसेच स्थानिक सायबर सेल असतातच. ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’ शोधणे मुश्कील आहे, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे त्यावर कार्यवाही अधिकच कठीण! ही विषवेल झपाटय़ाने पसरत असल्याचे मात्र दिसते आहे. असुरक्षित आंतरजालाचा वापर, त्याच्या परिणामाबाबत अज्ञान, पौगंडावस्थेतील स्वभाववैशिष्टय़े, मित्रांचा प्रभाव, लहान मुलांना यातून येणाऱ्या आकर्षणाबाबत माहिती नसणे या सगळ्यामुळे निरागस मुलं बळी ठरत आहेत.

एकूणच पॉर्नोग्राफीचे वाढते आकर्षण आणि त्यातही ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चे विकृत आकर्षण का वाढते आहे हे एकदा समाजाने तपासून पाहायला हवे आहे. मैदानी खेळ, सहकुटुंब घालवलेला आनंददायी वेळ, मन गुंतवून ठेवणारे छंद हे उपाय आंतरजालाच्या जाळ्यातून कदाचित बाहेर काढू शकतील.