अपर्णा कुलकर्णी-देशपांडे

आईचा उदोउदो करण्याची संधी आत्तापर्यंत अनेकांनी अनेक वेळा साधली, पण या उदोउदोच्या गजरात आताच्या बदलत्या काळातली आणि वाढत्या व्यवधानांमुळे होणारी तिची  घुसमट मात्र अनेकदा दुर्लक्षिली गेली. आईपण निभवताना तिने तिच्यावरच केलेला अन्याय त्यागाच्या नावाखाली दडपून टाकला गेला. पण मानसिकता बदलू लागली आहे.. ती आई आहेच, पण त्याआधी ती माणूसही आहे, याचं भान वाढू लागलं आहे. आईपणाचा वर्षांनुवर्षे चालू असणारा ‘प्रोग्राम’च नव्हे तर ‘सॉफ्टवेअर’च बदलण्याची वेळ आलेली आहे. मातृत्व या शब्दातलं व्यापकत्व आता कुटुंबातल्या प्रत्येकात आणणं ही काळाची गरज झाली आहे. उद्याच्या ‘इंटरनॅशनल मदर्स डे’निमित्त आईपणाच्या व्याख्येचा नव्याने विचार करायला लावणारा  लेख..

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Theft of gas from cooking cylinders Two arrested for doing illegal business
स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस चोरी; पत्र्याच्या खोलीत बेकायदा व्यवसाय करणारे दोघे अटकेत
Dealing with anti-recipe trolls on social media
एका पाककृतीविरोधातील ट्रोलधाडीला सामोरे जाताना…

‘‘ताई, पोरगी बाळंतपणाला आलीये, मी काही आता पंधरा दिवस यायची नाही.’’ आमची राधाबाई.

‘‘वाट्टेल तेवढी सुट्टी घे; पण काय गं, आठ दिवसांपासून अंगावर दुखणं काढतीयेस, कितीदा सांगितलं तरी सुट्टी घेऊन डॉक्टरांकडे गेली नाहीस, आता लेकीसाठी बरी सुट्टीची गरज वाटतेय तुला?’’

‘‘काय करू वो ताई, शेवटी ‘आई’ आहे मी!

सकाळची प्रचंड घाईची वेळ, नाश्ता, मुलांचे डबे, युनिफॉर्मला इस्त्री.. तिचा जीव टांगणीला.. आज कॉलेजमध्ये ‘कमिटी’ येणार, त्यामुळे लवकर जाणं आवश्यक आहे. ती रडकुंडीला आलेली. मेंदूतला प्रोग्रॅम बीप..बीप सिग्नल देतोय.. विचारतोय, ‘अशी कशी तू जाऊ शकतेस? तुझीच जबाबदारी आहे घरातलं आवरायची. तुझ्या वैयक्तिक जगाचा याच्याशी संबंध लावू नकोस. यातील एकही काम न टाळता तुझी वेळ कशी साधायची ते तू बघ.’ मग सगळी सर्कस करून, स्वत:च्या दोन घासांवर पाणी सोडून उपाशीपोटी ही माऊली कॉलेज गाठणार..

आणखीन वरच्या वर्तुळातील आईदेखील या अशाच भावनिक आंदोलनातून जाते. वातानुकूलित अद्ययावत बोर्ड रूम, तीन-चार देशांतील उच्चपदस्थ समोर बसलेले. देशात या नव्या करारामुळे प्रचंड आर्थिक उलाढाल होणार. चर्चा ऐन भरात आलेली. इतक्यात स्वीय सहायक तिच्या कानाशी पुटपुटतो, तिचा चेहरा गंभीर.. मुलगा तापाने फणफणलाय आणि पती परदेशात. तिची घालमेल.. मेंदूत.. विचारांची टिक, टिक, टिक! तिचा निर्णय झाला.. काय असेल तो निर्णय?

सगळे म्हणणार ‘अर्थातच ती जाणार’ कारण? तेच, ‘आईपणाचा प्रोग्रॅम’. आपला प्रोग्रॅमर आहेच तितका परफेक्ट! हृदय आणि मेंदूची झटापट झाली की आईसाठी विजय हृदयाचाच होतो. ‘आपले मूल ही आपली वैयक्तिक उच्च प्राथमिकता’, हे आईने मनावर बिंबवून घेतलेलं असतं.

कधी नव्हे ती वेळ काढून बाहेर खरेदीसाठी निघालेली. खूप महिन्यांपासून घरातल्याच अनेक गोष्टी घ्यायच्या कामांची यादी वाढत चाललेली होती. आज अखेर वेळ काढलाच. उन्हातान्हात भटकत तिची खरेदी चाललेली. तितक्यात लेकीचा फोन येतो, ‘‘मॉम, कुठे आहेस? आज कॉलेज लवकर सुटलं, मी घरी आलेय.’’

‘‘अगं सोनू, आलेच बघ घरी. तोपर्यंत टेबलावरची फळं खाऊन घे.’’ आणि मग सगळी खरेदीची यादी गुंडाळत जिवाचे पाणी करत धावत ती घरी येते. ‘ले मैं तेरे वास्ते सब छोडके आ गई’ म्हणत. का? कारण तिनंच (आणि बहुतेक वेळा सगळ्या कुटुंबानेच) हे गृहीतच धरले आहे, की तिचं अस्तित्वच मुळी इतरांसाठीच आहे. गंमत म्हणजे आपण गृहीत धरले जाण्याची तिनंही सवय लावून घेतलीय. याचे अतिशय बोलके उदाहरण माझ्या मैत्रिणीचेच. पुण्यात नोकरी करणाऱ्या तिच्या मुलीचा होणारा नवरा, तिचा ‘बेबी’ बरं का! तिच्यासाठी स्वत:ची चेन्नईतली नोकरी सोडून पुण्यात आला. तिला कोण कौतुक! चांगलंच आहे, पण ती हे सोईस्करपणे विसरली का, की तिच्या बारावीच्या शिक्षणासाठी तिच्या आईनेही तिची चांगली नोकरी सोडून पुण्यात घर केलं होतं? की आईने असा त्याग करायचाच असतो? ‘आईपणाचं सॉफ्टवेअर’ हेच सांगतं का?

गणित आणि विज्ञानात संशोधन करताना अनेक गृहीतके वापरतात. तसे संपूर्ण विश्वात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं गृहीतक म्हणजे आई. विशेषत: मध्यमवर्गात तर फारच जास्त. कुटुंबातल्या सगळ्यांच्या सगळ्या गरजा आईच पूर्ण करणार, तिचंच तर काम आहे हे! तिला काय हवे ते ती बघून घेईल नंतर.. म्हणजे काय, तर आई हा भावनेवर चालणारा, स्वत:च्या वैयक्तिक इच्छांना शेवटक्रम देणारा निसर्गाचा अनोखा ‘प्रोग्रॅम्ड आविष्कार’ आहे. हा प्रोग्रॅम तिला वेगळा विचार करण्याची उसंतच देत नाही. तिला हे उमजूच देत नाही की, ‘बाई, तू आई आहेस मान्य! पण बाई आहेस आणि त्याआधी माणूस आहेस ना? एखाद्या दिवशी ठरलेल्या क्रमाने नाही झाली कामं, हरकत नाही. नंतर पुन्हा कधी होतील. आधी भरभरून श्वास तर घे.’ पण नाही! आईपणाच्या साच्यात तिनं स्वत:ला इतकं पक्कं बसवलंय, की तिच्या कामात कुठलीही तडजोड तिला स्वत:लाच लवकर मान्य होत नाही. नवीन तंत्रज्ञानाने आईची कामं सोपी झालीत, कमी झालीत कबूल! पण आईपणाची जबाबदारी मात्र सर्व कोनांतून सर्व दिशेने वाढतच जातेय. हिरकणीने लेकरासाठी उभा कडा पार केला, तर ही माऊली जीवनाच्या अटळ खिंडी, कपारीतून रोज अव्याहत लढतेच आहे. तिची ही लढाई अनेक नवीन आव्हानांशी आहे. या लढाईत तिला आपली कुठलीच भूमिका कमजोर पडू द्यायची नाहीय. आपलं मूल एक उत्तम व्यक्ती, आदर्श विद्यार्थी, जीवघेण्या स्पर्धेत टिकणारे, उत्तम नागरिक, आरोग्यसंपन्न आणि गुणवान बनवणे ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे, अशीच खूणगाठ तिने बांधलेली असते. यात जरा म्हणून कुठे कमी पडतोय अशी शंका जरी तिला आली, की ती कमालीची अस्वस्थ होते. कारण? तेच, ‘आईपणाचा प्रोग्रॅम’.

समाजनिर्मात्याने आपल्या लॅपटॉपवर ‘आईपण’ हा अत्यंत गुंतागुंतीचा भावनिक ‘प्रोग्रॅम’ तसाच तर डिझाईन केलाय. मग ती कोणत्याही सामाजिक, आर्थिक स्तरातील असू देत.

संविधानात सुधारणा (दुरुस्ती विधेयक) कायदा सर्वसंमतीने पास करावा लागतो, तसा हा ‘आईपणाचा प्रोग्रॅम’ सर्वसंमतीने, थोडा नव्याने लिहिण्याची गरज आहे. बदलणाऱ्या जगाशी आपण सहज मिळतेजुळते घेतो, मग तसेच ‘बदलणारे आईपण’ही (आईसकट) सगळ्यांनी तितक्याच सकारात्मकतेने स्वीकारले पाहिजे. त्याचे सॉफ्टवेअर आपल्याकडे आहे. आपण जाणूनबुजून त्याकडे कानाडोळा करतो. कारण जुन्या प्रोग्रॅममध्ये आपला सगळ्यांचा स्वार्थ आहे. ‘स्वार्थ’ शब्द खटकू शकतो, पण तो आहेच.

स्वार्थ कसा? तर आधी उल्लेख केलेल्या कामगार स्तरावरील आई वर्गाचा विचार केला, तर का राधाबाई स्वत:कडे दुर्लक्ष करून आपल्या सुट्टय़ा मुलीसाठी राखून ठेवते? तिला हे माहितेय, की ही पूर्णपणे आईचीच जबाबदारी आहे. मग त्या सुट्टय़ा स्वत:वर खर्च करून कसे चालेल? आपले दुखणे हा आपला वैयक्तिक त्रास आहे, तो सहन करू या. इथे कुटुंबातला समजुतीचा परीघ वाढवत मुलांपर्यंत वा नवऱ्यापर्यंत का जात नाही? तिचा नवरा अथवा मुलगा तिला हा आधार का देत नाहीत? तू घाबरू नकोस, आम्ही आहोत. तू आधी स्वत:च्या प्रकृतीला सांभाळ, चल डॉक्टरकडे जाऊ या.’  हे इतकं सोपं सरळ का घडत नाही? आईनं आपल्या समर्पणाची किंमत स्वत:च मोजायची. त्यात कुणाचा वाटा असणार नाही हे का सर्वमान्य झालं? तेही सगळ्या स्तरांत?

मुळात स्त्रिया हे विसरतात की, आधी त्या माणूस आहेत, त्यानंतर स्त्री, मग पत्नी आणि आई.. किंवा अनंत काळची माता(?) तिच्या अनेक भूमिका आहेत, ज्यात ‘आई’ हीदेखील एक महत्त्वाची असली तरी भूमिकाच आहे. तिनं आधी स्वत:जवळ हे मान्य करावं की ती ‘सुपर पॉवर’ घेऊन जन्माला आलेली नाहीये. ‘द रिपब्लिक ऑफ मदरहूड’ या आपल्या पुस्तकात लिझ बेरी म्हणतात, ‘काळानुरूप मी आईपणाच्या झेंडय़ाखाली उभी तर राहिले मानवंदनेसाठी तोंडही उघडले, पण त्याचे गीत मात्र मला माहिती नव्हते. ‘परिपूर्ण मातृत्व’ ही फक्त संकल्पना आहे. याचे कारण ते अशक्य आहे. ती माणूस असल्याने कधी तरी चुकू शकतेच ना.  मुळात एक व्यक्ती म्हणून तिलाही काही मर्यादा असणारच आहेत, हे आधी तिनं संपूर्णपणे मान्य करावं, मग कुटुंबही करेलच. म्हणजे काय करायचं? तर वर्षांनुवर्षे आपण वापरत असलेले ‘आईपणाचे सॉफ्टवेअर’ आता बदलायचे. त्यात काही ‘सेन्सर्स’ वाढवायला हवेत. ते काही गोष्टींची नोंद करून घेतील आणि वेळोवेळी अलार्म वाजेल. ते तिच्यासकट सगळ्यांना प्रश्न विचारतील.. ‘आई म्हणून तिच्याकडून जरा जास्तच अपेक्षा नाही का ठेवल्या जात आहेत?’

मुलांनी आपल्या वस्तू घरभर कुठेही फेकाव्यात आणि आईने मात्र ‘सुपर वुमन’ (मधल्या काळात या संकल्पनेचाही बागुलबुवा फुटला नि काही जणींनी तरी नि:श्वास सोडला.) होऊन त्या क्षणार्धात शोधून द्याव्यात. प्रत्येकाने आपल्या वेळापत्रकानुसार जेवायला यावे आणि आईने तत्परतेने अन्न गरम करून, जिवाची घालमेल करून, त्यांच्या वेळेत त्यांच्या पोटात टाकण्याची जबाबदारी चोख पार पाडावी. आधुनिक सुखसुविधा, आधुनिक वेश, जीवनशैली यांचा अंगीकार करतानाच आपल्या पाल्यातील सत्त्व आणि स्वत:तील स्वत्व टिकवण्याची प्रचंड कसरत करावी. ही मानसिकता बदलायचे काम हे ‘सेन्सर्स’, म्हणजेच अशा जाणिवा आपल्याला करून देतील. घरातल्या सगळ्यांनाच चांगलं, सात्त्विक अन्न घालायची जबाबदारी तिची असते, हे एक वेळ मान्य केले तरी त्याचा अर्थ तिनं त्याकडे लक्ष पुरवावं असा आहे, तिनेच ते रात्रंदिवस रांधत बसावं, अशी अपेक्षा आत्ताच्या काळात सरसकट बाराही महिने सगळ्याच आईवर्गाकडून करत राहाणं तिच्यावरही अन्याय करणारंच आहे.

आई हा प्राणी सतत विवंचनेत असतो, की मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी काय-काय करू? अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणते कला-क्रीडा प्रकार शिकवू? मी ऑफिसमध्ये किंवा घरी कामामध्ये असताना मुलं जास्त टीव्ही तर बघत नसतील ना? आता तर मोबाइलवर, सोशल मीडियावर आणि गेममध्ये किती असतील? काय काय पाहात असतील? ते आळशी आणि निरुत्साही तर बनणार नाहीत ना? त्यांना वाईट सवयी तर लागणार नाहीत ना? आपण त्यांना स्वत:वर संयम ठेवणे शिकवतोय ना? त्यांचे मित्र होऊन त्यांच्याशी संवाद साधणे जमतंय ना? मातृत्व निभावण्यात आपण कमी तर पडत नाही ना? अशा असंख्य चिंता..

आपलं हे नवं सॉफ्टवेअर तिला समजावून सांगू पहातंय, ‘तू हे सगळं करत आलीयेस, पुढेही करणारच आहेस; पण घरातील सगळ्यांना हाताशी धरून, सगळ्याच आघाडय़ांवर मी पुरून उरली पाहिजे, अशी वेडी जिद्द न बाळगता.’

कार्पोरेट क्षेत्रातील आईनं मात्र याबाबतीत पाऊल उचललेलं दिसतं. तिच्या समोरील पहिलं आव्हान म्हणजे प्रवाहात टिकून राहणं. म्हणजे वैयक्तिक कारणांसाठी करिअर सोडून न देणं. त्यासाठी छोटय़ा-छोटय़ा कौटुंबिक अडचणींसाठी तिनं मजबूत फळी तयार केलीय. विश्वासू मदतनीस घेऊन, घरातील दोन्ही बाजूंची ज्येष्ठ मंडळी हाताशी घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन ती मुलांचे संगोपन उत्तमरीत्या पार पाडतेय. असे करताना कंपनी मालक, व्यवस्थापक, टीम लिडर्स आणि पती यांची भूमिका तिला फार महत्त्वाची वाटते. आपल्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये त्यांनी आवश्यक बदल केलेले दिसतात. एक यश कमावताना दुसरे काही तरी सोडावे लागेल याची मानसिक तयारी, त्याला ‘त्याग’ हे लेबल न लावता, अपराधी भावनेनं न बघता त्याचा सकारात्मक स्वीकार! हा बदल किती छान आहे. आपले व्यक्तिमत्त्व फुलवताना तिच्या अंगभूत मातृत्वाला ती कुठेही बगल देत नाही.

‘फेसबुक’च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या ‘लिन इन’ आणि ‘ऑप्शन बी’ या पुस्तकात स्त्रियांच्या उच्चपदस्थ भूमिका, त्यांचे मातृत्व आणि आई म्हणून जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकलाय. त्यांच्या ‘ऑप्शन बी’ या नव्या पुस्तकात त्यांनी अधोरेखित केलंय की, ४० टक्के स्त्रिया आपल्या घराची आर्थिक बाजू  सांभाळून कणखर आईची भूमिकाही निभावतात.  एका व्यक्तीला आपले करिअर करताना अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांतून जावे लागते, पण आईपणाची जबाबदारी मात्र कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय ती खांद्यावर घेते. याचाच अर्थ आजच्या कुठल्याच आईला तिच्या जबाबदाऱ्या मुळीच टाळायच्या नाहीयेत. तिला आपल्या क्षमता विस्तारून सगळं करायचंय; पण त्यासाठी आधी अनावश्यक आईपणाचे ओझे मानेवरून उतरवावे लागते.

नको इतके गुरफटणे कमी करावे लागते. अन्यथा सुधा मूर्ती, शांती एकांबराम, इंद्रा नुयी, मल्लिका श्रीनिवासन, अरुण जयंती, मेरी कोम.. अशा असंख्य स्त्रियांना इतकं यशस्वी होणं शक्य झालं नसतं. सुधा मूर्ती यांना प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा देऊन करिअर करावं लागलं आणि त्यानंतर कुठलाही कमीपणा न बाळगता त्या जबाबदारीपासून दूर होऊन त्यांनी ‘इन्फोसिस फाऊंडेशन’चं प्रचंड मोठं काम मुलाला सांभाळत पार पाडलं. त्यांच्यातील आईचा तो निर्णय होता. नंतर त्यांच्या अफाट बुद्धिमतेनं सामाजिक कार्याबरोबरच लेखिकेच्या भूमिकेलाही उत्कृष्ट न्याय दिला. आपल्या व्यावसायिक चौकटीत आपण एक आई म्हणून आनंदी नसाल तर ती चौकट तोडण्याची हिंमत बाळगा आणि त्याचा कुठलाही खेद बाळगू नका, हा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्याला दिला. म्हणजे आईपणाचे नवे सॉफ्टवेअर त्यांनी सहज आत्मसात केलेले दिसते. मग हा बदल दिसू देत ना सगळीकडेच.

अर्थात काळाप्रमाणे अनेकींनी स्वत:मध्ये बदल करायला सुरुवात केली आहेच. काही ठिकाणी ते दिसूही लागले आहेत. मात्र ते बदल जाणीवपूर्वक व्हायला हवेत ही काळाची गरज आहे. समजा, अनेक कामं समोर आली, तर आई म्हणेल, ‘‘आज मला बरीच कामं आहेत. आजच्या दिवस आपण ‘बाहेरचं’ खाऊ या, उद्या सगळ्यांच्या आवडीचे जेवण बनेल घरी.’’

ठीकच आहे की. चलता है!

‘‘तुझी शाळेची बॅगचेन लावून आणायची होती नं? आज आणणे झालेच नाही, उद्या नक्की आणेन!’’

किती सोपं आणि सहज. कुठलीही अपराधीपणाची भावना न ठेवता.

‘‘सोनू, आज अचानक लवकर सुटलं का कॉलेज? घरात आहे ते खाऊन घे, मला यायला थोडासा वेळ लागेल. चालेल ना?’’ न चालायला काय झालं.. सोनूलाही थोडा निवांतपणा हवाच असतो की!

मुलगा सांगतोय, ‘‘आई, शाळेत मीटिंगला बोलावलंय.’’ यावर आईला म्हणता येईल- बाळा, मी प्रत्येक वेळी येते किनई? मला या वेळी नाही जमणार, बाबांना विचार आज.’’ मग बाबादेखील साथ देतील. मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातील बाबा मंडळीही आता छान बदलत चालली आहेत. आईची जबाबदारी विभागून घेणारे बाबा आता अनेक घरांत दिसतात. हा बदल खूपच स्वागतार्ह आहे.

खरं तर एकटय़ा आईनं आईपणाचं अवास्तव दडपण बाळगणं हे आपण मनुष्यप्राण्यातच बघतो. पक्ष्यांमध्ये आपल्याला पिल्लांची जबाबदारी नर-मादी दोघांनी मिळून घेतलेली दिसते. आता आपला नवीन प्रोग्राम आपणही एकत्रपणे फिट केला पाहिजे.

म्हणजे एके दिवशी समजा, आईला घरी येण्यास उशीर झाला.. मुलगी म्हणू शकेल, ‘‘आई, आज स्वयंपाकवाल्या मावशी आल्याच नाहीत. मग बाबांनी खिचडी केली. मज्जा आली खूप!’’ त्यावर आई म्हणू शकेल, ‘‘अरे वाह! आज बाबांनाही ‘शेफ’ व्हायची संधी मिळाली तर!’’

हे आईपण किती सुखाचे आहे! आपली अपत्ये आपल्याइतकीच त्यांच्या बाबांचीही आहेत. कधी आपल्याला नाही जमले करायला, मुलांच्या वडिलांनी केले मुलांचे तर लगेच आई म्हणून बाईची क्षमता नक्कीच दावणीला लागत नाही.

हे मान्य आहे की, स्त्रीला ‘माता’ संबोधले जाते, कारण मूल जन्माला घालणे आणि स्वत: जीवनरस देऊन बाळाचे पोषण करणे ही जबाबदारी निसर्गाने स्त्रीवरच टाकली आहे. मात्र त्याव्यतिरिक्तच्या बाबी मनुष्यप्राण्यावर सोडल्यात. अन्यथा निसर्गानेच आणखी जबाबदाऱ्या तिच्यावर टाकण्याची सोय नसती का केली? त्यामुळे पित्याने मुलांच्या संगोपनातील जबाबदाऱ्या उचलल्या म्हणजे आई कमी पडतेय असं नाही. उलट ही अशी व्यवस्था सगळे समजून घेतील. यासाठीच तर आपला ‘नवीन प्रोग्रॅम’ लागलाय न कामाला!

शिवाय हे फक्त नोकरदार वा व्यावसायिक स्त्रियांपुरतेच नाही तर पूर्णवेळ गृहिणी असलेल्या आईनेदेखील स्वत:ची आवड, छंद, मत्र परिवार यासाठी आवर्जून वेळ राखून ठेवायला हवा, कारण तिलाही मुलांच्या नव्या जगाशी जुळवून घ्यावे लागते. त्यांच्या आवडीनिवडीत रस घ्यावा लागतो. त्यांच्या वयाचे होऊन संवाद साधावा लागतो. वाढत्या वयातही नवे गॅजेट्स हाताळायचे कसब आत्मसात करावे लागते. त्यांची नवी बोलीभाषा शिकावी लागते. एकदा तुम्ही आई झालात, की कायमचे विद्यार्थीही होता. म्हणून त्यासाठी वेळ काढायलाच हवा. नाही तर आपलीच मुलं ‘आई, तुला काही येत नाही?’ असं म्हणत आपला सर्वासमोर अपमान करायला मागेपुढे पाहात नाहीत. त्याशिवायही महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून तिच्याही काही इच्छा आहेत, स्वप्नं आहेत. कुणाला कविता लिहायची आहे, कुणाला चित्रकलेत रस आहे, कुणाला संमेलनात जायचंय, कुणाला यूटय़ूब चॅनेल काढायचं आहे, वाचन करायचं आहे, योगासन वर्गाला जायचं आहे. अशा अनेक इच्छा, ज्या आई बऱ्याचदा दाबून टाकते किंवा मुलं मोठी झाल्यावर किंवा निवृत्तीनंतर करू म्हणून उद्यावर ढकलते. कारण मुलांच्या अपेक्षा म्हणजे ‘आवश्यक गरज’, तर आईच्या अपेक्षा म्हणजे तिची ‘इच्छा’ समजून बघितलं जातं. ही चुकीची समजून दूर करणे हाच तर आहे ‘आईपणाचा नवीन प्रोग्रॅम.’!

‘आईपण’ हे तिच्या वयानुसार वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जाते. जुन्या काळातल्या आईची मानसिकता मुलाच्या लग्नानंतर एकदम वेगळी असायची. सतत मुलावर हक्क दाखवताना तिच्या हे लक्षात येत नसे की, ती मुलांच्या पायात घोटाळणारे मांजर झालीये. एक न झिडकारता येणारा चिवट अडथळा आणि त्यातूनच निर्माण होते सासू-सुनेचा घर व्यापून टाकणारी, नकोशी काजळमाया.

पण, आजची आई मात्र या बाबतीत ‘स्मार्ट’ झालीये. इथे मात्र तिनं आपला ‘प्रोग्राम’ मस्त बदललाय, निदान शहरातल्या आईने तरी. ती आईपदावरून आजीच्या पदावर बढती मिळवते. तिच्या तरुणपणी ज्या गोष्टींपासून ती वंचित राहिली, त्या सगळ्या गोष्टी ती सुनेला पुरवते. तिचा आधारस्तंभ बनते. हा आईपणाचा मुकुट कधी मखमली तर कधी बोचणारा काटेरी असतो; पण काटय़ांना अलगद दूर करणे तिला जमते.

आता तर भारत सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना अपत्य जन्मावेळी ‘पितृत्वाची’ पंधरा दिवस सुटी देते. खासगी क्षेत्रात ही सुटी कंपनीच्या योजनेनुसार कमीअधिक आहे. म्हणजे ‘पित्याचाही अर्भकाच्या संगोपनात वाटा असावा’ यावर एकमत झालेय, ही समाधानाची बाब आहे. तसं बघितलं तर ‘मातृत्व’ ही संकल्पना लिंगभेदापलीकडची आहे. सर्वाना कवेत घेणारी ‘ती’ वसुंधरा, तर साऱ्या विश्वाची काळजी करणारे ज्ञानेश्वरही ‘माऊली’ म्हणवले जातात. पंढरीच्या विठोबालाही ‘विठूमाऊली’ म्हणतो ना आपण? म्हणजे आपल्या अपत्यावर अतिशय मायेने लक्ष ठेवून काळजी घेणारे ते मातृत्व!

आईपण हे आयुष्यभर संपत नसतं, किंबहुना ते संपूच नये अशीच आईची इच्छा असते. पती, मुले आणि घरातील मोठी मंडळी यांना मुलांची आईच एका धाग्यात बांधते; पण काळानुसार बदल घडवणारं ‘सुधारित आईपण’ तिला एका पिढीकडून अलगद दुसऱ्या पिढीकडे सोपवायचंय, प्रसन्नपणे जगायचंय, शाश्वत कुटुंबव्यवस्थेचा केंद्रिबदू म्हणून!

adaparnadeshpande@gmail.com

chaturang@expressindia.com