डॉ. आशीष देशपांडे

‘मनाच्या तऱ्हा’ समजून घेणं खरं तर अवघडच. त्यामुळे आपण रोज आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या काही माणसांच्या गोष्टींवरून, त्यांच्या वागण्यावरून या तऱ्हांचा अर्थ लावण्याचा, त्यांच्या कारणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तोच प्रयत्न या तिसऱ्या लेखातही आपण सुरू ठेवणार आहोत…

गर्भाशयात नियतीच्या इच्छाशक्तीनं जीव धरतो आणि जगण्याची ताकद (लिबिडिनल फोर्स) त्याला आकार देते. मेंदूच्या वाढीत भाषा, भावना, अनुभव माणसाचा पिंड घडवतात. अस्तित्वाच्या जाणिवेनं स्मरणशक्तीला वेढा घालण्याआधीचे अनुभव ‘प्री-कॉन्शियस’ नि वेढा पक्का पडल्यानंतरचे ‘कॉन्शियस’ बनवतात. त्याच वेळी ‘मनाचं मी पण’, विविध इंद्रियं, आकलनशक्ती आणि निर्णयक्षमता समांतर वाढत असतात.
अनंत तुकड्यांच्या ‘जिग्सॉ’प्रमाणे उलगडत जाणारं हे कोडं, बालपण, पौगंडावस्था ओलांडून प्रौढावस्थेत पोहोचतं. साहजिकच या जडणघडणीत जाणिवेच्या नजरेतनं निसटलेल्या (अनकॉन्शियस) गोष्टी ‘ओरखडे’ बनून मनावर आपली छटा उमटवतात. एखाद्याा चौकातनं रेल्वे फलाटाकडे किंवा बाजारात जायच्या रस्त्यावर जशी आपसूक वर्दळ वाढते, तशीच भावनिक वर्दळ बालपणीच्या अनुभवविश्वातल्या ओरखड्यांनी बदलते नि स्वभावसुलभ बनते. तात्पुरती सुटका करणाऱ्या या ‘मनाच्या तऱ्हा’ अतिवापरानं मेंदूतली ‘सुखाची रसायनं’ तयार करण्याच्या प्रक्रिया बिघडवतात. त्यात भर पडते परिस्थितीजन्य कारणांची. आगरकरांच्या ‘काळ-काम-वेगा’च्या हौदाप्रमाणे सुखाची रसायनं मनाच्या हौदात स्वैरपणे खाली-वर होऊ लागतात. बहुतेक वेळा झोप, योग्य आहार, व्यायाम, छंद, नवीन शिक्षण ही रसायनं वाढवतात. पण जर का हे प्रयत्न असफल झाले, तर बेचैनी/ औदासीन्याचा आजार सुरू होतो. मागच्या दोन लेखांमध्ये मिळून आपण आपल्यातल्याच काही माणसांच्या गोष्टींमधून मनाच्या ६ तऱ्हांचा वेध घेतला आहेच. या लेखात त्यापुढच्या ३ तऱ्हा –
शरीरांतरण, अधोगती, आत्मसातीकरण –

गेली १२ वर्षं साहेबांचं अगदी ‘कुठचंही’ काम फरश्यानं केलं होतं. बहाद्दूरला विसरून साहेब म्हणूनच तर फरश्यापाठी उभे राहिले. नाहीतर त्याचं कुटुंब व्यवस्थित जगू तरी शकलं असतं का? पण आताशा धाकदपटशा मोजूनमापून करायला लागत होता. टीव्ही नि वृत्तपत्रांच्या नजरेबाहेर असणं महत्वाचं होतं. ‘‘साहेबांनी आयुष्यभर तुला वापरला रे, फरश्या!’’ म्हणणाऱ्या मित्रांना पूर्वी जमेस धरायचा नाही तो. पण या कुळकण्र्याच्या बाबतीत सगळं आक्रीतच घडत होतं. ‘हा साधा मानूस नव्हता, बरीच लोकं मानतात त्यानला, हे सांगायला पाहिजे होतं साहेबांनी. वाटलं होतं, घाबरेल एखादा वार केल्यावर!… ’ फरश्याच्या डोक्यात विचारांची गर्दी झाली. साहेब फोन का उचलत नाहीत, या विचारानं त्याला बेजार के लं होतं. आज नाही म्हटलं तरी दीड महिना झाला होता, पण विरोधी पक्षवाले आणि पेपरवाल्यांनी हा मामला पेटता ठेवला होता. उत्तर प्रदेशच्या आझमगढ जिल्ह््यात एका शेतातल्या अनोळखी घरात फरश्या एकटा पडला होता. कमालीचा उन्हाळा, जेमतेम जेवण, बोलायला कोणी नाही, ना घरच्यांशी संबंध, ना साहेबांशी! तसा सकाळी एक भैय्या दारूची बाटली, कोणालाही फोन न करण्याची तंबी आणि शर्टाखालचा घोडा मिरवायला यायचा! नको-नको ते विचार भेजाचं दही बनवत होते. जुने मित्र, बायकोचा वाट पाहाणारा चेहरा, मुलांचा वावर, कुळकण्र्याचा रक्तानं माखलेला चेहरा, साहेबांचा बेरका स्वभाव, बहाद्दूरचं अचानक लुप्त होणं… अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. खंजिर खुपसल्यासारखं. आतडं पिळवटून दरदरून घाम फुटला, श्वास चढला. तोंडातून एक शब्दही फुटेना. डोकं भन्नाट गरगरायला लागलं. जीभ टाळूला चिकटून राहिली. दहा-दहा जणांना भारी पडणारा फरश्या आज छोट्या मुलासारखा आक्रसला होता.

आतून-बाहेरून माणूस सारखाच, पण वेगळा ठरतो तो त्याच्या क्षमतांनी नि त्याच्या अनुभवांनी. तारुण्यातली रग नि बेडर वृत्ती कित्येक ‘फरश्या’ घडवते. अशा फरशांचे पोशिंदे स्वत:च्या जरुरीप्रमाणे त्यांचा वापर करतात. वापरणारा आणि वापरला जाणारा, दोघांनाही हे माहीत असतं. तात्पुरत्या विश्वासावर नि इमानावर बेतलेली ही नाती परिस्थितीचा हात धरत चालत, बदलत असतात. अशा वेळी नियतीचा कौल बहुदा अशा फरशांच्या विरुध्दच जातो. बहाद्दूरचं लुप्त होणं, साहेबांची, एकटेपणाची वाढती भीती, मित्रांचे टोमणे, ढळणारा विश्वास (दुसºयांच्या विचारांचं आत्मसातीकरण) यांतून वाढणारी बेचैनी, विचारांचं तांडव! अनंत विचारांच्या थैमानानं डोकं गरगरणं, साहेबांवरच्या ढळलेल्या विश्वासानं पाठीत खंजीर खुपसला गेल्याची भावना आणि शरीरांतरणानं सुरू झालेलं छातीतलं दुखणं. फरश्यात असंच काहीसं दिसतंय. एकटेपणाच्या जाणिवेनं दुबळ्या पडलेल्या फरश्याला आता मायेची गरज जाणवते आहे, एका लहान बाळाप्रमाणे!
विवेकीकरण, विस्थापन, छुपी विरोधात्मक प्रतिक्रिया –
‘काव्या घोष, वय ३०, ‘एमबीए फायनान्स’, मणिपाल विद्याापीठ, बेस्ट स्टुडंट अ‍ॅवॉर्ड- २०१०. ‘बी.ए. ऑनर्स’, झेविअर्स कॉलेज, कोलकाता विथ डिस्टिंक्शन, २०१०-२०१३ टाटा फायनान्स, २०१३-२०१५ ‘पीडब्ल्यूसी’, अविवाहित.’ – आपल्या ऑडी ए-८ मधून ‘कॅसा विओना’मध्ये शिरताना सुंदर राजनच्या मनात काव्याचा विचार होता. बायको मंद्रिकानं बंगळूरूची नोकरी घेतल्यापासून एक वेगळीच मोकळीक अनुभवत होता तो. रात्री उशिरापर्यंत काम, मग ‘बाँबे जिम’ला ड्रिंक्स आणि जेवण. सकाळी जिम, ब्रेकफास्ट आणि १० वाजेपर्यंत ऑफिस. आता लिफ्टमधून जातानासुद्धा काव्या घोषचा ‘सीव्ही’च त्याच्या मनात घोळत होता. ‘फोटोत तरी ‘शी वॉज लुकिं ग लाईक अ वूमन ऑफ सबस्टन्स!’ त्यानं प्रमाणपत्र देऊन टाकलं. आंघोळ करून बातम्या ऐकताना ‘काव्या घोष, अनमॅरिड’ हे शब्द त्याच्या मनात घोंघावत होते. पुन्हा त्याच्या विचारांनी वेग घेतला, ‘हुशार असणार पोरगी! वय ३० वर्षं. लग्न का नसेल केलं? कसलीच बंधनं नको असतात आजकाल या मुलींना! ‘करिअर एके करिअर’ करता करता नैसर्गिक गरजा तर पूर्ण करतात, पण जबाबदाऱ्यांपासून सतत दूरच राहातात. मंद्रिकाला तरी काय गरज होती बंगळूरुला जायची?… कामाचं श्रेय घेण्यासाठी किंवा आपल्या मनासारख्या गोष्टी घडवून आणण्यासाठी पुरुषार्थालादेखील मान खाली घालायला भाग पाडणाऱ्या या नवविचारी तरुणी, अपयश झाकण्यासाठी मात्र त्यांचं ‘स्त्रीत्व’ असं काही बेमालूम वापरतात की त्याला तोड नाही!…’ त्याच्या मनातले विचार आता काव्याकडून एकू णच स्त्रीवर्गाकडे वळले होते. आणि म्हणूनच असे कित्येक ओघळणारे अश्रू, ढळणारे पदर नि ‘त्या’ पाच दिवसांआधीची व्यथा त्यानं आपल्या ऑफिसात येऊच दिली नव्हती. सुंदरचे हे स्त्रीविषयक विचार आणि कामाच्या नियमावल्या इंडस्ट्रीत सर्वांनाच माहीत होत्या. म्हणून या कंपनीत गेल्या ८ वर्षांपासून एकाही स्त्रीनं कामासाठी प्रस्तावच टाकला नव्हता. मात्र आता अचानक काव्या घोष सामोरी आली होती…
रात्री गादीवर पडल्यावर त्याच्या दिवसभराच्या थकलेल्या शरीरातसुद्धा अचानक चैतन्य पसरल्यासारखं झालं. कूस बदलताना त्याच्या लक्षात आलं, मंद्रिकाला फोन करायचा राहिला. मनाच्या नव्या अवतारात फार काळ ही चूक किंवा तिचे परिणाम तगलेच नाहीत. एका अनावृत्त लाटेवर ते के व्हाच आरूढ झालं होतं! आसक्ती कल्पना, समाजभान यांच्या मर्यादा ओलांडून ते बेहोश झालं होतं. उत्कंठेच्या उंबरठ्यावर स्त्री-पुरूषांतील उपजत आकर्षण काल्पनिक बाहूपाशांत बंदिस्त झालं होतं आणि सुंदरला खडबडून जाग आली. काव्या घोषचा चेहरा त्याच्या जाणिवेपलिकडे सुप्त मनात विरघळत गेला. सकाळी नाश्ता करतानाच त्यानं मंद्रिकाला वॉइस मेसेज टाकला, ‘मिस्ड यू डार्लिंग!’ काव्या घोषचा इंटरव्ह््यू नंतर कधीच झाला नाही. ‘सीव्ही’वर शेरा होता, ‘टू फ्रीक्वेटं चेंजेस इन जॉब्ज डझ नॉट ऑकर वेल फॉर द सिन्सिअरिटी ऑफ द अप्लिकंट!’.

कामाच्या जागी पुरुषी साधक आक्रमकता, शिवराळ भाषा नि बऱ्याच वेळा दारूधुंद पुरुषसुलभ वागणं ‘ज्या सहजतेनं’ स्वीकारलं जातं, तितक्याच तिटकाऱ्यानं ‘स्त्रीसुलभ’ वागण्याकडे पाहिलं जातं. कामाच्या जागी व्यावसायिकता आणण्यासाठी या दोन्ही ‘भिन्नतांना’ दूर ठेवणं जमलं पाहिजे, स्त्रियांना नाही. पण पुरुषप्रधान चष्म्यातून हे असं दिसत नसावं कदाचित. म्हणून अशा चष्म्यातून स्त्रियांना ‘त्या’ दिवसांत देवापासून, गाभाऱ्यापासून, आणि कुठल्याही कारणानं कामाच्या जागेपासून किंवा बढतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. सुंदर राजनही पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रातिनिधिक स्त्रीविरोधी विचारांची गुंफण करतो आहे.

स्त्रीविषयीच्या स्वत:च्या सुप्त आकर्षणाला सुंदर राजन रोखू शकत नाही. लैंगिकतेची अभिव्यक्ती तो पत्नीच्या प्रेमात रूपांतरित करतो आणि तिला ‘वॉईस मेसेज’ करतोे. काव्या नि तिच्याबद्दलच्या आकर्षणाला दूर ठेवण्यासाठी विरोधात्मक प्रतिक्रिया पण काय शोधली पाहा पठ्ठ्यानं!

बौद्धिकीकरण, दडपणं, विरोधाभासी पूर्ववतीकरण, कोशीकरण
बुऱ्हानच्या मृत्यूची बातमी वाचली आणि भूतकाळ जागा झाला. त्याचे बाबा आणि आमच्या बाबांचा संबंध त्यांच्या शाळेतला. विज्ञानाची पदवी घेऊन शिकवण्याच्या विचारानं भारावून त्याचे बाबा काश्मीरला आले होते. शास्त्राच्या प्रेमानं त्यांना आणि बाबांना जोडलं होतं. निसर्गानं दिलदारपणे उधळलेलं सौंदर्य, खान अब्दुल गफार खानांची भारताशी जुळलेली नाळ, युद्धानंतर जनमनात आलेली निर्धास्तता आणि हिंदी चित्रपट व प्रवासी यांमुळे मिळणारा रोजगार. सगळंच आलबेल. पुढे आणीबाणी, त्यानंतरचं सरकार, पुन्हा ‘काश्मीर की बेटी इंदिरा’, फारूख साहेबांबरोबरचे त्यांचे ‘बिगडते रिश्ते’. कुठल्याही विषयावर शिक्षक कक्षेत जोरदार चर्चा होऊ शकत होती. काश्मिरीयत जिंदा थी तब. पण हे सगळं वरवरचं होतं? वेशीपलीकडनं जखम घेऊन येणाºयांत आपली मुलंही सामील झाली आहेत, याची कोणालाच कल्पना नव्हती? हळूहळू काश्मीर अशांत झालं. धगधगत, धुमसत राहिलं. आणि बाबांना एका मध्यरात्री तडकाफडकी काश्मीर सोडायला लागलं. शाळेतूनच निरोप आला, नेसत्या कपड्यांनी गाव सोडा. मजल दरमजल करत आम्ही दिल्लीत पोहोचलो तेव्हा काही दिवसांसाठी वाटलेली ही ताटातूट आयुष्यभरची होती. दिवसा क्लासमधली नोकरी, संध्याकाळी ‘सायन्स’ मासिकासाठी ‘प्रूफरीडिंग’, रात्री गरीब मुलांसाठी शिकवण्या करत बाबांनी घाव भरायचा प्रयत्न केला. दोघा मुलांचं शिक्षण पूर्ण झालं, नोकऱ्या लागल्या, लग्नं झाली, मुलं झाली. बाबा रममाण होऊन तासन्तास गोष्टी सांगायचे आमच्या मुलांना. पण त्यातली एकही ‘त्या’ मध्यरात्रीची नसायची. आम्ही सगळ्यांनीच ती रात्र आठवणीतनं पुसून टाकली होती. कधी ते एकटेच बसायचे गॅलरीत उत्तरेला पाहात. एका अतृप्त इच्छेची वाट पाहात, पुटपुटायचे,
‘‘अगर फिरदौस बर-रु-ए-जमी अस्त
हमीं अस्त ओ हमीं अस्त ओ हमीं अस्त !’’
माणसाला सुखी राहाण्यासाठी पर्याय आवश्यक असतात. विस्थापित होणं किती दु:खद असेल? ती काश्मीर सोडण्याची आठवण ‘दडपली’ सगळ्यांनी. तिथल्या चांगल्या आठवणीत गुरफटवून स्थिती
जितकी पूर्ववत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न अख्खं कुटुंब करतंय. आपल्या शिकवायच्या आवडीनं प्राथमिक गरजा पूर्ण केल्यानंतर गरजूंना शिकवून आपल्याच सुखाच्या शोधात बाबा रमले आहेत. झाल्या परिस्थितीला कोणा व्यक्तीला, पंथाला किंवा धर्माला दोष न देता ते बदलती सामाजिक परिस्थिती समजू न शकलेल्या नेतृत्वाला दोष देतात. काश्मिरीयतवरचा त्यांचा विश्वास अढळच आहे. त्याच शोधात आठवणींच्या ‘कोषात’ जाऊन नियतीनं केलेल्या ताटातुटीला खिजवत, बाबा हवं तेव्हा काश्मीरला जाऊन येतात!

नेहमीच्या वापरातल्या मनाच्या विविध तऱ्हा मानसशास्त्राच्या चष्म्यातून पाहायचा हा छोटासा प्रयत्न! एरवी थोडा क्लिष्ट असा विषय जितका सोपा करणं माझ्या लेखणीला जमलं/ झेपलं तेवढं तुमच्यासमोर आहे. या तºहा बऱ्याच वेळा त्यांच्या व्याख्यांचे निर्बंध मानत नाहीत नि एकमेकांत विलीनही होतात. मेंदूमनाच्या कार्यपद्धतींचे व्यवहारातले अनुभव या तऱ्हांत दिसतात नि ‘असा मी कसा मी?, कसा मी असामी?, कसा मी कसा मी?, असा मी, असामी’ याचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण होते.
dr.deshpande.ashish@gmail.com