News Flash

बँकवाली बाई!

महिलांनी अर्थसाक्षर व्हावं, हा एकच ध्यास लखमी यांना आहे आणि त्यासाठी त्या जिवाचं रान करत असतात.

(संग्रहित छायाचित्र)

स्वाती केतकर-पंडित

आसाममधील ‘कोनोकलता महिला सहकारी बँक’ हे स्त्रियांना अर्थसाक्षर करण्याच्या दृष्टीने टाकलेलं  एक पाऊल होतं.  ज्यांच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फारच दूरची गोष्ट होती. रोजच्या जगण्यासाठी मरमर कराव्या लागणाऱ्या त्या स्त्रियांना हवं होतं कर्ज. नवऱ्याच्या छळातून सुटका करण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी. पण ते मिळवणं कठीण होतं, कारण शिक्षणाचा अभाव. अशा असंख्य स्त्रियांसाठी बँक उघडून त्याचे व्यवहार शिकवणाऱ्या, अनेक स्त्रियांना कर्ज देऊन त्यांना पायावर उभ्या करणाऱ्या लखिमी बरुआ यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्याविषयी..

आज अनेक स्त्रिया अर्थसाक्षर झाल्या असल्या, निदान बँके त स्वत:चं खातं उघडण्याइतपत व्यवहार कळू लागलेला असला, तरी  ग्रामीण भागात अनेक स्त्रिया अर्थनिरक्षरच आहेत. शिक्षणाचा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यात भर म्हणजे पैशांची टंचाई, अशा गोष्टींना तोंड देत जगणाऱ्या गरजू स्त्रियांसाठी त्यांच्या अडचणीच्या वेळी भांडवल, पैसे उभे करून देणारी बँक स्थापन करण्याचं धाडस दाखवलं आसामच्या लखमी (लखिमी)  बरुआ यांनी.

त्यांनी केवळ ही बँक उभी केली असं नव्हे, तर ती उत्तमरीत्या चालवूनही दाखवली. आज आसाममधल्या हजारो स्त्रियांसाठी लखमी बरुआ यांची ‘कोनोकलता महिला सहकारी बँक’ अर्थसाक्षरतेच्या दिशेनं पहिलं पाऊल आणि भक्कम आधार ठरली आहे. लखमी यांना त्यांच्या याच कार्यासाठी नुकताच भारत सरकारकडून दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

आसाममधल्या गोलहाट या ठिकाणी १९४९ मध्ये लखमी बरुआ यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांनी अनेकींना कठीण आर्थिक स्थितीचा सामना करताना पाहिलं होतं. जोरहाट बहोना महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर १९७३ मध्ये लखमी यांचा विवाह झाला. त्या तेथील जिल्हा मध्यवर्ती बँके त काम करू लागल्या. त्यावेळी त्यांना एक दृश्य कायम दिसायचं, ते म्हणजे तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या अशिक्षित बायाबापडय़ा. बँके नं आपल्याला कर्ज द्यावं या एकाच हेतूनं त्या रांगेत उभ्या असायच्या. आपला नंबर कधी येईल, या प्रतीक्षेत असलेल्या त्यांचा नंबर जेव्हा लागायचा तेव्हा मात्र काहीच क्षणांत त्यांना रांगेबाहेर जावं लागे, कारण बहुतेक वेळा कर्ज देण्यासाठी बँकेला अपेक्षित असलेल्या आवश्यक कागदपत्रांची त्यांच्याकडे वानवा असायची. कोणती कागदपत्रं लागतात हेसुद्धा त्यांना माहीत नसायचं. या सगळ्या जणी बहुतकरून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आणि मुख्य म्हणजे अशिक्षित असत. हे चित्र लखमी यांना निराश करत असे. बँकेची कामं करता करता या स्त्रियांच्या व्यथाही लखमी ऐकून घेत असत. कुणाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या संसारातून सुटका हवी असे, तर कु णाला मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे असत. यांच्यासाठी काही तरी करायला हवं, हा विचार लखमी यांच्या मनात कायम येत असे. तो पहिल्यांदा मूर्त स्वरूपात उतरला, १९८३ मध्ये. बँके चे व्यवहार, कर्ज, अर्थसहाय्य मिळवणं सुलभ व्हावं यासाठी लखमी यांनी महिला समितीची स्थापना केली. ही महिला समिती स्त्रियांना बँके चे व्यवहार समजावून सांगत असे. या समितीत काम करत असताना स्त्रियाचं जगणं खोलवर अनुभवलेल्या लखमी यांना या स्त्रियांच्या मनात रुतलेल्या भीतीचं, आर्थिक असुरक्षिततेचं कारण समजू लागलं. अनेक जणींचं हातावर पोट असे. अनेकींचे नवरे त्यांचा सगळा पगार हिसकावून घेत. सरतेशेवटी या स्त्रियांच्या हाती काहीच राहात नसे. कायम निराशा, दु:ख आणि टंचाईचा अनुभव लखमींना अस्वस्थ करे.

या स्त्रियांसाठी काही करायचं तर खास त्यांच्या गरजांसाठी, अडचणींसाठी उभी राहिलेली बँक आपणच का सुरू करू नये, या विचारानं लखमी यांच्या मनात उचल खाल्ली. स्त्रियांनी, स्त्रियांसाठी आणि स्त्रियांची अशी बँक उभारणं हे अत्यंत कठीण काम होतं. पण लखमी बरुआ यांनी हार मानली नाही. या प्रवासात पतीचा भक्कम आधार असल्यानं त्यांची वाट अधिक सुकर झाली. १९९० मध्ये त्यांनी ५२ प्रमोटर सदस्यांसह ‘कोनोकलता महिला सहकारी बँके ’ची स्थापना केली. कोनोकलता बरुआ या १७ वर्षांच्या मुलीनं भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात मोलाची कामगिरी बजावली होती. त्या कोनोकलतेचं स्मरण म्हणून त्यांच्या पतीनं सुचवलेलं तिचं नाव बँके ला दिलं गेलं.  या बँकेचा प्राथमिक उद्देश व्यावसायिकरीत्या बँकिंग सुविधा पुरवणं आणि स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करणं हा होता. दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे स्त्रियांना बँके ची, सुयोग्य आर्थिक व्यवहारांची सवय लावणं. पण बँके ची नोंदणी होणं, हेच अत्यंत कठीण होतं. त्यासाठी लखमी यांना तब्बल ८ वर्ष वाट पाहावी लागली. हा काळ खरोखरच परीक्षा पाहाणारा होता. नोंदणीसाठी किमान एक हजार सदस्य आणि ८ लाख रुपयांचं भांडवल या अटी होत्या, ज्या पूर्ण करणं लखमी आणि सहकाऱ्यांना अतिशय कठीण जात होतं. लखमी यांनी आशा सोडली नव्हती. अशातच काही गृहिणी ‘कोनोकलता सहकारी बँके ’चे समभाग घेण्यासाठी पुढे आल्या. हे आनंददायी तर होतंच, पण प्रोत्साहनपरही होतं. सरतेशेवटी २२ मे १९९८ रोजी ‘आसाम सहकारी बँक १९४९’च्या कायद्याअंतर्गत बँके ची नोंदणी झाली. यानंतर पुढची लढाई होती, परवानापत्र मिळण्याची. लखमी यांनी रिझव्‍‌र्ह बँके च्या मुंबई आणि गुवाहाटी कार्यालयाशी सततचा पत्रव्यवहार ठेवला होता. त्यांचा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नोंदणीच्या तुलनेत परवाना मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली.

१६ फेब्रुवारी २००० मध्ये बँकेला व्यावसायिक बँकिंग करण्याचा परवाना मिळाला. त्यांना बँकेचा पहिला दिवस आठवतो. एकूण फक्त १७ खाती उघडलेली होती. यानंतर बँकेला ‘नॉर्थ ईस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन’, ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’ आणि ‘राष्ट्रीय महिला कोष’ यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळालं. २००२ मध्ये बँकेची पहिली शाखा उघडली गेली.

बँके ची सुरुवात झाली होती केवळ  ६ कर्मचाऱ्यांसह. आज कर्मचारी आणि बँकेतील खाती यांची संख्या बरीच वाढली आहे. तळागाळातल्या अनेक जणींना लखमी यांच्या ‘कोनोकलता सहकारी बँके’नं पडत्या काळात हात दिला आहे. अनेक स्त्रिया आता आपल्या पायांवर उभ्या आहेत. पण लखमी यांचा उत्साह कमी झालेला नाही. बँके च्या कामात त्या जातीनं लक्ष घालतात. जेवढं शक्य होईल तसं अधिकाधिक स्त्रियांपर्यंत, गावगाडय़ापर्यंत, महिला गटांपर्यंत बँके च्या व्यवहारांची माहिती पोहोचवता येईल, यासाठी प्रयत्न करतात.

महिलांनी अर्थसाक्षर व्हावं, हा एकच ध्यास लखमी यांना आहे आणि त्यासाठी त्या जिवाचं रान करत असतात. त्यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार ही त्याचीच पावती आहे.

swati.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:35 am

Web Title: article on lakhimi barua who has given loans to many women to support them abn 97
Next Stories
1 फॅशन डिझायनर आजी
2 ‘स्व’रांशी मैत्री
3 काठिण्यातील सहजता
Just Now!
X