एका मराठमोळ्या, सनातनी विचारांच्या घरातील स्त्रीनं फ्रेंच राज्यक्रांतीविषयीची चित्रं काढावीत, तीही ८० वर्षांपूर्वी. ही गोष्ट वाटते तितकी सहज-सोपी नाही. एका बहुआयामी घटनेचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून साकारणे, ही आव्हानात्मक जबाबदारी होती. ती पार पाडणाऱ्या दिवंगत शकुंतला राजवाडे-आठवले यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत, त्यांची स्नुषा शैला मुकुंद यांनी, फ्रेंच राज्यक्रांतीला २२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने.
माझ्या सासूबाई, शकुंतला राजवाडे-आठवले, यांना जाऊन आता वीस वर्षे होऊन गेली आहेत. तरी कुठल्या ना कुठल्या संदर्भात त्यांची रोजच आठवण येत असते. घटना, प्रसंग तर अनेक आहेत. तरी घरातल्या लहान लहान वस्तू, आमच्यासाठी त्यांनी विणलेले स्वेटर्स, हौसेने घरासाठी शिवलेले पडदे, माझ्या क्रोकरीतील त्यांनी जपून वापरलेला उत्तम काचेचा बाऊल, अशा गृहिणीच्या अनेक रूपात त्या भेटत असतात हे खरं. परंतु आज मी त्यांना आठवतेय एक चित्रकार म्हणून, कलावंत म्हणून.
फ्रेंच राज्यक्रांतीला २२५ वर्षे पूर्ण झाल्याची बातमी वाचली, चर्चा ऐकल्या आणि १९३४-३५च्या सुमाराला शकुंतलाबाईंनी याच राज्यक्रांतीवर काढलेल्या १०३ चित्रांची आठवण झाली. ज्या काळात ही चित्रनिर्मिती झाली, ती कशी झाली याचा आज विचार करताना खरोखरच आश्चर्य वाटतं.
‘सृष्टी’, पुणे, या संस्थेच्या आणि राजवाडे परिवाराच्या सहकार्यानं १९९५ साली, सासूबाईंच्या निधनानंतर, आम्ही आठवले कुटुंबानं पुन्हा याच चित्रांचं प्रदर्शन पुणे इथे बालगंधर्व कलादालनात आयोजित केलं होतं. त्या वेळी कित्येक महिने आमचं घर क्रांतिमय होऊन गेलं होतं. अनेकांची ऊठ-बस.. चर्चा.. ही चित्रं पाहण्यासाठी इतिहासकार कै. य. दि. फडके राजवाडय़ांच्या वाडय़ात येऊन गेले होते.
राज्यक्रांतीतल्या व्यक्ती, मग नेपोलियन असो किंवा व्होल्तेअर, रूसोसारखे विचारवंत, प्रसिद्ध मुत्सद्दी मादाम रोलाँ, राणी मारी आँत्वानेत (जिनं ‘पाव परवडत नसेल तर केक खा’ असं लोकांना सांगितलं, असं म्हटलं जातं), वृत्तपत्र संपादक व लोकप्रिय नेता मिराबो. ही माणसं चित्रांमुळे आणि सततच्या चर्चामुळे जवळची वाटू लागली होती. सासूबाईंचा विषय तर अखंड आमच्या बोलण्यात असायचाच. या पद्धतीनं त्यांचं आमच्यात ‘असणं’सुद्धा खूप आनंददायी होतं. तीन दिवसांचं प्रदर्शन संपलं. घरातले पाहुणे निघून गेल्यानंतर घर जसं सुनंसुनं वाटतं तसं, काही महिन्यांसाठी आमच्या घरात राहायला आलेली ही मंडळी आमचं घर सुनंसुनं करून गेली. माझे सासरे भालचंद्र आठवले यांना हे सुनेपण भरून काढणं फार अवघड गेलं. काही वर्षांनंतर ते सहजच एकदा म्हणाले, ‘‘प्रदर्शनाच्या काळात काय तो मी पुन्हा भरभरून जगलो. बाकी दिवस उगवले आणि मावळले इतकंच’’.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा विचार देणाऱ्या या राज्यक्रांतीशी माझं असं वेगळ्या स्तरावरचं नातं आहे. अशा आठवणींच्या निमित्तानं तो काळ, व्यक्ती, घटना.. याचं नकळतपणे पुनरावलोकन होत असतं, तसं माझं झालं आहे. तुम्हा वाचकांशी हे सांगण्यासाठी तब्बल आठ दशकं मी तुम्हाला मागे घेऊन जाणार आहे.
८० वर्षांपूर्वीचं पुणं! पेन्शनरांचं पुणं! सनातनी पुणं! संगीत नाटकांना लोकाश्रय मिळाला असला तरी कलेला प्रोत्साहन देणारं तेव्हाचं पुणं नव्हतं. असे दोन पातळ्यांवर जगणारे तेव्हाचे पुणेकर! त्यांच्यापासून चित्रकला विषय कोसो दूर होता. आजही चित्रकलेविषयी पुष्कळ प्रमाणात अनास्था आहे. तर अशा त्या काळात, त्या सामाजिक वातावरणात अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांनी आपली मुलगी शकुंतला, माझ्या सासूबाई, यांना फ्रेंच राज्यक्रांतीवर चित्र काढायला सांगितली. ही एक-दोन नव्हे तर तब्बल १०३ चित्रं होती. धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांवर ते भारतभर व्याख्यानं देत असत. संस्कृत, इंग्रजीबरोबरच फ्रेंच भाषा त्यांना उत्तम अवगत होती. सदाशिवपेठेतील आपल्या वाडय़ात ते ‘शारदीय ज्ञानसत्र’ भरवत असत. एका वर्षी अहिताग्नींनी ‘फ्रेंच राज्यक्रांती’ हा विषय व्याख्यानांसाठी निवडला. त्यांच्या संग्रही असलेल्या दुर्मीळ ग्रंथांमध्ये या राज्यक्रांतीवरचा फ्रेंच भाषेतील ग्रंथ होता. त्यामध्ये क्रांतीकाळातील व्यक्ती, बास्तीलचा तुरुंग, गिलोटीन यंत्र.. असे अनेक फोटो तसंच चित्रं होती. व्याख्यानाला या चित्रांची जोड द्यावी ही कल्पना अहिताग्नींची. आजच्या परिभाषेत ते ऑडियो-व्हिज्युअल माध्यम होतं. त्याचा विचारपूर्वक उपयोग त्यांनी केला हे इथं आवर्जून नमूद करावंसं वाटतं.
शकुंतलाबाईंनी २६ /१९ इंच चौकटीची ९९ तर ४ यांच्या दुप्पट आकाराची चित्रं फक्त पेन्सिलीनं काढलेली आहेत. संपूर्ण व्याख्यानमालेच्या काळात शिसवी लाकडाच्या फ्रेममधील ही कृष्णधवल चित्रं व्याख्यानाच्या चौकात मांडलेली होती. एका मुलीनं काढलेल्या या प्रतिकृती बघायला विविध ठिकाणांहून, अगदी पुण्याबाहेरूनही पुरुषांबरोबर स्त्रियाही आल्या होत्या हे विशेष. यांमध्ये काही संस्थानिक होते, तर काही इंग्रज लोकही होते. सर्वानाच शकुंतलाबाईंचं खूप कौतुक वाटलं होतं.
चित्रांच्या निमित्तानं काही प्रश्नांची उत्तरं आजही मी शोधते आहे. अतिशय कर्मठ, सनातनी विचारांच्या अहिताग्नींनी (त्यांनी अग्निहोत्र घेतलं होतं) मुलींना शिक्षण आणि कला दोन्हींसाठी प्रोत्साहन दिलं होतं. शकुंतलाबाईंच्या संदर्भात तर आपल्या मुलीमधला चित्रकार त्यांनी ओळखलाच, पण या चित्रकाराला प्रकाशातही आणलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही दोन टोकं.
एका बाजूला कर्मठ सनातनीपण तर दुसऱ्या बाजूला त्यांच्यातला सुधारक पिता, रसिक पिता. या दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची संगती कशी लावायची हे आजपर्यंत मला न उलगडलेलं कोडं आहे. दुसरं आश्चर्य वाटतं ते हे, की शकुंतलाबाईंनी कॉलेजमध्ये शिकत असताना ही चित्रं काढली, वय अवघं १९-२० वर्षांचं. चित्रकलेविषयीचं मार्गदर्शन तेव्हा फारसं उपलब्ध नव्हतं. अशा परिस्थितीत शकुंतलाबाईंना आपली पाऊलवाट आपणच शोधायची होती. राज्यक्रांतीसारखा विषय, वडिलांच्या नावाचा प्रचंड दबदबा, अभ्यास सांभाळून अवघ्या दीड वर्षांत व्याख्यानाची तारीख गाठणं, चित्रं पुरी करणं.. हे शिवधनुष्य त्यांनी कसं पेललं असेल?
चित्रातली प्रत्येक व्यक्ती त्याच्या व्यक्तिमत्त्वासह उमटणं ही व्याख्यानाची मोठी मागणी होती. आमच्या प्रदर्शनाच्या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर म्हणाले होते, ‘‘या प्रतिकृती असल्या तरी प्रतिकृतीच्या पलीकडे चित्रकाराला विचार करावा लागतो. तो त्यांनी केलेला दिसतो आहे. त्याचा विचार, कल्पकता हे त्या चित्रकाराचं योगदान असतं.’’ १९-२० वयाच्या शकुंतलाबाईंनी तेव्हा काय विचार केला असेल? माहीत नाही. पण प्रत्येक व्यक्तीची वेशभूषा, केशभूषा, केसांचे टोप, त्यासाठी वापरलेलं शेडिंग, डोळ्यातले भाव, चेहऱ्यावरच्या पुसट रेषा (ज्यातून त्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज येतो). हे सारं अतिसूक्ष्म रेषांच्या साहाय्यानं तपशिलात रेखाटलेलं आहे. ज्यातून या व्यक्ती सजीवपणे उभ्या राहतात.
‘रिपब्लिक ऑफ फ्रान्स’ या एकाच चित्राचे उदाहरण पुरेसं बोलकं आहे. या चित्रात रचना, मांडणी, त्रिमिती भास, अश्वांची गती, रथांच्या चाकाखाली पडलेल्या उघडय़ा शरीराचे, दुमडलेल्या हाताच्या स्नायूंचे सुरेख चित्रण साधले आहे. चित्रकाराच्या विचाराशिवाय हे कसं शक्य होतं? आणि तरीही राज्यक्रांतीतलं अखेरचं चित्र काढून शकुंतलाबाईंनी ‘पेन्सिल मोडली’. ‘मला चित्रकलेचं अजीर्ण झालं आहे’ असं म्हणून पुन्हा कधीही चित्रं काढली नाहीत. आपल्या हातून एवढं मोठं काम झाल्याचा पुसटसा उल्लेखही त्यांच्या बोलण्यात नसायचा. अबोल, शांत स्वभावाच्या होत्या तसंच प्रसिद्धीचा मोहही नव्हता. आठवल्यांच्या घरात पोषक वातावरण असूनही चित्रकलेपासून त्या सहजपणे अलिप्त झाल्या. तो त्यांचा स्वत:चा निर्णय होता. याच स्वभावामुळे असेल, घरीदारी अनेकांना मदत करूनही,  त्याचं ‘श्रेय’ स्वीकारताना नेहमीच मागच्या पायरीवर उभ्या राहिल्या. आपणहून. कविवर्य सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे – ‘गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’
हे एका वेगळ्या अर्थानं त्यांच्या बाबतीत खरं आहे.
म्हणूनच त्यांच्या पश्चात भरवलेल्या प्रदर्शनात बोलताना मी शकुंतलाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला रुचेल, पटेल, एवढाच माफक उल्लेख त्यांच्या नावाचा केला होता. आज हे सारं लिहीत असताना माझ्या मनात असाही विचार येतो आहे की, समजा आज त्या असत्या तर त्यांच्या विषयीचं जाहीर लेखन त्यांना आवडलं असतं का? याचं उत्तर ‘नाही’ असंच आहे. मग मी का लिहिते आहे? तर अशा अनेक अनाम आदर्श स्त्रियांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून – त्यात माझी आईसुद्धा आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…