संपदा वागळे waglesampada@gmail.com

काळाप्रमाणे कु टुंबं लहान झाली आणि वेगवेगळ्या कारणांनी माणसं माणसांपासून शरीरानं आणि अनेकदा मनानंही दूर झाली. असं म्हणतानाच काही कु टुंबांच्या घरांच्या भिंती मात्र रक्ताच्या नात्यांबरोबरच नात्याच्या नसलेल्या व्यक्तींनाही सामावून घेण्यापर्यंत विस्तारल्या. कधी गरजेनं, तर कधी विचित्र परिस्थितीनं या माणसांना एकत्र आणलं. कारण कोणतंही असो, पण नंतर मात्र त्यांच्यात जो स्नेह निर्माण झाला तो कायम टिकला आणि आगळी कुटुंबं तयार झाली. माणुसकीनं सांधलेल्या या कुटुंबांविषयी आजच्या जागतिक कुटुंब दिनाच्या (१५ मे) निमित्तानं..

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

आज जी माणसं साठ -सत्तर-ऐंशीच्या घरात आहेत त्यांना आठवत असेल, की त्यांच्या लहानपणी अनेक घरांमध्ये एखादा शिकणारा गरजू विद्यार्थी किंवा लांबच्या नात्यातील कुणी निराधार बाई सामावलेली असे. जर शहरात घर असेल तर उपचारासाठी कोणी गाववाला हक्कानं मुक्कामाला येई. समजा, चुकून काही दिवस कुटुंबाबाहेरचं कोणी नसेल, तर घरातल्यांनाही चुकचुकल्यासारखे होई, इतकं  ते नियमित असायचं. इथे घर लहान की मोठं हा प्रश्न नव्हताच. मनं मोठी होती हे महत्त्वाचं!

आपण आपल्यापुरतं जगायचं नाही, हा संस्कार घरोघरी होता.

गावाकडे किंवा कोकणात ही संस्कृती आजही दिसते. कदाचित म्हणूनच तिथे फारसे वृद्धाश्रम आढळत नाहीत. दाराची बेल वाजल्यावर हातातलं ताट घेऊन आत पळणाऱ्या आजच्या शहरी पिढीला मात्र आपल्याच माणसांचं अजीर्ण होताना दिसतंय. ‘मी व माझे’ हे हल्लीचं व्यक्तिकेंद्री जग करोनानं तर अधिकच संकुचित करून टाकलंय. रवींद्रनाथ टागोर यांची एक कविता आहे, ‘अस्तमानाला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं, मी अस्ताला गेल्यावर जो अंधकार होईल तो कोण दूर करेल?’  यावर कोठूनही प्रतिसाद आला नाही. तेव्हा एक पणती धिटाईनं पुढे येऊन म्हणाली, ‘मी सगळा अंधार दूर करू शकणार नाही, पण मी तेवत राहीन. प्रकाशानं अंधार भेदला जातो यावरचा लोकांचा विश्वास जागता ठेवीन.’ या पणतीच्या निष्ठेनं आपल्या कुटुंबाचा परीघ विस्तारत माणुसकीची बेटं फुलवणारी काही कुटुंबं आजही दिसतात. त्यातील काहींचा हा  परिचय आजच्या जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने.

गरजू विद्यार्थ्यांना घरकामासह शिक्षण करण्याचा पर्याय देऊन घरी ठेवून घेणारे बरेच असतात, पण त्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडवणारे थोडेच! शिवाय अशी संधी मिळाल्यावर त्या उपकारकर्त्यांचा आदर्श समोर ठेवून समाजासाठी योगदान देणारे तर त्याहूनही दुर्मीळ. औरंगाबादचे भाऊ पठाडे हे त्यापैकी एक. लहान असताना गावात शेजारी राहाणाऱ्या बुवा दाम्पत्यानं त्यांना आधार दिला आणि शिक्षणाची गोडी लावली. पुढे घारपुरे पतीपत्नी या सुविद्य जोडप्यानं त्यांच्या जीवनाला आकार दिला.

२२ ऑगस्ट १९७५ या दिवशी दुष्काळात होरपळून निघालेला, अल्प मोबदल्यात हॉटेलात राबवून घेतलेला, ‘सिडको’च्या बांधकामात मजूर ते मेस्त्री यापैकी पडेल ते काम केलेला आणि अनाथ विद्यार्थीगृहात राहून मॅट्रिक झालेला भाऊ ‘घरकामाच्या बदल्यात अन्न-वस्त्र-निवाऱ्यासह पुढील शिक्षण’ या बोलीवर औरंगाबादमधील उच्चभ्रू वस्तीतील घारपुऱ्यांच्या बंगल्यावर दाखल झाला.

डॉ. घारपुरे हे औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात औषधशास्त्र विभागाचे प्रमुख. (पुढे ते पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता झाले.) आणि जोत्स्ना घारपुरे अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवलेल्या समाजसेविका.

त्यांच्याकडे आल्यावर भाऊ प्रथमच गादी, उशी, मच्छरदाणी अशा थाटात झोपला. बनियन आणि स्लिपर्स या अप्रूप वाटाव्या अशा चिजाही पहिल्याच दिवशी खरेदी झाल्या. भाऊचं काम म्हणजे पहाटे ५ ला उठून केर-लादी करणं, कुत्र्याला फिरवणं, बाईंना स्वयंपाकघरात मदत इत्यादी. हळूहळू तो घारपुरे यांच्या बँकेची कामंही करू लागला. दोघांच्या मर्जीतला झाला. या जोडप्याला मूल नव्हतं. भाऊला त्यांनी आपला मानसपुत्र मानलं. डॉ. घारपुरे यांनी त्याचं इंग्रजी सुधारावं यासाठी बरीच मेहनत घेतली. त्यांची शिस्त, प्रामाणिकपणा, गोरगरिबांविषयी कळवळा यांचा ठसा भाऊच्या संस्कारक्षम मनावर उमटला. जोत्स्नाताई मोठमोठय़ा सामाजिक कार्यकर्त्यांकडे जाताना भाऊला बरोबर घेऊनच जात. या घरानं भाऊला घडवलं. ‘बी.कॉम.’ झाल्यावर भाऊला ‘स्टेट बँक ऑफ हैदराबाद’मध्ये नोकरी लागली. त्याचं लग्न झाल्यावरही तो पत्नीसह घारपुऱ्यांच्या आऊटहाऊसमध्येच राहात होता. साहेबांच्या शेवटच्या आजारपणात त्यानं महिनाभर रजा काढून साहेबांची सेवा केली. मात्र त्याआधी जेव्हा साहेबांनी मृत्युपत्र केलं, तेव्हा ‘मला तुम्ही समर्थपणे उभं केलंत, आता मला कसलीही अपेक्षा नाही’ असं त्यानं निक्षून सांगितलं. नोकरीतच पदोन्नती मिळत गेली आणि मे २०१९ मध्ये भाऊ अर्थात भाऊसाहेब पठाडे स्टेट बँकेतून शाखाधिकारी म्हणून निवृत्त झाले. आज सिडको- औरंगाबाद येथे त्यांचा स्वत:चा बंगला आहे. त्यांचा मुलगा बी.टेक. आणि ‘आयआयएम’ मधून एमबीए होऊन उच्च पदावर काम करतोय, तर मुलगी ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहे. बँकेत असल्यापासून भाऊसाहेब व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला जोडले गेले आहेत. औरंगाबादपासून २० किलोमीटरवरील त्यांच्या गावी त्यांनी जोत्स्नाताईंच्या नावे वाचनालय सुरू केलं आणि आता करोनाकाळात ते ‘डिजिटल’ही केलं. या वाचनालयात आठ हजार पुस्तकं आहेत. त्यांच्या हातून होणारी सत्र्कम ही ‘घारपुरे मायबापाची पुण्याई’ असं ते मानतात. घारपुरे कुटुंबियांच्या रुपानं एका एकाकी मुलाला मायेचं घर मिळालं.

घारपुरे कु टुंबीयांनी भाऊंना जाणिवपूर्वक घरी आणलं होतं, मात्र काही वेळा असंही होतं, की ध्यानीमनी नसतानाही एखादं वादळ येतं आणि त्या कुटुंबाचं समीकरण बदलून टाकतं. अशाच एका (सत्त्व)परीक्षेत ठाण्याचं वेदक कुटुंब तावून-सुलाखून झळाळून निघालंय. वैशाली आणि दिलीप वेदक या जोडप्याची प्रार्थना लग्नाला सात वर्ष उलटल्यावर फळाला आली आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं झाली.  मुलं मोठी होऊ लागली. वैशाली यांचा घरगुती केटरिंगचा व्यवसाय आहे, त्यातही जम बसू लागला अन् एक दिवस (८ डिसेंबर २०१४) ‘ती’ बातमी आली. दिलीप वेदक यांच्या चुलत भावाच्या पत्नीचं पहिल्या प्रसूतीच्या वेळी बाळाला जन्म दिल्यानंतर निधन झालं होतं. त्यानंतर पुढचे दहा दिवस ते बाळ- म्हणजे ती मुलगी अतिदक्षता विभागातच होती. सर्व जणांना धक्का बसला होता. ‘आता या तान्ह्य़ा बाळाला कोणी घरी न्यायचं? कसं सांभाळायचं?’ हा प्रश्न होता. जवळच्या सगळ्यांनी काही ना काही कारण सांगून असमर्थता दाखवली. त्या वेळी वैशालीच्या मनात आलं, ‘एके काळी आई होण्यासाठी मी झुरत होते. आता हे बाळ आईसाठी आसुसलंय. त्या जीवाची ही आर्त हाक मीच समजून घायला हवी..’ वैशालीच्या मनानं कौल दिला. पती आणि मुलांनी पाठिंबा दिला आणि भाग्यश्रीला (चिऊ) घराबरोबर आई, बाबा, दादा, ताई असं सगळंच मिळालं. निर्णय घेतला खरा, पण १४ दिवसांच्या ‘आईविना बाळाला’ सांभाळणं हे शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं. वेदक यांची मुलं तेव्हा सहावीत होती. त्यांची शाळा, प्रोजेक्ट्स, शिकवण्या, वैशालीचे डबे आणि तिचा तीव्र मधुमेह या आघाडय़ांवर तोल सावरत दिवस पळू लागले. यात चिऊच्या कोडकौतुकात कुठेही कमतरता नव्हती. सगळं घर तिच्याभोवतीच नाचत होतं.. नाचतंय. गेली दोन वर्ष तर पायाला झालेल्या अल्सरमुळे वैशाली व्हीलचेअरवर आहे. तरीही तिच्या रोजच्या दिनक्रमात आणि डबे करण्यात खंड पडलेला नाही. या काळात तिला मधूनमधून हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्या वेळी बाबा आणि मुलांनी चिऊसह घर व्यवस्थित सांभाळलं. चिऊ आता सहा वर्षांची झालीय. दादा-ताई शिकले त्या ठाण्यातील नामांकित शाळेत ती  शिकतेय. वेदकांच्या चौकोनी कुटुंबानं हा पाचवा कोन अतिशय प्रेमानं आपलासा केला आणि आता हाच कोन त्या कुटुंबाचा आत्मा झालाय.

चिऊला या घरानं कायमचं आपलंसं

के लंय, पण काहींच्या बाबतीत असंही होतं, की विद्यार्थी आणि त्याला आधार देणारे असे दोघेही आपापल्या गरजेपोटी एकत्र येतात. तो विद्यार्थी शिकून स्वत:च्या पायावर उभा राहीपर्यंत त्याला सांभाळणाऱ्यांची गरज संपलेली असते. साहजिकच नंतर दोघांचे मार्ग भिन्न होतात. परंतु कधी असंही घडतं की हे गुंफलेले धागे वेगळे होतच नाहीत. एकमेकांच्या सोबतीनं जगण्यातच त्यांना आनंद वाटतो. ठाण्यातील विजयकर कुटुंबाच्या बाबतीत हेच घडलं.

छाया विजयकर यांनी आपल्या वृद्ध, आजारी वडिलांच्या सोबतीसाठी गावाहून एका १४-१५ वर्षांच्या मुलाला- मधूला (मधुकर जोशी) आणलं, त्याला आता ३० वर्ष होऊन गेली. काही काळानंतर त्यांचे वडील गेले. मधूही १२ वीपर्यंत शिकून नोकरीला लागला. त्याचं लग्नही झालं. तरी तो आजही विजयकर कुटुंबाचा एक घटक होऊन राहिलाय. मधू एका खासगी कंपनीत कामाला आहे. कामाला जाताना रोज घरून पोळीभाजीचा डबा घेऊन जातो. त्याच्या राहाण्याखाण्याचे कसलेच पैसे विजयकर घेत नाहीत, नव्हे तसा विचारही त्यांच्या मनात आलेला नाही. उलट छायाताईंनी बँकेत नोकरी केल्यामुळे त्यांनी मधूला पैसे वाचवायची सवय लावलीय. पगार झाला की तो गावी बायकोमुलांना पैसे पाठवतो आणि उरलेले पैसे साठवून फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवतो. त्यानं नालासोपारा येथे स्वत:ची जागाही घेतलीय. त्यासाठी पैशांची मदत छायाताईंनीच केली. मात्र तो आजही त्यांची सोबत म्हणून त्यांच्याकडेच राहतो. मधू घरी आला तेव्हा विजयकरांचा मुलगा मंदार ५ वर्षांचा होता. तेव्हापासून त्यांची जी गट्टी जमली, ते प्रेम आजही आहे. मंदार आता नोकरीनिमित्त दुबईला आहे. मधूला घरासाठी दिलेले पैसे परत घ्यायचे नाहीत हे त्यानंच बजावलंय. या आपलेपणाला मधूही जागतो. त्याला छायाताईंच्या प्रेमाची जाणीव आहे. देवाला ठेवलेल्या नैवेद्याच्या पानातही त्याचा वाटा असतो हे त्याला माहीत आहे. याच जाणिवेतून छायाताईंच्या सासूबाई आल्या की त्यांची सेवा करायला हा पुढे असतो. छायाताईंनी मधूला ड्रायव्हिंगही शिकवलंय. छायाताई जे करतात त्याला त्यांच्या यजमानांचा नेहमीच मूक पाठिंबा असतो. आता टाळेबंदीच्या काळात विजयकर पतीपत्नीला मधूचा खूप आधार वाटला आणि मधूला त्यांचा! या आपलेपणाला गेल्या ३० वर्षांच्या सहवासाची ऊब आहे.

असंच एक कुटुंब स्वार्थाशिवाय एकत्र आलेलं. अंशिका ही भोपाळमध्ये राहाणारी एक संवेदनशील मुलगी. बारावीनंतर पॅथोलॉजीचा डिप्लोमा घेऊन १९ व्या वर्षीच तिनं रामकृष्ण आश्रमाच्या धर्मादाय रुग्णालयात विनामूल्य काम करायला सुरुवात केली. त्या मठाचे मठाधिपती स्वामी गवेंद्रानंद यांच्या सेवाभावी कार्यानं प्रभावित होऊन तिनं त्यांना गुरुस्थानी मानलं. आठ वर्षांचा अनुभव घेऊन हे काम सोडल्यावरही ती त्यांच्याशी संपर्क ठेवून होती. काही काळानंतर स्वामी गवेंद्रानंदही स्वत: उभा केलेला आश्रम रामकृष्ण मिशनच्या स्वाधीन करून नि:स्वार्थीपणे तिथून निघाले. उभं आयुष्य सेवेत गेल्यामुळे साठवलेला पैसा नव्हताच. लग्नही केलेलं नव्हतं. वयोमानानुसार शारीरिकदृष्टय़ाही ते कमजोर झाले होते. त्यांची परिस्थिती बिकट झाली होती. एव्हाना अंशिकाचं लग्न होऊन तिला मुलगा झाला होता. तिची स्वत:ची प्रयोगशाळाही सुरू झाली होती. मात्र संसाराच्या व्यापात गुरफटल्यावरही ती स्वामींची ख्यालीखुशाली विचारत होतीच. त्यांची परिस्थिती लक्षात आल्यावर तिनं त्यांना भोपाळपासून ७० किलोमीटर अंतरावरील बुधनी येथे- जिथे तिचे आई-वडील राहात होते तिथे भाडय़ानं जागा घेऊन दिली. जेवण व इतर कामासाठी एक मुलगी ठेवली आणि तिची दर रविवारी बुधनीला फेरी सुरूझाली.

सर्व मार्गी लागलं असं वाटत असतानाच २०१९ मध्ये अंशिकाला स्तनांच्या कर्क रोगाचं निदान झालं. तिच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया होऊन बाकी उपचार सुरू झाले. ही गोष्ट तिनं गुरूंपासून लपवली होती, पण त्यांना ती कळलीच. तेव्हापासून ते मनानं अतिशय खचले. खाणंपिणंही त्यांनी एकदम कमी केलं. हे कळताच अंशिकानं पतीच्या सहकार्यानं त्यांना मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती राहाते त्या इमारतीतच वरच्या मजल्यावरील चार खोल्यांचा प्लॅट भाडय़ानं घेतला. तेव्हापासून गेली दोन वर्ष स्वामी गवेंद्रानंद तिथे राहात आहेत. आज त्यांचं वय ८५ आहे. अंशिकाही कर्क -रोगातून आता पूर्ण बरी झाली आहे आणि ती त्यांचीच कृपा असं ती मानते. ती रोज सकाळी त्यांचे कपडे धुऊन, त्यांच्या ठाकूरची- कृष्णाची  पूजा करून, नैवेद्य दाखवून, त्यांना दूध-नाश्ता देऊन बाहेर पडते. तिचे यजमान मुकेश राठोड जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये मॅनेजर आहेत. मोठा मुलगा देवांशिक १२ वर्षांचा आहे, तर धाकटा देवांश ९ वर्षांचा. हे तिघेही स्वामींना जेवण देणं, वेळेवर औषधं देणं, संध्याकाळी खाली वॉकर घेऊन फिरायला नेऊन आणणं, ही कामं आनंदानं करतात. अंशिकानं त्यांच्यासाठी घरात टीव्हीपासून कूलपर्यंत सर्व सोयी करून घेतल्या आहेत, पण कोणत्याही भौतिक सुखोपभोगाची त्यांना इच्छा नाही. या घरात जी प्रेमाची ऊब त्यांना मिळालीय, त्यातच ते संतुष्ट आहेत.

ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणं. अशा कुटुंबांचं आभाळाएवढं मन पाहाताना संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांची आठवण होते. माऊली सांगतात, ‘अध्यात्म म्हणजे मैत्र. ज्याच्या मनात सर्वाविषयी करुणा आहे, मैत्रभाव आहे तो आध्यात्मिक..’  हा मैत्रभाव प्रत्येकानं आपल्यात मुरवला तर आजची व्यक्तिकेंद्री आणि करोनामुळे  कुटुंबाचा अर्थ समजलेली माणसं एकमेकांच्या प्रेमानं एकत्र येतील आणि कुटुंबकक्षा विस्तारल्या जाऊन आगळीवेगळी कुटुंबं तयार होतील यात शंका नाही.