News Flash

शेतमाय!

आजींचा आहार आणि काम करण्याची जीवनशैली हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.

(संग्रहित छायाचित्र)

लता दाभोळकर

आर. पापाम्मल ही १०५ वर्षांची आजी. या वयातही तिचं सेंद्रिय शेतीसाठी असलेलं झपाटलेपण, शेतात राबण्याची हिंमत समोरच्या व्यक्तीला अचंबित करून सोडते. एखादं ध्येय मनाशी बाळगलं की अजोड मेहनतीच्या जोरावर वय, लिंग यापलीकडे जाऊन एखादी व्यक्ती काम करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या आर. पापाम्मल आजी!

आर. पापाम्मल. वय वर्ष १०५. राहाण्याचं ठिकाण कोईम्बतूरमधील थेकमपट्टी. या छोटय़ाशा गावातल्या पापाम्मल आजींना यंदा सेंद्रिय शेतीमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सेंद्रिय शेती हाच ध्यास असलेली ही आजी आहे हाडाची शेतकरीण! ज्या वयापर्यंत अनेकजण जगण्याचाही विचार करत नाही अशा वयात ही आजी राबतेय हिरव्या शेतात. तिचं अडीच एकरचं शेत हीच तिची कर्मभूमी. ती रमते या शेतात, तिथल्या झाडांमध्ये, केळींच्या बागांमध्ये! तिला लळा लागला आहे या मातीचा, हिरव्यागार रोपांचा, त्या रोपांमधून तरारून येणाऱ्या पिकांचा..

या आजी अगदी तशाच आहेत, इतर आजींसारख्या- सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या. पण त्यांच्या त्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर अजूनही जगण्याची आस आणि प्रसन्नता आहे. आजी मरणाची गोष्ट कधी करतच नाहीत. त्या सतत राबत राहातात त्यांच्या लाडक्या शेतात. त्याही गोष्ट सांगतात इतर आज्ज्यांसारख्या. पण त्यांच्या गोष्टी आहेत शेतीच्या, तिथल्या मातीच्या, पिकांच्या अन् त्यांनी शेतात केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या! शेतीवर असलेलं अपार प्रेम हाच या आजींचा जीवनरस. त्याच ओढीनं वयाच्या १०५ व्या वर्षीही त्या शेतात राबताहेत आणि हिरव्या बोलीचा मनमुराद आनंद घेताहेत. शेतच जणू त्यांच्या जगण्याचं, दीर्घायुष्याचं गमक.

सहा फूट उंची, मध्यम अंगकाठी, कडक शिस्तीचा बाणा आणि कधीही न थकणारे पाय.. आणि हो, डोक्यावरचे पांढरे शुभ्र केस त्यांच्या देहयष्टीवर अधिकच शोभून दिसतात आणि मन- ते सदैव हिरव्या बोलीची ओढ लागलेलं आणि विचार नेहमीच ठाम! अशी ही आजी आजूबाजूच्या लोकांनाही सतत काम करण्याची प्रेरणा देत असते. त्यांनाही काम करण्याचा सल्ला देत असते तिच्या खमक्या आवाजात! पापाम्मल आजी जन्मल्या एका शेतकरी कुटुंबात. कष्ट, कष्ट आणि फक्त कष्ट करणं, अशीच धारणा असलेल्या शेतकऱ्याचं हे कुटुंब. त्यामुळे कष्टाळू वृत्ती त्यांच्या रक्तातच आहे. १९१४ मध्ये तमिळनाडूमधल्या देवलपूरम गावात जन्मलेल्या पापाम्मल आजींचं लहान वयातच आईवडिलांचं छत्र हरपलं. आजी-आजोबांनी त्यांचा आणि त्यांच्या दोन बहिणींचा सांभाळ केला. वारसा हक्कानं मिळालेलं दुकान चालवत या आजींनी शेत विकत घेतलं, तेही वयाच्या तिशीत. आजींना कुठल्याही प्रकारचं शालेय शिक्षण मिळालेलं नाही. दक्षिण भारतात घराघरातून जे काही पारंपरिक शिक्षण मिळतं त्यातूनच आकडेमोड शिकल्या. ‘‘त्या काळी पाचवीपर्यंत शिकलं तरी भरपूर होतं. एवढय़ा शिक्षणानंही शिक्षकाचा दर्जा मिळे,’’ हे आजी आवर्जून नमूद करतात. लहान वयातच शेतात राबताना मातीचा लळा लागला. मग हे शेतच त्यांचं कार्यक्षेत्र झालं. शेतात राबताना शेतीचं शास्त्र अवगत करून घेतलं. साधी शेतकरीण ते सेंद्रिय शेतीची प्रणेती असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

आजही आजी पहाटे तीन वाजता उठतात. घरची कामं उरकून शेतीची अवजारं खांद्यावर घेऊन आपल्या लाडक्या शेतात जातात. केळींवर आजींचं विशेष प्रेम. तमिळनाडू कृषी विद्यापीठातही विद्यार्थ्यांना त्या शेतीचे धडे देतात. स्वत:च्या शेतात राबता राबता तिथले अनुभव विद्यार्थ्यांना आणि अन्य शेतकऱ्यांनाही सांगतात. पिकांमध्ये नवीन काय प्रयोग करता येतील, काय करू नये, असं शेतकऱ्यांच्या फायद्याचं अनेक प्रयोगांबाबतचं मार्गदर्शन त्या शेतकऱ्यांना करतात. अर्थात आजींचा भर हा सेद्रिंय शेतीवरच असतो.  त्यांचं शेतात राबणं अनेक तरुणांनाही अचंबित करतं, पण आजींच्या ते गावीही नसतं. आजींच्या कष्टकरी वृत्तीला इथली तरुण मंडळीही सलाम ठोकतात. कधी कधी या तरुण मंडळींना आजी कानपिचक्याही देतात- ‘‘मी एवढी म्हातारी दिवसभर काम करूनही थकत नाही आणि तुम्ही कसे थकता रे? जा पळा, लागा कामाला!’’

आजींचा आहार आणि काम करण्याची जीवनशैली हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात. मटण बिर्याणी आणि भरपूर भाज्या हा आजींचा आवडता आहार. निसर्गाशी जवळीक साधण्याची एकही संधी आजी सोडत नाहीत. त्या अन्न शिजवतात मातीच्या भांडय़ात, जेवतातही केळीच्या पानात. आजींची या वयातही नवनवीन गोष्टी शिकण्याची हौस अनेकांना कमाल वाटते. शेतकऱ्यांच्या एका बैठकीत त्यांनी सेंद्रिय शेतीविषयी माहिती ऐकली आणि घरी आल्या आल्या त्याचा प्रयोग सुरू केला. ‘रासायनिक खतं आपल्या पिकांसाठी, मातीसाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठीही योग्य नाहीत. या कारणास्तव आपण सेंद्रिय खताकडे वळलो,’ असं त्या आवर्जून सांगतात. त्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे हे प्रयोग आणि नावीन्यपूर्ण पद्धती या भागात यशस्वी आणि लोकप्रिय झाल्या. आपले प्रयोग केवळ आपल्या शेतापुरतेच मर्यादित न ठेवता अन्य शेतकऱ्यांनाही त्याचा उपयोग व्हावा, सेंद्रिय शेतीची संकल्पना सर्वदूर पोहोचावी, यासाठी आजी ठिकठिकाणी फिरतात. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती देतात, त्यासाठी अनुकूल बनवतात. ‘‘आजीनं एखादी गोष्ट मनाशी ठाम केली की ती फारसा विचार करत नाही. ती गोष्ट करायचीच असा निर्धार करते आणि कामाला लागते. त्या ध्येयाप्रति पछाडल्यासारखी काम करते,’ असं त्यांचे कुटुंबसदस्य सांगतात. ‘‘देशाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांची आवश्यकता आहे. हीच वेळ आहे, की लोकांनी पुन्हा शेतीकडे वळायला हवं. मला आशा आहे की माझी कहाणी ऐकून तरी लोक शेतीकडे वळतील आणि माझ्यासारखेच कष्ट उपसण्याची तयारी करतील. एकाही व्यक्तीनं आळश्यासारखं बसू नये.’’ अशी आशा आजी व्यक्त करतात. पण आताच्या तरुणाईला एखादी गोष्ट पटकन हवी असते, त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीत गुंतवणूक करायला वेळ नाही, असंही खेदानं नमूदही करतात.

‘‘वयाची शंभरी उलटल्यानंतरही ‘पद्मश्री’ मिळाल्यानं मला माझंच आश्चर्य वाटत आहे. मला याबद्दल माझा अभिमानही वाटतोय. मी या वयातही शेतीत काम करते, आजही दिवसाला ५० ते १०० लोक शेतीविषयक माहिती घेण्यासाठी मला भेटतात, या गोष्टींचा आनंद वाटतो.’’ असं त्या सांगतात.

आजींचं खमके पण, चेहऱ्यावरचे कृतार्थतेचे भाव समोरच्या व्यक्तीला प्रेरणा देणारे आहेत. शेतातल्या हिरव्या रोपांसारखी अशी ही एकमेवाद्वितीय शेतमाय!

lata.dabholkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:39 am

Web Title: article on padma shri award winner r papammal abn 97
Next Stories
1 आभाळाएवढय़ा..
2 अढळ ध्येयनिष्ठा!
3 बहिष्कृता ते पद्मश्री
Just Now!
X