|| गीताली. वि. मं.

geetali.mandakini@gmail.com

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

सर्वदूर पसरलेली सदाहरित मऊ-लुसलुशीत हिरवळ बघितल्यावर डोळे निवतात, मनाला सुखद गारवा जाणवतो आणि काम करायला, जगायला हुरूप येतो, तसं काहीसं विद्या बाळ यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आणि कामाकडे बघितलं की वाटतं. एखादं माणूस वयाच्या ८३व्या वर्षीसुद्धा इतकं कसं काय उत्साही, प्रसन्न आणि मऊ-मुलायम असू शकतं, असा प्रश्न त्यांच्या सहवासात असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनासुद्धा त्यांच्याविषयी ऐकून-वाचून अनेकदा पडतो. या कूट प्रश्नाचं उत्तर अशक्य कोटीतला वाटावा असा त्यांचा आशावाद, निरोगी तब्येत आणि निर्वैरभाव वृत्ती! यातल्या काही गोष्टी त्यांना जन्मजात लाभल्या असतीलही, पण तब्येतीची निगुतीनं काळजी घेणं, मिताहार पण चवीनं खाणं, नियमित व्यायाम आणि संतुलित आचार-विचाराच्या जगण्याच्या रीतीला खूप सारं श्रेय जातं. हे सर्व लिहितांना आता भूतकाळाचा वापर करावा लागणार ही वेदना उरात आहे, कारण विद्या बाळ यांचं ३० जानेवारीला निधन झालं. स्त्री चळवळ आणि एकूणच परिवर्तनवादी चळवळीचा त्यांच्या निधनानं अपरिमित हानी झाली आहे.

विद्यापेक्षा मी वयानं १०-१२ वर्षांनी लहान, पण आमच्या ‘नारी समता मंच’च्या बैठकीत ती म्हणाली होती, ‘‘आपण समतेविषयी, बिन उतरंडीच्या व्यवस्थेविषयी बोलतो आहोत तर त्यासाठीच एक पाऊल म्हणून मी वयानं तुम्हा सर्वापेक्षा ज्येष्ठ असले तरी तुम्ही सर्वानी मला ‘ए विद्या’ म्हणावं. त्यामुळे निर्णय घेताना, बोलताना तुम्हाला माझ्या वयाचं दडपण येणार नाही, असं मला वाटतं.’’ विद्याच्या या मनापासून केलेल्या विनंतीमुळे मी आणि आमच्या ‘पुरुष उवाच’मधल्या काही तरुण मित्रांनी तिला लगेच ‘ए विद्या’ म्हणायला सुरुवात केली. परंतु बाकीच्या आमच्या मैत्रिणी मात्र ‘अहो विद्याताई’पाशीच थबकल्या याचं विद्याला आणि मलाही वाईट वाटलं. अर्थात ए, अहो म्हणण्यावरच काही नातेसंबंध अवलंबून नसतात तरी पण.. असं का झालं? याचं कारण बहुतेकींना विद्याच्या कामाचं, लोकप्रियतेचं, नेतृत्वाचं दडपण येत असावं. थोरांचा आदर करण्याची परंपरागत रीत त्यांना आदरार्थी संबोधण्यात आहे. मी मात्र इथून पुढे तिचा उल्लेख विद्या असाच करणार आहे कारण त्यामुळे तिच्या कामाचा अनादर होतो अथवा औचित्यभंग होतो, असं मी मानत नाही, असो.

पारंपरिक कर्तव्यदक्ष गृहिणी ते चळवळीतली कार्यकर्ता ते नेता ते सेलिब्रिटी हे तिचं अखेरचं स्टेट्स या तिच्या थक्क करणाऱ्या जीवनप्रवासाची मी तिची एक सखी आणि सहकारी म्हणून साक्षीदार आहे. हा प्रवास अर्थातच खूप खाच – खळग्यांचा, चढउतारांचा होता. पण तिनं तो अतिशय निर्धारानं, धीरानं प्रसन्नपणे निभावला. तिच्या यशाचं गमक काय? तर तिला आपल्या गुणांची-क्षमतेची जाणीव होती. तसंच मर्यादांचं भान होतं आणि त्या मान्य करण्याचा प्रांजळपणाही! वयाच्या पस्तिशीपर्यंत तिला सामाजिक जाणिवेचा थांगपत्ता नव्हता. ती सांगायची, ‘‘कारण यशानं मला खुरटवलं, अपयश आपल्याला खूप काही शिकवतं. कुठलीही सामाजिक जाणीव मला नसणं याचं कारण हेच होतं की मिळणाऱ्या यशात, मस्तीत मी इतकी तृप्त होते की माझं  सामाजिक प्रश्नांकडे लक्ष गेलं नाही. सामाजिक लेखनाकडेही नाही. अगदी आणीबाणीतसुद्धा मी ‘जागी’ झाले नव्हते,’’ असं ती कबूल करायची.

ही पहिली पस्तीस ‘अजाण’ वर्ष वाया गेली, असं कधी कधी तिला वाटायचं. पण मग तिच्या लक्षात आलं की १९७३-७४ पासून तिला घराविषयी अस्वस्थता वाटायला लागली. ती वाढत गेली आणि त्यानंतर १०-१२ वर्षांनी तिनं घराबाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला. फेब्रुवारी १९८७ पासून ती एकटी राहू लागली. त्यामुळे मध्यमवर्गीय बायकांमध्ये, जाणीव जागृतीचं काम करताना मध्यमवर्गीय बाई बंड करायला, विचार करायला, जुनं बदलायला खूप वेळ कसा घेते, तिला एवढं कसं कळत नाही, असले प्रश्न करायचे नाहीत, हे या ‘अजाण’ पस्तीस वर्षांनी तिला सांगितलं. त्यामुळे सर्वसामान्य बायकांना ‘विद्याताई’ अगदी जवळचं, आपलं माणूस वाटतात.

सुरुवातीच्या काळात तिला चळवळीत खूप डावललं गेलं, कमीही लेखलं गेलं आणि तिनं ते स्वीकारलंही. कारण तिची मांडणी अनुभवांवर आधारलेली असायची. त्यामागे काही पुस्तकी विश्लेषण नसायचं. तिचे विचार एकूण मध्यमवर्गीय स्त्री, कुटुंब याभोवती फिरणारे. ग्रामीण, दलित स्त्रीच्या प्रश्नांपर्यंत ती फारशी पोहोचू शकली नव्हती. कष्टकरी-भ्रमिक वर्गापर्यंतही नाही. या डावलल्याचा सल तिच्या मनात होताच. पण ती म्हणायची, ‘‘जो चांगला वागेल तो आपला, मग रक्ताचा असो वा नसो. जो चांगला वागला नाही तो आपला नसला तरी वैर, शत्रुत्व नाही. मला जास्त वेळ कटुता ठेवताच येत नाही.’’ तिच्यातला हा गोडवा-लाघव अवीट होतं आणि तेच तिला इतक्या उंचीवर घेऊन गेलं.

‘‘मला लेबल लागलेला मध्यमवर्ग महत्त्वाचा वाटला, अजूनही वाटतो. मध्यमवर्गाला दुर्लक्षू नये, असं वाटतं. विचार करणं परवडणारा तो वर्ग आहे. त्याच्या हातात काही सुविधा आहेत, काम करण्याची क्षमता आहे त्यांच्या जाणिवा व्यापक व्हाव्यात, दृष्टी व्यापक व्हावी म्हणून प्रयत्न चालू ठेवायला हवेत. मध्यम वर्गाचं मर्यादित क्षेत्र मला महत्त्वाचं वाटलं होतं. कालौघात कामाची गरज वाढतेच आहे. मध्यमवर्ग वाढतो आहे. यातले काही नवश्रीमंत, सुखवस्तू वर्गात जाताहेत. चळवळीचं वारं अंगावर घेत घेत वाढलेला हा वर्ग चळवळीची शिकवण आचरणात आणून सजग नागरिक बनतो. या वर्गात खूप ताकद, क्षमता आहे. हा वर्ग बोलणारा, टीका करणारा म्हणून या वर्गाची जबाबदारी वाढते. त्यानं सतत स्वत:त मश्गूल न राहता एकूण समाजाचा विचार करायला हवा. विषमता दूर करण्यासाठी काम करणाऱ्या संस्था/ संघटनांत सक्रिय होत पुरोगामी विचार समजून घ्यायला हवा. राजकारणात सक्रिय झालं पाहिजे. निदान चांगला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणं, निवडून आलेल्यांवर सतत नजर ठेवून ते भ्रष्ट होणार नाहीत. यासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. त्यामुळे समाजात समतेचं, सुरक्षिततेचं वातावरण तयार व्हायला मदत होईल, असा मला विश्वास वाटतो. सर्वसामान्य माणसाचं कुतूहल जागं करणं, अनुभवायला हात घालून त्याला विचार करायला उद्युक्त करणं ही जर जाणीव जागी करण्याची पहिली पायरी असेल तर मी तिथेच काम करीन. कारण विचार ही कृतीसाठी ‘तयार’ करणारी पहिली पायरी आहे.’’ तिच्या या विचाराचं महत्त्व हळूहळू सगळ्यांना पटत गेलं.

विद्याचं मोठेपण कशाकशात आहे? मला वाटतं, तिच्यातल्या आरस्पानी माणुसकीच्या दर्शनात! ती ‘माणूस वेडी’, सतत माणसात रमणारी पण तरीही ती सांगत असे, ‘‘परस्परावलंबनाचं नातं छान असलं तरी त्यापलीकडे जी अवस्था आहे आत्मनिर्भरतेची ती समजली पाहिजे. त्यासाठी प्रश्न पडणं, चर्चा करणं, विचार करणं हे नाकारता कामा नये. प्रश्नांची भीती वाटता कामा नये. विचार करण्याचा आळस करता कामा नये, लोकांना तुच्छ लेखून, एकटेपणा मिरवावा असं नाही. पण आपल्या विवेकाचा, तर्कसंगत विचाराचा आपल्याला कशाहीपेक्षा जास्त आधार वाटला पाहिजे. असलात बरोबर तर तुमच्यासह नाही तर तुमच्याविना या अर्थानं आत्मनिर्भरता आली पाहिजे. यश येईल न येईल, जे असेल त्याला सामोरं जाण्याची हिंमत असायला हवी आपल्यात, या अर्थानं आपल्याला मुक्त करायचं आहे आपणच!  मला ही जाणीव खूप उशिरा झाली आयुष्यात. पण आजही असे खूप लोक असणार की ज्यांना ही जाणीव झालेली नसणार. म्हणून मला वाटतं बोलत राहिलं पाहिजे. कुणीच विचार न करता आयुष्य रखडत रेटावं, असं मला वाटत नाही. पुरुषांनी स्त्रीला स्वातंत्र्य द्यायचं नाही तर तिचं ते असलेलं स्वातंत्र्य मान्य करायचं. स्वत:पासून सर्वांपर्यंत पोहोचण्याचं जीवनसूत्र मला ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक आणि ‘नारी समता मंच’ या दोन्ही माध्यमात सापडलं. भावनाविवश स्वभावाची मी भावनेचं सामर्थ्य ओळखत विचारांची बैठकही आवश्यक मानू लागले. पत्रकारितेचं बहुआयामी साधन परिवर्तनात फार मोठी भूमिका करू शकतं. असा माझा अनुभव आणि विश्वास आहे. कारण जगाकडे खूप खिडक्यांतून बघता येतं. यातून मला जे मिळालं ते इतरांना देता यावं यासाठी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या रूपाने धडपडते आहे.’’  ‘इष्ट ते बोलीन आणि शक्य ते करीन.’ हा आगरकरी बाणा विद्यामध्ये पुरेपूर उतरला होता हे या तिच्या विचारातून जाणवतं.

तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी ही कार्यकर्त्यांसाठी, नेत्याच्या स्वीकारासाठी आवश्यक असणारी त्रिसूत्री तिच्या जगण्यात भिनलेली होती. पैस- निकोप, निरामय जगण्यासाठीचा एक अवकाश! तो सगळ्यांसाठी निर्माण करण्याची धडपड म्हणजे विद्याचं काम! ती म्हणायची, ‘‘आपण मनुष्यप्राणी म्हणून जन्माला आल्यानंतर माणूस होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी एक पैस निर्माण करण्याची गरज असते. आजच्या भाषेत स्पेस. अशी जागा जी प्रत्येकीला ‘आपली’ वाटेल आणि ही जागाही तिला ‘आपली’ मानेल. जिथे भिंतींना कान नसतील उलट तिचं काही ऐकून घ्यायला नक्की कुणीतरी असेल. तिला वाचायला मिळेल, विचार करावासा वाटेल. त्याबाबत बोलावंसं वाटेल अशी ही जागा हवी. आजूबाजूला बघताना तिच्या मनात प्रश्न उगवतील आणि कदाचित त्यांच्या उत्तरांकडे नेणारी पायवाटही दिसेल. या प्रक्रियेत तिला जीवनाचा जोडीदार किंवा मैत्र भेटण्याची शक्यताही असेल. हे सारं स्त्रियांसाठी तर असेलच पण त्यात सहभागी होत, स्वत:च्या स्त्रीविषयक जाणिवा विस्तार बघणारे पुरुषही पुढे येतील. या साऱ्यांना एकत्र आणणारा एक बिनभिंतीचा, कदाचित बिनछताचा हा कट्टा आहे. मानवी मनाचा वैयक्तिक आणि सामजिक पैस रुंदावू बघणारी ही सारी तुम्हाला खुणावत आहेत इथे येण्यासाठी -अक्षरस्पर्श ग्रंथालय, मिळून साऱ्या जणी मासिक, नारी समता मंच, सखी साऱ्या जणी मंडळ, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ आणि पुरुष उवाच गट.

विद्याच्या पुढाकारानं सुरू झालेल्या या सर्व संस्थांमध्ये काम करणारे दुसऱ्या फळीचे अनेक हुशार- कर्तबगार कार्यकर्ते घर- संसार सांभाळत मनापासून काम करत असतात. मात्र या सर्व संस्था – संघटनांची ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर’ विद्या बाळ! यामुळे कधीमधी व्यक्त-अव्यक्तपणे नाराजी असते. पण सगळ्यांचं ती करत असलेल्या बारमाही चोवीस तास कामाचं सातत्य, आवाका आणि झपाटा मान्य असल्यामुळे फार संघर्षांचे प्रसंग कधी आले नाहीत. शिवाय तिच्या नेमस्त समन्वयवादी, कार्यकर्त्यांच्या गुणांचं वेळोवेळी कौतुक करून त्यांना संधी देण्याच्या वृत्तीलाही खूप सारं श्रेय जातं. या सर्व संस्था तिच्या आधारानं फळा-फुलाला आल्या आणि स्वतंत्रपणे जोमदार वाटचाल करताहेत. सामूहिक नेतृत्वाचं तिचं स्वप्नं होतं. इतरांच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी ती स्वत: खुर्ची सोडायला तयार असायची. ऑगस्ट २००९ मध्ये  ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादकपदाची धुरा आता इथून पुढे डॉ. गीताली सांभाळणार आहे, असं तिनं ‘संवाद’मधून जाहीर केलं. त्यात ती म्हणते की ‘‘हा माझा संवाद लिहितानाचा वेगळाच अनुभव आहे. भेटत तर राहीनच ‘साऱ्या जणी’ तून, पण आता ही जागा गीतालीच्या हातात कृतार्थ भावनेनं सोपवत आहे. ही जबाबदारी आनंदाची होती, आपणहून स्वीकारलेली होती. आता मीच आपणहून तिच्यातून मुक्त होते आहे. संसाराच्या एका टप्प्यावर जी भूमिका घ्यायला हवी ती कामाच्या संसारातही घ्यायला हवी..’’

विद्याला अनेकानेक मानसन्मान मिळाले, पण विद्याचे पाय जमिनीवर घट्टपणे रोवलेले होते. आपल्या मर्यादांची पुरेशी जाणीव असणारी विद्या म्हणायची, ‘माझ्यापेक्षा अधिक काम केलेल्या खूप जणी आहेत, पण मी माध्यमात काम करत असल्यामुळे माझं नाव जरा जास्तच झालं. विद्यानं बहुजन, दलित, वंचित – शोषितांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत, उपोषणं, सत्याग्रह, मोर्चे असं प्रचंड धकाधकीचं उपाशीतापाशी राहात वणवणत काम केलं नाही. हे खरंय पण, असं काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांविषयी तिच्या मनात निस्सीम आदर होता. त्यांच्या कामात ती जमेल तसं सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन देत असे. ‘मिळून साऱ्या जणी’ च्या माध्यमातून त्यांच्या कामाचं कौतुकही करत असे. विद्याला अमाप प्रसिद्धी, मानसन्मान आणि पुरस्कार मिळाले. सत्तरी पार केल्यावर ‘पुरस्कार घ्यायला संकोच वाटतो,’ असं ती मला म्हणाली. तेव्हा मी तिला सुचवलं होतं की लोकांना तुलाच पुरस्कार द्यायचा असतो (त्याची तू हकदार आहेसच) शिवाय त्यांचा पण तुला पुरस्कार देण्यात सन्मान आणि प्रसिद्धी असते. तू पुरस्कार घेताना दरवेळी एका संस्थेच्या पुढच्या फळीतल्या कार्यकर्तीला घेऊन जात जा म्हणजे त्यांचं पण काम आणि नाव पुढे येत राहील. ते तिला काही जमलं नाही. नुकताच पुन्हा हा विषय निघाला तेव्हा तिची एकटेपणाची खोलवरची वेदना अश्रूंच्या वाटे बाहेर पडली. ती म्हणाली, ‘‘खरं सांगू का गीताली, मी इतकी एकटीच असते ना की माझ्या हे लक्षातच येत नाही.’’ तसं मी म्हटलं, ‘‘पैशाकडे पैसा जातो तसं प्रसिद्धीकडे प्रसिद्धी जात नाही का?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘हो ना गं, परवा फॅसिझम विरोधात एल्गारच्या कार्यक्रमाला मी गेले तर सर्व पत्रकार माझाच बाईट मागत होते. फोटोसाठी मला मधोमध उभं राहा म्हणत होते. मी त्यांना सांगत होते, अहो, या बाकीच्या कार्यकर्त्यांनीच खूप काम केलं आहे. मी फक्त आले आहे. मला इतका संकोच वाटला म्हणून सांगू.’’ हे सांगताना तिला रडू अनावरच झालं. तिचा हा प्रामाणिकपणातला गोडवा सगळ्यांना फार भावतो.

सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणं खूप महत्त्वाचं, असं ती अतिशय कळकळीनं सांगत असे. खरी कसोटी मतभेदांच्या वेळी होते. तिथं ती स्वत:च्या मतांशी ठाम राहत, शांतपणे, समतोल राखत मांडणी करायची. हे तिचे गुण टीव्हीवरच्या चर्चेत प्रकर्षांनं लक्षात राहायचे.

मृत्यू, एकटेपणा आणि प्रेम या तिन्ही गोष्टींचा खूप नव्यानं विचार करून मुला-नातवंडांना वाढवलं पाहिजे, असा सांगावा विद्या तिच्या कामातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा जिवापाड प्रयत्न करत राहिली. परिवर्तनाच्या विचाराचं बी ती दोन्ही हातांनी अथकपणे पेरत राहिली. ती म्हणायची, ‘‘आपण आपलं पेरत राहावं, उगवलं तर उगवतं नाही तर वाया पण जातं. कधी तरी कुठे तरी थोडंसं उगवेल म्हणून हे पुन्हा पुन्हा करत राहावं लागतं. मी फार आशावादी आहे आणि म्हणूनच माझा उत्साह टिकून आहे. अंधाराला शिव्या देण्यापेक्षा प्रकाश शोधूया मनातला आणि बाहेरचा! मला या प्रकाशानं निराशा आणि भयापासून वाचवून कामाला लावलं आहे.’’

ती म्हणायची, ‘‘मी स्वेच्छामरणाचा विचार अतिशय तृप्तीच्या भावनेनं करते. आयुष्य जगून झालं. जे करण्यासारखं होतं ते करून झालं. किती यशस्वी-अयशस्वी हा भाग वेगळा. मागे वळून पाहताना वाटतं, पुष्कळ आघाडय़ांवर पुष्कळ लढलो आपण. विचारांनी बदललो, वाढलो. काही गोष्टीत अपयश आलं, पण कल्पना केली नव्हती असं खूप काही मिळालं आणि वृद्धत्वाची जी खासियत आहे म्हणजे एकेक क्षमता कमी होत जातात. त्यामुळे नॉर्मल आयुष्य जगता येत नाही. एकटे पडतो आणि रिकामे मन सैतानाचे धन! हे सर्व टाळायचं तर आता या टप्प्यावर मी अतिशय सुखाने- समाधानाने या आयुष्याचा निरोप घेऊ इच्छिते. या संदर्भातलं ज्यो रोमन या अमेरिकन लेखिकेचं ‘एक्झिट हाऊस’ हे पुस्तक विद्याला फार आवडलं होतं. त्यावर ‘निरोपघर’ हा तिचा ‘साऱ्या जणी’तला लेख वाचायला हवा. निश्चित, विनाविलंब आणि वेदनारहित मरण देईल, अशा ‘काळगोळी’चा शोध घेऊन निश्चित केलेल्या दिवशी मृत्यूला निमंत्रित करणारं औषध घेऊन जगाचा निरोप घेणारा. विद्यानं स्वेच्छामरणासाठी एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. ती आपण पुढं न्यायलाच हवी..

निरोपघरात प्रसन्नपणे ‘काळगोळी’ घेऊन जगाचा निरोप घेण्याचं विद्याचं स्वप्नं अधुरं राहिलं. ‘काळगोळी’अभावी तिला दीड दोन महिने मृत्यूची वाट बघावी लागली. आणि शेवटी ३० जानेवारीला तिची आणि त्याची गळाभेट झाली.. ती दूर दूर निघून गेली म्हणून मन सारखं भरून येतंय, पण तिची मायेची आणि विचारांची मोठी सावली आपल्यावर सतत असेल, या विश्वासानं नव्या उमेदीनं कामाला लागू या..