|| डॉ. ऊर्जतिा कुलकर्णी

आयुष्य जसे बदलते, आपण व्यक्ती म्हणून जसे प्रगल्भ होत राहतो, शिकतो, तसा प्राधान्यक्रम बदलायला सुरुवात होते. आपल्या आयुष्यात नवनवीन येणारे अनुभव, व्यक्ती, अभ्यास यातून ते नाही बदलले तरच नवल! पण स्वत: सोबत स्वत:ची म्हणून काही प्राधान्ये असावीत आणि ती मात्र कायम तशीच ठेवावीत. यातून व्यक्ती म्हणून इतर बाबतीत आपण प्रगल्भ होताना, नात्यात येणारी घर्षणे टाळता येतील. नात्यांमध्ये समस्या निर्माण होतात, त्याला जबाबदार असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे, दिले जाणारे किंवा मिळणारे प्राधान्य!

मला, माझ्या कुटुंबात महत्त्वच दिलं जात नाही किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी, इतर सहकाऱ्यांच्या तुलनेने माझे महत्त्व कमी आहे, माझ्या मताला किंमत नाही असे वाटते अथवा माझ्या स्नेही मंडळींमध्ये माझं नेमकं अस्तित्व काय, असा प्रश्न सारखाच सतावतो, ही त्याची काही बोलकी उदाहरणे.

हे प्राधान्य म्हणजे नेमकं काय? ते कुठून निर्माण होतं? आणि त्याला इतकं महत्त्व का? याचीही आपण सहज सोपी व्याख्या करू या. ‘आपल्याला व्यक्तीनिहाय अतिशय आवश्यक वाटणाऱ्या, गरजेच्या वाटणाऱ्या बाबींना/ माणसांना आपल्या लेखी असणारे; वेळ, पैसा, भावना, विचार या साऱ्याच गुंतवणुकीच्या अनुषंगाने असणारे महत्त्व, त्यातून त्यांना आपल्या लेखी सर्वच ठिकाणी मिळणारे अव्वल स्थान म्हणजे प्राधान्य!’ इथे व्यक्तीनिहाय म्हणायचं कारण अतिशय सुस्पष्ट. प्रत्येकाला असणारे निवडीचे स्वातंत्र्य, इतकेच! हे लक्षात घेतल्यानंतर इतरांना आपल्याविषयी वाटणाऱ्या प्राधान्याआधी, आपण थोडंसं आत्मपरीक्षण करून, आपण कोणाला केवळ महत्त्व न देता प्राधान्य देतो, याची एक यादी तयार करू या. ही यादी तयार झाली की, न मागता कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि स्वत:च्या बाबतीत इतरांविषयी असणाऱ्या तक्रारी आपसूक कमी होतील.

आता एक दुसरी यादी तयार करू. इथे मेंदूला जरासे जास्त काम करावे लागेल. अशा काही बाबी/ मंडळींचा विचार करा, की ज्यांच्याशी आपण गेल्या कित्येक दिवसांत अगदी साधे म्हणून दोन शब्दसुद्धा बोललेलो नाही. मग ते एखाद्या विषयात विचारलेले मत असेल किंवा मिळालेला प्रतिसाद किंवा चौकशीवजा विचारणा. अगदी प्रत्यक्षातले बोलणे किंवा सगळ्या माध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्ती/बाबी. ही यादी तयार झाली, की मनाला थोडासा त्रास होईल. काही आप्तेष्ट, स्नेही यांची अशी नावे समोर येतील, की ज्यांना आपण संपूर्णत: नसले तरी काही अंशी, मेंदूच्या आतल्या पडद्यात कुठे तरी, विस्मरणाजवळ नेऊन ठेवले आहे. कदाचित त्यांच्या लेखी आपल्या अस्तित्वाला प्राधान्य असावे, नाही का? या याद्या नक्की करा, कारण यातून दोन गोष्टी घडतील, एक तर ‘मला व्यक्ती म्हणून कोणी तरी महत्त्व देत नाही/टाळत आहे’ या विचारातून आपण काही काळ तरी बाहेर येऊ आणि दुसरे, त्याच मापदंडावर स्वत:ला पडताळून पाहण्याची संधीही मिळेल.

महत्त्वाचे, या वरच्या यादीत आपले कामही येऊ द्या, काम म्हणजे अर्थार्जनासाठी, आवडीसाठी, छंदासाठी असे असणारे कुठलेही काम. कारण बऱ्याचदा याचे महत्त्व समजावून सांगावे लागतेच, ते समजेल अशी अपेक्षा करू नये.

आता हे प्राधान्य कुठून तयार होते?

आपली जडणघडण होत असताना, खरे तर आपण हे शिकत राहतो, अनुभवत राहतो, निरीक्षण करत राहतो. त्यातून, आपल्या स्वत:चे, काही स्वत:विषयीचे आणि इतर जगाविषयीचे निकष तयार होत राहतात. कधीकधी ही अगदीच, साधी सरळ देवाणघेवाण असते; तुझ्या लेखी असे, तर माझेही तसेच, इतकी स्पष्ट. अजून खोलात जाऊन विचार केला, तर यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, आपण स्वत:विषयी काय विचार करतो, हा. आपल्या लेखी स्वत:ला असणारे महत्त्व किती? त्याचे अवडंबर किती? आणि तोच एक निकष आहे का? याच्याच उलट, आपण स्वत:विषयी, अस्मितेविषयी जागरूक आहोत का? हेही! पण या अस्मितेची पूर्तता इतरांनी दिलेल्या प्राधान्याने किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या, त्यांच्या लेखी असणाऱ्या आपल्या महत्त्वामुळेच सिद्ध होते असे गणित असेल, तर मात्र जगणे अवघड होऊन बसते. दुर्दैवाने सध्याच्या काळात हा अकारण विचार करावा असा विषय झाला आहे. याची उदाहरणे जागोजाग दिसतील, पण या न मिळणाऱ्या किंवा अपेक्षित असणाऱ्या आणि न मिळणाऱ्या किंवा दिल्या न जाणाऱ्या प्राधान्यांमुळे निराशा येत असेल किंवा कुटुंबात सतत दुरावा निर्माण होत असेल, तर त्यावर ठरवून काम केलेले उत्तम.

तेही फारच सोपं आहे. आपल्या लेखी हे ज्या कोणाकडून आपल्याला हवे असे वाटते, त्या व्यक्तीशी, सर्व भीड सोडून प्रत्यक्ष बोलणे. ‘मला तुझ्याकडून प्राधान्य हवंय’ असं नाही, तर वागण्यात काय अपेक्षित आहे, हे!

तिथे आपल्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतील हे मात्र गृहीत धरू नये किंवा कदाचित समोरून आपल्या वागण्याविषयीची बेरीज-वजाबाकी होऊ शकते, हेही लक्षात ठेवूनच बोलावे.

आता व्यक्तींच्या पुढे इतर गोष्टींना दिले जाणारे प्राधान्य बघू या. म्हणजे शाळेत मुलीचे स्नेहसंमेलन आहे. आधी ठरवूनही काम आल्यामुळे, आईला तिथे जाता येणे शक्य नाही किंवा कोणतेही समारंभ, जसे मंगलकार्य

किंवा आप्तेष्टांचे, स्नेह्य़ांचे संमेलन अशा ठिकाणी ठरवूनही कामामुळे न जाता येणे, एखादी व्यक्ती आजारी असताना, गरज असताना, इतर येणाऱ्या अडचणी, यामुळे तिथे उपस्थित नसणे इत्यादी. इथे एक कडक नियम स्वत:लाच सांगणे, करडी शिस्त लावणे गरजेचे. आपण ज्या अर्थी इथे जाणे टाळून एखादे काम, अगदी आत्ता येणारी भेट किंवा दुसऱ्याच व्यक्तीला भेटणे हे करतो, तिथे जाणतेपणानेच आपण आपले प्राधान्य नकळत कामाला, त्या व्यक्तीला देतो आणि त्याच सोबत, आधी ठरलेल्या गोष्टी, माणसे यांना टाळतो किंवा समजून घेतील किंवा रोजचेच आहेत या यादीत ढकलून देतो. इथे हे न करणे हीच ती शिस्त. अर्थात काही व्यवसाय किंवा कामांबाबत हे शंभर टक्के शक्य होणारच नाही; पण त्याविषयी तक्रारही उत्पन्न होणार नाही. कारण अशी आपत्कालीन परिस्थिती नक्कीच रोज उद्भवत नाहीत. आता हेच इतर बाबींबाबत, जसे एखादे पुस्तक वाचणे, बागेत विशिष्ट झाड लावणे, व्यायाम करणे इत्यादींच्या बाबत, प्रश्न फक्त प्राधान्याचा, याच्याशीही आपले नाते असतेच, नाही का?

आता यातून येणारे वैषम्य कसे टाळायचे, ते बघू या. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. ती अशी की. माझे अस्तित्व माझ्यासाठी आहे, इतरांसाठी आहेच; पण त्यांच्या प्राधान्य देण्यामुळे अथवा न देण्यामुळे, त्यात फरक पडत नाही. हा एक संतुलित विचार किंवा तटस्थ विचार. यातून स्वत:ला होणारे क्लेश कमी होतात, हळूहळू संपून जातात. वर आपण जे म्हणालो, ते व्यक्तीनिहाय निवडीचे स्वातंत्र्य हेही लक्षात ठेवायचे. त्यामुळे अमुक एका व्यक्तीची आवड वेगळी असू शकते. त्यात मी आवडत नाही, हा प्रकार नसून, इतर काही तरी आवडते, हा सकारात्मक विचार करता येईल. इथे जाताजाता हेही ठरवू या की, अशा व्यक्तींसाठी ओढाताण करत आपण स्वत:मध्ये किती बदल करतोय? आणि ते खरंच गरजेचं आहे का? नसेल तर इथेच थांबणे उत्तम! विशेषत: एकतर्फी प्रेम, अगदी कोणत्याही वयातील, कोणत्याही नात्यातील, तिथे हे जालीम औषध.

आता अजून पुढे जाऊ या. आयुष्य जसे बदलते, आपण व्यक्ती म्हणून जसे प्रगल्भ होत राहतो, शिकतो, तशी ही प्राधान्ये बदलायला सुरुवात होते. म्हणजे शाळेत असताना, तासभर खेळणे हे हळूहळू, तासभर जास्तीचा अभ्यास इकडे जाते, तसेच एखादी गोष्ट आई-बाबांशी सगळ्यात आधी बोलायची, हे हळूहळू, मित्रमैत्रिणींशी बोलू या, त्यांनी होकार दिला, तर आई-बाबांना सांगता येईल इथे पोहोचते किंवा दोन सतत एकत्र असणाऱ्या व्यक्तींमध्ये न बोलता होणारा संवाद, यातूनही ते लक्षात येते. आपल्या आयुष्यात नवनवीन येणारे अनुभव, व्यक्ती, अभ्यास, यातून ते नाही बदलले तरच नवल!

पण स्वत:सोबत स्वत:ची म्हणून काही प्राधान्ये असावीत आणि ती मात्र कायम तशीच ठेवावीत. यातून व्यक्ती म्हणून इतर बाबतीत आपण प्रगल्भ होताना, नात्यात येणारी घर्षणे टाळता येतील. जसे की, इतरांच्या वागणुकीमुळे आपल्या स्वभावात बदल न होऊ  देणे, व्यक्ती म्हणून आपण सारासार विचार करत जगत असू, तर त्यात काडीमात्र बदल न होऊ  देणे किंवा कोशात न जाता, काही जवळच्या व्यक्तींचे दुर्दैवाने वाईट अनुभव आल्यास, त्यांना सदोष साच्यात बांधून न टाकणे, केवळ वेळ देणे आणि त्यांची प्राधान्ये बदलली असल्यास ती खुल्या दिलाने मान्य करणे. कारण त्यावर कुढत राहून किंवा त्यांना पटवून देण्याचा निर्थक प्रयत्न करणे यातून निराशेशिवाय काहीही हाती लागत नाही.

आपल्या शारीरिक, मानसिक गरजा, एकंदरीत स्वास्थ्य, यानेही प्राधान्ये बदलतात किंवा गरज पडली तर बदलावी लागतात. त्या वेळेस कोणताही किंतु-परंतु न ठेवता, ते सहजतेने करावे. याचे स्तोम माजवणारेही काही लोक असतात. त्यांचे सारे आयुष्यच केवळ या एका शब्दभोवती घुटमळते, पण त्याचे खरे कारण असे, की त्यांच्या अंतर्मनात कुठे तरी ते स्वत:लाच कमी लेखत असतात. अशांना काहीही समजावून सांगणे, पटवून देणे यापेक्षा आपल्या वागण्यातून बरेच काही सांगता येईल. त्यातून त्यांना ते समजेलच असे मात्र नाही.

एकंदरीत हा सगळाच विषय अत्यंत शांत डोक्याने आणि थोडासा तटस्थ राहून बघण्यासारखाच आहे. आता हे शक्य नाही, पुस्तकी आहे, असेही काही लोकांचे म्हणणे असेल; पण ते करून बघायच्या आधीच हे ठरवणे म्हणजे, एक शक्यता नाकारण्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत प्रत्येकाचे स्वानुभव हेच खरे उत्तर!

urjita.kulkarni@gmail.com