रोहिणी हट्टंगडी

‘सुलतान रझिया’च्या पहिल्या तालमीमध्ये जेव्हा मी पळत उंच बुरुजावर जाऊन भाषण द्याायला समोर पाहिलं, प्रेक्षकांच्या मागेपर्यंत नजर गेली… एक क्षणच… आणि समोर अफाट जनसमुदाय असल्याची नुसती कल्पना करूनच रोमांच उभे राहिले.  भूमिका करताना हे अनुभवणं म्हणजे शब्दातीत… आत कुठेतरी एक तार छेडली जाते, त्याचे झंकार फक्त आपल्यालाच ऐकू येतात! सगळं एक क्षणभर विसरायला होतं…तसाच अनुभव होता ‘पुराना किला’च्या अवशेषांवर नाटक करणं. पुरातन अवशेष पाहाताना, त्या वास्तूत वावरताना, स्पर्श करताना जाणवतं, की त्या काळी तिथे ज्यांचा वावर होता, तो स्पर्श तसाच राहिला असेल आणि आज आपण त्याच ठिकाणी स्पर्श करतोय! आत कुठेतरी एक दुवा जाणवतो!  ‘राष्ट्रीय नाट्य विद्याालया’च्या (रा.ना.वि./ एन.एस.डी.) दुसऱ्या वर्षात मला ‘स्पेशलायझेशन’ मिळालं, अभिनय! वार्षिक परीक्षेत तोंडी परीक्षाही असायची. तेव्हा शिक्षकांशी, तुम्ही वर्षभरात काय केलं, तुम्हाला काय वाटलं, तुमच्या काही अडचणी, वगैरे बरंच बोलणं व्हायचं. अगदी ‘वन टू वन’! पहिल्या वर्षात ‘पुढे काय स्पेशलायझेशन हवं?,’असं आम्हाला विचारलं. आमच्या वर्गातल्या झाडून सगळ्या जणांना दिग्दर्शनच हवं होतं, अगदी मलासुद्धा! पण शिक्षकांना तुमच्या क्षमता कळतात. तुम्ही काय जास्त चांगलं करू शकाल हे कळतं. त्यांची आज्ञा शिरसावंद्या मानून आमच्या वर्गात दोन विद्यााथ्र्यांना ‘स्टेज क्राफ्ट’ (नेपथ्यकला), दोघांना दिग्दर्शन आणि चार जणांना अभिनय, असा आठ विद्याार्थ्यांचा वर्ग झाला.

दुसऱ्याच वर्षात ‘सुलतान रझिया’ नाटकात रझियाची भूमिका करायला मिळाली. ज्या काळात स्त्रियांना म्हणावी तशी मोकळीक नव्हती अशा काळात बनलेली ही सुलतान! पुरुषप्रधान समाजाला तोंड देणारी. फार मोठी कारकीर्द नव्हती, पण ठसा उमटवून गेलेली. त्यासाठी तयारीही जोरदार करावी लागली. चालण्याबोलण्यात तो राजेशाही थाट विसरून चालणारच नव्हतं. शिवाय तलवारबाजीही शिकायची होती, लढताना पाच-पाच फुटांवरून उड्या मारणं… सगळंच! (शाळा-कॉलेजमधले ‘स्पोर्टस’ कामी आले. आयुष्यात शिकलेलं कधीही आणि कुठेही वाया जात नाही ते असं.) तलवारबाजी शिकवायला सिंघजीत सिंग हे मणिपुरी नृत्य शिकवणारे शिक्षक आले. ते स्वत: उत्तम नर्तक होते. काही प्राथमिक वार त्यांनी शिकवले आणि मग त्याचा उपयोग करून तलवारबाजीची दृश्यं. एका दृश्यात मी आणि रतन थियम (आताचे ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक) होतो. एका हालचालीत मी खाली वाकून त्याच्या पायावर वार करायचा आणि त्यानं उडी मारून तो चुकवत माझ्या डोक्यावरून तलवार फिरवायची असं दृश्य होतं. तलवारीचं पातं जाडच  होतं आणि त्या सरळ पात्याच्या तलवारी होत्या. तालीम सुरू असताना एकदा काहीतरी चुकलं आणि त्याची तलवार माझ्या डोक्यावरून न जाता गालाला लागली, रक्त आलं. रतन ‘सॉरी, सॉरी’ म्हणत होता तेवढ्यात ‘स्टॉप’असा जोरात आवाज आला इब्राहिम अल्काझी सरांचा. त्यांनी प्रथम इंजेक्शन घेऊन यायला सांगितलं. नंतर आम्हा दोघांनाही बोलवून सांगितलं, ‘बी के अरफु ल, बी रिस्पॉन्सिबल!’ दुसऱ्या वर्षात हे नाटक केलं तेव्हा नसिरुद्दीन शाह ‘याकूत’ची भूमिका करायचा. तो मला एका वर्षानं ‘सिनिअर’. (ओम पुरी, नसिर, ज्योती देशपांडे(आता ज्योती सुभाष), बी. जयश्री हे सगळे एकाच वर्षातले.) नसिर आणि आमच्याच वर्गातली सबा झैदी या दोघांकडून मी स्वच्छ उर्दू शिकले. एखादा नुक्ता जरी सुटला तर ते दोघे बरोबर हटकायचे आणि व्यवस्थित उच्चार करून घ्यायचे.

तिसऱ्या वर्षात परत हे नाटक करायला मिळालं, तेही आमच्या ‘मेघदूत’ प्रेक्षागृहात नाही, तर दिल्लीच्या ‘पुराना किला’च्या अवशेषांवर. सरांची चार वर्षांची मेहनत होती. पुरातत्व विभागाच्या पाठीमागे लागून परवानगी मिळवणं, तिथे कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याबद्दल विश्वास देणं, सगळं फळाला आलं आणि आम्ही आमची तीन नाटकं त्या अवशेषांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच सादर केली. ‘सुलतान रझिया’, ‘तुघलक’ आणि ‘अंधायुग’. ‘अंधायुग’ हे महाभारताच्या काळातलं असूनही कुठेही ‘ऑड’ नाही वाटलं हे विशेष. ‘अंधायुग’मध्ये मी गांधारीची भूमिका करत होते.

सरांनी किल्ल्याचं प्रवेशद्वार निवडलं होतं. दोन्ही बाजूला बुरूज होते. त्याला धरून लाकडी पायऱ्या तयार केल्या. मध्ये मोठा ‘मेन अ‍ॅक्टिंग एरिया’. पायऱ्या वरच्या कमानीपर्यंत गेलेल्या. तिथे आणखी एक प्लॅटफॉर्म, तो आणखी एक, असे कितीतरी वेगवेगळे ‘एरिया’ केले. अगदी वरच्या तीन छोट्या कमानीतही आमचा एक सीन होता ‘रझिया’मध्ये. प्रेक्षागृह हे समोर अर्धगोलाकार. नैसर्गिक उतार होता त्यालाच बसण्यासाठी पायऱ्या करून घेतल्या होत्या. (सोबतचा फोटो पाहून लक्षात येईल.). ‘सुलतान रझिया’मध्येच मला जनतेला उद्देशून एक  मोठं भाषण होतं, त्यासाठी पळत पळत मला एका बुरुजाच्या वर जायचं होतं. त्या पायऱ्या मात्र त्या काळातल्या मूळच्या पायऱ्या होत्या- एक-एक फूट उंचीच्या. दमछाक व्हायची. पण पहिल्या तालमीमध्ये जेव्हा मी वर जाऊन भाषण द्याायला समोर पाहिलं, प्रेक्षकांच्या मागेपर्यंत नजर गेली… एक क्षणच… आणि एक वेगळाच प्रत्यय आला. समोर अफाट जनसमुदाय असल्याची नुसती कल्पना करूनच रोमांच उभे राहिले.  काय झालं असेल त्या वेळी? भूमिका करताना हे अनुभवणं म्हणजे शब्दातीत आहे. आत कुठेतरी एक तार छेडली जाते, त्याचे झंकार फक्त आपल्यालाच ऐकू येतात! सगळं एक क्षणभर विसरायला होतं. असं नंतरच्या काळात अनुभवलं, पण फार थोड्या वेळा. ते तिथे प्रथमच अनुभवलं.

या वेळी याकूतची भूमिका अजित वाच्छानीनं केली. (नसिर तोपर्यंत डिप्लोमा घेऊन बाहेर पडला होता. अजित वाच्छानी, राज बब्बर हे आमच्या नंतरच्या बॅचचे, आणि तोपर्यंत पंकज कपूर पहिल्या वर्षाला दाखल झाला होता. असो.) तर, रझिया करताना या ‘पुराना किला’च्या सेटवर मला शेवटच्या सीनमध्ये शेजारच्या फोटोत दिसताहेत त्या सगळ्या पायºयांवरून गडगडत खाली यायचं होतं. अरे बापरे! कसं करावं? माझी चलबिचल सरांनी लगेच ओळखली. ते म्हणाले, ‘‘रोहिणी, तलवार लागून खाली पडलीस, की दोन्ही हातांनी डोकं पकड आणि दे स्वत:ला ढकलून. डोकं मात्र सोडू नकोस!’’ घेतलं देवाचं नाव आणि त्यांनी सांगितलं तसंच केलं. आलं! इतकी मजा वाटली. बघताना ‘अरेरे!’ वाटायचं, पण करताना मजा! एक शिकले… करायचं. प्रश्न न विचारता करायचं. फार काय होईल? नाही जमणार. केल्यानं होत आहे रे आधी केलेचि पाहिजे!

‘पुराना किला’मधला दुसरा अनुभव गांधारी करताना. पण त्याआधी दुसऱ्या वर्षात ‘ईबारागी’ या जपानी नाटकाचा प्रयोग के ला होता. जपानमध्ये दोन पारंपरिक नाट्यप्रकार आहेत. पहिला ‘नो’(ठङ्मँ). हा प्रकार फारच पुरातन, आपल्या संस्कृत नाटकांसारखा. खूप संथ. नट मुखवटा घालून काम करतात. दुसरा ‘काबुकी’. हा जास्त लोकप्रिय. संगीत, नृत्य असणारा. यात छोटी नाटकंपण असतात. या प्रकारातलं नाटक करायला स्कूलमध्ये अमेरिकेहून प्रो. शोजो सातो आले होते. त्यात जपानी पद्धतीतच हालचाली, पोशाख, नृत्य, संगीत वगैरे असणार होतं. भाषा हिंदी, पण बोलण्याची ढब जपानी! लांब हाताचे किमोनो, चालण्याची पद्धत, हातातल्या पंख्याचा वेगवेगळ्या तºहेनं केलेला उपयोग, सगळं सगळं शिकायला मिळालं. मेकअप असा, की माणूस ओळखता येणार नाही. जणू मुखवटा घातला आहे. नृत्य आणि आंगिक अभिनयावर जास्त जोर. मंचावर नटांना मदत करायला काळे कपडे घातलेले स्टेज हँड्स (मदतनीस) वज्रासनात बसल्यावर छोटी स्टूल्स द्याायचे. पोशाख नीट करायचे. नाटकाचं स्क्रिप्ट नऊ पानांचं, पण प्रयोग दोन तास चालायचा. त्सुना नावाचा एक सामुराई ईबारागी नावाच्या एका राक्षसाचा पराभव करून त्याचा हात तोडून आणतो. तो हात सात दिवस पहाऱ्यात ठेवला की आठव्या दिवशी राक्षस मरणार असतो. पण तो हात पळवून न्यायला राक्षस सामुराईच्या मावशीचं रूप घेऊन येतो. विनवण्या करून राजवाड्यात प्रवेश मिळवतो. त्या हाताचा ताबा मिळवून पळत असताना दोघांच्यात युद्ध होतं, पण राक्षस हात घेऊन पळून जातो. अशी छोटीशी गोष्ट! मी मावशी, ओम पुरी त्सुना, राज बब्बर  त्याचा सेनापती. माझी ‘एन्ट्री’ प्रेक्षागृहातून असायची. मावशी बाहेरगावाहून येते ना! प्रेक्षागृहात जाणारा एक प्लॅटफॉर्म असतो, त्याला ‘हानामीची’ म्हणतात. त्यावर बाहेरून येताना संगीतावर नृत्य, दोन-तीन वाक्यं. यात आठ-दहा मिनिटं जायची. तोपर्यंत स्टेज हँडस् स्टेजवर पांढरं गेट आणून ठेवायचे. स्टेजवर तीन निवेदक (कोरस) असायचे. ते मध्ये मध्ये बोलून गोष्ट पुढे न्यायचे. असं एकंदर नाटक चालायचं. राक्षसाला हात मिळतो तेव्हा मावशीचं स्टेजवरच राक्षसात रूपांतर व्हायला सुरुवात होते. त्या वेळी स्टेज हँड्स मला केसांमध्ये पांढरे केस अडकवायला, किमोनोचा वरचा भाग उतरवायला आणि जीभ लाल दिसण्यासाठी ‘फूड कलर’चा कापसाचा बोळा तोंडात ठेवून परत घ्यायला मदत करायचे. राक्षसाची पोझ घेऊन (याला ‘मिये’पोझ म्हणतात) मी लढाईचे दोन-चार वार करत आत जायची आणि मग पूर्ण राक्षस झालेला दुसरा अभिनेता लढाई करत बाहेर यायचा. मजा यायची. कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. ‘नो’ किंवा ‘काबुकी’मध्ये स्त्रिया काम करत नाहीत. त्यामुळे मी, मावशीचा रोल करणारी, आशिया खंडातली पहिली स्त्री ठरले आणि जगातली दुसरी!

या अशा जपानी सादरीकरणावरून प्रेरणा घेऊन अल्काझी सरांनी ‘अंधायुग’ हे धर्मवीर भारतीजींचं नाटक बसवलं. आधी एकदा सरांनी हेच नाटक केलेलं होतं, पण आता करताना त्यांनी पोशाखात बदल केले. पुरुषांना धोतर आणि वर अर्धा किमोनो, स्त्रियांना पायघोळ किमोनो, पण मुकुट वेगवेगळे. हे करताना धृतराष्ट्र आणि गांधारी यांना अर्धे मुखवटे दिले. फक्त संवाद बोलण्यासाठी तोंडाचा भाग मोकळा ठेवला. मी गांधारी करत होते. मास्क कागदाच्या लगद्यााचा होता, तो नाकाच्या शेंड्यापर्यंत यायचा. दिसण्यासाठी डोळे कोरले होते आणि श्वासासाठी नाक मोकळं होतं. अर्धमुखवटा घातल्यावर दोन गोष्टी प्रामुख्यानं लक्षात आल्या. एक म्हणजे डोक्याची किंवा चेहऱ्याची बारीकशी हालचाल खूप मोठी दिसते. त्यामुळे त्यावर बंधनं आली ती चेहऱ्याची हालचाल जरुरीपुरतीच करण्याची. दुसरं, समोरचं दिसत जरी असलं तरी अमुक एका रेषेनंतर खालचं मान खाली न वाकवता दिसत नव्हतं. आणि त्यावर डोळ्यावर पट्टी! हे एक वेगळंच आव्हान. पायऱ्या चढाउतरायच्या तर होत्याच. न धडपडता. तालमीमध्ये त्याचीही प्रॅक्टिस केली. पायऱ्या उतरताना पायाच्या बोटांनी पायरीच्या कडेचा अंदाज घ्यायचा आणि उतरायचं. पायऱ्या मोजून लक्षात ठेवायच्या. हे ठीक झालं, पण मुखवट्यामुळे चेहऱ्यावरचे भाव पण दिसणार नव्हते. त्यामुळे आवाज, त्याचा चढउतार, एकंदर बोलण्यातून प्रतीत होणारे भाव, याकडे जास्त लक्ष पुरवणं भागच होतं. या नाटकात गांधारीनं श्रीकृष्णाला दिलेला शाप अत्यंत महत्त्वाचा आहे! सरांनी मला एक दिवस बोलावलं आणि सांगितलं, की त्यावर आपल्याला काम करायचं आहे, तू उद्याा सकाळी साडेसात वाजता स्टुडिओ थिएटरमध्ये पोहोच. त्यानंतर एक आठवडाभर रोज सकाळी त्यावर काम करत होतो. मी संवाद म्हणायची, सर सुधारणा करायचे, टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड करायचे, मला ऐकवायचे… की परत सुरू. रोज तासभर. माझ्यासाठी पर्वणीच!

‘पुराना किला’च्या अवशेषांवर नाटक करणं हा एक अविस्मरणीय अनुभव आम्हाला मिळाला. कोणतेही पुरातन अवशेष पाहाताना, त्या वास्तूत वावरताना, स्पर्श करताना जाणवतं, की त्या काळी तिथे ज्यांचा वावर होता, तो स्पर्श तसाच राहिला असेल आणि आज आपण त्याच ठिकाणी स्पर्श करतोय! आत कुठेतरी एक दुवा जाणवतो! प्रथम पुराना किला, नंतर साबरमती आश्रम, मग आगाखान पॅलेस… आणि अनेक. आठवून बघा… तुम्हाला झालंय असं? मी जरा ओघात विचारून गेले. पण या ‘रा.ना.वि.’च्या आठवणी म्हणा किंवा मला जे सांगायचंय म्हणा, ते एवढ्यावरच संपलं नाहीये. अजून बरंच  आहे… ते पुढच्या (२७ मार्च) लेखात!

hattangadyrohini@gmail.com