16 January 2021

News Flash

ज्येष्ठांचे लिव्ह इन : हात तुझा हातात..

दुरून पाहाता भारतीय विवाहसंस्था ही अत्यंत पवित्र, मंगल, सुखकर अशी सामाजिक संस्था आहे, असा समज होतो.

(संग्रहित छायाचित्र)

सरिता आवाड

सहजीवन वा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’.. हा शब्द आणि त्यामागचा विचारकल्लोळ आपल्याला नवीन नाही. लग्न न करता दोन व्यक्तींनी सहजीवन जगणं वा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणं हे लग्नव्यवस्थेला पर्याय म्हणून बघितलं गेलं असलं तरी आजही त्याला भावनिकदृष्टय़ा समाजमान्यता नाहीच.  त्यामुळे बहुतांशी आजही असे संबंध लपवून ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो. याचा अर्थ असे संबंध समाजात नाहीत का? तर आहेत. काय आहेत या जोडप्यांचे अनुभव? कोणत्या मानसिक दोलायमानातून त्यांना जावं लागतंय? याचा वेध घेणारं हे सदर आजपासून दर पंधरवडय़ाला.

दुरून पाहाता भारतीय विवाहसंस्था ही अत्यंत पवित्र, मंगल, सुखकर अशी सामाजिक संस्था आहे, असा समज होतो. दोन तरुण व्यक्तींनी एकत्र राहायला, पुनरुत्पादन करायला, मूळ कुटुंबाची एक शाखा फुलवायला समाजमान्यता देणं हे विवाहसंस्थेचं मुख्य उद्दिष्ट असतं. ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीप्रमाणे ही संस्था दुरूनच साजरी दिसते; प्रत्यक्षात त्यात अनेक खाचखळगे आहेत. पण पुरुषप्रधानतेचा जाच देणाऱ्या, व्यक्तिस्वातंत्र्याचा कोंडमारा करणाऱ्या, तडजोडीच्या गोंडस आवरणाखाली घुसमट करणाऱ्या या संस्थेला पर्याय काय हेही सुचत नाही. बदलत्या काळाप्रमाणे काही बदल विवाहसंस्थेत होत गेले आहेत. उदाहरणार्थ, विवाहासाठी संमतीवयाच्या प्रश्नावरून झालेली घुसळण आता ऐतिहासिक कथा झाली आहे. एके काळी चळवळीचा मुद्दा असलेले विधवा विवाह आता रूढ झाले आहेत. आंतरजातीय विवाहालाही कायदेशीर मान्यता केव्हाच मिळाली आहे. एकूण विवाहांपैकी सुमारे ५ टक्के  विवाह आंतरजातीय होतात असा २००५ मध्ये झालेला अभ्यास सांगतो.

म्हणजे विवाहसंस्थेमध्ये बदल होणं आपल्या सवयीचं झालं आहे. पण विवाहसंस्थेला बगल देऊन स्त्री-पुरुषांनी एकत्र येणं, राहाणं आपल्या समाजाला अजून नवीन आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे एक प्रकारे विवाहसंस्थेला बगल देणं आहे. त्यामुळे एका बाजूनं याबाबत उत्सुकता आहे आणि त्याचबरोबर मनात अनेक प्रश्नही आहेत. हे प्रश्न काय आहेत आणि वास्तवात या प्रश्नांना काय उत्तरं मिळतायत हे समजून घ्यायला हवं. कारण  प्रश्नांची उकल करताना नवे नवे प्रश्न पुढे येत राहातात.

मी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बद्दल विचार करायला लागल्यावर मुख्यत: तीन घटक माझ्या डोळ्यांसमोर आले. हे तीनही घटक परस्परांवर परिणाम करताना दिसले. या परिणामांच्या प्रक्रियेतून समाजाचं पुढे पुढे सरकणं जाणवलं.

हे तीन घटक असे- एक तर वैयक्तिक आकांक्षा, त्यावर आधारलेले मानवी संबंध, दुसरा घटक म्हणजे सामाजिक वास्तव आणि समाजमन- वेगळ्या शब्दांत समाजात रुजलेल्या धारणा आणि त्यात होणारे बदल. आणि तिसरा घटक म्हणजे यासंबंधीचा कायद्याचा अवकाश. हे तीन घटक निरनिराळे असले तरी प्रत्यक्षात मंगळागौरीतल्या खेळासारखं त्यांचं ‘गोफ विणू बाई गोफ विणू.. रात्रंदिवस गोफ विणू’ चाललेलं असतं. माझं आकलन आपल्या समोर उलगडताना तरुणाईमधलं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मी सुरुवातीच्या टप्प्यात बाजूला ठेवणार आहे. माझ्या लेखी तेही महत्त्वाचंच आहे. पण या घटिताचे ताणेबाणे खूप निराळे आहेत. त्याचप्रमाणे ‘लिव्ह इन’चं स्वातंत्र्य असलेला आदिवासी समाजही विवेचनाच्या संदर्भात बाजूला ठेवला आहे. आता नागर समाजातल्या ज्येष्ठ नागरिकांमधल्या ‘लिव्ह इन’ची प्रामुख्यानं चर्चा करायची आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातल्या बदललेल्या वैयक्तिक संबंधांची म्हणजे (पहिल्या घटकाची) काही ठळक वैशिष्टय़ं मला जाणवली.

१) वाढलेली आयुर्मर्यादा. सेवानिवृत्त झालेले किंवा लवकरच सेवानिवृत्त होणारे नागरिक शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असतात. जगण्याची, नवे अनुभव घेण्याची त्यांना उमेद असते. कवी अनिलांच्या कवितेत सांगायचं, तर ‘फिरून वर्षचक्र हे पुढे पुढेच जातसे, विशी तिशी न चाळिशीही लोटली जरी दिसे, असे तरीही गोठली न जीवनातली उषा, तशाच रंगसंगतीही वृत्ती गुंगती तशा..’ अशी अवस्था असते. अशा वेळी जर एकलेपण वाटय़ाला आलं, जोडीदार अर्ध्यावरती डाव सोडून गेला, तर अधुऱ्या कहाणीचे धागे काटय़ांसारखे रक्तबंबाळ करायला लागतात. पुन्हा अनिलांच्याच शब्दात जोडीदारानं धरलेल्या अबोल्यानं मन अगदी विकल होतं. अशा वेळी समवयस्काची साथसंगत असावी असं वाटू लागतं. कौटुंबिक आयुष्यात झालेले बदल संगतीची ओढ अधिकच गहिरी करतात. इतक्या वर्षांचं व्यवधान असलेली आपली मुलं त्यांच्या त्यांच्या व्यवसायात, नोकरीत, त्यांच्या त्यांच्या बायकामुलांमध्ये मग्न असतात. हल्ली तर बरेचदा परदेशात असतात. अशा वेळी एकलेपणाची आग मनाला जाळते. या मनस्थितीला एक सूक्ष्म पदर असतो. साठीच्या उंबरठय़ावर आयुष्यात बऱ्याच गोष्टी पार पाडलेल्या असतात. ‘जाहल्या काही चुका’ अशी जाणीव असते. पण काळाची चाकं उलटी फिरवता येत नाहीत. अशा वेळी ‘हा हात फक्त माझ्या हातात राहू दे रे’ असं म्हणणारं कोणीतरी हवं असं वाटतं. स्त्रियांच्या वाटय़ालाही ही पोकळी येते. सुप्रसिद्ध लेखिका गिरीजा कीर यांच्या ‘माझा खेळ मला मांडू दे’ या कथेत नायिकेची उतारवयातली तगमग अतिशय प्रभावीरित्या आली आहे. ही नायिका आपल्या मुलांबरोबर राहाते आहे, तिच्या सगळ्या भौतिक गरजा भागताहेत, तरीही काहीतरी हरवल्याची तगमग आहे. ‘गोष्ट सांगते ऐका’ या त्यांच्या पुस्तकातली ही कथा मुळातून वाचावी. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे साठीच्या उंबरठय़ावरच्या स्त्रिया हल्ली आर्थिकदृष्टय़ाही सक्षम झालेल्या असतात. (रुजलेल्या, मुरलेल्या स्त्री शिक्षणाचा अपरिहार्य परिणाम.) आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठीच नसून ते आपल्यासाठीही आहे, साठीनंतर तरी मला माझा सूर गवसायला हवा, अशी आच त्यांना लागते. आणखी एक निरीक्षण म्हणजे आर्थिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम स्त्री आणि पुरुष स्वत:च्या आयुष्यावर प्रयोग करायला तयार असतात.

हे काही सर्व समाजाचं चित्र नाही. पण लक्षणीय घटकाशी संबंधित हे वास्तव आहे. हा घटक तुलनेनं छोटा असला, तरी या वास्तवाचा अस्सलपणा निर्विवाद आहे. अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे वाढलेलं आयुर्मान आहे, अधिकाधिक स्वयंकेंद्री झालेली कुटुंबं आहेत, स्त्रियांच्या आर्थिक क्षमतेप्रमाणेच त्यांचं अधिक विकसित झालेलं आत्मभानही आहे. अशा वास्तवाच्या संदर्भात उतारवयाच्या स्त्री-पुरुषांनी सहजीवनाचा स्वीकार करणं मला स्वाभाविक वाटतं. पण सहजीवनावर समाजमान्यतेची मोहर चढवणं अनावश्यक वाटलं तर? का वाटतं असं?

यासंदर्भात माझा अनुभव थोडक्यात सांगायचा झाला, तर मला आणि माझे जोडीदार आनंद (करंदीकर) यांना लग्न करावंसं वाटलं नाही, कारण एकतर पुनरुत्पादनाचं वय आम्ही ओलांडलं होतं आणि आर्थिकदृष्टय़ा आम्ही एकमेकांवर अवलंबून राहाणार नव्हतो. स्वत: स्वत:ला साक्षीला ठेवून आम्ही हा निर्णय घेतला. आमचे निकटचे, समविचारी आणि समवयस्क मित्र आणि मैत्रिणी, जे बरेच सामायिक होते, त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मला वाटतं, आमचा विचार प्रातिनिधिक असावा. माझा अनुभव असा, की कायद्याचं बंधन न स्वीकारल्यामुळे आमचं नातं अधिक जिवंत झालं, कारण कुठल्याच पायरीवर आम्ही एकमेकांना गृहीत धरत नाही.

आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या सामाजिक घटितावर परिणाम करणाऱ्या दुसऱ्या घटकाचा विचार करूया. हा दुसरा घटक म्हणजे आपल्या अवतीभवतीचा समाज आणि समाजमन. प्रत्यक्ष व्यवहारात आपल्या मुलांमार्फत, इतर कुटुंबीयांमार्फत मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून हे मन लगेच जाणवतं. सहसा मुलांचा आपल्या आईच्या किं वा वडिलांच्या अशा निर्णयाला विरोध असतो. याला एक महत्त्वाचं कारण वडिलोपार्जित संपत्तीतला वाटा. हा वाटा आपण गमावणार की काय, अशी धास्ती मुलांना वाटू शकते. पण मृत्यूपत्र करून ही अडचण सोडवता येते. याहून एक अडचण मानसिक स्तरावरची असते. ती म्हणजे वडील आणि विशेषत: आई यांना आपले पालक म्हणूनच मुलांनी पाहिलेले असते.  त्यापलीकडचा माणूस जाणून घेण्याची मुलांना आवश्यकता वाटत नाही. आईच्या बाबतीत तर  ‘पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने। रक्षन्ति स्थाविरे पुत्रा: न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति,’  हे चक्र मनात ठसलेलं असतं. त्यामुळे मी सर्व गरजा पुरवत असताना असा विचार आई करतेच का?, असा प्रश्न आता गृहस्थाश्रमात असलेल्या कमावत्या मुलाला पडतो. दुसरं असं, की वैधव्य आल्यावर स्त्रीनं सन्यस्त वृत्तीनं राहावं अशी समाजाची अपेक्षा असते. मी वर उल्लेखलेल्या गिरीजा कीर यांच्या गोष्टीतही शेवटी नायिका समाजकार्य करायचं ठरवते. पण आईनं असा विरक्तीचा मार्ग नाकारून अनुरक्तीचा मार्ग स्वीकारणं, पुन्हा सहजीवनाचा पट मांडणं, हे मुलांना पचवणं कठीण जातं. यावर इलाज म्हणजे आपल्या आई-वडिलांमागचा माणूस ओळखून परस्परांशी  मैत्र करणं हे उभयपक्षी श्रेयस्कर ठरतं. समाजमनाचा आणखी एक प्रभाव म्हणजे विवाहाचं बंधन नसलं, तरी ‘लिव्ह इन’मधल्या संबंधांचं प्रारूप प्रचलित         नवरा-बायको असंच होण्याची दाट शक्यता असते. या नात्यातली सनातन उतरंड जाऊन मैत्र आणि स्नेह गाभ्याशी असलेलं नातं जोपासायला प्रयत्न करावे लागतात. सुदैवानं असे प्रयत्न करणारी तुरळक का होईना, पण जोडपी दिसू लागली आहेत.

या सदरात आपण असं सहजीवन जगणाऱ्यांची ओळख करून घेणार आहोत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’संबंधीचा कायद्याचा अवकाशही जाणून घेणार आहोत. हे प्रयत्न समाजात आता अगदी बीजरूपात आहेत. पण शांताराम आठवल्यांनी म्हटलंच आहे, ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप जाहले.. एका बीजापोटी फळे कोटी कोटी, कोटी जन्म घेती सुमने फळे’. म्हणूनच बीजरूपातल्या प्रयत्नांची ओळख पथदर्शी ठरेल असा विश्वास वाटतो.

सरिता आवाड यांनी वाणिज्य शाखेतील पदवी घेतल्यानंतर ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मधून समाजकार्याचे प्रशिक्षण घेतले. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ एज्युकेशन’मध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या प्रकल्पात काम केले. नंतर ‘बँक ऑफ बरोडा’मध्ये २५ वर्षे काम केले. मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेऊन पुन्हा सामाजिक कामात सहभाग घ्यायला सुरुवात केली. स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे ‘कुटुंब सल्ला केंद्रा’त समुपदेशनाचे काम केले. गोरेगाव येथील ‘स्वाधार’ या मृणाल गोरे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या कामातही सहभाग घेतला. ‘मिळून साऱ्याजणी’ या विद्या बाळ यांनी सुरू केलेल्या मासिकात त्यांनी संपादकीय सहाय्य केले आहे. सध्या ‘विचारवेध’ या चळवळीत पूर्ण वेळ काम करतात. त्यांचे ‘हमरस्ता नाकारताना’ हे आत्मचरित्र २०१९ मध्ये ‘राजहंस प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.

sarita.awad1@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:04 am

Web Title: article on seniors live in by sarita awad abn 97
Next Stories
1 व्यर्थ चिंता नको रे : जन्म : माणसाचा आणि अस्वस्थतेचा!
2 मी, रोहिणी.. : अभिनयाचे धडे..
3 वसुंधरेच्या लेकी : रागावलेल्या मुलींची गोष्ट!
Just Now!
X