News Flash

अढळ ध्येयनिष्ठा!

शांती देवी या भूदान आंदोलनात, तसंच गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाल्या होत्या

(संग्रहित छायाचित्र)

प्रियदर्शिनी हिंगे

१९५१ मध्ये दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी शांती देवी ओडिशातील कोरापुट जिल्ह्य़ात फिरत असतानाच त्यांची ओळख विनोबा भावे यांच्याशी झाली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला जणू कलाटणीच मिळाली. आदिवासी भाग हाच त्यांची कर्मभूमी बनला. १९५२ मध्ये कोरापुटमधील जमीन सत्याग्रह आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाल्यानंतर  सामाजिक कार्यकर्ता असलेल्या नवऱ्याला समाजसेवेत हातभार लावण्याचं दिलेलं वचन त्यांनी पतीच्या मृत्यूनंतरही अव्याहतपणे पूर्ण केलं. वयाच्या ८६ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा उत्साहानं आदिवासी, एकल महिलांसाठी काम करणाऱ्या शांती देवींचा ‘पद्मश्री’ पुरस्कारापर्यंतचा प्रवास जाणून घेण्याजोगाच.

सतराव्या वर्षी सुरू केलेलं काम अव्याहतपणे ८६ व्या वर्षीही चालू ठेवणं, तेही तितक्याच उत्साहानं, हे काही येऱ्यागबाळ्याचं काम नाही; पण हेच काम करून दाखवलं आहे नुकताच ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर झालेल्या ओडिशाच्या शांती देवी यांनी.

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या शांती देवी यांचं आयुष्य त्याच विचारांच्या वाटेवर चालत राहिलं. वयाच्या १७ व्या वर्षी, म्हणजेच १९५१ मध्ये महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी आपल्या होणाऱ्या नवऱ्याला असं वचन दिलं होतं, की ओडिशा येथील कोरापुट गावातील लोकांच्या उद्धारासाठी नवऱ्याच्या सामाजिक कार्याला त्या हातभार लावतील. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांनंतर वचनपूर्तीसाठी त्या नवऱ्यासह कोरापुट येथे हजरही झाल्या. खरं तर मनात आणलं असतं तर शिक्षण पूर्ण करून त्या ऐषोरामी आयुष्य जगू शकल्या असत्या; पण शांती देवी हे न थांबणाऱ्या वादळाचंच दुसरं नाव होतं! त्यांनी पती डॉ. रतन दास यांच्यासोबत एका वेगळ्या आयुष्याला सुरुवात केली.

१८ एप्रिल १९३४ मध्ये जन्मलेल्या शांती देवी यांचा विवाह सामाजिक कार्यकर्ते डॉ. रतन दास यांच्याशी झाला. लहानपणापासूनच शांती देवी यांना अन्यायाची चीड होती. पुढे गांधीवादी विचारसरणीचा स्वीकार करत गोपबंधू चौधरी यांनी स्थापन केलेल्या गांधी आश्रमाशी त्या जोडल्या गेल्या. लग्नानंतर त्यांनी बालासोर शहर सोडलं व कोरापुट येथील गावात त्या वास्तव्यास आल्या. त्यानंतर दक्षिण ओडिशाच्या रायगड जिल्ह्य़ात त्यांनी काम सुरू केलं. एखादं शहर सोडून अतिमागास अशा आदिवासीबहुल भागात जाऊन काम करणं हा मोठा निर्णय होता. सामान्यत: अनेक जण असा निर्णय घेण्यास धजावलेही नसते. मात्र शांती देवींची ध्येयनिष्ठा अढळ होती. त्यांनी कधी तक्रार केली नाही की मागे वळून पाहिलं नाही.

शांती देवी या भूदान आंदोलनात, तसंच गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. १९५१ मध्ये विनोबांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. १९५२ मध्ये कोरापुट जिल्ह्य़ातील जमीन सत्याग्रह आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. आदिवासींच्या जमिनी काबीज करणाऱ्या जमीनदारांच्या विरोधात त्यांनी संघर्ष पुकारला आणि बोलानगरी, कालाहांडी, तसंच संबलपूर जिल्ह्य़ातील भूदान आंदोलनात सक्रिय झाल्या. याच दरम्यान त्यांनी गोपालनबाडी येथील आश्रमात भूदान कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं. या आश्रमाची स्थापना मालती देवी (ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नबाकृष्ण चौधरी यांच्या पत्नी) यांनी केली होती. याच दरम्यान आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या ४० आदिवासींच्या सुटकेसाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा यासाठी त्यांनी केलेला संघर्ष चांगलाच गाजला.

१९६४ मध्ये जबारगुडा गावी लोकांच्या सहभागानं त्यांनी ‘सेवा समाजा’ची उभारणी केली. या आश्रमात गरीब व अनाथ मुलांना आश्रय देत त्यांना मायेची, प्रेमाची ऊब शांती देवी यांनी दिली.  सुमारे १३१ अनाथ मुलामुलींची त्या आई झाल्या आणि त्यांचं संगोपन केलं. अनाथ मुलांसाठी त्यांनी जबारगुडा व नुआपाडा, तसंच रायगड जिल्ह्य़ातील गुनुपुर येथे अनाथाश्रमांची स्थापना केली. या आश्रमात मुलांना केवळ डोक्यावर छप्पर आणि दोन वेळचं जेवण देऊन त्या थांबल्या नाहीत, मोठी होऊन हीच मुलं समाजाचा आधारस्तंभ बनणार आहेत, त्यामुळे मूल्यशिक्षणावर त्यांचा भर जास्त होता. आईची माया देतानाच या मुलांच्या शिक्षणाचीही व्यवस्था त्यांनी केली. मुलांना केवळ जगवणं हा उद्देश न मानता त्यांना आत्मसन्मानही मिळायला हवा, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे यातील मुलं पुढे वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर पोहोचली, असंख्य संस्थांमध्ये ती आत्मसमानानं उभी राहिली. अनाथ मुलांच्या संगोपनामध्ये सर्वात मोठा मुद्दा असतो तो अनाथ मुलींच्या आयुष्याचा. त्यांना आपल्या पायावर उभं राहाण्यासाठी सक्षम करत असतानाच या मुलींची लग्नं लावण्यापासून अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं योग्य पद्धतीनं पुनर्वसन करण्यावरही त्यांनी कटाक्षानं लक्ष दिलं.

डॉ. रतन दास आणि शांती देवी हे जोडपं भूदान आंदोलनात अतिशय सक्रिय होतं. हाडाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून या दोघांची ओळख होती. डॉ. रतन दास यांच्या मृत्यूनंतरही शांती देवी यांच्या कामात खंड पडला नाही, त्यांनी ते सुरूच ठेवलं. त्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. मात्र या पुरस्कारांपेक्षाही जास्त आनंद आपल्याला गरीब आणि अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि स्मितहास्यानं होतो, असं शांती देवी नेहमी सांगतात. ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतरही आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना त्या म्हणाल्या होत्या, की हा पुरस्कार माझा नसून सर्व मुलांचा आहे. या पुरस्कारानं अनाथ मुलांचाही गौरव केला गेला आहे!

अनाथ मुलांबरोबरच विधवा-परित्यक्ता स्त्रियांसाठी, कुष्ठरोग्यांसाठीही शांती देवींनी काम केलं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षीही त्या स्वस्थ बसलेल्या नाहीत. स्त्रियांना समाजामध्ये मिळणारं दुय्यम स्थान पाहून त्या व्यथित होतात. येत्या काळात स्त्रियांना योग्य सन्मान मिळावा म्हणून त्यांचं सक्षमीकरण करणं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं, यासाठी त्या काम करणार आहेत. गांधी आणि विनोबांचा विचार त्या अक्षरश: जगत आहेत.

lata.dabholkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2021 12:37 am

Web Title: article on shanti devi journey to the padma shri award abn 97
Next Stories
1 बहिष्कृता ते पद्मश्री
2 बँकवाली बाई!
3 फॅशन डिझायनर आजी
Just Now!
X