सगळ्यांभोवतीच आभासी जगाचा वेढा घट्ट होत चाललेला असताना आणि कुटुंब-काम यांच्यातला तोल सांभाळताना, नात्यांना जोपासण्यासाठी लागणारी प्रगल्भता, लवचीकता आणि संयम, यांची मोट बांधणं अनेकांना शक्य होत नाही. आई आणि वडील दोघंही एकत्रितपणे हे करताना जर कठीण ठरत असेल तर ‘एकल पालकत्व’ स्वीकारलेल्या पित्याला कोणकोणत्या आव्हानातून जावं लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आज आपण चित्रपटसृष्टीतील अशाच तीन एकल वडिलांना भेटणार आहोत, त्यातील एक आहे ‘आयव्हीएफ’च्या माध्यमातून पिता झालेला तुषार कपूर, दुसरा, मुलीचं दत्तक पालकत्व स्वीकारलेला पिता प्रकाश झा आणि तिसरा आहे, पत्नीचं अकाली निधन झाल्यानंतर मुलासाठी करिअर काही काळ बाजूला ठेवणारा राहुल देव. उद्याच्या आंतरराष्ट्रीय ‘फादर्स डे’च्या (२१ जून) निमित्तानं.. मुलाखतकार –  पूजा सामंत samant.pooja@gmail.com

प्रकाश झा

‘मृत्युदंड’, ‘गंगाजल’, ‘राजनीती’, ‘आरक्षण’ असे वेगळ्या विषयांवरचे आणि लोकप्रिय चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रकाश झा हे वैयक्तिक आयुष्यात ‘एकल पिता’ आहेत. साधारण ३३ वर्षांपूर्वी त्यांनी मुलीला दत्तक घ्यायचं ठरवलं. पत्नीबरोबर (दीप्ती नवल) विभक्त झाल्यावरही या मुलीला सामंजस्यानं सांभाळलं. आज त्यांची मुलगी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून बस्तान बसवतेय. ‘‘ती स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय याचं पिता म्हणून समाधान वाटतं,’’ अशी भावना व्यक्त करत झा या प्रवासाविषयी भरभरून बोलतात. तो प्रवास त्यांच्याच शब्दांत..

‘‘मी त्या वेळेस पुण्याच्या ‘फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’मध्ये शिकत होतो. बिहारहून पुण्याला आलो आणि ‘एफटीआयआय’मध्ये प्रवेश घेतला तेव्हा आपण अर्थपूर्ण चित्रपटांची निर्मिती करायची, असं स्वप्नं उरी बाळगलं होतं. एका लघुपटासाठी अनाथाश्रमात जाण्याचा योग आला. तिथली ‘निरागस आयुष्यं’ बघून मला जाणवलं, की ही मुलं पोटाच्या भुकेपेक्षा वात्सल्याला जास्त पारखी असतात. तिथं बागडणाऱ्या छोटय़ा मुलींना पाहून उदास झालो. त्यांचं निर्मळ हास्य मात्र मनात घर करून गेलं. ज्या काळात मुलींचा जन्म नकोसा होता, त्या काळात मी निश्चय केला, की मी आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्यावर एका मुलीला नक्की दत्तक घेईन. जीवन आणि करिअरच्या पुढच्या टप्प्यावर दीप्ती (नवल) माझ्या आयुष्यात आली. १९८५ मध्ये आम्ही लग्न केलं. संसार सुरु झाला आणि अचानक दीप्तीचा गर्भपात झाला. आपलं बाळ असावं ही इच्छा होतीच. तेव्हा ‘सरोगसी’सारखे पर्याय नव्हते. शिवाय माझी मुलगी दत्तक घेण्याची फार पूर्वीपासूनची इच्छा आहे हे दीप्तीलाही ठाऊक होतं. १९८८ मध्ये दिल्ली ‘दूरदर्शन’साठी मालिका दिग्दर्शित करत होतो. त्याच काळात एका स्वयंसेवकाकडून मला समजलं, की १० दिवसांचं बाळ एका चित्रपटगृहात सापडलं आहे आणि जंतुसंसर्ग झाल्यामुळे ते आजारी आहे. कल्पना नाही का, पण त्या न पाहिलेल्या त्या मुलीविषयी मन भरून आलं. तिला पाहायला हवं, उपचार करायला हवेत, असं ठरवलं आणि योग्य ती परवानगी मिळवून या लहानगीला मी घरी आणलं. चांगले उपचार दिले. पुढच्या १२-१५ दिवसांत ही चिमुकली ठणठणीत बरी झाली. पण या १५ दिवसांत त्या छकु लीनं माझ्या मनात स्थान मिळवलं होतं. मला तिचा इतका लळा लागला, की अधिकृतपणे मी तिला दत्तक घ्यायचं ठरवलं. कामानिमित्त मी तेव्हा दिल्लीत आणि दीप्ती तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी मुंबईत होती. ती दिल्लीत आली आणि आम्ही दोघांनी अधिकृतपणे आई-वडील म्हणून दत्तकविधानाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. दीप्तीलाही या आमच्या लेकीनं लगेचच आपलंसं केलं. तिनंच तिला नाव दिलं, दिशा. पण दरम्यान आमचा संसार डळमळीत होऊ लागला होता. आमच्यामध्ये तात्त्विक मतभेद होऊ लागले आणि अखेर १९८८ मध्ये आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

दिशाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. तिला आम्ही दत्तक घेतलं ते पूर्ण वर्ष मी तिची अतिशय काळजी घेतली होती. तिला औषध देणं, आंघोळ घालणं, तीट-पावडर लावणं या बाळाला वाढवण्यातल्या सुरुवातीच्या कामांमध्ये मला हळूहळू गती येऊ लागली. माझ्याकडे तेव्हा ‘मारुती-८००’ गाडी होती. चित्रपटांच्या चित्रीकरणाला जायचं असे तेव्हा मी वेताच्या मोठय़ा बास्केटमध्ये तिला ठेवून गाडीत माझ्या बाजूच्या सीटवर ठेवत असे. त्या काळात माझं काम आणि दिशाला सांभाळणं असं दुहेरी काम मी मोठय़ा प्रेमानं केलं. त्यानंतरच्या काळात मला दिल्लीत खास अशी काही कामं उरली नाहीत. ‘दामूल’सारखे चित्रपट मी ‘एनएफडीसी’मधून (‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’) केले. तोपर्यंत मी मुंबईच्या व्यावसायिक चित्रपटसृष्टीचा हिस्सा झालेलो नव्हतो. विभक्त झाल्यामुळे मी एकटाच होतो. शेवटी माझ्या मूळ गावी- पाटण्याला (बिहार) जायचं ठरवलं.  तिकडे जाऊन पूर्ण वेळ दिशाला द्यायचं ठरवलं. पाटण्याला स्वयंसेवी संस्था सुरू करावी, सामाजिक कार्य करावं आणि दिशाला सांभाळावं, असा माझा विचार होता. दिशाची आपल्या आजीबरोबर- माझ्या आईबरोबर- छान गट्टी जमली. तोपर्यंत माझी लेक साडेचार वर्षांची झाली होती. दुर्दैवानं माझ्या आईचं निधन झालं. माझा मानसिक आधार गेला. दिशाला आपलं सर्वस्व असल्याप्रमाणे सांभाळणाऱ्या माझ्या आईचं जाणं मला मोठय़ा संकटात टाकून गेलं. माझ्याकडे म्हणावं तसं कामही नव्हतं. मी नाइलाजानं दिशाला घेऊन मुंबईला आलो. तिला सांभाळणं आणि नवं काम शोधणं हाच त्या काळात माझा दिनक्रम होता. मला राहण्यासाठी घरदेखील नव्हतं. ३-४ महिने ‘गोल्डन मनोर’ या हॉटेलमध्ये राहिलो. पण अशी अनिश्चितता फार काळ चालणारी नव्हती. दिशाच्या भविष्याचा गंभीरपणे विचार केला आणि तिला पाचगणीच्या ‘संजीवनी’ शाळेत प्रवेश घेतला. ती फारच लहान असल्यानं शाळेनं मला तिच्यासह शाळेच्या वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली. पुढचे ८-१० दिवस तिथे राहिल्यावर दिशा त्या वातावरणाला, शिक्षकांना सरावली आणि मी थोडासा निर्धास्त होऊन मुंबईला आलो.

१९९५-९६ दरम्यान मला ‘मृत्युदंड’ चित्रपट मिळाला आणि हळूहळू कारकीर्द वेग घेऊ लागली. दिशाला पाचगणीला भेटण्यासाठी मी दर आठवडय़ाला जात असे. दीप्तीसुद्धा चित्रीकरणातून वेळ काढून दिशाला भेटायला जात असे. तिचे खूपसे वाढदिवस आम्ही कधी मुंबईत, तर कधी पाचगणीला साजरे केलेत. दिशानं १३-१४ व्या वर्षांत पदार्पण केलं आणि मग दीप्तीनं तिचा ताबा घेतला. मायलेकींचं संभाषण, भेटीगाठी वाढल्या. दिशा हळूहळू मोठी होत होती. आपले प्रश्न, हितगुज ती तिच्या आईशी ‘शेअर’ करू लागली. दिशा १२ वर्षांची झाली आणि एकदा मी तिला विश्वासात घेऊन ती माझ्या आणि दीप्तीच्या आयुष्यात कशी आली हे समजावून सांगितलं. तिला अंधारात ठेवलं नाही. ती प्रेमानं मला बिलगली. तो क्षण माझ्यासाठी समाधानाचा होता. आत्तापर्यंत केलेल्या प्रयत्नांचं चीज झालं होतं. मी अधिकच निश्चिंत झालो. शाळांमधल्या सुट्टय़ांमध्ये दिशा मुंबईत माझ्या घरी येऊन राहू लागली. आम्हा बाप-लेकीचं नातं खूप छान परिपक्व होत होतं. सुदैवाने दिशाला वाढवताना मला कधी कुठल्या आजारपणाला किंवा इतर समस्यांना तोंड द्यावं लागलं नाही.

ती मोठी होत होती तसतसं तिलाही तिचं करिअर खुणावू लागलं. बारावी उत्तीर्ण झाल्यावर तिनं आम्हाला सांगितलं, की तिलाही आमच्याप्रमाणेच चित्रपटसृष्टीत करिअर करण्यात रस आहे. सुरुवातीला तिला संगीतात करिअर करायचं होतं. तिनं शास्त्रीय संगीताचे धडेही घेतले. पण जेव्हा ती आमच्या ‘होम प्रॉडक्शन फिल्म्स’साठी ड्रेस डिझाईन करू लागली, तेव्हा लक्षात आलं की तिला फॅशन आणि कॉश्च्यूम डिझायनिंगमध्ये खूप रस आहे. तिनं माझ्या चित्रपटातील कलाकारांचे कपडे डिझाइन करायला सुरुवात केली आणि हा प्रवास पुढे ‘कार्यकारी निर्माती’पर्यंत पोहोचला. दिशानं ‘फ्रॉड सैय्या’ या चित्रपटाची निर्मिती केली, २-३ कथाही लिहिल्या. लवकरच माझी लेक पूर्णपणे निर्माती म्हणून स्वत:ची कारकीर्द सुरू करतेय. तिच्या पुढील चित्रपटाचं नाव ‘ड्रामा क्वीन’ आहे. संकलन, निर्मिती यात ती रस घेतेय याचा मला नितांत अभिमान आहे. स्वतंत्र राहून बघण्याची हौसही ती सध्या भागवून घेतेय. सावलीत न राहता खुल्या आकाशाचा अनुभव घेतेय.

दीप्तीला साहित्य, कविता यांचं अंग, अभिरुची आहे. हा कल हळहळू दिशातही दिसतोय. पण आमची आवड दिशामध्ये मुद्दामहून रुजवणं यापासून आम्ही दूरच

राहिलो. दिशाला तिच्या जीवनात काय करायचं आहे हे तिनं स्वत:हून ठरवल्याचा आनंद वाटतो. मी आणि दीप्तीप्रमाणेच आमच्या लेकीला स्वातंत्र्य पसंत आहे. तिला एक स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे, आणि त्या दिशेनं तिचा प्रवास घडतोय याचं पिता म्हणून मला समाधान आहे.’’

‘मी पापाज् डॉटर’

     –  दिशा झा

माझ्या आईबाबांनी त्यांच्या करिअरमध्ये जे स्थान मिळवलंय त्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आला आहे. दोघांनीही मला वाढवलं असलं तरी मी बाबांच्या अधिक जवळची आहे, ‘पापाज् डॉटर’ म्हणा ना. मी त्यांना बाबा म्हणते आणि ते मला लाडानं ‘बेबो’ म्हणतात. सध्या मी निर्माती आणि कॉश्च्यूम डिझायनर म्हणून आपलं बस्तान बसवतेय. माझ्या ‘बॅनर’चं नाव आहे ‘पेन, पेपर्स, सीझर्स एंटरटेनमेंट’. अर्थात कागदावर पेनानं लिहिलेली कथा, निर्मिती आणि कात्री- म्हणजे संकलन! माझं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व फुलवण्यास आई-बाबांनी नेहमी मदत केली. बाबांच्या ‘राजनीती’ या चित्रपटापासून मी त्यांना मदत करू  लागले. निर्मिती, कथा, दिग्दर्शन यात मी साहाय्य करत असे. माझ्या शंका-कु शंकांवर त्यांच्याकडे नेहमीच उत्तरं असत आणि आजही असतात. बाबांचं वैशिष्टय़ असं, की ते माझ्यावर कधीही रागावत नाहीत. माझं काही चुकलं की मात्र गप्प होतात. त्यांचा तो अबोला मात्र मी सहन करू शकत नाही. माझं काही चुकलं तर मला त्यांनी रागवावं, चिडावं, पण गप्प राहू नये असं मला वाटतं. पण त्याचं ते मौन काही काळापुरतं असतं हेही मला माहीत आहे. माझ्यावर संस्कार करण्यात आईबाबांचा दोघांचा सहभाग होता. पण बाबांचं कौतुक यासाठी वाटतं, की मी पाचगणीला शिकायला असताना ते मुंबईहून अगदी न चुकता ७-८ तास सलग गाडी चालवत मला भेटायला येत असत. त्या काळात मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’देखील झाला नव्हता. माझ्यासाठी खाऊ, खेळणी घेऊन येत आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तितकाच प्रवास करून मुंबईला जात. तो त्यांच्या अथक परिश्रमाचा, संघर्षांचा काळ होता. आपलं करिअर कायम ‘बॅकसीट’वर ठेवून मला त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं. अशा बाबांची मुलगी म्हणून मला त्यांचा सदैव अभिमानच वाटेल.

आयुष्य दोघांचंच.. समाधानाचं!

तुषार कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतला देखणा नायक जितेंद्रनं साठ ते ऐशींचं त्रिदशक रुपेरी पडद्यावर गाजवलं, तर त्यांची पत्नी शोभा कपूर आणि लेक एकता कपूर यांनी ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची स्थापना करून टीव्ही मनोरंजन क्षेत्रात एक वादळ आणलं. जितेंद्रचा धाकटा मुलगा तुषार कपूर यानंही वडिलांसारखं चित्रपटक्षेत्रातच पाऊल टाकलं. पण आता त्याची एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे ‘एकल पिता’ ही. तुषारनं ‘आयव्हीएफ-सरोगसी’ या तंत्राचा उपयोग करून पितृत्व स्वीकारलं. जितेंद्रनं एकदा प्रसारमाध्यमांशी बोलताना तुषारबद्दल अत्यंत समाधानानं म्हटलं होतं,‘‘माझ्यापेक्षाही तुषार उत्तम पिता आहे याचा मला अभिमान आहे.’’ एकल पिता असणाऱ्या तुषारनं आपल्या लेकासोबतच्या या चार वर्षांचा प्रवासाबद्दल मारलेल्या या गप्पा.

‘‘ उच्चशिक्षणासाठी मी अमेरिकेत गेलो खरा, पण पदवी घेण्यापूर्वीच वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून अभिनयातच ‘करिअर’ करावं असं मला वाटू लागलं आणि पुन्हा मुंबईत परतलो.  करिअरला सुरुवात झाली आणि एकापाठोपाठ-एक असे चित्रपट करता-करता मी वयाची पस्तिशी गाठली. अर्थातच घरून आधी दीदीच्या (एकता कपूर ) आणि नंतर माझ्यामागे लग्नाचा लकडा लागला. ते स्वाभाविकही होतं, पण माझ्या पसंतीस पडेल अशी जोडीदार मिळाली नाही. ‘अरेंज्ड मॅरेज’वर माझा विश्वास नाही. त्यात दीदी आणि माझं करिअर सुरूच होतं. तशीच आणखी दोन वर्ष निघून गेली. माझे समवयीन मित्रमैत्रिणी माझ्या संपर्कात होते, खऱ्या अर्थानं आदर्श असं माझं कुटुंब सोबतीला होतं. पण हळूहळू मित्रमैत्रिणीही आपापल्या वैयक्तिक विश्वात रमू लागले होते. मलाही वाटू लागलं, की लग्न जेव्हा होईल तेव्हा होईल, पण पिता व्हावं असं खूप आतून वाटू लागलं. आपल्या अगदी जवळचं, आपलं माणूस ज्याच्याबरोबर जगावं, वाढावं, सगळे अनुभव घ्यावेत असं वाटू लागलं. ’’

‘‘२०१५ मध्ये एकदा तिरुपती-चेन्नई प्रवासात ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांची भेट झाली. गप्पांच्या ओघात मी त्यांना माझी बाबा होण्याची इच्छा सांगितली. माझं वय वाढत चाललंय आणि उतारवयात पिता होण्यापेक्षा या वयातच माझं मूल असावं, त्यानं मला ‘पापा’ हाक मारावी, अशी असोशी वाटत असल्याचंही सांगून टाकलं. त्या वेळी प्रकाश झा यांनी आपलेपणानं समजून घेत मला काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी मला त्यांचा वैयक्तिक अनुभवही साांगितला. जवळपास  ३२ वर्षांपूर्वी झा यांनी एका मुलीला दत्तक घेतलं. अर्थात त्या वेळी त्यांच्या पत्नी दीप्ती नवल त्यांच्यासोबत होत्या.‘ सरोगसीद्वारे तू सहज पिता होऊ शकतोस,’ असा एक वेगळाच मार्ग त्यांनी मला दाखवला.  सरोगसीसाठीच्या निष्णात डॉक्टरांची माहितीही सांगितली. मला त्याचं ते सांगणं इतकं भावलं की पुढच्या सगळ्या गोष्टी सहज घडत गेल्या. डॉक्टरांनी मार्गदर्शन तर केलंच, पण ‘सरोगेट मदर’ या संकल्पनेविषयी संपूर्ण माहिती आणि खात्री दिली. डॉक्टरांना भेटल्यावर मी माझा मानस घरी बोलून दाखवला. माझ्या या निर्णयाचं- खरं म्हणजे ‘बोल्ड’ निर्णयाचं घरी स्वागतच झालं आणि २०१६ मध्ये मी सरोगसीच्या माध्यमातून पिता झालोही.

घरात सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. माझी दीदी एकता त्याची आत्या आहे, पण तिनं त्याला कायमच आईची माया दिली.  त्याचं ‘लक्ष्य’ हे नावंही तिनंच ठेवलं. लक्ष्यच्या संगोपनात आमचं संपूर्ण कुटुंब रमलेलं पाहून दीदी एकतानंही लग्नाशिवायच ‘सरोगसी’ आणि ‘आयव्हीएफ’द्वारे आई होण्याचा निर्णय घेतला आणि शब्दातीत आनंद मिळवला. तिनंही योग्य वेळी हा निर्णय घेतला. तिच्या लेकाचं नाव ‘रवी’. जे आमच्या डॅडचं खरं नाव आहे. लक्ष्य आणि रवी या दोन लहानग्यांमुळे घराचं गोकु ळ झालंय. वयाची पंचाहत्तरी उलटलेले माझे वडील आणि एकाहत्तरीची आई यांच्या आयुष्यात एक अत्यंत सुखद वळण आलंय. त्यांना या नातवंडांत रमताना पाहून आम्हालाही आनंद होतोय. लग्न झालं नाही म्हणून मातृत्व-पितृत्व अनुभवण्यातला नैसर्गिक आणि सहज आनंद कशाला गमवायचा, असं माझं आणि दीदीचं वैयक्तिक मत!

लक्ष्य माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला जो आनंद, जे समाधान लाभलं आहे ते शब्दांत सांगता येणार नाही. सांगायचंच झालं तर मी म्हणेन माझ्या आयुष्यात  एक ‘ठहराव’ आला आहे. एक निश्चिंतता.. आयुष्यातले अनावश्यक प्रश्न, बेचैनी, अस्वस्थता, उदासी निघून गेलीय. माझ्या लाडक्यासाठी काय करू अन् काय नको असं होतं अनेकदा.  एका अर्थी जीवन खूप ‘सॉर्टेड’ झालंय. लक्ष्यला काय-काय शिकवावं, त्याला घेऊन सहलीला, फिरायला कुठे जावं, अशा सारखे अनेक प्रश्न अन्य कुठल्याही पित्याप्रमाणे माझ्याही मनात सतत येत असतात. रोजचं काम संपलं की मन घरी धाव घेतं. माझा लेक माझी मनापासून वाट पाहत असतो, ते पाहिलं की पिता म्हणून मी सुखावतोही.  लक्ष्य आणि रवी आता आमच्या आयुष्यातले अविभाज्य घटक झाले आहेत.

मी त्याचा ‘एकल पिता’ असल्यामुळे त्याच्यासाठी आई आणि वडील या दोन्ही भूमिका मला पार पाडायच्या आहेत, याची मला जाणीव आहे. त्याचा शाळेतला प्रवेश, ‘ओपन हाऊस’, गृहपाठाकडे लक्ष देणं, हेच नाही, तर तो लहान असताना त्याचा ‘डायपर’ बदलणं, त्याचं खाणं तयार ठेवणं ही सगळी कामं मीच केली. सुदैवानं लक्ष्य अतिशय निरोगी आहे. त्यामुळे त्याला मांडीवर घेऊन रात्र-रात्र जागत राहावं लागलंय, असं अजून तरी घडलेलं नाही.  सध्या टाळेबंदीच्या काळातही मी संपूर्ण काळजी घेऊन लक्ष्यला संध्याकाळी किमान १५-२० मिनिटं बाहेरच्या हवेत खेळवतो. सध्या मीही घरी असल्यानं लेकाबरोबर अधिकाधिक वेळ घालवता येतो आहे. शिवाय त्याचे अभ्यासाचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. त्या वेळी मीही त्याच्याबरोबर बसून ते पाठ घेत असतो, त्याचं एक वेगळंच समाधान मिळतं. एरवीसुद्धा सिनेमांच्या शूटिंगवरून घरी आल्यानंतर मी माझा ‘क्वालिटी टाइम’ लक्ष्यला देतो.

मी आणि एकता लहान असताना डॅड अनेक चित्रपटांमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांचा वेळ आम्हाला तितकासा मिळाला नाही. मग शक्य होईल तेव्हा आई मला आणि एकताला त्यांच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी नेत असे. अर्थात वडिलांचा अपुरा वेळ मिळाल्यानं आम्हा मुलांचं खूप नुकसान झालं असं मी म्हणणार नाही. उलट तेव्हा त्यांची कमतरता जाणवल्यामुळे आता मी माझ्या मुलाला शक्य तितका जास्त वेळ द्यावा अशी इच्छा प्रकर्षांनं निर्माण झाली.

मुलं वाढत असताना तुम्हीही वडील म्हणून वाढत असता. आपलं मूल कसं वाढतंय हे जाणून घेण्याची इच्छा पिता म्हणून सर्वकालीनच असते. बहुधा म्हणूनच लक्ष्यनं टाकलेलं पहिलं पाऊल, त्यानं उच्चारलेले पहिले शब्द, त्यानं म्हटलेली पहिली कविता हे सगळं ‘रेकॉर्ड’ करून ठेवलंय. माझ्यासाठी तो अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे मी नसतो तेव्हाची छायाचित्रं, व्हिडीओ काढण्यासाठी डॅडनं एका व्यक्तीची नेमणूक केलीय. लेकाची बहुतेक छायाचित्रं आणि व्हिडीओ मी कौतुकानं ‘इन्स्टाग्राम’वर ‘शेअर’ करतो. लक्ष्य कायम लहान राहणार नाहीये, तो प्रत्येक क्षणी मोठा होतोय, वाढतोय आणि या सगळ्या आठवणी मला संग्रही ठेवायच्या आहेत. तो मोठा झाल्यावरही त्या आठवणी जगायच्या आहेत. त्याचं सामान्य ज्ञान चांगलं असावं, आजूबाजूच्या घडामोडी त्याला माहीत असाव्यात, वाचनाची आणि खेळाची गोडी लागावी, म्हणून मी प्रयत्नशील असतो. आम्ही पंजाबी असलो तरी लक्ष्यला पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेसह इथल्या भाषेचं- मराठीचं ज्ञानदेखील असावं त्यासाठीही प्रयत्न करतोय. त्यानं घरातल्या नोकरचाकरांसह सगळ्यांचा आदर करावा, स्वत:ची कामं स्वत: करण्याची त्याला सवय लागावी, तो स्वावलंबी व्हावा, यासाठी मी त्याला जाणीवपूर्वक घडवतोय. पण खरं तर आमच्या घराला लक्ष्य आणि रवीमुळे शिस्त लागली आहे, असं मी म्हणेन.  मोठय़ा माणसांना घराची ओढ लागलीय, ही या मुलांची किमया आहे. लक्ष्यला पिता म्हणून वाढवताना मीही घडतोय, नव्यानं जगतोय. आमचा एक समवयस्क पालकांचा ‘व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप’  आहे. करीना कपूर (खान) देखील या ग्रुपमध्ये आहे. आमची पूर्वीही मैत्री होती, पण आता तिचा तैमूर आणि माझा लक्ष्य जवळपास एकाच वयाचे असल्यानं एकमेकांचे अनुभव आम्ही सांगत असतो. त्याचा फायदाही होतो.  लक्ष्यनं नुकतीच वयाची ४ वर्ष पूर्ण केली. त्याला भरवावं लागू नये, त्याने स्वत:च्या हाताने जेवावं, यासाठी नेमकं  काय करावं अशा सारखे प्रश्न मला पडतात. मग मी ते या ग्रुपवर टाकतो.

लक्ष्यसोबत माझं मित्रत्वाचं नातं कायम तसंच राहील, याची मला खात्री आहे. मी नवीन पिढीतला बाप आहे. ‘एकल पिता’ असल्याचा माझ्यावर आता कुठलाही ताण नाहीये. त्यापलीकडे आमचं नातं के व्हाच पोचलंय.. आता तो आणि मी.. दोघांचं आयुष्य.. खूप खूप समाधानाचं!

आई आणि वडील यांच्यातला तोल 

राहुल देव

राहुल देव, अनेकांना त्यांच्या चित्रपटांमधल्या खलनायकाच्या भूमिकांमुळे  माहिती आहेच, पण पत्नीच्या अकाली निधनानंतर मुलाच्या जीवनातली आईची पोकळी भरून काढण्यासाठी धडपडलेला बाप म्हणून असणारं त्यांचं वेगळं रूप मात्र अनेकांना माहीत नाही.  सुरुवातीचा काळ आपल्या व्यवसायातच मग्न असणारा आणि नंतर मात्र मुलाची गरज लक्षात घेऊन काही वर्ष करिअर बाजूला ठेवून मुलाबरोबर जगणारा बाप, असा त्यांचा प्रवास कसा झाला तो अनुभव त्यांच्याच शब्दांत..

‘‘आम्ही मूळचे दिल्लीचे. वडील पोलीस अधिकारी तर आई शाळेची मुख्याध्यापिका. आम्ही भावंडं मध्यमवर्गीय मूल्यांमध्ये वाढलो. पुढे मी रीनाच्या प्रेमात पडलो. त्या वेळेस मी जेमतेम १८ वर्षांचा आणि रीना १९ वर्षांची होती. तिच्यात उपजतच परिपक्वता, ममता, जबाबदारीची जाणीव सगळं काही होतं. आमचा संसार तिनं अतिशय निगुतीनं सांभाळला. माझं ‘मॉडेलिंग’मधलं करिअर  हळूहळू आकाराला येत होतं. सिद्धांतचा जन्म झाला आणि आमच्या आयुष्यातला आनंद कित्येक पटींनी द्विगुणित झाला. त्या काळात मी झपाटल्यासारखा काम करत होतो. त्यामुळे सिद्धांतला पिता म्हणून फारसा वेळ देणं शक्य व्हायचं नाही. रीना मात्र आनंदानं आई आपल्या मुलांसाठी जे-जे काही करते, ते सगळं करत होती. पण २००८ मध्ये रीनाला कर्करोगाचं निदान झालं आणि १६ मे २००९ रोजी तिचं निधन झालं. ते सारं पचवणं कठीण होतं. मी सैरभैर झालो होतो. सिद्धांत तर तेव्हा फक्त दहा वर्षांचा होता. या दहा वर्षांमध्ये त्याचं आणि रीनाचं एक वेगळंच घट्ट विश्व निर्माण झालं होतं. या माय-लेकरांच्या कोशात मी कधी शिरू शकलो नव्हतो. त्यांच्या गप्पा, त्यांचं गृहपाठ घेणं, विविध स्पर्धाची तयारी, खरेदी, या सगळ्यामध्ये मी कु ठेच नव्हतो खरं तर. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य यावं म्हणून मी कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. रीनाच्या अचानक जाण्यानं कुटुंबाच्या सुखाला सुरुंग लागलाच, पण सिद्धांतच्या भावविश्वाला इतके तडे गेले होते, की  त्याला कसं सांभाळायचं, हा माझ्यापुढे प्रश्न होता.

तिच्या आजारपणामुळे विस्कटलेली आर्थिक घडी कशी सांभाळू, सिद्धांतला कसं सावरू, भविष्यात काय होणार, असे असंख्य प्रश्न माझ्यासमोर होते. कुठल्याही प्रश्नांची उकल होत नव्हती. मी प्रथमच सिद्धांतच्या शाळेत त्याच्या ‘ओपन हाऊस’साठी गेलो आणि त्यानंतर त्याचं शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत जात राहिलो. तिथे येणाऱ्या सगळ्या पालकांमध्ये मी कायम एकमेव पुरुष असायचो हे तेव्हा जाणवलं. अर्थात सुरुवातीला वाटणारं अवघडलेपण नंतर  राहिलं नाही. सिद्धांतची आई आणि वडील दोन्ही मीच होतो त्यामुळे मला तसं वागून चालणारही नव्हतं. पण त्याचा एकटेपणा, त्याच्या मनात निर्माण झालेली पोकळी कमी होत नव्हती, म्हणून मी मुंबईला काही काळासाठी रामराम ठोकला आणि सिद्धांतला घेऊन दिल्लीत- माझ्या आई-वडिलांकडे राहिलो. चार-पाच वर्ष माझं चित्रपटांमधलं आणि मॉडेलिंगमधलं करिअर गुंडाळून ठेवलं, कारण चित्रीकरण किंवा मॉडेलिंग करता-करता सिद्धांतला वेळ देणं, त्याचा अभ्यास घेणं, करता येणार नव्हतं. ‘आऊट ऑफ साईट- इज आऊट ऑफ माइंड,’ असा या व्यवसायाचा नियम आहे.

ते माहीत असूनही मी दिल्लीत राहिलो. उपजीविकेसाठी व्यायामशाळेच्या (जिम) व्यवसायात उतरलो.  मी सहा जिम्स सुरू केल्या. माझ्याकडे ८४ कर्मचारी होते. यात बरेचसे पैसे खर्च झाले, पण जिमच्या व्यवसायाला नफ्यात आणण्यास मी असमर्थ ठरलो.

सिद्धांतबद्दलच्या अनेक गोष्टींविषयी माझ्या मनात कायम चिंता आणि एक प्रकारची असुरक्षिततेची भावना असे. लेकाबद्दल वाटणारी धास्ती, दडपण, भीती, चिंता रीनाला कधीच जाणवली नसेल का, असं वाटे. तिच्या जागी मी स्वत:ला पाहू लागलो होतो. तो शाळेतून वेळेवर घरी येईल ना, अभ्यास त्याला झेपतोय ना, त्याच्या मित्रांची संगत योग्य आहे ना, एक ना अनेक चिंता! लवकरच तो तेरा वर्षांचा झाला. त्याची ती पौंगडावस्था. अधिक जपायला हवं. मग त्यानं अभ्यासाखेरीज जास्त इंटरनेट वापरू नये म्हणून दक्ष झालो. त्याच्याबरोबर राहू लागलो. रीना त्याला लच्छेदार पराठे करून देत असे. ते सिद्धांतला विशेष आवडत. त्यात मात्र मी कमी पडलो!  त्याच्या आजीशी (माझी आई) त्याचं छान मेतकूट जमलं असलं तरी तो रीनाला विसरला नव्हता. त्याला शाळेत चांगले गुण मिळत होते, पण त्यानं खेळात लक्ष घालावं, वाचनात रस घ्यावा अशी माझी तळमळ असे. अर्थात मी माझ्या महत्त्वाकांक्षा त्याच्यावर लादल्या नाहीत. त्याचं कधी चुकलं तरी मी त्याच्यावर रागावलो नाही. कधीही कडक बाप झालो नाही. आई आणि वडील यांच्यातला तोल सांभाळायचा कायम प्रयत्न केला.

सिद्धांत नववी उत्तीर्ण झाल्यावर इग्लंडमधल्या एका मोठय़ा शाळेत मी त्याला प्रवेश घेऊन दिला. तिथल्या नियमानुसार विद्यार्थ्यांला विचारूनच त्याचे गुण त्याच्या पालकांना कळवण्यात येतात. मी मात्र त्यांना विनंती केली, की मीच त्याचा एकमेव पालक आहे, तेव्हा त्याचे गुण, त्याची प्रगती, वर्तन याविषयी मला कळवण्यात यावं. सिद्धांतचा मला फोन येई तेव्हा मी इथे मुंबईत जागत बसलेला असे, कारण दोन्ही देशांचे ‘टाइम झोन’ वेगळे आहेत. शिक्षणासाठी तो तिथे गेल्यावर मात्र मी हळहळू मुंबईत पुन्हा बस्तान बसवलं. अर्थात पुन्हा अभिनयक्षेत्रात घडी बसवण्यास काही वर्ष लागली.

रीनाच्या पश्चात मी पुनर्विवाहाचा विचार कधीच केला नाही. मी आतापर्यंत १२२ हिंदी चित्रपट, काही पंजाबी, काही इतर प्रादेशिक भाषांमधले चित्रपट, ३-४ वेब मालिकांमध्ये  काम केलं. पण या कारकीर्दीपेक्षा पिता म्हणून मला मिळालेलं समाधान अधिक महत्त्वाचं होतं. सिद्धांतला मोठं करण्यात मी कसूर केली नाही. माझ्या कर्तव्यात कमी पडलो नाही, हीच माझ्यासाठी जमेची बाब आहे.