भक्ती बिसुरे

bhakti.bisure@expressindia.com

Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी

इंजिनीअर झाल्यावर हातात आली ती ‘इन्फोसिस’मधली चांगल्या पगाराची नोकरी.. सारं काही छान चाललेलं असताना एक संधी चालून आली आणि स्नेहल प्राथमिक आरोग्याच्या सुविधा दुर्गम ग्रामीण भागातल्या गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी थेट पोहोचली ती बिहारमधील रामनगरला, द हिल स्टेशनला. बिहारच्या पूर अवस्थेतील लोकांचं आरोग्य सांभाळणं असो, स्त्रियांमधील रक्तक्षयावर मात करणं असो, मतिमंद मुलांना सांभाळणं असो वा स्क्रिझोफेनिक रुग्णांवरचे उपचार असो. वैद्यकीय धडे देत ती स्वत:ला घडवत गेली.. स्वत:पासून सुरू झालेला तिचा प्रवास अनेकांसाठी सेवादायी झाला. त्या स्नेहल जोशीविषयी..

‘इन्फोसिस’मधली नोकरी, त्यातील कामानिमित्त घडणारा परदेश प्रवास, भरभक्कम बँक बॅलन्स असं रूढार्थाने स्थिर असलेलं आयुष्य सोडून एक मध्यमवर्गीय तरुणी गरीब, अशिक्षित लोकांसाठी बिहारला जाते हे ऐकलं तर कुणालाही आश्चर्य वाटणे शक्य आहे. त्या सगळ्यांना तिचं, सहज-सोपं उत्तर म्हणजे, ‘आरोग्य सेवा ही प्राथमिक गरजेची गोष्ट आहे. ती फक्त डॉक्टरच्या हातात ठेवून आपल्या व्यवस्थेने वर्षांनुवर्ष केलेली चूक दुरुस्त करण्यासाठी कुणीतरी सुरुवात करणं आवश्यक होतं. हे मी एकटीने नाही, अनेकांनी करायला हवं. डॉक्टर, तंत्रज्ञ, सेवाभावी लोक या क्षेत्रात आले, तर आरोग्य सेवा अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचण शक्य आहे.’

ही स्नेहल जोशी. मूळची सांगलीची, पण पुण्यात स्थायिक झालेल्या कुटुंबातली. वडील सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त. बहीणसुद्धा यशस्वी! आईचं २०१६ मध्ये कर्करोगाने निधन झालं. पुण्यातल्या ‘कमिन्स’ कॉलेजमधून तिने अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नोकरी मिळाली तीच थेट ‘इन्फोसिस’मध्ये! ‘इन्फोसिस’पासून ‘द हिल स्टेशन’पर्यंतचा तिचा प्रवास रंजक म्हणावा असाच. स्नेहल सांगते, ‘इन्फोसिस’मध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतानाच प्राथमिक आरोग्याच्या सुविधा दुर्गम ग्रामीण भागातल्या गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी, बिझनेस मॉडेल तयार करण्यासाठी डॉ. गौरव कुमार हा मित्र मला भेटायला आला. त्याच्यासाठी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्याच्या निमित्ताने या कामाबद्दल मला माहिती मिळाली आणि मी स्वत:च या कामात उतरायचा निर्णय घेतला. ‘इन्फोसिस’ सोडून बिहारसारख्या राज्यात जाऊन काम करायचा निर्णय मी घरी सांगितला तेव्हा बाबांनी ‘थेट नोकरी सोडून जाण्यापेक्षा सुट्टी घेऊन जा’ असं सुचवलं, पण ‘प्लॅन बी’ असेल तर ‘प्लॅन ए’साठी आपण म्हणावं तसं झोकून देत नाही, त्यामुळे ती शक्यताच झुगारुन मी बिहार गाठलं. याआधी ‘इन्फोसिस’मुळे ऑनसाइट लंडन, ऑनसाइट अमेरिका जायची सवय होती, या वेळी मी माझ्याच स्वत:च्या इच्छेचा मान राखत ‘ऑनसाइट रामनगर’ निवडलं. जाताना ‘इन्फोसिस’च्या नोकरीतून केलेली थोडीफार बचत आणि ‘नाहीच जमलं, तर परत ये, आम्ही आहोत!’ हे सांगणारं घर हा आणखी एक प्लस पॉइंट होता.

स्नेहल म्हणाली, ‘‘बिहारमधलं रामनगर हा आपल्याकडच्या गडचिरोली-नंदूरबारसारखा दुर्गम भाग. सेवाभावी कामाचा पाया उभा करण्यासाठी सुरुवातीला काही पैसे मिळत राहाणं गरजेचं होतं. डॉ. गौरव हा एकमेव एमबीबीएस डॉक्टर आणि इतर सगळे माझ्यासारखे शिकाऊ अशी परिस्थिती होती. आजूबाजूला गरिबी, अशिक्षितपणा यांचं साम्राज्य होतं. नवा कुणीही डॉक्टर तिथे राहून काम करण्याची शक्यताही नव्हती. अशात, अवघ्या चार महिन्यांत आम्ही ‘जन्मस्थान’ हे आमचं हॉस्पिटल सुरू केलं. एक तयार इमारत भाडय़ाने घेऊन, त्यात हॉस्पिटलसाठी आवश्यक तसे बदल केले. त्यासाठी बायसन पॅनेलसारखं, पटकन उभं राहणारं साहित्य वापरलं. हॉस्पिटल सुरू करायचं तर ते मुळीच चकाचक असता कामा नये, इथल्या गरीब लोकांना तिथे यायची भीती वाटता कामा नये हे पक्कं  होतं. हॉस्पिटल उभं राहिलं. त्यातच एक लहानशी खोली, किचन असं माझं ‘विंचवाचं बिऱ्हाड’ ही मी तिथेच मांडलं. इंजिनीअरिंगची पदवी बाजूला ठेवली आणि

डॉ. गौरवच्या हाताखाली मी मेडिकलचे प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली. बीपी तपासणं, गरोदर स्त्रीला मदत करणं, सलाइन लावणं, इंजेक्शन देणं अशी कामं शिकून घेतली. पैसे उभे करणं ही या हॉस्पिटल उभारणीमागची कल्पना असली तरी  डॉ. गौरवची ओपीडी ही प्रत्येक रुग्णासाठी, जवळजवळ मोफत खुली होती. ‘फी’ दिलीच पाहिजे हा आग्रह नाहीच, उलट शक्य असेल तरच द्या, हाच नियम! दरम्यान, रुग्णालयात असलेल्या ‘मुली’शी बोलण्यात रुग्ण जास्त ‘कम्फर्टेबल’ असल्याचं आमच्या लक्षात येत होतं, त्यातूनच मग समुपदेशनातील प्राथमिक कौशल्यही मी शिकून घेतली. अनेक लहान-सहान दुखण्यांना प्रत्येक वेळी औषधाचीच गरज नसते, प्रेमाने बोललेले दोन शब्दही जादुई परिणाम साधतात याचा अनुभव आम्ही घेत होतो. म्हणून वेल्लोर इथे जाऊन मानसिक आरोग्यविषयक एक अभ्यासक्रम मी पूर्ण केला. त्याचा उपयोग रामनगरमधल्या कामासाठी व्हावा हा उद्देश होता, पण त्यात आम्ही सुवर्णपदक मिळवलं आणि पाहता पाहता सार्वजनिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य या विषयात त्याच संस्थेत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करत आहोत.’’

स्नेहल सांगते, ‘‘कम्युनिटी हेल्थ’मध्ये काम करायला सुरुवात केली आणि जे शोधत होते, ते सापडल्यासारखा आनंद मला झाला. गावा-गावांत जाणं, लोकांशी बोलणं, त्यांच्या घासातला घास खाणं, हात हातात घेऊन त्यांच्या भाषेत बोलणं अशा छोटय़ा प्रयत्नांतून दूरवरच्या, कोपऱ्यातल्या गावातल्या लोकांशी एक वेगळाच बंध तयार झाला. त्याचाच भाग म्हणून इयत्ता सातवी ते दहावीच्या मुलींसाठी रक्तक्षय निर्मूलनाचं काम सुरू केलं. ३० ते ३५ टक्के मुलींना अ‍ॅनिमिया वा रक्तक्षय, अशक्तपणा होता. मुलींची तपासणी करून त्यांना १५ दिवस, एक महिन्याची औषधं मोफत द्यायला लागलो, बरोबर गूळही दिला. तेवढं करून थांबलो नाही, ‘फॉलोअप’ही ठेवला. हे काम पुढे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम सुरू  करण्यासाठी फार उपयोगाचं ठरलं. शाळांमधल्या मुलांशी बोलून, मानसिक आरोग्याच्या समस्या, त्याची लक्षणं याबाबत त्यांना साध्या-सोप्या भाषेत दिलेलं ज्ञान कामी आलं. आता गावात, कुटुंबात, ओळखीत कुठेही मानसिक आरोग्याचा प्रश्न असलेली व्यक्ती आढळली तर तिला आमच्यापर्यंत आणण्याचं काम ही मुलं जबाबदारीने करतात.

स्किझोफ्रेनिया सारखे प्रश्न गंभीर आहेत, पण त्यांच्यावर इलाज करण्यासाठी त्या व्यक्तीला तिच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर काढणं मला योग्य वाटत नाही. म्हणून संवाद, समुपदेशन आणि औषधोपचार देऊन, पण व्यक्तीला तिच्या घरी, तिच्या प्रेमाच्या माणसांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न मी करते. बिहारमधली गरिबी, मागासलेपण यांमुळे मानसिक आजार असोत की शारीरिक, त्यांवर उपचारांसाठी ‘झाडफूंक’सारख्या गोष्टींची मदत आवर्जून घेतली जाते. त्यांच्या श्रद्धा आणि समजुतींना थेट विरोध न करता त्यांना त्यापासून लांब ठेवायचा प्रयत्न करायचा, दरम्यान औषधोपचार सुरू करायचे हा ‘फॉम्र्युला’ मी वापरते. डोळ्यासमोर बरा झालेला रुग्ण दिसला की त्याचा सकारात्मक परिणाम दिसतोच. नुकतीच माझ्याकडे एक स्किझोफ्रेनियाची रुग्ण आली. तिला ‘बाहेरची’ बाधा आहे का हे पाहायला जातो असं तिचे कुटुंबीय मला सांगत होते. त्यावर ‘औषध घेऊन बघा, नाही बरं वाटलं तर जा,’ असं सांगत मी वेळ मारून नेली. त्या वेळी तिथे उपस्थित असलेल्या एका मुलीच्या आईने ‘माझ्या मुलीला बरं वाटलं तसं तुमच्या मुलीलाही वाटेल,’ असं म्हणत दिलासा दिला. त्यातून नव्या रुग्णाचे नातेवाईक निर्धास्तपणे उपचारासाठी तयार झाले. चार मुलांच्या जन्मानंतर एका गरीब बाईला स्किझोफ्रेनिया झाला. तिच्या नवऱ्याने मुलं-घरदार सांभाळायला कोणी हवं म्हणून दुसरं लग्न केलंय, हे कळलं तेव्हा माझ्या शहरी पांढरपेशा मनाला धक्काच बसला, पण बरी झाल्यावर तिने मात्र ते सहज स्वीकारलं. नवरा मोलमजुरीला जातो तर मुलांना कोणी सांभाळलं असतं, त्यामुळे त्याने दुसरं लग्न करण्यात तिला काही गैर वाटलं नाही. आता त्या दोघीही एका घरात राहतायेत. याशिवाय शरीराने वाढलेली पण मेंदूची वाढ पूर्ण न झालेले अनेक जण आमचे ‘रुग्ण’ आहेत. सहसा त्यांच्यावर वेडे हा शिक्का मारला जातो. पण ‘तुमचा मुलगा किंवा मुलगी मोठी झाली असली तरी प्रत्यक्षात तिचं वय पाच वर्ष आहे, ती/तो गुणी आहे, पण आकलनाच्या बाबतीत तो नेहमी पाच वर्षांचा राहणार आहे,’ हे समजावण्यातून फरक पडतो. तो आम्ही अनेकदा अनुभवला आहे. आपल्याकडच्या वैद्यकीय सेवेत ‘एंपथी’ – संवेदनशीलतेचा अभाव आहे, तो दूर करायचा प्रयत्न आम्ही आमच्यापरीने करतो आहोत.

बिहारमध्ये महापूर आला त्या काळात अनेक भागांचा संपर्क तुटला. स्थानिक प्रशासनाला ज्या भागात पोचणं अवघड असेल त्या भागात आम्ही जाण्याची जबाबदारी घेतली. जेवणाची पाकिटं वाटली. जखमा, अ‍ॅलर्जी, विषाणूजन्य आजार, पोटाचे विकार यांवरची औषधं स्थानिक लोकांना दिली. महापुराच्या काळात वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, पिण्याचं पाणी र्निजतुक कसं करायचं याबाबत लोकांना माहिती दिली. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन पुरवलं. साबण उपलब्ध नसतील तर कडुनिंबाचा पाला घालून उकळलेलं पाणी स्वच्छतेसाठी वापरा, असं आवाहन केलं. संपर्क तुटलेली गावं खरोखरच एवढी दुर्गम होती की, आवश्यक सामान पाठीवर टाकून चालत आम्ही मदत पोचवली. सरकारी यंत्रणा तोकडय़ा आहेत, हे मान्य करून जिथे त्या पोचत नाहीत तिथे मदत करायला हवी, हे तत्त्व आम्ही अंगीकारलं. मध्यंतरी एका पत्रकारानं आम्हाला जवळच्या गावात लोक डायरियाने मरत असल्याचं सांगितलं. औषधं, ओआरएसची पावडर, सलाइन असा जामानिमा घेऊन, आम्ही ते गाव गाठलं. आवश्यक तिथे सलाइन लावलं. औषधं दिली. ज्यांना कोणताही त्रास झाला नव्हता त्यांना ओआरएसची पाकिटं देऊन ते सुरू करायला सांगितलं. त्यातल्या त्यात शिकलेली एक-दोन तरुण मुलं होती, त्यांच्याकडे औषधं दिली, काय काळजी घ्यायची, कोणतं औषध कधी घ्यायचं हे सगळं त्यांना शिकवून आम्ही परत आलो. पण ज्या भारतात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत त्याच भारतातल्या एका गावात आजही लोक डायरियाने मरतात या वास्तवाने डोळ्यात पुरेसं झणझणीत अंजन घातलं.

स्नेहल जोशी आणि डॉ. गौरव कुमार हे मागची दोन-तीन वर्ष झपाटल्यासारखे बिहारमध्ये काम करत आहेत. या कामाला संस्थात्मक रूप देण्याच्या दृष्टीने त्यांनी त्याला ‘द हिल स्टेशन’ हे नाव दिले असून त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मदतीचे काही हात पुढे येत आहेत, पण जवळचे अगदी मोजके मित्र-मैत्रिणी सोडल्यास हे काम कुणाला माहितीच नाही. काम स्थिरस्थावर होण्यासाठी तेवढा वेळ देणं गरजेचं होतं, आता कुठे ‘सांगण्यासारखं’ काही तरी उभं राहिलंय असं वाटत असल्याचं ही दोघं प्रामाणिकपणे सांगतात. भारतात दुर्गम, कानाकोपऱ्यातल्या अनेक गावांमध्ये हे काम व्हायला हवं एवढे आरोग्य सेवांबाबत आपण आजही मागे आहोत. पण आम्ही आमचा मार्ग निवडलाय, या मार्गावर अजून बराच पल्ला गाठायचाय याबाबतही दोघेही ठाम आहेत.

यंदाच्या महिला दिनाची संकल्पना आहे, इच फॉर इक्वल! सुरुवातीला कशाला सुखाचा जीव दु:खात घालायचा म्हणून काळजी करणारे स्नेहलचे बाबा आज मुद्दाम वेळ काढून तिच्याबरोबर बिहारमध्ये काम करण्यासाठी जातात. तिचा सहकारी डॉ. गौरव कुमारने त्याचं ‘एमडी’ सोडून पूर्ण वेळ या कामात वाहून घेतलंय. या टप्प्यावर स्नेहलला तिच्या आईची आठवण येते. ‘ती एक जबरदस्त बाई होती. खंबीर, प्रेमळ आणि वेगळीच! ती गेली आणि पुढे बराच काळ मी अस्वस्थ होते. आयुष्यात तिला अभिमान वाटेल असं काही तरी करावं असं वाटायचं, आत्ताही माझा तोच प्रयत्न आहे’ असं ती सांगते.

प्रत्यक्षात, स्नेहलने निवडलेली ही ‘वेगळी वाट’ भविष्यात वेगळी वाट निवडू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठीच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे!