आरती कदम

सुनीता धुमाळे गेली २४ वर्ष अमेरिकेत राहून मराठी स्त्रियांसाठी हेल्पलाइन चालवत आहेत, गेल्या चोवीस वर्षांत हा एक फोन नंबर अनेकांची आयुष्यं बदलवून गेलेला तर आहेच, पण काळाच्या विविध टप्प्यांतल्या स्थित्यंतराचाही तो साक्षीदार आहे. स्त्रीने दुय्यम असण्याच्या सहनशीलतेतून भोगलेल्या शारीरिक, मानसिक छळापासून आर्थिक स्वातंत्र्यातून बेभान झालेल्या आयुष्याचा लेखाजोखा अनुभवणारी ही हेल्पलाइन खूप काही सांगणारी आहे..  प्रश्न मांडणारी आहे आणि सोडवणारीही आहे..

हेल्पलाइन १८७७ मैत्रीण – एखादी मुलगी लग्न करून अमेरिकेला जातेय म्हटल्यानंतर तिच्याबद्दल वाटणारं कौतुक, आनंद आणि काहीसा मत्सर.. थेट अचंबा, दु:ख आणि काहीशा करुणेत बदलवणारी.. हो, ही हेल्पलाइन आहे, अमेरिकेतल्या फक्त मराठी तरुणींच्या वैवाहिक आयुष्यातल्या व इतर समस्या ऐकून घेणारी.. त्यांना योग्य तो मार्ग दाखवत मदत करणारी आणि थांबून राहिलेली आयुष्यं पुन्हा एकदा वाहती करणारी..

सुनीता धुमाळे गेली २४ वर्षे अमेरिकेत राहून ही हेल्पलाइन वा हॉटलाइन चालवत आहेत, अर्थात आता या हेल्पलाइनचा क्रमांक बदलला असला तरी ही ‘मैत्रीण’ साक्षीदार आहे स्त्रीच्या वेदनांची, तिच्या हतबल असाहाय्यतेची, पण त्याही पलीकडे हळूहळू तिच्यात येणाऱ्या आत्मभानाची आणि नंतर आत्मविश्वासाने घेतलेल्या स्वत:च्या जबाबदारीचीही. रडत केलेला पहिला फोन काही काळानंतर समाधानाने काठोकाठ भरून हसतो तेव्हा सुनीताताईंना आपल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं.

गेल्या २४ वर्षांत त्यांना सुमारे १२ ते १३ हजार जणींनी या हॉटलाइनद्वारे संपर्क साधून आपलं दु:ख उघड केलं. अर्थात ९० च्या दशकातल्या तरुणींचे प्रश्न आणि आजच्या तरुणींचे प्रश्न यात अगदी नैतिकदृष्टय़ाही फरक पडत चालला असला तरी प्रश्न आहेतच. काहींची उत्तरे सहज मिळतात तर काहींच्या समस्या अगदी निरुत्तर करणाऱ्याही. पण हा २४ वर्षांचा काळ म्हणजे बदलत जाणाऱ्या मानसिकतेचाही आहे. स्त्रीत्वाच्या बदलत जाणाऱ्या कल्पनांचाही आहे आणि स्त्री म्हणून झुगारून देणाऱ्या बंधनांचाही आहे, म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यातल्या बाई म्हणून आलेल्या दुय्यमत्वाच्या समस्या वेगळ्या, मधल्या काळातले थेट सेस्क्युआलिटीलाच आव्हान देणारे प्रश्न वेगळे आणि आताच्या काळातले ‘सो व्हॉट’च्या चष्म्यातून स्वत:चं समर्थन करू पाहाताना बदललेल्या दृष्टिकोनाचे तर आणखीनच वेगळे आहेत.

सुनीताताई अमेरिकेला गेल्या सत्तरीच्या दशकात. डॉक्टर नवरा आणि दोन मुलांचा संसार यात पूर्णत: व्यग्र असणाऱ्या सुनीताताईंची नजर मात्र अशा स्त्रियांकडे होती ज्या सुखी संसाराचा आभास निर्माण करत जगत होत्या. त्यांची घुसमट त्यांना जाणवत होती, पण बोलतं करण्याचा मार्ग सापडत नव्हता. दर वीकेंडला मराठी माणसांचा गोतावळा जमत होताच. तात्पुरता हसीमजाक, धमाल मस्ती चालत होती, पण त्यातल्या स्त्रियांचे डोळे सुनीताताईंना काही वेगळंच सांगत होते. आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हा प्रश्न त्यांना पडू लागला होताच. दरम्यान, त्यांचाही संसार स्थिरस्थावर झाला होता. दोन्ही मुलंही मोठी झाली होती. (वकील झालेली त्यांची लेक मुक्ताही आता पूर्णत्वाने त्यांना या कामात मदत करते आहे.) त्याच काळात त्यांची बहीण

विद्या बाळ अर्थात त्यांची सुधाताई तिथे गेल्या असताना त्यांनीही त्यावर जोर दिला, तेव्हा मात्र काही तरी करायची इच्छा तीव्र झाली. ‘कनेक्टीकट’मध्ये राहाणाऱ्या मराठी स्त्रियांसाठी मग त्यांनी ‘जागरण’ सुरू केलं. फक्त बायकांनी एकत्र यायचं, रात्र जागवत मस्त गप्पा मारायच्या, स्वत:ला व्यक्त करायचं ही कल्पना त्यामागे होती, पण सुरुवातीला नवऱ्याशिवाय बाहेर जायचं ही कल्पनाही करू न शकणाऱ्या या स्त्रियांचा प्रतिसाद अगदी थंड होता. लवकरच सगळ्या जणी यायला लागल्या. पण त्यातून काही साध्य होईना. ज्यांनी बोललं पाहिजे असं वाटत होतं त्या मूकच होत्या. दरम्यानच्या काळात सुनीताताई ‘स्नेहा’ नावाच्या हेल्पलाइनसाठी काम करू लागल्या. सहा वर्ष त्यांनी तिथे काम केलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या हेल्पलाइनवर कधीही मराठी स्त्रीचा फोन आला नाही. इतकंच कशाला अमेरिकेत आशियायी स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण तिथेही मराठी स्त्रिया जात नाहीत. कारण तिथे समस्या घेऊन येणाऱ्यांना फॉर्म भरणं, माहिती सांगणं सक्तीचं होतं. मराठी बाईला आपल्या संसाराची लक्तरं वेशीवर टांगायला आवडत नाहीत. पण याचा अर्थ तिला प्रश्न नव्हते का?, या प्रश्नाचं उत्तर त्यांना ‘१८७७ मैत्रीण’ हेल्पलाइन काढल्यावर मिळालं. गेल्या १५ वर्षांत १२ ते १३ हजार फोन येणं हे त्याचंच उत्तर होतं. सुनीताताई ना त्यांना नाव विचारत ना त्यांना उलटा फोन करत. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी बिनधास्त फोन करायचा.. आणि व्यक्त व्हायचं.

पण काही वेळा काही घडण्यासाठी जोरका झटका हवा असतो, पन्नाशीच्या आसपासच्या चार स्त्रियांच्या एकामागोमाग झालेल्या आत्महत्या हेही या हेल्पलाइन सुरू करण्यामागचं ‘मस्ट डू’ कारण होतं. या चारही स्त्रिया नेतृत्वगुण असलेल्या होत्या. एक तर नामवंत संस्थेच्या लीडरही होत्या. वरून आनंदी दिसणाऱ्या या स्त्रियांना आतून काय खात असेल ज्यामुळे या स्त्रिया आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असतील. या प्रश्नांच्या उत्तरासाठी त्यांना बोलतं करायलाच हवं, हे लक्षात आलं. दरम्यान अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’च्या सुनीताताई सदस्य झाल्या. ‘फाऊंडेशन’ने ही हॉटलाइनची कल्पना उचलून धरली.  खर्चही त्यांनीच उचलला. (अर्थात गेल्या काही वर्षांपासून मात्र सुनीताताई व त्यांचे कुटुंबीय हा खर्च स्वत: करतात.) ‘फाऊंडेशन’च्या अधिवेशनात, ‘मिळून साऱ्याजणी’ अंकातून या हेल्पलाइनची माहिती सांगितली जाऊ  लागली. आणि फोन यायला सुरुवात झाली. बायका बोलायला लागल्या..

पण एक हादरवून टाकणारा अनुभव आला तो साधारण एक दीड वर्षांनी. चारजणींना एकत्रित आत्महत्या करायची होती. आमच्या हातून चूक झाली आहे, त्यातून बाहेर यायला मार्ग नाही म्हणून आत्महत्या करायची आहे, हेच त्या सांगत राहिल्या. हळूहळू बोलत्या झाल्या. मुंबईतल्या मध्यमवर्गीय मराठी घरातून अमेरिकेत गेलेल्या या चारही जणींना ‘वाईफ स्वॅपिंग’सारख्या गलिच्छ खेळाला सामोरं जावं लागत होतं. त्यांना ते असाहाय्य झालं किंवा विवेक जागृत झाला म्हणा, त्यांना ते सोडायचं होतं, पण तोपर्यंत खूप काही घडून गेलं होतं. सुनीताताईंनी त्यांना विश्वासात घेतलं. एकेकीला स्वतंत्र बोलतं केलं आणि त्या चौघींनीही काही ठाम निर्णय घेत आत्महत्येचा विचार सोडून दिला.

या समस्याग्रस्त मराठी स्त्रियांचा प्रश्न हा असतो की जोपर्यंत टोकाची स्थिती येत नाही तोपर्यंत त्या बोलतच नाहीत. सहन करत रहातात. अनेकदा त्यांना परदेशातल्या कायद्यांची कल्पना नसते. आपण स्वतंत्रपणे काही करू शकतो याची जाणीव नसते. आणि मग असाहाय्यतेच्या कल्पनेने ती बाई ढासळते. खरं तर ग्रीन कार्ड होल्डर स्त्रीसाठी अनेक सोयी, कायदे उपलब्ध आहेत. त्यांना कर्ज मिळू शकतं, त्यांच्या शिक्षणाची सोय होऊ  शकते. नोकरी मिळू शकते. सुनीताताई त्यांचीच माहिती देत या सगळ्यांना आश्वस्थ करतात. अर्थात अमेरिकेत वेगवेगळ्या स्टेटस्चे कायदेही काही वेळा वेगळे असतात मग ती बाई नेमकी कुठल्या स्टेटमधून बोलते हे कळलं तर तिथले नियम सांगत तसेच नवऱ्याकडून झालेल्या मारहाणीची तक्रार पोलिसांकडे करायची असल्यास त्यांचा संपर्क मिळवून देतात. फोन करणाऱ्या बहुतांश स्त्रियांचा प्रश्न हा नवऱ्याकडून होणारा शारीरिक छळ हाच असतो. भांडणं, थुंकणं, पासपोर्ट लपवून ठेवणं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणं, घरातून हकलून देणं, आणि सर्वात ‘लोकप्रिय’ म्हणजे सासूबाईंचा भारतात बसून चालणारा रिमोट कंट्रोल. तो छळ असह्य़ असतो. अशा वेळी एकेकटय़ा पडलेल्या त्या बाईसाठी तिथे आधार मिळणं कठीण असतं. शेल्टर होमची सोय असते पण तेथे व्यसनाधीन बायका आणि रोज नव्या पुरुषाबरोबर जायला तयार अनेकींचा समावेश असतो, आपल्या बायकांना तिथे जमत नाही. मग माहेरी भारतात परतण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण माहेरचेही तिला परत न्यायला अनेकदा नाखूश असतात. एक तर लहान भावंडांची लग्न व्हायची असतात. किंवा हिच्या लग्नावर खूप खर्च झालेला असतो. तिलाही जायचं नसतंच. अशा वेळी सुनीताताई त्यांना वॉलेंटियर व्हायला सांगतात. अमेरिकेत वॉलेंटियिरगला खूप मान आहे. तुम्ही रुग्णालये, शाळा किंवा लायब्ररींमध्ये काही तास घालवायचे असतात. त्याचा चांगला परिणाम होतो. मुख्य म्हणजे बाई घराबाहेर पडते. अनेकांमध्ये मिसळल्यामुळे आत्मविश्वास येतो.

अशीच एक लॅब टेक्निशीयन. लग्न करून अमेरिकेत गेली. तिथे इथलं शिक्षण उपयोगी नसतं. साहजिकच नवऱ्यावर अवलंबून होती. पुढे त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. इतका की तिने हेल्पलाइनची मदत घेतली. वॉलेंटियिरग करायला लागली एका रुग्णालयात, अगदी वॉर्ड बॉय ते रुग्णांना सोबत इथपर्यंत सगळं. पुढे शिक्षणही घेतलं. तिचा आत्मविश्वास इतका वाढला की दहा वर्षांत स्वत:ची लॅब सुरू केली. हा आत्मविश्वास मिळवून देणं, स्वत:वर ओढवलेल्या प्रसंगांची जबाबदारी स्वत: घेणं आणि मार्ग शोधणं अनेकींना सुनीताताईंशी बोलल्यानंतर शक्य होतं. म्हणूनच सुनीताताई म्हणतात, माझ्याकडे प्रश्न घेऊन आलेल्या स्त्रियांचा सक्सेस रेट शंभर टक्के आहे.

हेल्पलाइन सुरू झालेल्या गेल्या २४ वर्षांतील सुरुवातीचा काळ हा भराभर अमेरिकेत आलेल्या इंजिनीयर आणि डॉक्टर यांचा होता. प्रचंड पैसा मिळाला. अचानक आलेली श्रीमंती यातल्या अनेकांना झेपली नाही आणि त्यातून सुखासीनतेच्या कल्पना, ज्या भारतात विचार करणंही शक्य नव्हतं ते घडत गेलं. बहुतांशी लग्नंही जुळवली गेली ती डॉट कॉम, बेबसाइट, लग्न जुळवणाऱ्या संस्था यातून. अमेरिकेतला, मोठय़ा पदावरच्या नवऱ्याचा मोह अनेकींना सुटला नाही आणि मग एका अपरिहार्य शेवटाची सुरुवात झाली.. तडजोडी केल्या गेल्याच, पण जेव्हा मारहाणीच्या घटना रोजच घडू लागल्या तेव्हा घटस्फोटाशिवाय पर्याय नव्हता. काहींनी स्वत:चा मार्ग शोधला. नोकऱ्या केल्या. कारण मुळात या सगळ्या जणी शिक्षित होत्या. ज्या नव्हत्या त्या भारतात परतल्या.

पण या सगळ्याच तरुणींसाठी हा काळ खूप मनस्तापाचा असतो. आणि यासाठी सुनीताताई दोष देतात तो आपल्या शिक्षणाला. अनेक मुलांचा आयक्यू चांगलाच असतो. परंतु इक्यू वा इमोशनल कोशंट फारच कमी असतो. प्रसंगांना कसं तोंड द्यायचं हे लक्षातच येत नाही. परिस्थिती कशी हाताळायची याचं नीटसं भानच आपण या मुलांना करून देत नाही. विशिष्ट वय झालं की लग्न आणि विशिष्ट वय झालं की मुलं जन्माला घालायची. याच्या अधे-मधे काही आलं तर ते कसं निस्तरायचं ते कळत नाही आणि मग अशा वेळी घटस्फोटाशिवाय पर्याय नसतो. शिवाय एखादी मुलगी लग्न करून अमेरिकेत जाते तेव्हा श्रीमंतीच्या कल्पना, शॉपिंग, फॅशन या सगळ्याचं भान तिला असतं पण तिथले कायदे काय, तिथे गेल्यावर स्वत:च्या पायावर उभं रहायचं असेल तर मी काय करू शकते आदी कुठल्याच गोष्टीचा अभ्यास न करता बहुतेक वेळा एका अनोळखी माणसाबरोबर संसाराला ती सुरुवात करते. काही वेळा बदसूर लागतात आणि संसार मोडायला सुरुवात होते. जेव्हा परिस्थिती मारहाणीपर्यंत जाते तेव्हा मात्र घर सोडण्याशिवाय पर्याय नसतो. पण हे सोडतानासुद्धा कायद्याचा विचार केला जात नाही. काही वेळा या मुली घरी भारतात परत येतात. इथल्या न्यायालयात केस दाखल करतात. काही वेळा चुकीचे वकील भेटतात जे त्यांना पोटगी मिळवून देण्याचे आश्वासन देतात आणि केस वर्षांनुवर्षे चालत रहाते. कारण त्याने अमेरिकेत केस दाखल केलेली असते. आणि मग फक्त मनस्ताप पदरी येतो. परंतु याची आता भारताने सरकार पातळीवर दखल घेतली आहे.

काही जणींच्या वाटय़ाला तर याहीपेक्षा जास्त त्रास येतो. गीता नाडकर्णीची घटना त्या सांगतात. अर्थात ती केस त्यांच्याकडे आलेली नव्हती, पण ती खूप गाजली. गीताचं जेव्हा तिच्या नवऱ्याशी अजिबात पटेना तेव्हा तिने भारतात परत जायचा निर्णय घेतला. पण नवरा मुलाचा ताबा आपल्याला देणार नाही याची खात्री असल्याने त्याला न सांगता मुलाला घेऊन ती भारतात पळून आली. अर्थात ती सासू-सासऱ्यांकडेच राहात होती. नंतर स्वत:च्या पायावर उभं राहात मुलालाही तिनं मोठं केलं. याला १५ वर्ष होऊन गेली होती. मुलाच्या उच्च शिक्षणाची वेळ आली. मुलगा हुशार, त्याला अमेरिकेतल्या तीन कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकत होता. तिनं सांगितलं, वडील जिथे रहातात तिथेच प्रवेश घे म्हणजे सोयीचं होईल. सगळं व्यवस्थित पार पडलं. नंतर त्याने वडिलांना, आम्ही येतोय या विमानाने वैगैरे माहिती कळवली. त्याला पोचवायला म्हणून गीताही सोबत गेली. ती अमेरिकेत पोहोचली. विमानातून उतरली आणि विमानतळावरच तिला मुलाच्या अपहरणाखाली अटक करण्यात आली. तिच्या नवऱ्यासाठी ही १५ वर्षे, मुलाचं मोठं होणं, बायकोने त्यासाठी घेतलेले कष्ट हे सगळं मातीमोल ठरलं. ‘आपल्याला न सांगता आपल्या मुलाला पळवून नेणाऱ्या बाईला अद्दल घडलीच पाहिजे,’ या पुरुषी अहंकारातून निर्माण झालेल्या सुडाच्या भावनेने तिला सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगायला लावला. अशा अनेक केसेस तिथे झाल्याने शेवटी नियम करावा लागला. आता तुम्ही सुखी संसारात असलात तरी मुलांना भारतात न्यायचं असेल तर वडिलांची स्वाक्षरी लागतेच.

नंतरचा काळ आला तो, गे, लेस्बीयन लग्नांचा. आपली ‘सेस्क्युअल आयडेण्टिटी’ सांगायला घाबरणाऱ्या किंवा ती लपवून ठेवलेल्या तरुण-तरुणींमुळे अनेकांच्या आयुष्याचा विचका झाला. सुदैवाने या प्रकरणातून लोक लवकर बाहेर आले आणि आता ते आपली ही आयडेण्टिटी लपवत नाहीत. पण दरम्यान, ज्या आई-वडिलांनी कळत नकळत अशी लग्नं करवून दिली त्यातल्या काहींनी तर आपल्या मुलांची जबाबदारीच झटकली. या तरुणींना मार्ग दाखवला तो सुनीताताईंनी. आज अनेकजणी दुसरं लग्न करून संसार करत आहेत.

मात्र अलीकडचा काळ खूप कठीण आला आहे, असं सुनीताताईंचं म्हणणं. काही वेळा अक्षरश: त्यांना निरुत्तर करणारा. तरुणींची बदलती मानसिकता यासाठी कारणीभूत आहे, असं एकूण चित्र आहे. नैतिकतेच्या बदललेल्या कल्पना, आर्थिक स्वातंत्र्य, आणि पुरुष-स्त्री यांच्यामधली कमी होत चाललेली असमानता – (सिगारेट, दारू पिण्याच्याही पलीकडची) पुरुषातला लिंगभेद कमी होतो आहे, अगदी काही उच्च पदापर्यंत तो पोहोचला आहे. डॉक्टर, इंजिनीयर, सीईओ पद, कुणाचंही असू शकतं. पुरुषांनी भूषवलेली अनेक पदे आता स्त्रिया भूषवीत आहेत, साहजिकच एक वेगळाच ‘अ‍ॅटिटय़ूड’ वाढीला लागला आहे. ‘मी का’ किंवा ‘मीच का’ हा प्रश्न विचारणारी तरुणी जेव्हा वैवाहिक प्रश्न घेऊन सुनीताताईंना फोन करते तेव्हा, ‘मी का सहन करायचं? मीही मारलं त्याला, माझं काय चुकलं’, असं बिनधास्त सांगते. मात्र हेच पुढे जाऊन शारीरिक संबंधांपर्यंत येतं तेव्हाही, ‘सो व्हॉट – मी केलं तर काय चुकलं,’ असंही बिनधास्त बोलू लागली आहे. योनिशुचितेचं नको तितकं अवडंबर माजवलं गेल्याने, इतक्या वर्षांत घुसमटलेली आयुष्यं एकदम मोकळी झाल्यासारखी वागू लागली आहेत. नैतिकतेची, बंधनांची ही लक्ष्मणरेषा धूसर झालेली दिसते आहे. सुनीताताई म्हणतात, ‘‘जेव्हा या मुली बोलतात, तेव्हा नवरा, कुटुंब याबद्दल कुठेही भावनिक आपलेपणा, गुंतवणूक दिसत नाही. नवरा आणि त्याच्यापासूनची मुलं तिला हवी आहेत. कारण इन्श्युरन्स त्याच्या नावावर पण अनेकदा प्रियकर वेगळाच असतो. काही मुलींच्या बाबतीत विशेषत: अमेरिकेत एकेकटय़ा रहाणाऱ्या तरुणींना ‘वन नाइट स्टॅड’ तर निर्माण केला गेलेला बागुलबुवा वाटतो. मग फोन वर बोलताना, ‘आमचं काही चुकतंय का, तो करतो, तर मग आम्ही केलं तर काय चुकलं?’ असं बहुतेक स्वत:ला विचारणारे प्रश्नच त्या सुनीताताईंना विचारतात. अशा वेळी सुनीताताई त्यांना सावधानतेचा इशारा देत पुढच्या परिणामांची फक्त कल्पना देतात. पण ही एक फेज आहे, काही काळाने हेही थांबेल, याची खात्री सुनीताताईंना आहे. कारण आज अमेरिकेत राहाणाऱ्या साधारण चाळिशीच्या मुली मात्र पुन्हा एकदा कुटुंबाकडे वळलेल्या दिसतात. आपलं स्वत:चं स्थिर आयुष्य असावं, मुलाचं भविष्य नीट मार्गी लागावं यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. या वयातल्या स्त्रियामधलं घटस्फोटाचं प्रमाणही कमी झालंय. आणि त्यासाठी फक्त स्त्रियाच नाहीत तर पुरुषही बदललेला जाणवतो, अधिक जबाबदार, काळजी घेणारा, कुटुंबाला महत्त्व देणारा वाटतो आहे. आपल्या भारतीय मराठी तरुण-तरुणींमध्येही ते लवकरच येईल, असं त्यांना वाटतं आहे. फक्त ती फेज लवकरात लवकर जावो, हीच इच्छा त्या व्यक्त करतात.

आजच्या घटकेला या हेल्पलाइनवर सर्वात जास्त फोन येतात ते वयस्कर लोकांचे. हाही काळाचा बदलता परिणामच. एकटेपणाला कंटाळलेले हे जीव कुणाशी तरी संवाद साधायला आसुसलेले असतात. फक्त बोलतात आणि फोन ठेवून देतात. आज पन्नाशी, साठीत असणाऱ्या अनेकांनी, आपल्या मुलांच्या देखभालीसाठी भारतातलं सारं काही विकून आपल्या आई-वडिलांना परदेशी आणलं. आणि आता वयस्क झालेल्या आई-वडिलांकडे बघायला त्यांना वेळ नाही. त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला वेळ नाही. अशा वेळी सुनीताताईंचा फोन वाजत राहिला तर नवल ते काय, वॉलेंटियिरग साठीही आता वृद्ध लोकांबरोबर वेळ घालवणे हा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. ही समस्या मात्र वाढत जाणारी आहे, त्यासाठी वृद्धांनीच पन्नाशीपासून काळाची पावले ओळखून वागायला हवं असं त्या मानतात.

एकूणच प्रश्न अनेक आहेत, वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे आहेत. शेवटी प्रत्येकाने आपला निर्णय स्वत:च घ्यायचा असतो, कृतीही स्वत:च करायची असते, मात्र ‘मैत्रीण’ ही हॉटलाइन नव्हे, ‘वॉर्मलाइन’ दिलासा असतो त्यांच्यासाठी. कुणी तरी आहे तिथे, आपल्याला समजून घेऊन ऐकणारं, योग्य मार्ग दाखवणारं.. आपल्याला शांतवणारं.. साहजिकच सुनीताताईंचा फोन सतत वाजतच राहतो.. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग..

arati.kadam@expressindia.com

chaturang@expressindia.com