25 March 2019

News Flash

सीरिया.. एक प्रश्नचिन्ह!

कोणतंही युद्ध हे राजकीय सत्तासंघर्षांतून, अनेकदा अमानवी महत्त्वाकांक्षेतून होत असलं तरी ती हानीच असते.

‘इसिस’चा दहशतवाद आणि यादवी युद्धाने सीरिया जखमांनी भळभळतो आहे. किमान अडीच लाख लोक ठार, ५ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित तर सुमारे ४ लाख लोक निर्वासित आहेत.

ch07 दुसऱ्या देशात निवारा शोधणारे निर्वासीत

‘इसिस’चा दहशतवाद आणि यादवी युद्धाने सीरिया जखमांनी भळभळतो आहे. किमान अडीच लाख लोक ठार, ५ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित तर सुमारे ४ लाख लोक निर्वासित आहेत. बाई असल्याचा शाप इथलीही स्त्री भोगते आहे, पण त्यातूनही मार्ग काढून आपल्या देशवासीयांच्या पाठीशीही उभी राहते आहे. मार्ग काढते आहे..

ch09 असे दृश्य सीरियात सर्वत्र पहायला मिळतं

कोणतंही युद्ध हे राजकीय सत्तासंघर्षांतून, अनेकदा अमानवी महत्त्वाकांक्षेतून होत असलं तरी ती हानीच असते. शहरांची, गावांची, माणसांची आणि मुख्य म्हणजे माणुसकीची! सरेआम होणारी कत्तल, विध्वंस मागे ठेवते ते फक्त निराधारपण, वेदना आणि भरून न येणारी हानी!

ch08 छोटा मोठा उद्योग करून स्वत:च्या पायावर उभ्या रहाणाऱ्या सीरियातील मुली

वायू आणि तेलाने संपन्न असलेल्या किंबहुना त्याचमुळे सीरियामध्ये गेली चार वर्षे हेच सुरू आहे. युद्ध! सीरियातला जवळजवळ पाऊण भाग ‘इसिस’ दहशतवाद्यांनी व्याप्त आहे. इसिसच नव्हे तर कुर्द बंडखोर, अल नुसरा, अन्य बंडखोर आणि अध्यक्ष बशर-अल्-असद यांचं सीरिया सरकार यांच्यामधल्या यादवी युद्धानं अनेकांची आयुष्यं होत्याची नव्हती झाली आहेत.. होत आहेत.. बॉम्ब, क्षेपणास्त्र हल्ल्यांनी वस्त्याच्या वस्त्या उजाड होत आहेत. घरंच्या घरं जाळली जात आहेत. सुखी समाधानी कुटुंबावर आपल्याच घरातून, आपल्याच देशातून परागंदा व्हायची वेळ आली आहे. आत्तापर्यंत किमान अडीच लाख लोक ठार झाले आहेत, ५ लाखांपेक्षा जास्त लोक विस्थापित झाले आहेत तर सुमारे ४ लाख लोक रेफ्यूजी वा निर्वासित म्हणून शेजारच्या जॉर्डन, लेबनॉन, तुर्की, इराक अगदी थेट ग्रीस, जर्मनी, अमेरिका आदी देशांत निवारा शोधताहेत..

ch10 पुन्हा शिक्षणाकडे वळलेल्या मुली

प्रत्येक युद्धाला एक काळी किनार असते ती बाईच्या वाटय़ाला आलेल्या भोगाची. बहुसंख्य वेळा मारला किंवा कैद केला जातो तो घरातला पुरुष आणि बाईच्या वाटय़ाला येतो तो जिवंत भोगवटा. एकटीने मुलांना सांभाळत जगण्याचा! पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरं जाण्याचा! अशाच अनेक सीरियाच्या स्त्रिया कधी कुटुंबासह, कधी एकटय़ाच मुलांसह, जगण्याची जिद्द कायम ठेवत देशाच्या सीमा ओलांडताहेत. दुसऱ्या देशांचे पासपोर्ट नसल्याने चेक पॉइंट्स आणि अडवणाऱ्या पोलिसांना चुकवत रात्रीच्या भयाण अंधारात कधी शेत तुडवत, तर कधी बुडण्याची पर्वा न करता भरभरून वाहणाऱ्या बोटींमध्ये स्वत:ला लोटून देत, सीरियात जन्माला आलो या एकाच सत्यापायी ‘जगण्याला’ सामोरं जाताहेत.

त्यातीलच एक हनन. बदललेलं नाव आणि सरेपाँव काळ्या बुरख्यातल्या उघडय़ा डोळ्यात साकळलेली मूर्तिमंत भीती- बोलकी! तिच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द इसिसव्याप्त सीरियातील बाईच्या यातना व्यक्त करणारा. आई, वडील, भाऊ आणि तीन बहिणी असं कुटुंब. धुमश्चक्रीत भाऊ मारला गेला आणि त्याच्याकडची एके ४७ वडिलांनी सुरक्षा म्हणून स्वत:कडे ठेवली. त्याचा सुगावा इसिसला ((ISIS-Islamic State in Iraq and the Levant (syria) लागला आणि वडिलांना ते पकडून घेऊन गेले. जिवाच्या करारावर ती आणि आई शरीया पोलिसांकडे गेल्या. पुरुषाशिवाय स्त्रियांनी येणंच या पोलिसांना त्यांनाछळण्यासाठी पुरेसं होतं. शरिया पोलीस म्हणजे रस्त्यात पेट्रोलिंग करणारे, शरिया कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा करणारे. अनेकदा विनंती केल्यावर ते तिच्या वडिलांना सोडायला तयार झाले.. अट होतीच, वरिष्ठ शरिया पोलिसाशी लग्न करण्याची. शरिया पोलीस हे इसिसचंच टोपण नाव. एका बाजूला स्वत:चं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला वडिलांचं आयुष्य. निर्णय घ्यायचा नव्हताच. हा ‘निकाह’ फक्त तडजोड होती. त्यामुळे पहिल्या रात्रीचा अनुभव भावनाशून्य होता. दोघं एकत्र राहात होते. पण तिला स्वातंत्र्य नव्हतंच. ती होती, घरातली कैदी, मोलकरीण आणि लैंगिक गुलाम. पण त्याचंही आयुष्य स्वस्थ नव्हतंच. सतत भीतीच्या छायेत आणि हाताशी बंदूक. दरवाजावर खट् वाजलं तरी बंदूक ताणून उभा राहायचा. चेहरा झाकून घ्यायचा. मनातलं
दडपण सिगरेटींच्या धुरात विसरू पहायचा. त्याचाही शेवट ठरलेला होता जणू. महिन्याभरातच त्याला ठार मारण्यात आलं. आणि तिची पाठवणी घरी करण्यात आली.

ती घरी परतली होती, परंतु तिच्यातलं काहीतरी कायमचं हरवलं होतं. तिचं लग्नाशिवाय राहणं इसिस दहशतवाद्यांना मान्य नव्हतंच. दुसऱ्या एकाशी लग्न लावण्याचा घाट घातला गेला आणि तिला पळण्याशिवाय पर्याय नव्हता. इसिसव्याप्त सीरियातून ती लपतछपत सीरियात गेली आणि तिथून तुर्कीतल्या आपल्या नातलगांकडे. पण भीतीचा पगडा आजही कायम आहे. ती सांगते, सीरियातली मुलगी १८ ची झाली की तिचं घराबाहेर पडणं बंदच होतंय. लग्नाच्या नावाखाली दहशतवादी फक्त अत्याचार करताहेत. लग्न आणि घटस्फोट पोरखेळ झाला आहे. पण यातना फक्त मुलींना भोगावी लागतेय. तिथली प्रत्येक तिसरी मुलगी अशी बळी पडतेय. ज्यांना पळता येतंय.. ते पळताहेत जीव घेऊन. दुसऱ्या देशाकडे…रेफ्यूजी कॅम्प्स ओसंडून वाहताहेत. पण अनेकदा तिथेही स्थैर्य नसते. खाण्या-पिण्याचा पत्ता नसतो ना नागरी सुविधांचा.. अनेक जण तिथे पोहोचेपर्यंतच प्राण सोडताहेत. तर अनेक जण आपल्या कुटुंबापासून तुटताहेत. अनेक छोटी छोटी मुलं आई-वडील असूनही अनाथपण भोगताहेत. भीतीच्या छायेत असंख्य जीव श्वास चालतोय म्हणून जगताहेत..
पण या काळ्या छायेलाही रुपेरी किनार आहेच. मानव अधिकार संघटना, काही एनजीओ, काही स्थानिक गट या निर्वासितांना शरण देत आहेत. तर काही निर्वासित स्त्रिया आता स्वत:च्या पायावर उभं राहून आपल्या देशवासीयांना जगण्याचं भान देत आहेत. इतकंच नाही तर प्रत्यक्ष सीरियातही गेल्या चार वर्षांतल्या या दहशतवादी भयाला खुंटीवर टांगून अनेक जणी, त्यांचे गट आपल्या कामाचा सुगावा जरी दहशतवाद्यांना लागला तरी आपल्याला ठार केलं जाईल हे माहीत असूनही धाडसाने काम करीत आहेत.

दहशतवाद्यांनी बंद केलेल्या सीरियातल्या शाळा सुरू करणं हे त्यातलं एक पाऊल. त्यासाठी त्यांनी आपल्या स्थानिक नेत्याला प्रथम विश्वासात घेतलं. शिक्षणाचं महत्त्व आणि ते कसं धर्माच्या विरोधात नाही हे गळी उतरवलं. आज तेथे दोन खासगी शाळा सुरू झाल्या आहेत. अगदी गप्त रीतीने शेकडो मुलं शिकत असलेली ही शाळा फक्त दोन तास चालते कारण अन्य वेळी वीजच नसते.

चार वर्षांच्या धुमश्चक्रीचा परिणाम म्हणजे सीरियातल्या २५ टक्के म्हणजे चारातील एक स्त्री एकटी आहे. वडील वा नवरा नसल्याने आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र नाही. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. म्हणूनच इथल्या कार्यकर्त्यां गटाने स्त्रियांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्यांना कम्प्युटर, फर्स्ट एड, इंग्रजी संभाषण, कुटिरोद्योग, हस्तकला, कपडे शिवणे आदी छोटे छोटे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. ३०० जणींनी याचा फायदा घेतलाय. रोजगार मिळवत आहेत. इतकंच नव्हे तर गेल्या तीन महिन्यांत ५० बालविवाह या स्त्रियांनी थांबवले आहेत. तर तुर्की येथील निर्वासित भागातील एकल स्त्रियांसाठी स्वस्त हॉस्टेल्स सुरू करण्यात आलीत. उद्देश हाच की पैशांच्या गरजेपोटी त्या कुठल्याही वाममार्गाना जाऊ नयेत किंवा कोणी त्यांचा फायदा घेऊ नये.

या आणि अशा असंख्य हृदयस्पर्शी कहाण्या रोजच्या रोज प्रसिद्ध होत आहेत. सीरियातील युद्धाने आता तमाम जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जागतिक पातळीवर राजकीय बैठका, उपाययोजनांवर चर्चा सुरू आहे. तरीही हे युद्ध संपणार का आणि कधी याबद्दल सीरियातील लोकांच्या मनात शंका आहेच. संपलं तरी झालेली हानी भरून निघणार आहे का? देशवासी आणि देश सोडून गेलेल्या निर्वासितांना पुन्हा आपल्या देशाचं वैभव अनुभवता येईल का?.. विस्थापित झालेली कुटुंबं पुन्हा प्रस्थापित होतील का?.. जगण्याचा आनंद ते अनुभवू शकतील का? .. सध्या तरी सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि म्हणूनच सीरियाचं भवितव्यही..
संदर्भ – बीबीसी, सीएनएन-लेखिका अरवा डेमॉने घेतलेली मुलाखत, पीआरआय, इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी.
आरती कदम – arati.kadam@expressindia.com

First Published on October 10, 2015 4:59 am

Web Title: article on syria crisis