अलकनंदा पाध्ये

‘सिंड्रेला’च्या परिकथेनं काचेचा बूट अमर के ला. चप्पल, बूट या आता कपडय़ांइतक्याच महत्त्वाच्या वस्तू झाल्या असल्या तरी पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत स्त्रियांच्या जीवनातला चपलांचा प्रवास परिकथेसारखा नव्हता. चप्पल घालण्यासाठी आणि न घालण्यासाठीही जगभर ठिकठिकाणी स्त्रियांना टोमणे ऐकावे लागले आणि बंडखोरी, चक्क चळवळही करावी लागली. नुकत्याच झालेल्या ‘जागतिक चप्पल दिना’च्या निमित्तानं..

रेल्वे प्लॅटफॉर्मवर आपली जीर्ण तुटकी स्लिपर दुरुस्त करण्याच्या, किमान वापरता येण्याजोगी करण्याच्या प्रयत्नात यश मिळत नाहीसं पाहून हताशपणे बसलेला १०-१२ वर्षांचा मुलगा. किमान गरजांपासून वंचित असणाऱ्या ‘नाही रे’ वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा. एका सधन मुलाच्या नव्या कोऱ्या बुटावर नजर पडता क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव खूप काही सांगणारे. त्या सधन मुलाचं आपल्या बुटांविषयीचं अप्रूप वारंवार जाणवण्याजोगं; परंतु गाडीत चढताना नेमका त्याचा एक बूट पायातून खाली प्लॅटफॉर्मवर पडतो. त्याच वेळी नेमकी गाडी सुरू होते. त्या गरीब मुलाची नजर त्या बुटावर पडते. तो बूट उचलतो आणि निकरानं गाडीतल्या मुलाकडे फेकण्याचा दोनतीनदा प्रयत्न करतो. त्यास यश न मिळाल्यानं त्याच्या चेहऱ्यावर आलेला हताश भाव त्याचा प्रामाणिकपणा जाणवून देणारा.. गाडीनं आता वेग घेतलाय.. गाडीतल्या मुलालाही खात्री पटलीय आपला बूट  आपल्याला मिळणार नाही याची. क्षणभर तो विचार करतो आणि आपल्या पायातला दुसरा बूट काढून तो प्लॅटफॉर्मवरच्या मुलाकडे फेकतो.. आता दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं परिमाण वेगवेगळं. कसलीही अपेक्षा न ठेवता मला नाही, पण इतर कुणाला काही मिळावं.. त्या कृतीतून लाभलेला आनंद, शब्दांच्या आधाराशिवाय व्यक्त होणारा.  निष्पाप मुलांच्या सहज क्षणिक वर्तनाद्वारे करुणा, प्रामाणिकपणा आणि औदार्याचं दर्शन घडवणारा ‘द अदर पेअर’ हा जेमतेम

४ मिनिटांचा पुरस्कारप्राप्त इजिप्शियन लघुपट पाहाताना प्रत्येक वेळी त्यातले भाव स्पर्शून जातात..

हा लघुपट आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच १५ मार्च रोजी झालेला ‘जागतिक चप्पल दिन’! अलीकडे वर्षांतील ३६५ दिवस रोज कुठले ना कुठले ‘दिवस’ साजरे होत असतात. त्यातलाच हा एक २०१४ पासून सुरू झालेला, पण काहीसा अपरिचित असलेला चप्पल दिन.  चालताना पावलांचं रक्षण व्हावं या हेतूनं पादत्राणांची निर्मिती झाली; पण चपलेच्या एकू ण प्रवासात किती वेगवेगळे अनुभव तिला घ्यावे लागले हेही समजून घेण्यासारखं आहे.  खरं तर अगदी पूर्वीचा इतिहास पाहिला तर  स्त्रियांप्रति कमालीची तुच्छता दर्शवण्यासाठी तिला वहाणेची उपमा देणाऱ्या पुरुषप्रधान समाजानं एके काळी तिला वहाण वापरण्यास मात्र मनाई केली होती. वर्षांनुवर्ष स्त्रीला स्त्रीपणाच्या कोषात बंदिस्त करू पाहणाऱ्या, तिच्याकडे निव्वळ माणूस म्हणून पाहाण्याचं नाकारणाऱ्या पुरुषप्रधान समाजानं तिच्यावर घातलेल्या अनेक बंधनांपैकी हे एक बंधन. उन्हातान्हात, काटय़ाकुटय़ांतही स्त्रियांनी अनवाणीच चालावं, असा अगदी अलीकडच्या काळापर्यंत अलिखित नियम होता. तो नियम न पाळणाऱ्या बाईची चक्क बेधडकपणे हुडगी  किंवा वेश्या अशी हेटाळणी होत असे. ‘बायकाच आता जोडे घालायला लागल्या, तेव्हा आता पुरुषांनी काय बरे घालावे?’ असे टोमणे मारले जायचे. असाच काहीसा अनुभव पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनाही आला होता. त्या शाळेत जायला निघाल्या की लोक त्यांच्याकडे खिडक्यातून टक लावून बघत आणि त्यांना ऐकू येईल अशा आवाजात ‘काय हो.. कोण बरं ही बूट-श्टॉकिण्या घालून फिरणारी बाई? काय बरं हा कलियुगाचा महिमा.. छे छे!’ (बहुतेक या सगळ्याचा सूड म्हणूनच पुढे एखाद्या पुरुषानं बाईची छेड काढल्यावर बहुतेक वेळा ती त्याला आपल्या पायातल्या चपलेचा प्रसाद  देत असावी का?)  विनोदी अभिनेते राम नगरकरांच्या ‘रामनगरी’ या आत्मकथनात वाचलेला या संदर्भातला एक किस्सा आठवतो. एकदा त्यांनी बायकोबरोबर सिनेमाला जायचं ठरवलं; पण घरातून एकत्र न निघता ते पुढे निघाले (हो. कारण नवरा-बायकोंनी एकत्र फिरणंसुद्धा जुन्या काळी अगोचरपणाचं मानलं जाई.) थोडय़ा वेळानंतर बायको आली आणि तिनं हळूच पिशवीतून चपला काढून पायात घातल्या, कारण चप्पल घालून जाताना आजूबाजूच्यांनी पाहिलं असतं, तर टोमणे मारून तिला हैराण केलं असतं. याचाच अर्थ अगदी अलीकडच्या काळापर्यंत, म्हणजे ५०-५५ वर्षांपूर्वीपर्यंतसुद्धा  कित्येक गावांत बायकांनी चप्पल न घालण्याचा दंडक होता.

खरं तर संपूर्ण जगातल्या पुरुषप्रधान समाजानं स्त्रियांसाठी परस्परच स्वत:च्या मर्जीनं आखलेल्या चौकटीमुळे त्यांच्यावर पोशाख-पेहरावापासून लादलेल्या असंख्य बंधनांमुळे घुसमटलेल्या स्त्रिया कधी तरी त्याविरुद्ध आवाज उठवताना दिसतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंडमधल्या निकोला थॉर्प या स्त्रीनं तिच्या ऑफिसमधून झालेल्या हकालपट्टीविरोधात केलेली याचिका. झालं असं की, २०१६ मध्ये निकोला थॉर्प ज्या कार्यालयात कामाला होती तिथे सर्वासाठी विशिष्ट ‘ड्रेसकोड’ होता आणि स्त्री कर्मचाऱ्यांनी (फक्त स्त्रियांनीच बरं का!)

४  इंच उंच टाचेचे सँडल्स घालणं सक्तीचं होतं. निकोलानं सपाट किंवा त्यांना अपेक्षित उंचीचे सँडल्स न घातल्यामुळे तिला चक्क घरी जाण्यास फर्मावलं गेलं. तिच्या मते, एखाद्या व्यावसायिक ठिकाणी विशिष्ट पेहराव असणं ठीक, परंतु स्त्रीच्या कार्यक्षमतेचा, हुशारीचा, सचोटीचा विचार न करता तिला साचेबद्ध सौंदर्याच्या चौकटीत बसवून, तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा व्यवसायवृद्धीसाठी उपयोग करण्याचा त्यांचा हेतू नाकारता येत नाही. अन्यथा पुरुष कर्मचाऱ्यांनाही वेगळ्या बुटांचा नियम लावला गेला असता. या अन्यायाविरुद्ध तिनं याचिका दाखल केल्यावर तिच्या समर्थनार्थ त्यावर दीड लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या. युरोपात ही परिस्थिती, तर जपानमध्येही अशीच एक नवलकथा घडतेय. तिथेही कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी उंच टाचेचे सँडल्स/ बूट वापरायच्या सक्तीविरोधात युमि इशिकावा या स्त्रीच्या पुढाकारानं ‘कुटू’ नावाची चळवळ सुरू झालीय. आपल्या परिचयाच्या ‘मी-टू’ चळवळीच्या नावाशी साधम्र्य दाखवणाऱ्या या चळवळीद्वारे जपानी स्त्रिया लिंगभेदावर आधारित नियमांविरुद्ध आवाज उठवत आहेत. जपानी भाषेत KUTSU म्हणजे चप्पल वा सँडल आणि Kutsuu म्हणजे वेदना. तासन्तास उंच टाचेचे बूट घालून काम करणं आम्हाला त्रासदायक ठरू शकतं, तेव्हा कामाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी असलेला हा जाचक नियम काढून टाकण्यासाठी युमिनं कामगार मंत्र्यांकडेच हजारोंच्या स्वाक्षऱ्या असलेली याचिका दाखल केली आहे.

‘#KuToo’ चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी तिथे मोठय़ा संख्येनं मोर्चे निघाले. खरोखर काळाचा महिमा अगाध आहे! कधी पायात जोडे घातले म्हणून हेटाळणी, तर कधी उंच टाचेचे जोडे नाही घातले म्हणून हकालपट्टी.. गोळाबेरीज एवढीच, की पुरुषी मनोवृत्तीतून तयार झालेल्या नियमांमध्ये स्त्रियांच्या मानसिक तर राहोच, पण शारीरिक सोयी-गैरसोयींचासुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार झालेला दिसत नाही.

परंतु एकूणच इतक्या वर्षांतला जगभराचा,फॅशन विश्वाचा विचार के ला तर नावीन्याची आवड असलेल्या माणसाला पादत्राणांचे विविध प्रकार आकर्षित करू लागले, भुलवू लागले हेही तितकं च खरं. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच पादत्राणंसुद्धा माणसाची अत्यावश्यक गरज होऊन बसली. प्रसंगानुरूप पादत्राणं वापरणं गरजेचं झालं, किंबहुना त्याच्या उत्पादक कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ते बिंबवलंय म्हणायला हरकत नाही. म्हणूनच एके काळी माणशी एक जोड असणारी सर्वसामान्य माणसंही हल्ली एकाच वेळी अनेक जोड खरेदी करताना दिसतात वस्त्रोद्योगाप्रमाणेच स्टाइल स्टेटमेंट बनलेल्या पादत्राण उद्योगाच्या बाजारपेठेचा आकारही वाढतोच आहे. पादत्राणांच्या जोडीनं मोजे, शू पॉलिश, ब्रश, शू रॅक अशा वेगवेगळ्या वस्तूंना अखंड  मागणी आहे. क्रिकेट, फुटबॉल, धावणे, गिर्यारोहण अशा किती तरी खेळांमध्ये खेळाडूच्या पादत्राणांच्या दर्जावर त्यांचं यश अवलंबून असल्याचं मानलं जातं. साहजिकच जगभरात खेळल्या जाणाऱ्या नानाविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी अनुरूप पादत्राणांचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल आज अक्षरश: कोटय़वधींच्या घरात आहे. टी.व्ही.वर कुठलेही सामने, स्पर्धा बघताना टी.व्ही.वर दाखवल्या जाणाऱ्या किंवा स्टेडियमच्या परिसरात लावलेल्या प्रायोजकांच्या जाहिराती पाहिल्या, अगदी खेळाडूंच्या कपडय़ांवर नजर टाकली, तरी याची खात्री पटते.

रूढींपायी अनवाणी चालावं लागणं आणि खिशाला परवडत नाही म्हणून अनवाणी पायांनी फिरणं या पूर्णता भिन्न बाबी आहेत. ‘स्टाइल स्टेटमेंट’ बनलेल्या पादत्राणांचे हजारो जोड  बाळगणाऱ्या चैनी, विलासी व्यक्तींची तर बातच सोडा, परंतु दर दिवशी, किमान दर प्रसंगाच्या कपडय़ांनुसार जोडे वापरणं समाजात काही जणांसाठी सहज झालं आहे. मात्र दुसरीकडे आजही जगातील लाखो लोकांकडे, काटय़ाकुटे, दगडधोंडे, तापलेल्या जमिनीवर भेगाळलेल्या पायांनी वणवण करणाऱ्यांकडे चपलेचा साधा एक जोडही नाही. समाजातील ही विषमतेची दरी बघून अस्वस्थ झालेल्या कॅलिफोर्नियाच्या डोनाल्ड सेमोनडी या संवेदनशील व्यक्तीच्या संकल्पनेतून ‘जागतिक चप्पल दिना’ला सुरुवात झाली. परिस्थितीपायी चपलेपासून वंचित असणाऱ्या अनेक अभागी जीवांना मदत करण्याच्या हेतूनं किमान त्यांच्या दुर्दैवी परिस्थितीची समाजाला जाणीव करून देण्याच्या हेतूनं २०१४ पासून पाळल्या जाणाऱ्या या दिनाला हळूहळू चांगला प्रतिसाद मिळतोय. जगातील नावाजलेल्या चप्पल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच आपल्याकडील सामाजिक भान असणारे काही तरुण कल्पक उद्योजक (उदा. श्रीयांस भंडारी आणि अन्य) नवीन उपक्रमांद्वारे जुन्या चपलांचा पुनर्वापर करून हजारो अनवाणी पावलांसाठी चपलांचं उत्पादन करत आहेत. चप्पल वापरायला न मिळणाऱ्या अनेकांचा ते दुवा मिळवत आहेतच, पण पुनर्वापरामुळे पर्यावरणाचं रक्षण करण्याचं, तोल सांभाळण्याचं कार्यही त्यांच्याकडून घडतंय.

लहानपणी ऐकलेल्या ‘सिंड्रेला’च्या गोष्टीनं नाजूक पायांत बसणारा काचेचा नाजूक बूट अजरामर के ला. स्त्रियांना जुन्या काळात चप्पल घालण्याच्या साध्या हक्कासाठी किं वा आता कं बर आणि पायांना जाचक ठरणारी उंच टाचांची चप्पल नको म्हणून करावा लागलेला संघर्ष मात्र परिकथांमध्ये येत नाही. चप्पल हा आपल्या जीवनाचा रोजचा भाग झालेली असताना त्यामागच्या संघर्षांची लहानशी का होईना, जाणीव राहावी म्हणून हा लेखप्रपंच!

alaknanda263@yahoo.com