मंदार भारदे mandar.bharde@gmail.com
बाराखडी शिकायला लागल्यापासूनच शब्द आणि चित्र यांची जोडी आपण जुळवली. जणू समोरच्या चित्रांवर बोट ठेवत ‘अ- आईचा’, ‘ब-बाळाचा’ असं म्हटल्याशिवाय बाळ आणि आई ओळखताच येणार नाही. शब्दांनी बनलेल्या भाषेचं महत्त्व इतकं  वाढलं, की ‘शब्देविण संवादु’ आपल्याला कधी करताच आला नाही. पण असा संवादही कदाचित भविष्यात घडू शके ल, अशी हमी देणारी एक वैश्विक चित्रभाषा सध्या झपाटय़ानं पसरते आहे. समाजमाध्यमांवर दर क्षणाला वापरले जाणारे हजारो ‘इमोजी’ हे त्या भाषेचं नाव. बऱ्याचशा भावना आणि कृ तींना या भाषेनं चित्रात बसवलं आणि जे शब्दात व्यक्त व्हायला संकोचत होते तेही व्यक्त होऊ लागले. आजच्या ‘जागतिक इमोजी दिना’च्या (१७ जुलै) निमित्ताने..  

हा लेख लिहीत असताना माझ्या मनात विलक्षण संकोचाची भावना आहे. एखादा हौशी किंवा नवथर, संकोच नावाच्या भावनेशी ज्याचा पहिल्यांदा परिचय झालाय, काळजाच्या तळापासून जो निगरगट्ट आहे आणि पहिल्यांदाच ज्याला अंशत: संकोचल्यासारखे होते आहे आणि आपल्यासारख्या अभेद्य माणसालाही संकोचल्यासारखे होऊ शकते याचा साक्षात्कार झाल्याने अजूनच संकोचल्यासारखे ज्याला वाटते आहे, अशा माणसाची एखादी ‘इमोजी’ असती तर मला माझ्या लेखाची सुरुवात त्या इमोजीने करायला आवडली असती.

Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

रॉजर फेडररने २०१५ मध्येच त्याचा दिनक्रम एकदा संपूर्ण इमोजीच्या माध्यमातून ‘ट्विट’ केला होता. सकाळी गजर वाजला, गाढ झोपेत होतो पण मला जाग आली, आंघोळ केली, द्राक्षं खाल्ली, गाडी बाहेर काढली, छान ऊन होते, मी गाडी चालवत विमानतळावर गेलो, बॅगा ठेवल्या, प्रवासात मस्त पुस्तक वाचले, कोल्ड्रिंक प्यायलो, जर्मनीमध्ये उतरलो, गवताच्या कोर्टवर मजबूत प्रॅक्टिस केली, खूप घाम आला, सफरचंद खाल्लं, ज्यूस प्यालो, गाडी काढली, रूमवर आलो, पुन्हा आंघोळ केली, पाच छोटय़ा मित्रांना भेटलो, त्यांना ‘बाय’ केले, आनंदी झालो, केळी खाल्ली, आता झोपतो.. गोष्ट संपली. त्याने हे सगळे पुराण ‘इमोजी’मधून सांगितले होते. अवघ्या काही मिनिटांत त्याच्या चाहत्याने हे सारे ‘डीकोड’ केले होते आणि फेडररने त्याला ‘बदामा’ची इमोजी ताबडतोब पाठवली होती. नुसत्या चित्रांतून सांगता येईल इतका सोपा, सरळ एखाद्याचा दिनक्रम असू शकतो, याने मला फेडररचा विलक्षण हेवा वाटला. मी माझा दिनक्रम इमोजीत मांडायचा प्रयत्न करून पाहिला..

सकाळी सकाळी इंटरकॉम वाजला, घरातील इतर तीन प्रौढ, दोन बालके आणि एक मांजर यांना स्वाभाविकपणे तो ऐकूच गेला नाही, अचानक बरगडीत दणका बसला आणि बाहेर जाऊन फोन उचलणे हे सप्तपदीच्या चवथ्या फेरीत आपण कबूल केले आहे याची नि:शब्द जाणीव मला करून देण्यात आली. त्रासिक चेहऱ्याने फोन उचलला. ‘साब मॅडमने  राँग साईडको गाडी पार्क किया हैं। तो पोलीसवाला उसको उठाके लेके जा रहा हैं। ’ अशी मंगलवार्ता सिक्युरिटीने दिली. ‘अरे पोलीसवालोंको मेरा नाम बोलनेका ना!’ ‘बोला था साब। फिर वो बोला अब तो बिलकुल नही छोडेगा।’ ‘ठीक आहे! मैं देखता हैं।’ म्हणून फोन ठेवला आणि पाचव्या सप्तपदीत पोलिसांकडून गाडी घेऊन येणे हीसुद्धाआपली जबाबदारी असेल, हे वचन दिल्याची हताश जाणीव झाली. नंतर बाथरूममध्ये गेलो. गाडी पोलिसांनी नेली नसती, तर तिच्या टायरखाली टूथपेस्ट ठेवून आणि त्यावर गाडी चालवून जास्त पेस्ट आपल्याला ब्रशवर घेता आली असती, याची बोचरी जाणीव झाली. कितीही अचूक प्रयत्न केला आणि दोन दोन तोटय़ांचे गणित कसेही जमवले, तरी स्वत:च्या मनाला येईल इतक्याच उष्णतेने पाणी अंगावर फेकणाऱ्या शॉवरखाली दोन शतांश अंगकाठी राखून असलेल्या साबणाने आंघोळ करावी लागली. आंघोळ करताना सात मिनिटांत फाडफाड ‘मोटिव्हेट’ करणाऱ्याचे भाषण लावले आणि उत्साहाने रगोरग भरून बाहेर आलो. इस्त्रीवाल्याने फक्त निळी पॅन्ट आणि हिरवा शर्टच आणून ठेवला आहे, हे जाणवले. ताजा ताजा ‘मोटिव्हेटेड’ असल्याने ‘आपण करू ती स्टाइल!’ असे मनाला समजावले आणि आहेत ते कपडे चढवले. घरातल्या मांजराने उपहासाने माझ्याकडे पाहिले आणि ‘चारचौघांत मी यांचे मांजर आहे, हे सांगायलाही मला लाज वाटते’ असा भाव चेहऱ्यावर आणला. ‘कॅ ब’वाला कुठेतरी दीड किलोमीटरवर थांबला आणि त्याला जाऊन मी गाठले. एक किलोमीटरवरच्या पोलीस स्टेशनवर गेलो. ऑफिसला आलो. खुर्चीचे एक चाक बसल्या बसल्या निखळले. तीन पायांवर मी. उरलेल्या खुर्चीचा चौथा तुटका पाय मागे नेला तर पडायची भीती आणि पुढे आणला तर उगाच समोरच्या समोर झुकल्यासारखे वाटते, त्यामुळे दिवसभर माझे स्थान डगमगते राहिले. काल जो नक्की पैसे देतो म्हणाला होता, तो आज ‘आऊट ऑफ कव्हरेज’ झाला. दिवसाच्या सर्व प्रहरांनी फुटबॉलसारखे चारी बाजूंनी तुडव तुडव तुडवले. आता रॉजर फेडररसारखा आपलाही दिनक्रम सोपा करून, इमोजीचा वापर करून मांडायचा तरी कसा?

आज ‘जागतिक इमोजी दिवस’ आहे. कोणते तरी एक चित्र संभाषणासाठी निवडायचे आणि संवाद एकही शब्द न वापरता पूर्ण करायचा अशी कल्पना आणि ते चित्र किं वा चिन्ह म्हणजे ‘इमोजी’. आज सुमारे साडेतीन हजार अशी चिन्हे वा चित्र आहेत, जी जगभरात इमोजी म्हणून मान्यता पावली आहेत आणि फक्त ती चित्रे वापरली तरी एकही शब्द न वापरता संवाद पूर्ण होतो. सहज गंमत म्हणून तुम्ही कोणत्याही फेसबूक किंवा ट्विटर अकाउंटवर एखाद्या पोस्टच्या कमेंटस्मध्ये जाऊन बघाल, तर तुम्हाला लक्षात येईल की खूप लोकांनी शब्द वापरणे टाळले आहे आणि फक्त ‘लाइक’, ‘प्रेम’, ‘खिदळायला झालंय’ किंवा ‘खचायला झालंय’ अशा इमोजी वापरून आपले त्या पोस्टबद्दलचे मत नोंदवले आहे. अनेक पोस्ट खाली तर शब्दांनी कमी आणि इमोजींनीच लोक जास्त व्यक्त झालेत. ‘आकाशाकडे अंगठा’ म्हणजे आवडले आणि ‘जमिनीकडे अंगठा’ म्हणजे आवडले नाही, असा सोपा मामला.

सहज प्रयोग म्हणून जर  कमेंट करणाऱ्या चार पाच जणांना सांगितले, की बाबा रे चार ओळींची कमेंट लिहून दाखवतोस का? किंवा चार शब्द बोलून दाखवतोस का? तर त्यांना कदाचित तसे करायला संकोच वाटेल. प्रयोग म्हणूनच, पण सगळ्यांच्या पोस्टवर कमेंट करणारे बहुतांश लोक कोण आहेत याचे ‘प्रोफाइलिंग’ के ले, तर लक्षात आले, की सर्वसामान्य आयुष्यात शब्दांनी अजिबात व्यक्त न होणाऱ्या लोकांनी इमोजींचा पर्याय उपलब्ध झाल्यावर हिरिरीने व्यक्त व्हायला सुरुवात केलीय. साध्या, सोप्या शब्दांच्या उच्चाराचाही संकोच असणाऱ्यांचा थेट, थोडक्यात आणि नेमके मेसेज देणाऱ्या इमोजी चित्रलिपीच्या जगापर्यंतचा प्रवास थरारक आहे.

आपली भारतीय म्हणून किंवा अगदी जागतिक नागरिक म्हणूनही चित्रसमज अगदी मर्यादित आहे. वर्षांनुवर्षे आपल्याला आपल्या शाळेत फक्त शब्दांनी व्यक्त होणारी भाषा शिकवली गेली आहे. त्यामुळे ‘शब्देविण संवादु’ आम्हाला येत नाही, माहीतही नाही. व्यक्त व्हायला तुमच्याकडे शब्द हवेतच. ते नसतील तर तुम्हाला व्यक्त व्हायचा अधिकारच नाही, अशी एक वेगळीच ‘जातीय उतरंड’ आहे, जिथे स्वाभाविकपणे शब्दाचा ‘आहे रे’ वर्ग कमालीचा कमी लोकांचा आहे. त्यात पुन्हा शब्दांची गंमत अशी, की भाषा कोणतीही असो, या शब्दांचे अनेक अर्थ, अनर्थ, यांच्या विराट गोंधळात संभाषण करीत राहायचे, फक्त हेच आमच्या सरावाचे आहे. ‘ध चा मा’ करून कसे गोंधळ केले गेले, हे आम्ही वर्षांनुवर्षे इतिहास म्हणून सांगतो आहोत आणि सर्व भारतीय आणि कदाचित जागतिक भाषांमध्येही हे ‘ध चा मा’ असतीलच, असे मानायला वाव आहे. या सगळ्यात इमोजीची चित्रलिपी ही सर्वथैव वेगळी आणि मुख्य म्हणजे कमालीची थेट आणि स्पष्ट आहे. फक्त गंमत अशी, की आताच्या बहुतांश लोकसंख्येने शब्दांना वगळून संवाद होऊ शकतो आणि शब्दाशिवायही आकलन होऊ शकते, या शक्यतेचा विचारच केलेला नाही.

नव्वदीच्या दशकात किंवा त्यापूर्वी शाळेत असलेल्या माझ्यासारख्यांच्या आयुष्यात चित्रे आणि रंग मुळातच किती कमी आले याची  अगदी रुखरुख जाणवत राहाते. माझ्या आयुष्यात आलेल्या इमोजी कोणत्या होत्या हे जेव्हा आज आठवतो, तेव्हा हृदयाचे ‘बदाम’ म्हणून लोकप्रिय असणारे एक चित्र किंवा भूत वा मानवी कवटी आणि दोन हाडांचे ‘डेंजर’ म्हणून दर्शविलेले एक चित्र आणि काही रस्ता सुरक्षेच्या खुणा, यापलीकडे मला काही आठवत नाही. आम्ही बाराखडी शिकायला पहिल्यांदा आणि कदाचित शेवटचेच शब्द आणि चित्र यांची जोडी लावली. ‘आ रे आईचा’, ‘ब रे बाळाचा’ वगैरे वगैरे.. जन्माला आलेल्या बाळाला शब्द माहीत नसताना स्पर्शानेच आई कळत होतीच की, आणि आईला बाळासाठी कोणता शब्द वापरतात हे माहीत नसते झाले तरी बाळ समजत होतेच. चित्राला समजवायला शब्द लागतीलच, त्याशिवाय आपले भागणारच नाही, ही पहिली अहंकारी अंधश्रद्धा या बाराखडीने आपल्या आयुष्यात आणली. दृश्य, स्पर्श, गंध यांचीही भाषा असू शकते आणि त्यांना व्यक्त करण्याकरिता शब्दांची कोणतीही गरज नाही, हे कोणीही कधी फारसे सांगितलेच नाही. जिभेने उच्चारता येणाऱ्या शब्दांच्या अहंकाराने आमच्या पंचेंद्रियांतल्या उरलेल्या चार इंद्रियांना अगदी दुबळे करून टाकले.

आज जेव्हा व्यक्त करायला एकाही शब्दाची गरज नसलेल्या इमोजी मी पाहातो, तेव्हा आशयाच्या आकलनासाठी शब्दाचा हात सोडून अर्थाच्या जवळ जात असलेली मानवी प्रज्ञा मला दिसायला लागते आणि माझ्या डोळ्यासमोर घाबरत घाबरत का होईना, पण भोपळा काढून टाकून थेट पाण्यात उतरायचा प्रयत्न करणाऱ्या नव्या माणसाचा घाबरलेला, तरी उत्सुक चेहरा येत राहातो. वाटत राहाते, की शब्दाच्या भ्रमाचा हा भोपळा टाकल्यावर जगण्याच्या आकलनाचा मोठा प्रवाह वाटय़ाला येईल, जिथे तरंगायला शब्दाची गरज लागणारच नाही. इमोजीचा आजच्या संभाषणात वेगाने वाढणारा वापर हा मला शब्दाची शेपूट टाकून देऊन आकलनाच्या दिशेने उत्क्रांत होत जाणारा जगण्याचा प्रवास असावा असे वाटते.

इमोजी ही आता समोर येते आहे तशी फक्त काहीतरी गमतीची गोष्ट नसावी. शब्दाला शब्द जोडत अर्थ पोहोचवण्याचा पिढय़ान्पिढय़ा, शतकानुशतके प्रयत्न करीत असलेल्या माणसाला कुठेतरी आता साक्षात्काराची चुणूक दिसली असावी. कोणास ठाऊक,  आदिमानवाला जशी कालांतराने शेपूट अनावश्यक वाटली होती आणि एका विराट कंटाळ्याने त्याने ती टाकून दिली, तशी आता शब्द टाकून द्यायची वेळ आलीय असेही वाटत असावे! जातील अजून पाच-पन्नास पिढय़ा, पण बहुतेक माणूस या शब्दाच्या सापळ्यातून बाहेर पडेल असे मला वाटते.

जिवाच्या आकांताने आजवर जन्माला आलेली किती बाळं रडली. सगळ्यांनीच ऐकली. कोण्यातरी एका प्रज्ञावानाला त्या रडण्यातून ‘कोहं?’ हा चिरंतन प्रश्न ऐकू आला. ‘अहं ब्रम्हास्मि’ हे त्याने आणि त्याच्या नंतरच्या पिढय़ांनी फक्त लिहिलेय. ना त्यांना कधी ते ऐकायला आलेय, ना जाणवले आहे. ब्रम्हाचे हे आकलन कदाचित शब्दातीतच असेल. शब्दाने जिवाच्या आकांताने पोहोचवायचा प्रयत्न केलेला आशय आणि माणसाची समज यातली एक भयाण, विराट दरी माझ्या वारंवार नजरेसमोर येत राहाते.

कितीतरी नाती आठवत राहातात, जी शब्दांच्या भूलभुलैय्यावर उभी होती, तर कितीतरी अशी नाती, जिथे जिवाच्या आकांताने शब्दांनी आशय पोहोचवायचा प्रयत्न केला, तरी बाकी शिल्लक फक्त कोरडा प्रदेशच राहिला. शब्दाच्या जंजाळातून सुटून आपण आकलनाच्या एका अपरिचित प्रदेशात जायला निघालो आहोत. ही चित्राची भाषा आहे. याला कोणत्याही प्रदेशाचे बंधन नाही, याला समजायला तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात, स्त्री आहात की पुरुष?, काळे, गोरे, पिवळे, निमगोरे, कसे आहात? याने काहीच फरक पडत नाही. परभाषा समजून घ्यायला अनुवादक लागेल, पण चित्राच्या भाषेला अनुवादकाची गरज लागणार नाही. ही जन्माला आली तेव्हाच जागतिक भाषा म्हणून जन्माला आली. ही भाषा आपल्या अद्याप अंगवळणी पडलेली नाही. तसे तर आपल्याला अजून विविध मुद्रा, गंध, स्पर्श, अगदी मौन, शांतता, याचीही भाषा पुरेशी अवगत नाही. विविध भाषिक अनुशेषाची पुरेशी खंतही आपल्याला नाही. त्यातल्या चित्राची भाषा शिकायच्या दिशेने इमोजीच्या रूपाने एक दमदार पाऊल टाकले आहे. कोणास ठाऊक, अजून काही वर्षांनी जेव्हा मी ‘लोकसत्ता’साठी लेख लिहीत असेन तेव्हा त्या लेखात एकही शब्द नसेल, खूप साऱ्या चित्रांची एक मालिका असेल! ‘लोकसत्ता’चे वाचक मराठीपणाच्या बंधनातून मुक्त असतील, त्यांना स्थानिक भाषा, प्रमाण भाषा, जागतिक भाषा, प्रत्येकीचे व्याकरण, या सगळ्या गोंधळातून जावेच लागणार नाही! प्रत्येकाची एक बोली भाषा असेल आणि ती चित्राची भाषा असेल. त्यामुळे आज ‘लोकसत्ता’मध्ये लिहिल्यावर मी जसा मराठी जाणणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतोय, तसा तेव्हा मी जगातल्या कोणाहीपर्यंत पोहोचू शकेन.

समाधीमुद्रेतले बुद्ध आठवा. ते ज्ञानी आहेत, त्यांना आकलन झाले आहे, त्यांच्याकडे विराट शांतता आहे, ते समाधानी आहेत, हे आपल्याला शिकवावे लागत नाही, थेट समजते. आपल्याला ज्ञात भाषा समजण्यासाठी शिकाव्या लागतात, चित्र भाषा शिकावी लागत नाही, ती थेट समजते. शिकायच्या भाषेपासून समजायच्या भाषेपर्यंतचा किंवा जाणवायच्या भाषेपर्यंतचा हा प्रवास मोठा रोचक असणार आहे.

आताची पिढी ज्या वेगाने त्या रस्त्यावर निघाली आहे, ते पाहाता बाकी फक्त श्रीशिल्लक म्हणून राहिलेल्या पिढीला फार वेगाने ते या समजायच्या भाषेच्या रस्त्यावर आणून सोडतील आणि मग तेव्हा फेडररने जसा सहज सोप्या इमोजीद्वारे आपला दिनक्रम मांडला, तसा मलाही माझा दिनक्रम इमोजीतून मांडता येईल!

प्रयोग म्हणूनच, पण सगळ्यांच्या पोस्टवर कमेंटकरणारे बहुतांश लोक कोण आहेत याचे प्रोफाइलिंगके ले, तर लक्षात आले, की सर्वसामान्य आयुष्यात शब्दांनी अजिबात व्यक्त न होणाऱ्या लोकांनी इमोजींचा पर्याय उपलब्ध झाल्यावर हिरिरीने व्यक्त व्हायला सुरुवात केलीय. साध्या, सोप्या शब्दांच्या उच्चाराचाही संकोच असणाऱ्यांचा थेट, थोडक्यात आणि नेमके मेसेज देणाऱ्या इमोजी चित्रलिपीच्या जगापर्यंतचा प्रवास थरारक आहे.