रुचिरा सावंत

‘नासा’सारख्या विज्ञान संस्थांमध्ये आता उच्चपदांवर तुरळक संख्येनं का होईना, पण स्त्रिया दिसू लागल्या आहेत. ही स्वागतार्ह पावलं दिसेपर्यंतचा काळ मात्र स्त्रियांसाठी समान संधींच्या दृष्टीनं खूपच खडतर होता. ‘नासा’च्या जुन्या काळात किचकट गणिती आकडेमोड करणाऱ्या स्त्रियांचा प्रवास पाहिला तर हे पटतं. या गणिती स्त्रियांमधल्या अग्रगण्य कॅथरीन जॉन्सन यांचा नुकताच २४ फेब्रुवारी रोजी पहिला स्मृतिदिन झाला. त्यानिमित्ताने अवकाश विज्ञान क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग सांगणारा लेख, नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला दिनाच्या आणि उद्याच्या (११ आणि २८ फेब्रुवारी) राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने..

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

काही दिवसांपूर्वी, म्हणजे १९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे मध्यरात्री अवघ्या जगाचे डोळे ‘नासा’च्या (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) लाइव्ह स्ट्रीमिंगवर खिळले होते. छत्तीसावं मार्शियन नवीन वर्ष दणक्यात साजरं करण्यासाठी (‘मार्स इयर’ गणतीला ११ एप्रिल १९५५ रोजी सुरूवात झाली. मंगळावरील १ वर्ष म्हणजे पृथ्वीवरील ६८७ दिवस.) फेब्रुवारी महिन्यातच दुबई, चीन यांच्या यशस्वी मोहिमेनंतर त्या दिवशी नासाचं ‘परसिव्हरन्स रोव्हर’ आणि ‘इंजेन्युटी हेलिकॉप्टर’ मंगळावर उतरणार होतं. श्वास रोखून सारेच थराराची शेवटची ७ मिनिटं- जी ‘सेव्हन मिनिट्स ऑफ टेरर’ म्हणून ओळखली जातात त्यांचा अनुभव घेत होते. इतक्यात भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे रात्री २:२५ च्या दरम्यान कॅलिफोर्निया येथील ‘नासा जेपीएल कंट्रोल रूम’मधून ऑपरेशन लीडर डॉ. स्वाती मोहन यांनी हे लॅण्डिंग यशस्वी झाल्याची घोषणा केली. या कंट्रोल रूममधल्या सगळ्यांबरोबरच बाकीचं जगही माणसाच्या या मंगळ मोहिमेचं यश साजरं करण्यात व्यग्र झालं. ठिकठिकाणहून स्वाती मोहन यांचं कौतुक होऊ लागलं. कधी भारतीय वंशाची म्हणून, तर कधी अनेक स्त्रियांसाठी आदर्श ठरणाऱ्या स्त्री-अभियंता म्हणून या यशासाठी त्यांचं आणि त्यांच्या चमूचं अभिनंदन केलं जाऊ लागलं.

किती साधी आणि सरळ गोष्ट आहे, नाही? कंट्रोल रूममध्ये प्रकल्पाचं नेतृत्व करणारी स्त्री अशी एका स्त्रीची प्रतिमा फार सहज स्वीकारलीय आज आपण. याच मोहिमेतील इंजेन्युटी हेलिकॉप्टरच्या प्रोजेक्ट मॅनेजर मिमी आँग असतील किंवा मंगळावर यापूर्वी ‘क्युरियॉसिटी रोव्हर’ उतरवण्यासाठी पॅराशूट यंत्रणा डिझाइन करणाऱ्या अनिता सेनगुप्ता. भारतीय ‘चांद्रयान-२’साठी मिशन डायरेक्टर असणाऱ्या रितू क्रिधाल ते ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेला ‘ऑल वूमन स्पेस वॉक’. आता तर ‘अर्टिमिज’ मोहिमेद्वारे स्त्री अवकाशवीर चंद्रावरसुद्धा पोहोचणार आहे. तसं पाहिल्यास अवकाश विज्ञान या क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग, त्यांचं योगदान नवं नाही. त्यामुळे एखादी स्त्री वैज्ञानिक, अभियंता किंवा अवकाशवीर असणं हे आपल्यासाठी सवयीचं झालं आहे. मात्र हे असं सगळं इतकं सोपं सुरुवातीला मुळीच नव्हतं. या समान संधींचा पाया रचणं सहज होणारं नव्हतं. काही स्त्रियांनी ते करून दाखवलं. तो हमरस्ता कधी होईल माहीत नाही, पण त्या पायवाटेचा आज चांगला रस्ता झाला आहे. वंशभेद आणि लिंगभेदापलीकडचं जग. अनेकांचं यात योगदान आहे. कुणा एकाचं ते काम नक्कीच नाही. यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे कॅथरीन जॉन्सन.

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अमेरिकेत कमालीचा वंशभेद होता. आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या माणसांना भेदभावाची वागणूक दिली जात होती. त्यांना अमेरिकी माणसांबरोबर एका शाळेत शिकता येत नव्हतं. वाचनालयातून ‘कलर्ड’ अशी पाटी लावलेल्याच भागातील पुस्तकं वाचता येत होती. सर्व प्रकारच्या सोयी, इतकंच काय, तर ज्ञान मिळवण्यावरसुद्धा अनेक बंधनं होती. ही गोष्ट आहे संगणक जीवनाचा महत्त्वाचा भाग बनण्यापूर्वीची. नासाची ‘मिशन कंट्रोल रूम’ ह्य़ूस्टनला जाण्यापूर्वीची.. ‘स्पटनिक’च्या ‘लाँच’मुळे जगाचा इतिहास बदलण्यापूर्वीची.. ‘नाका’ (नॅशनल अ‍ॅडव्हायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स) या संस्थेचं ‘नासा’मध्ये रूपांतर होण्यापूर्वीची..  साधारण शतकभरापूर्वी १९१८ मध्ये २६ ऑगस्ट रोजी व्हाईट सल्फर स्प्रिंग येथे कॅथरीन जॉन्सन यांचा जन्म झाला. तल्लख बुद्धिमत्तेची ही चिमुकली गणिती खेळ खेळायची. कधी जिने मोज, घरातली ताटं मोज, कधी समोर जे असेल ते! आकडेमोड करण्याचे खेळ तिच्या फार आवडीचे होते. शिकण्याची,अभ्यासाची  इतकी ओढ होती की पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करण्यासाठी असलेली आवश्यक वयाची अट पूर्ण करण्याआधीच आवड म्हणून ती आपल्या मोठय़ा भावासोबत शाळेत जायला लागली. वयाच्या चौथ्या वर्षीच दुसऱ्या इयत्तेत दाखल झाली. व्हाईट सल्फर स्प्रिंगमध्ये आफ्रिकन अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शाळा नव्हती. तिला पुढचं शिक्षण व्यवस्थित घेता यावं यासाठी तिथपासून १२० मैल दूर त्यांचा संपूर्ण परिवार स्थलांतरित झाला. समाजातील रोष, उपलब्ध नसणाऱ्या संधी आणि करावा लागणारा संघर्ष या परिस्थितीतही त्या कुटुंबानं आपल्या मुलांना स्वप्न पाहायला नुसतं शिकवलं नाही, तर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शक्य ते सगळे कष्ट त्यांनी घेतले. म्हणूनच पुढे ही लहानगी जग बदलणारी, एक वेगळा आदर्श घालून देणारी ठरली. स्त्रियांबरोबरच आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या व्यक्तींसाठी अनेक पातळ्यांवर समानता निर्माण करण्याच्या संघर्षांत एक महत्त्वाचा आधार ठरली.

वेस्ट व्हर्जिनिया स्टेट विद्यापीठातून गणित विषयात पदवी संपादन केल्यानंतर इतर अनेकांप्रमाणेच कॅथरीन शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. लॅन्गले रिसर्च सेंटर येथे काम करण्यासाठी ‘नाका’ संस्था गणितज्ञांची नियुक्ती करत असल्याची बातमी १९५०च्या दरम्यान (म्हणजे आजपासून साधारण ७० वर्षांपूर्वी) त्यांच्या कानी आली. या आकडेमोडीवर काम करणाऱ्यांना ‘कॉम्प्युटर्स’ असंच संबोधलं जाई. १९५३ मध्ये त्या नासामध्ये कॉॅम्प्युटर्स टीमचा भाग झाल्या आणि इथून खऱ्या गोष्टीला सुरुवात झाली. त्या दरम्यान अमेरिकेत नागरी हक्क चळवळ सुरू होती. कामाच्या ठिकाणी वंशभेद आणि लिंगभेदावर बंदी आणली गेली होती. म्हणून संस्थेनं काही स्त्रियांची- त्यातही आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांची गणना करण्याच्या कामासाठी ‘कॉम्प्युटर्स’ या बिरुदाखाली निवड केली. पण एका अर्थी स्त्रियांना संवेदनशील माहिती सांगायला नको, त्यांना महत्त्वाच्या गोष्टी न समजता त्यांच्याकडून भरपूर किचकट काम करून घेण्यासाठी हा एक सोपा मार्ग तिथे शोधला गेला होता. पण कॅथरीन लहानपणापासूनच वेगळ्या होत्या. प्रश्न विचारणं आणि आपण जे करतोय ते का करतोय, हे जाणून घेण्याविषयी त्यांना कुतूहल होतं. प्रश्न विचारण्याच्या याच सवयीमुळे त्या  वेगळ्या ठरल्या आणि पुढे महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकल्या.

मार्गट ली शेटरली या हॅम्पटन, व्हर्जिनियामध्ये वाढलेल्या लेखिकेनं जगाचा, अमेरिकेचा आणि अवकाशविज्ञानाचा इतिहास बदललेल्या आफ्रिकन अमेरिकन स्त्रियांविषयी माहिती देणारं ‘हिडन फिगर्स’ हे पुस्तक लिहिलं. पुढे त्याच नावाचा एक चित्रपटही आला. या पुस्तकात कॅथरीन, डोरोथी आणि मेरी जॅक्सन या तीन प्रमुख व्यक्तिरेखांसोबतच इतर अनेक स्त्रियांचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. यादरम्यान कॅथरीन यांना भेटून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मार्गट त्यांच्या घरी गेल्या तेव्हा कॅथरीन ९३ वर्षांच्या होत्या. पण तरीही त्यांना ज्या बारकाव्यांसह गोष्टी आठवत होत्या, ते लेखिकेला थक्क करणारं होतं.  १९५८ ते १९६३ या काळात ‘प्रोजेक्ट मक्र्युरी’ म्हणून एक प्रकल्प अमेरिकेनं केला. अमेरिकी माणसाला पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्याचा आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्याचा हा प्रकल्प होता. जॉन ग्लेन हा तो अवकाशवीर. ‘फ्रेंडशिप-७’ स्पेसक्राफ्टच्या आधीसुद्धा एकदा कॅथरीन यांनी जॉन यांच्यासाठी आकडेमोड केली होती. त्यामुळे

फ्रें डशिप-७ च्या वेळी जॉन यांनी त्यांना ती करायला सांगितली आणि त्यांनी ती केली. एका मोठय़ा मोहिमेवेळी तुमचा रंग ‘नासा’मध्ये महत्त्वाचा नव्हता, महत्त्वाचं होतं ते तुम्ही सोडवलेल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर.

‘एडिटोरियल मीटिंग’मध्ये सहभाग घेणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या. शक्यतो पुरुष संशोधन करायचे आणि अशा सभांमध्ये ते एकमेकांना सांगून त्यावर शिक्कामोर्तब करायचे. आकडेमोड करण्यासाठी मला या सभांना उपस्थित राहून तिथे काय चर्चा होतात हे समजून घेणं गरजेचं आहे, असं त्यांनी वरिष्ठांना सांगितलं. आणि पहिल्यांदाच कु णा स्त्रीला त्या खोलीत प्रवेश मिळाला. पुढे ‘अपोलो लॅण्डिंग’मधील त्यांच्या कार्यामुळे माणसाला शब्दश: चंद्रावर पोहोचवण्यात यश आलं. अवकाश विषयावरील काही पहिल्या पुस्तकांपैकी एक असणाऱ्या पुस्तकाच्या लेखनातही त्यांनी भूमिका बजावली.

त्यांच्या सन्मानार्थ नासानं लॅन्गले रिसर्च सेंटर येथील एका इमारतीचं ‘कॅ थरीन जी. जॉन्सन कॉम्प्युटेशनल रीसर्च फॅ सिलिटी’ असं नामकरण केलं. २०१५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’ प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

आपल्या कामातूनही जग बदलता येतं, हा विश्वास कॅथरीन सगळ्यांना देतात आणि जगभरातील आबालवृद्ध स्त्रीवर्गाला अवकाशाइतकी मोठी स्वप्नं पाहाण्याचं बळ देतात. शेवटपर्यंत तल्लख बुद्धी जपलेल्या कॅ थरीन यांनी वयाच्या १०१व्या वर्षी २४ फेब्रुवारी २०२० रोजी जगाचा निरोप घेतला. या वर्षी त्यांचा पहिला स्मृतिदिन. आणि योगायोग म्हणजे आंतरराष्ट्रीय विज्ञानातील महिला दिन (११ फेब्रुवारी)आणि ‘ब्लॅक हिस्ट्री मंथ’ साजरा केला जाणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातच तो यावा!

‘हिडन फिगर्स’मध्ये त्यांची भूमिका करणाऱ्या हॅन्सनच्या शब्दात सांगायचं तर, ‘‘युअर लेगसी विल लिव्ह ऑन फॉरेव्हर अ‍ॅण्ड एव्हर. यू रॅन, सो वुई कुड फ्लाय!’’

ruchirasawant48@gmail.com