सुखी माणसाचा सदरा प्रत्येकालाच हवा असतो, पण तो मिळवायचा कसा हा प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरीत… परंतु जसजसा मानसशास्त्राचा आणि पुढे जाऊन व्यवस्थापनाचा अभ्यास, संशोधन होऊ लागलं तसंतसं सुख, आनंद, समाधान मिळवता येतं हे लक्षात येऊ लागलं. संशोधनाद्वारे असंही सिद्ध झालेलं आहे, की आनंदी आणि समाधानी माणूस व्यावसायिक जगात अधिक उद्यामशील असतो. त्यामुळे त्याला तसं वातावरण घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळालं तर भरभराट होणं शक्य आहे. ‘करोना’ काळानं अर्थात आनंदाचा झोका आर्थिक भरभराटीपेक्षा आरामदायी, निरोगी जगण्याकडे वळवला आहे. ‘वर्क लाईफ बॅलन्स’ आणि हॅपिनेस इंडेक्स’ या विषयावर संशोधन के लेल्या डॉ. मानसी जावडेकर यांचा आनंद, सुख, समाधानाची परिभाषा नेमकी काय हे सांगणारा हा लेख ‘जागतिक आनंद दिना’ च्या (२० मार्च) निमित्तानं…

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हा तुकाराम महाराजांचा अभंग आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. सुख, आनंद म्हणजे नक्की काय? हा प्रश्न माणसाला आयुष्यभर पडत असतो. वेगवेगळ्या गोष्टींमधून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. विविध गोष्टी समरसतेनं करून अनेकदा त्याला खरा आनंद मिळतो. कुणाला गाण्यातून, कुणाला चित्र काढण्यातून, कुणाला वाचनातून, फिरण्यातून, तर कुणाला फक्त कामातून आनंद मिळतो. आनंदाची संकल्पना ही प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे आणि मिळणारा आनंदसुद्धा कमी-जास्त प्रमाणात आहे. हा जो आनंद माणसाला मिळतो त्याचं मोजमाप करण्याच्या दृष्टीनं काही परिमाण लावता येईल का, असा प्रश्न अभ्यासकांसमोर होता. त्या अभ्यासातून आनंदाचा विविध दृष्टिकोनातून विचार के ला गेला आणि तो मिळवण्यासाठी त्याचं व्यवस्थापन करता येईल का, यावर संशोधनही झालं.
अर्थात हे सगळं आपण भौतिक आनंदाबद्दलच बोलतोय. संतसाहित्यामध्ये जो परमेश्वराच्या सान्निध्याचा आनंद वर्णन केलेला असतो, त्या प्रकारच्या आनंदाची परिमाणं निराळी असणार. आणि तो प्रत्येकाचा प्रत्येकानं अनुभवावा असा असणार. भौतिक आनंदाच्या मोजमापांविषयी बोलायचं झालं, की अब्राहम मास्लो यांच्या १९४३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या माणसाच्या प्रेरणेविषयी मांडलेल्या संशोधनाची आठवण येते. प्राथमिक मानसिक गरजा, सुरक्षिततेच्या गरजा, प्रेमाची आणि ओढ वाटण्याची गरज हे टप्पे मांडून झाल्यावर मास्लो ‘एस्टीम’ आणि ‘सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशन’ या पातळ्यांकडे वळतो. आधीच्या पातळ्यांवर असतं ते निव्वळ समाधान आणि जसजशी व्यक्ती निर्मितीकडे आणि संशोधनाकडे वळते आणि जसजसं काम करण्याचं स्वातंत्र्य व्यक्तीला मिळतं तसतसा त्याला आनंद मिळतो, नुसतं समाधान नव्हे, समाधान ते आनंद (सॅटिस्फॅ क्शन ते हॅपिनेस) असा हा प्रवास असतो. मास्लोचं संशोधन मानसशास्त्राच्या कक्षेत येणारं, पण अगदी १९५०-६० पासूनही आनंद या संकल्पनेकडे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा अन्य शाखांमधूनही अभ्यासक अभ्यास करत आले आहेत.
१९७२ मध्ये भूतानचा राजा जिग्मे वांगचुक यानं ‘ग्रोस नॅशनल हॅपिनेस इंडेक्स’ची संकल्पना मांडली. भूतान या देशामध्ये नागरिकांचा आनंद मोजता यावा यासाठी त्याचे काही निकष (पॅरामीटर्स) ठरवले गेले. त्यात के वळ राहाण्याच्या सोयीसुविधा वगैरे नव्हे, तर आध्यात्मिक वर्तन, प्रार्थना अशा विविध मापदंडांचा आधार आनंद मोजण्यासाठी घेतला गेला. जेव्हा अन्य देश केवळ ‘जीडीपी’ (एकू ण राष्ट्रीय उत्पन्न) मोजत होते, तेव्हा भूताननं हे पाऊल उचललं. २०११ मध्ये ‘ओईसीडी’ (ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट) या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रीय संस्थेनं ‘बेटर लाईफ इंडेक्स’ हा निर्देशांक तयार केला. आणि या धर्तीवर आज आनंदाची मोजमापं करणारे अनेक निकष आहेत. दरवर्षी २० मार्च हा दिवस ‘वर्ल्ड हॅपिनेस डे- जागतिक आनंद दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आणि त्या निमित्तानं ‘यूनो वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट’ प्रकाशित केला जातो. असा पहिला अहवाल २०१२ मध्ये प्रसिद्ध झाला. ‘गॅलप वर्ल्ड पोल’द्वारे संकलित केलेल्या माहितीआधारे विविध देशांचं मानांकन दरवर्षी प्रसिद्ध केलं जातं. दुर्दैवानं भारताचा क्रमांक यात बऱ्यापैकी खालच्या स्तरावर असतो.

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
kolhapur lok sabha seat, Sanjay Mandlik, Clarifies Controversial, against shahu maharaj, opponents deliberately distorted statement, shahu maharaj adopted statement, kolhapur shahu maharaj, shivsena, congress,
माफी मागायचा प्रश्नच नाही; दत्तक वारस विरोधातील उग्र जनआंदोलनाचा इतिहास जाणून घ्यावा – संजय मंडलिक
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

या चर्चेनंतर कुणाला वाटेल की हे सगळं आंतरराष्ट्रीय राजकारणासारखं रोजच्या जगण्यापासून लांब असलेलं आहे. पण खरं तर रोजची अनेक कामं, कष्ट आणि आनंद याचं प्रत्येक माणसाचं गणित त्याच्यापुरतं महत्त्वाचं असतं. मी माझ्या ‘पीएच.डी.’च्या प्रबंधामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्राध्यापकांच्या ‘वर्क लाईफ बॅलन्स’ आणि ‘हॅपिनेस इंडेक्स’ या दोन निकषांचा सहसंबंध अभ्यासला. तो मानसशास्त्राच्या नजरेनं केलेला नसून व्यवस्थापनशास्त्राच्या अंगानं केलेला अभ्यास होता. रोजचं जीवन जगताना माणूस मुखत्वे दोन पातळ्यांमध्ये जगत असतो. पहिलं त्याचं घरदार, त्याचं कुटुंब आणि व्यक्तिगत आयुष्य. आणि दुसरं म्हणजे त्याचं व्यावसायिक आयुष्य- नोकरी, उद्योगधंदा त्यातील ताणतणाव, स्पर्धा वगैरे. या दोन जगण्याच्या पातळ्यांमधला सुसंवाद म्हणजे ‘वर्क लाईफ बॅलन्स’. या दोन्ही टप्प्यांवर जगताना अखेरीस माणूस समाधान आणि आनंद शोधत असतो. लाईफ बॅलन्स आणि आनंद यांच्यात थेट सहसंबंध आहे. संशोधनाद्वारे असंही सिद्ध झालेलं आहे, की आनंदी आणि समाधानी माणूस व्यावसायिक जगात अधिक उद्यामशील असतो. आणि कुठल्याही व्यावसायिक संघटनेच्या दृष्टीनं त्या संस्थेचं कामकाज सुरळीत होणं आणि संस्थेची आर्थिक व अन्य भरभराट होणं हे महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर तिथे काम करणाऱ्या माणसाला आनंद आणि समाधान हवं असतं. संस्थेचं वातावरण यासाठी पोषक हवं. आणि त्या व्यक्तीनंही यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे दोन्ही बाजूंनी एकमेकांना पूरक (win win) परिस्थिती येऊ शकते. श्रेयस आणि प्रेयस या भारतीय संकल्पना सहसा आपण व्यक्तीला लागू करतो. परंतु त्या संस्था आणि व्यक्ती अशा दुहेरी लागू झाल्या तर अधिक उपयुक्त ठरेल.

या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधला ‘वर्क लाईफ बॅलन्स’चा फरक. वर्क लाईफ बॅलन्स म्हटलं, की अनेकदा केवळ स्त्रियांचाच अभ्यास आधी केला जायचा, जणू पुरुषांना याची गरज नाही. पण आता मोठ्या शहरांमध्ये बदललेली परिस्थिती आणि मानसिकता, आर्थिक संपन्नता मिळवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही करायला लागणारी धडपड, कळत नकळत समानतेचं रोवलं जाणारं बीज, यामुळे सध्या अनेक घरांत स्त्री आणि पुरुष दोघंही घराची, मुलांची जबाबदारी घेतात (म्हणजे अनेक घरांमध्ये फक्त बायकांवर त्याची जबाबदारी पडत नाही) माझ्या संशोधनातही असंच निदर्शनास आलं, की सगळे नाही, तरी अनेक पुरुष प्राध्यापकदेखील हल्ली घराची आणि मुलांची समसमान जबाबदारी घेतात. माझ्या संशोधनातील एक प्रमेय असं होतं, की ‘वर्क लाईफ बॅलन्स’ आणि ‘हॅपिनेस इंडेक्स’ यांच्यासंदर्भात पुरुष आणि स्त्रिया यांची मतं आणि जाणिवा निरनिराळ्या असतील. प्रत्यक्षात साधारण ५०० प्राध्यापकांकडून प्रश्नावली भरून घेतल्यावर निष्कर्ष मात्र वेगळा आला. माझं प्रमेय आजच्या काळातल्या स्त्री पुरुषांनी चुकीचं ठरवलं याचा आनंद झाला. पुरुषही स्त्रियांबरोबर घर आणि दार दोन्ही बघत आहेत आणि आनंद शोधत आहेत, असं लक्षात आलं. अर्थात माझा प्रबंध हा अभियांत्रिकी आदी ‘प्रोफेशनल’ शैक्षणिक संस्थेत काम करणाऱ्या प्राध्यापकांवर आधारित होता. बाहेरच्या समाजात मात्र पुरुष आणि स्त्रिया यांची ‘वर्क लाईफ बॅलन्स’ निगडित मतं आणि वास्तव यात फरक आहे. बऱ्याच ठिकाणी अजूनही सुशिक्षित आणि अशिक्षित कुटुंबांमध्ये घरातल्या बाईवरच बाहेरच्या कामाबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त पडतात.

सध्याची परिस्थिती म्हणजेच मागच्या फेब्रुवारी-मार्चपासून सुरू झालेला ‘करोना’ काळ हा दु:ख घेऊन आला, पण त्याच बरोबरीनं काही बाबतीत आनंदाची वेगळी परिभाषाही घेऊन आला. अनेक माध्यमं आणि संस्था यांनी या काळात हॅपिनेस इंडेक्स संख्याशास्त्रीयरीत्या मोजला, ऑनलाइन ‘जनमत’ घेतलं आणि आश्चर्यकारक निष्कर्ष निघाला, की करोना काळातही लोक आनंदी आहेत! त्याची अनेक दृश्यं-अदृश्यं कारणं होती. लोकांचे आपापसातले नातेसंबंध सुधारले. विशेषत: नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांना समजून घेण्यात सकारात्मक बदल झाले. बऱ्याच लोकांनी आरोग्याकडे नव्यानं लक्ष दिलं. घरच्या घरी ऑनलाइन माध्यमातून अनेकांनी व्यायाम केला, त्यामुळे फरक पडला. स्वत:च्या आहाराकडे उत्तम रीतीनं लक्ष दिलं. पुरेशी झोप घेता येऊ लागली. जाण्यायेण्याचे कष्ट ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कमी झाले. एकंदर ‘वर्क लाईफ बॅलन्स’ हा अनेक लोकांना साधता आला. त्याच्यावर विचार करण्यासाठी मुळात आधी वेळ मिळाला.

अर्थात काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले, त्यांचा आनंद मात्र पूर्ण खालावला. अनेकांना ‘करोना’ झाला, काही जण दगावले. त्यांची माणसं अर्थातच दु:खात राहिली. काहींच्या बाबतीत तो काळ निराशाजनक ठरला आणि अजूनही काही काळ तसा जाऊ शकतो. असं सगळं असलं तरी अनेकांना कुटुंबासमवेत एकत्र वेळ बराच काढता आला. आनंद किंवा दु:ख ‘शेअर’ करताना घरची माणसं सोबत आहेत, हे एक समाधानच होतं. लोक या काळात आहे त्यात आनंद मानायला शिकले. करोनानं एकंदर जगण्याची गती कमी केली. भीतीचं सावट असलं, तरीही अनेक लोक कमी गरजांमध्ये आनंदी राहायला या काळात शिकले. ‘हॅपिनेस इंडेक्स’ आणि ‘वर्क लाईफ बॅलन्स’ या दोन्ही संकल्पनांवर काम करणाऱ्या अभ्यासकांना करोना काळात मिळालेला डेटा हा अनेक नवे महत्त्वाचे निष्कर्ष समोर आणतो आहे. ‘युनो’च्या ‘एसडीएसएन’ (सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्यूशन्स नेटवर्क ) वेबिनार मध्ये २०२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘वर्ल्ड हॅपिनेस’ अहवालामधील अनेक बदलांवर चर्चा झाली. अनेक ठिकाणी स्पर्धा थोडी विसरून लोक एकमेकांच्या मदतीला गेले. समाजमानसाच्या धारणेमध्ये चांगले बदल झाले. सकारात्मक विचार वाढीला लागले. जरी आर्थिकदृष्ट्या मागील वर्ष चांगलं नसलं तरी एकंदर रोख हा समाजाच्या ‘वेलबीईंग’वर म्हणजेच आरोग्य, आरामदायी जगणं, सुख याकडे सरकला. सामाजिक आणि संस्थात्मक वातावरण हे व्यक्तींना पूरक आणि पोषक ठरेल असं असायला हवं, असंही अनेक अभ्यासकांनी या वेबिनारमध्ये नमूद केलं. बदल स्वीकारणं आणि त्याच्याशी जुळवून घेणं हे आनंदाच्या प्रवासातील पहिलं पाऊल आहे, हा या वेबिनार चर्चेमधला मुद्दा महत्त्वाचा होता. एकंदर, माझं निरीक्षण असं आहे, की समाज म्हणून एकत्र बांधलं जाणं हे या काळात अधिक घडलं आणि त्यामुळे एका वेगळ्या आनंदाची निर्मिती झाली.

अखेर, आनंद ही काही केवळ अमूर्त आणि ढोबळ गोष्ट नसते. तो एक जाणवण्याजोगा ताकदीचा मानसिक आणि सामाजिक असा प्रवाह असतो. आनंद हा केवळ घरात असून चालत नाही, केवळ ऑफिसमध्ये मिळून चालत नाही. दोन्हीचा मेळ प्रयत्नपूर्वक प्रत्येक माणसाला घालायला लागतो. वेळेचं नियोजन करणं, वेगवेगळ्या माणसांची ‘सपोर्ट सिस्टीम’ तयार करणं, स्वत:चे छंद जोपासणं, समाजासाठी, नातलगांसाठी वेळ काढणं आणि त्यातून आनंद मिळवणं, हे सगळं एखाद्याा ‘जिगसॉ’ कोड्यासारखं आहे. कुठला वेळ आणि कुठला आनंद कमी-जास्त करायचा आणि त्या क्षणाला काय महत्त्वाचं आहे, हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. कारण प्रत्येकाची असणारी परिस्थिती वेगवेगळी असते. यासाठी एकच एक नियम किंवा ‘फिक्स फॉम्र्युला’ नाही!

एरिक एरिक्सन यांनी मानवी आयुष्याची सात द्वंद्वं टिपली आहेत. त्यातली शेवटची पायरी असते- ‘इंटिग्रिटी विरुद्ध डिस्पेअर’. अखेर माणूस समाधानी, आनंदी असतो, का उदास, हे एरिक्सनला महत्त्वाचं वाटतं. ‘वर्क लाईफ बॅलन्स’च्या नव्या आयामात बघताना आपल्याला असं लक्षात येतं, की आनंद ही अखेर एक कष्टसाध्य गोष्ट असते आणि ती नुसती मानसिक नसून ती ‘मॅनेजमेंट’ची- व्यवस्थापनाची गोष्ट असते. हे भान सगळ्यांनी ठेवायला हवं. आनंद मिळवायला आणि द्याायला शिकायला हवं.

वर्क लाईफ बॅलन्स म्हटलं, की अनेकदा केवळ स्त्रियांचाच अभ्यास केला जायचा, जणू पुरुषांना याची गरज नाही. पण आता मोठ्या शहरांमध्ये बदललेली परिस्थिती आणि मानसिकता, आर्थिक संपन्नता मिळवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही करायला लागणारी धडपड, कळत नकळत समानतेचं रोवलं जाणारं बीज, यामुळे अनेक घरांत स्त्री आणि पुरुष दोघंही घराची, मुलांची जबाबदारी घेतात आणि आनंद शोधतात, असं लक्षात आलं आहे.

( डॉ. मानसी जावडेकर या असिस्टंट प्रोफे सर असून त्यांच्या पीएच. डी.चा विषय होता, स्टडी ऑफ वर्क लाईफ बॅलेन्स अ‍ँड हॅपिनेस इंडेक्स ऑफ टीचर्स ऑफ प्रोफे शनल कोर्सेस इन पुणे सिटी )

manasijavadekar@gmail.com