News Flash

देता मातीला आकार : मदर

अनेक कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, असहाय, दीनदुबळे अशा लोकांची सर्वार्थाने माय ठरलेल्या मदर तेरेसा यांचा हा जीवनप्रवास नक्कीच स्तिमित करणारा आहे.

| July 26, 2014 03:28 am

अनेक कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, असहाय, दीनदुबळे अशा लोकांची सर्वार्थाने माय ठरलेल्या मदर तेरेसा यांचा हा जीवनप्रवास नक्कीच स्तिमित करणारा आहे. आताच्या युगोस्लाव्हियातली अँग्नेस, तिच्या देवाच्या आज्ञेसाठी, आपला देश, आपली माणसे सोडून, परक्या देशात हजारो लोकांची काळजी घेण्यासाठी दाखल झाली. केवळ कॉन्व्हेन्टमधली नन न राहता सेवाव्रती माउली झाली..

अल्बेनियात राहणारी ती सतरा वर्षांची मुलगी. आपल्या आयुष्यातल्या एका महत्त्वाचा निर्णयाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली होती.. वयाच्या बाराव्या वर्षांपासून तिने एकच ध्यास घेतला होता, नन व्हायचा; पण आईचा निर्णय होत नव्हता. ती मात्र अधिकाधिक त्यात गुंतत गेली आणि आता तर हा ध्यास निश्चयात बदलला होता. अखेर तिने आईजवळ आपला निर्धार व्यक्त केला, नन बनून भारतात जाऊन सामाजिक कार्य करण्याचा.. त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय, ‘‘आई काहीच न बोलता आतल्या खोलीत गेली. त्या खोलीत तिने स्वत:ला २४ तास बंद केले. त्यानंतर ती बाहेर येऊन शांतपणे आपल्या या मुलीला म्हणाली, ‘तुझा हात ‘त्याच्या’ हातात दे आणि पुढची संपूर्ण वाटचाल ‘त्याच्या’सोबतच कर.’ – ती मुलगी होती, अँग्नेस गोंझा बोयाझियू. अर्थात मदर तेरेसा.
या असामान्य धाडसाला अनुमोदन देणारी ती माउली होती, ड्रेनाफिल. एकापाठोपाठ एक असे अनेक निर्णय मदर तेरेसांनी मनस्वीपणे घेतले. त्या निर्णयांचे साद-पडसाद त्यांच्या अवतीभवती सतत उमटत राहिले. त्यांच्या झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना अनेक मानसन्मान मिळत राहिले. गरिबांची खऱ्या अर्थाने आई होताना तिथल्या घाणीची, अस्वच्छतेची, दैन्याची किळस त्यांच्या आसपासही फिरकली नाही. ते काम त्यांना सुंदर वाटत राहिले, कारण त्यात त्यांना सतत ‘तो’ दिसत राहिला.
मदर तेरेसांच्या या मनोभूमिकेवर त्यांच्या जन्मदात्रीचा, आईचा पगडा कमालीचा होता. आईची सेवाभावी वृत्ती त्यांच्या या विचारसरणीला प्रज्वलित करणारी ठरली.. आणि ही बेटी आईच्या दोन पावले पुढेच गेली.
अँग्नेस गोंझा बोयाझियू हिचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी त्या वेळच्या अल्बेनियातील, उत्तर मॅसिडोनियामधल्या स्कोप्ये इथे झाला. तिला एज ही थोरली बहीण, लाझार हा मोठा भाऊ  होता. निकोला बोयाझियू हे अँग्नेसचे वडील. ते एक व्यावसायिक होते. गाण्याची त्यांना खूपच आवड होती. स्कोप्ये नगरपालिकेचे ते एकटेच कॅथलिक सदस्य आणि आई ड्रेनाफाईल गृहिणी, अत्यंत धार्मिक, देवावर प्रचंड श्रद्धा. मुले तिला ‘नाना लोके’ म्हणायची. नाना म्हणजे आई आणि लोके म्हणजे आत्मा. ‘आत्म्याची आई’!
 निकोला अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते. त्यांची बरीच घरे होती. मोठे राहते घर, त्याभोवती बाग. बालपणीचा हा काळ अत्यंत सुखात गेला तिचा. त्या वयातही अँग्नेस खूपच परिपक्व होती. तिच्या मोठय़ा भावाला लाझारला गोड खूप आवडायचे. त्याने अनेकदा आईच्या नकळत चोरून जॅम खाल्ला, अनेकदा अँग्नेसने ते पाहिले, तिने त्याला अनेकदा समजावले, की सकाळच्या प्रार्थनेसाठी तू रात्री जेवल्यावर काही खात जाऊ  नकोस म्हणून; पण त्याचबरोबर तिने त्याची ही गोष्ट स्वत:पाशीच ठेवली. आईजवळ कधीच कागाळी केली नाही.
  निकोला हे अत्यंत उदार मनाचे, गरिबांच्या मदतीला सदैव तयार असायचे. दौऱ्यावर जाताना ते ड्रेनाजवळ भरपूर पैसे देऊन जायचे. गरजू, भुकेला, अडलानडला यांच्यासाठी त्यातला बराचसा भाग खर्च केला जायचा. गरिबांना खाद्यपदार्थाची पाकिटे किंवा पैसे यांचेही वाटप व्हायचे त्या वेळी ड्रेनाबरोबर अँग्नेसही असायची.
ड्रेना खूपच काटेकोर होती. नीतिमूल्ये सांभाळत, मुलांमध्ये ती रुजवत तिची व्रतस्थ वाटचाल चालू होती. दुसरी अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे, गोष्टींच्या नेमक्या वापरावर तिचा सतत कटाक्ष असायचा, वीज आणि पाण्यासकट. सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी ड्रेना, तिच्या तिन्ही मुलांना बरोबर नेत असे आणि संध्याकाळी संपूर्ण कुटुंब एकत्रित प्रार्थना करत असे. मदर तेरेसा यांनी याबद्दलची आठवण एका ठिकाणी सांगितली आहे, ‘‘रोज संध्याकाळी माझी आई, माझे वडील आणि आम्ही सर्व जण प्रार्थना करीत होतो हे मला आठवतं. इतर अल्बेनियन कुटुंबांतही हीच प्रथा सुरू असेल अशी आशा आहे. आपल्या कुटुंबाला देवाकडून मिळालेली ही सर्वात मोठी देणगी आहे. त्यातून कुटुंबाचे ऐक्य, एकतानता कायम राहते. जे कुटुंब एकत्रपणे प्रार्थना करत नाही ते एकत्रितपणे नांदूही शकत नाही.’’
सुरुवातीच्या काळात ही तिन्ही मुले सेक्रेड हार्ट चर्चमधील प्राथमिक शाळेत शिकली. सुरुवातीला अल्बेनियन भाषेतून आणि नंतर सबरे-क्रोट भाषेतून या शाळेत शिक्षण दिले जाई. त्यापुढे या मुलांचे शिक्षण सरकारी शाळा ‘जिम्नॅशिया’मध्ये झाले. निकोलाने शिक्षणाला अतिशय महत्त्व दिले होते, पण त्याचबरोबर चर्चचेही महत्त्व या कुटुंबाच्या दृष्टीने खूप होते. त्यामुळे धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीने त्यांची जडणघडण होत गेली. अँग्नेस जास्तीत जास्त वेळ ग्रंथालयात घालवत असे. तिचे पुस्तकप्रेम वाढतच होते.
या दरम्यान, अँग्नेस अवघी ८ वर्षांची असताना निकोलाचा मृत्यू झाला. त्यांच्या व्यवसायातल्या भागीदारांनी विश्वासघात केला आणि राहते घरच फक्त हातात राहिले. या सगळ्या घडामोडींमुळे ड्रेना हताश झाली. मात्र काही दिवसांतच तिने स्वत:ला आणि कुटुंबाला सावरले. तिने भरतकाम आणि कापडाचा व्यवसाय सुरू केला. लाझारला मदतीला घेऊन तिने कापडगिरण्यांच्या मालकांशी बोलणी करत कामे वाढवायला सुरुवात केली.
मधल्या काळात आर्थिक सधनता पूर्णपणे लयाला गेली, पण ड्रेनाने गरिबांना मदत करण्याची आपली पद्धत तशीच चालू ठेवली. मदर तेरेसांनी आईची आठवण सांगितलीय. आई म्हणायची, ‘‘बाळा, इतरांना दिल्याशिवाय कधीही तू अन्नाचा एकही घास घेऊ  नकोस.’’ तिचे गावातल्या दैन्यावस्थेतल्या लोकांना घरी जेवणासाठी खुले आमंत्रण असायचे. जेव्हा अँग्नेसने तिला त्यांच्या नात्याबद्दल विचारले त्या वेळी ड्रेनाने तिला सांगितले की, ‘‘त्यातले काही जण आपल्या नात्यातले आहेत, पण सगळेच लोक आपले आहेत.’’ त्याही परिस्थितीत ड्रेनाने अनेक रोगी, गरीब लोकांना मदत केली. एका दारुडय़ा बाईच्या अंगाच्या जखमा धुवायला ड्रेना मदत करत असे. सहा मुलांच्या या मरणासन्न आईला सतत भेटून धीर देत असे. अनेक लोकांना खाऊ  घालून कपडेलत्तेही देत असे.
आईच्या अशा सेवाव्रताचा भक्कम पगडा अँग्नेसच्या मनावर बसला. बारा वर्षांच्या अँग्नेसला नन व्हावेसे वाटू लागले. त्या वेळी आईने याचा खूपच विरोध केला. तिला वाटले काही दिवसांतच हे भूत अँग्नेसच्या डोक्यावरून उतरेल. दिवस पुढे पुढे सरकत होते.
मायलेक चर्चमध्ये बराच वेळ घालवू लागल्या. तिथे मिशनऱ्यांच्या कामाविषयीची नियतकालिके आणि वृत्तपत्रे चर्चमध्ये येत असत. अँग्नेस त्या सगळ्याचे वाचन करायची. त्यात एक कॅथलिक मिशन्स येत असे. त्यात भारतात काम करणाऱ्या मिशनऱ्यांच्या कार्याचे वर्णन असायचे. यातून अँग्नेसची मनोधारणा पक्की होत होती.
मधल्या काळात तिने धर्मगुरूंची दुभाषी म्हणून काम केले तसेच कॅथलिक पंथाची दीक्षाही ती लहान मुलांना द्यायला लागली होती. यथावकाश अँग्नेस १७-१८ वर्षांची झाली आणि तिने आपल्या निर्णयाचा पाठपुरावा केला. आईला तिचा निर्धार लक्षात आला आणि तिने अँग्नेसला परवानगी दिली. व्रताच्या पालनासाठी अँग्नेस भारतात आली. तिचे नामकरण अनुक्रमे सिस्टर लॉरेटो, सिस्टर तेरेसा आणि परत एकदा मनस्वीपणे निर्णय घेऊन ती स्वत:हून मदर तेरेसा झाली.
 कॉन्व्हेन्टमधले तुलनेने सुखासीन असलेले आयुष्य सोडले आणि कलकत्त्याच्या झोपडपट्टय़ांमधल्या गरिबांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांनी, ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी कामांचा आवाका, व्याप वाढवत आंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था नेली. सुरुवातीच्या अवघड परिस्थितीतून वाट काढत, अनेक बहुमान मिळवत मदर तेरेसा यांनी आपल्या सेवाव्रताची वीण घट्ट केली. १९६२ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ बहाल केली, त्याच वर्षी त्यांना ‘मॅगसेसे’ हा पुरस्कारही मिळाला. १९७९ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आणि १९८० साली मदर तेरेसांना भारताचा सर्वोच्च बहुमान ‘भारतरत्न’ मिळाला.
 लाझार वरचेवर मदर तेरेसांना भेटायला यायचा. त्यांची कामाची पद्धत बघून लाझारला आईची आठवण झाली. तीच समर्पण वृत्ती, सेवेसाठीची सोशीकता, निरपेक्ष वृत्ती या गुणांची त्यांच्यामध्ये पुनरावृत्ती झाली होती.
५ सप्टेंबर १९९७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८७ वर्षी त्यांचे देहावसान झाले. एक समर्पित आयुष्य अनंतात विलीन झाले. अनेक कुष्ठरोगी, एड्सग्रस्त, असहाय, दीनदुबळे अशा लोकांची सर्वार्थाने माय ठरलेल्या मदर तेरेसा यांचा हा जीवनप्रवास नक्कीच स्तिमित करतो. आताच्या युगोस्लाव्हियातली अँग्नेस, तिच्या देवाच्या आज्ञेसाठी आपला देश, आपली माणसे सोडून परक्या देशात हजारो लोकांची काळजी घेण्यासाठी दाखल झाली. केवळ कॉन्व्हेन्टमधली नन न राहता सेवाव्रती माउली झाली. आपल्या आवडीनिवडी, आपला पोशाख, आपली भाषा, आपली माणसे, आपले व्यक्तिमत्त्व यांचा त्याग करून परकी बोली, परकी माणसे त्यांच्या पोशाखासकट आपलीशी केली. आपल्या आईच्या शिकवणीचा इतका नेमका कित्ता क्वचितच कुणी गिरवला असेल. ‘त्याच्यावरची’, प्रार्थनेवरची श्रद्धा इतकी अलौकिक होती की, त्याची एक निस्सीम भक्त म्हणूनच त्यांनी स्वत:चे अस्तित्व मानले होते.. त्यांची प्रार्थना हीच असायची-
जिथं तिरस्कार आहे, तिथं माझ्या हातून प्रेम पेरले जाऊ  दे.
संशय असेल तिथं श्रद्धा, निराशा असेल तिथं आशा,
अंधार असेल तिथं प्रकाश आणि
दु:ख असेल तिथं आनंद पेरला जाऊ  दे. आमेन!    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 3:28 am

Web Title: articles about agnes of yugoslavia
टॅग : Mother Teresa
Next Stories
1 मदतीचा हात : रुग्णसेवक
2 कलाविज्ञानाचं सहजीवन
3 दिसतं तसं नसतं
Just Now!
X