29 November 2020

News Flash

सामाजिक विश्वाशी एकरूपता

तेव्हासुद्धा ते किती तरी कठीण असेल, असं आता लक्षात येतं. सुधामामीने या सर्व घटनांना तोंड दिलं.

 

|| नीला भागवत

chaturang@expressindia.com

तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी ही कार्यकर्त्यांसाठी, नेत्याच्या स्वीकारासाठी आवश्यक असणारी त्रिसूत्री विद्यांच्या जगण्यात भिनलेली होती. पैस- निकोप, निरामय जगण्यासाठीचा एक अवकाश! तो सगळ्यांसाठी निर्माण करण्याची धडपड म्हणजे विद्या बाळ यांचं काम!  ‘माणूस वेडी’ असणाऱ्या विद्या बाळ यांचं ३० जानेवारीला निधन झालं त्यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवणारे दोन लेख.

विद्या बाळ ही माझी मामी. पण खऱ्या अर्थाने आम्ही मैत्रिणीच होतो. मी दहा वर्षांची होते, तेव्हा ती आमच्या आजोळी माझ्या मामाकडे येऊ लागली. प्रेमविवाह ही १९५४ च्या सुमाराला फारच नवी गोष्ट होती. माझा मामा द. वि. बाळ याची ती विद्यार्थिनी होती. त्यांच्या लग्नामुळे आणि मग सुधा मामीच्या (आम्ही तिला विद्या क्वचितच म्हटलं. ते सासरचं नावं. आम्ही माहेरसारखे.) व्यक्तिमत्त्वामुळे आमच्या आजोळी आधुनिकतेचं वारं वाहू लागलं. ही आधुनिकता, निर्मळ डोळ्यांनी जगाकडे, माणसांकडे बघण्याची वृत्ती, साहित्य, संगीत आणि इतर कला यांत मनापासून रस घेणारा स्वभाव, याखेरीज गोड आवाज आणि गोड बोलणं यामुळे आमच्या आजोळी, बाळांच्या घरात ती सगळ्यांना खूप आवडू लागली.

तिचे हे गुणविशेष तिला केळकर कुटुंबातून मिळाले होते. न. चिं. ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे तिचे चुलत आजोबा. त्यांची मुलगी, डॉ. कमलाबाई देशपांडे, पुण्याच्या एस.एन.डी.टी. कॉलेजच्या प्राचार्य या मामीच्या आत्या. शिवाय मनोहर महादेव केळकर, य. नि. आणि का. न. केळकर हे सर्वच जण साहित्याच्या प्रांगणात स्वैर संचार करणारे होते. ते गुण मामीकडे चालत आले होते.

तिने वयाच्या १५व्या वर्षी लग्न ठरवलं नि १७ व्या वर्षी केलं. पहिली मुलगी १९५६ मध्ये झाली. आणि एवढा संसार करूनही तिला बी.ए. इकॉनॉमिक्समध्ये सुवर्णपदक मिळालं. त्याच वर्षी रानडे वक्तृत्व स्पर्धेतही तिला पहिलं बक्षीस मिळालं. आम्ही घरची मंडळी, त्यातही भागवत कुटुंबीय या तिच्या गुणांचं अफाट कौतुक करायचो. नात्यामध्ये आमची सगळ्यांची निखळ मैत्री असायची. या मैत्रीत लपवाछपवी नसायची. मन मोकळं करणं असायचं. किंबहुना नात्यांमध्ये आमचं नातं मैत्रीचं. त्यातही मोकळा संवाद. त्यातून परस्परांच्या विकासाची वाटचाल पाहायची, शोधायची, सुचवायची आणि हीच जगण्याची रीत समजून पुढे जायचं हा संस्कार अंगवळणी पडला तोदेखील सुधामामीच्या व्यक्तिमत्त्वामुळे होता.

बाळ कुटुंब हे प्रेमळ पण जुन्या वळणाचं, जुन्या विचारांचं. पण पुरुषप्रधान होतं, असं म्हणणं कठीण आहे. आमच्या सर्व मामी आम्हाला अधिक प्रिय होत्या. या सर्वाच्या संस्कारामुळे असेल, पुरुषप्रधान संस्कृतीचे चटके आम्हाला फारसे बसले नाहीत. मामी-मामा यांचं अतिशय सुंदर नातं तीन मुलांच्या नंतर जेव्हा विस्कळीत होऊ लागलं, तेव्हादेखील मामीशी असलेली मैत्री मात्र कायम राहिली. वस्तुत: अधिकच घनदाट झाली.

मामी पुणे आकाशवाणीवर ‘गृहिणी’चं सूत्रसंचालन करायची. ‘स्त्री’ मासिकाच्या सहसंपादनाच्या कामामुळे तिची अनेक व्यक्तींशी, त्यांच्या नवनव्या कार्यक्षेत्राशी, स्त्री-पुरुष नात्याच्या हरतऱ्हेच्या रसायनाशी, अनुभवाशी जवळून ओळख झाली. ती बदलत होती. संसारापलीकडचा खूप मोठा पसारा तिला दिसू लागला. त्याबद्दल जाणून घेताना तिच्या दृष्टीच्या कक्षा खूप रुंदावल्या. हळूहळू तिचा समृद्ध अनुभव घराच्या चौकटीत बसेनासा झाला. आमचा मामा हे समजू शकला नाही. एक चांगला माणूस संकुचित दृष्टीचा आग्रह धरू लागला, म्हणजे विकासाचे टप्पे गाठण्याची उमेद बाळगणाऱ्या कुणाही व्यक्तीला ते असह्य़ होतं. स्त्रियांना तर खूपच त्रास होतो. मामीच्या स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यामागे हा वैयक्तिक अनुभव होता. तिच्या कामात, वागण्यात, बोलण्यात असलेला आंतरिक जिव्हाळा सहजगत्या अनेक जणींना बळ देऊ लागला. एकेकीला आपली स्वतंत्र वाट शोधायला मदत करू लागला.

आमच्या लहानपणी शाळेच्या सर्व सुट्टय़ा मामा-मामींच्या घरी जात असत. आताच्या दिवसात हे शक्य होत नाही. तेव्हासुद्धा ते किती तरी कठीण असेल, असं आता लक्षात येतं. सुधामामीने या सर्व घटनांना तोंड दिलं. मैत्रिणींच्या संगतीने तिने आपलं एक समर्थ आणि तरी मैत्रीपूर्ण असं स्थान स्त्रियांच्या चळवळीत निर्माण केलं. हळूहळू त्यात लोकशाही, समाजवादी चळवळीचे विचार डोकावू लागले.

तिची मन आणि विचारशक्ती कायम जागृत होती. ही जागरूकता तिच्या आयुष्यभराच्या कार्यामध्ये दिसून आली. ‘यूनो’ने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष १९७५ मध्ये जाहीर केलं. तिचं स्त्रियांच्या चळवळीबद्दलचं काम आणि त्याचा विचार त्याआधीच सुरू झाला होता. वैयक्तिक समस्या, त्यातील दु:ख, यांची सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू लक्षात घेत, अनेकींना एकत्र आणून संवाद साधत, परस्परांना बळ देत स्त्री मुक्ती चळवळ उभी राहिली. राजकीय डाव्या चळवळीत न्यायासाठी लढणाऱ्या आघाडीला देखील घराच्या अंतर्गत नात्यांमधल्या लढय़ात न्यायाचा, समानतेचा विचार करायला स्त्रियांच्या चळवळींना भाग पाडलं. स्त्रियांच्या चळवळीला त्यातून वेगळं परिमाणं लाभलं. कथनी आणि करणी यांच्यात जे अंतर पडतं; पुरुषप्रधान समाज त्याला आणखी खतपाणी घालतो. त्याच्या विरोधात पर्यायी नाते ‘स्कूल’ निर्माण करण्याच्या उद्देशांने स्त्रियांच्या चळवळींनी मूलभूत काम केलं आहे. सुधामामीची या चळवळीतली कामगिरी फार महत्त्वाची आहे.

गेल्या ८/१० वर्षांत आवश्यक झालेल्या सर्वधर्म सहिष्णुतेच्या चळवळीलाही तिचा पाठिंबा असे. मात्र दुसरीकडे तब्येतीचे प्रश्न सतावू लागले होते. मनाजोगतं हिंडणं-फिरणं कठीण होऊ लागलं होतं. तिची जिद्द कायम होती. विचारशक्ती सावध होती. माणसाच्या शरीराची यंत्रणा हळूहळू काम करायला नकार देऊ लागते. ३० जानेवारीच्या सकाळी तिच्या शरीराने अखेरची रजा घेतली. आता शरीराच्या पलीकडे असलेल्या अनेक आठवणी, अनेक घटना मात्र कायम मनात राहतील.

निखिल वागळेच्या ‘आमने सामने’मधला तिचा सहभाग. त्यातला स्पष्ट विचार. ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकासाठी, केलेली विश्वासपूर्ण धडपड. गीताली वि.म.च्या हाती मासिकाची जबाबदारी सोपवण्याचा योग्य वेळी घेतलेली निर्णय. गीतालीच्या स्थानाचा आदर. सार्वमताचा आग्रह. वैयक्तिक आयुष्यापलीकडे असलेल्या सामाजिक विश्वाशी एकरूपता. एका मोठय़ा कुटुंबाची जाणीव.

माणसं निघून जातात, स्पर्शाच्या पलीकडे, नादांच्या पलीकडे, दृष्टीच्या आड. आपल्या मनात राहातात, आठवणी निष्ठेच्या, प्रेमाच्या, जिद्दीच्या. विद्याची, सुधामामीची आणखी एक गोष्ट डोळ्यांसमोर येत राहाते, जी आता कायम मनात राहील ती  म्हणजे तिचं सर्वाना स्वीकारणारं सहजसुंदर हास्य!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:37 am

Web Title: articles highlighting the personality of vidya bal abn 97
Next Stories
1 आरस्पानी माणुसकी
2 गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘आयुष्याचा परीघ व्यापक झाला’’
3 हेल्पलाइनच्या अंतरंगात : मनोसामाजिक सेवा
Just Now!
X