प्रिय,
नवीन वर्ष सुरू झालं की भोवताल काही असो, एका खळाळत्या उत्साहाचा स्रोतच  जणू नव्याने निर्माण होतो. साहजिक आहे. तुझा जन्मच या वर्षी होणार आहे. तू मुलगी म्हणून जन्माला येशील. अपेक्षा अशी आहे की, तुला जन्म देणारी ती तरुण स्त्री तिच्या आईसोबत मोकळी वाढलेली असेल, ज्यामुळे  एक स्त्री असण्याचा आनंद त्या दोघींमधून तुझ्यापर्यंत पोचलेला आहे. तुला हे नंतर समजेल की, इथे मुलीचा जन्म होताना निखळ आनंद होणं असं भाग्य किती कमी जणींच्या वाटय़ाला येतं. तुझ्या आईच्याही वाटय़ाला ते आलं असेल अशी आशा आहे. ती मोठी होताना तिच्या आईने आणि स्त्रीच्या सजग चळवळीचा थोडा तरी परिणाम झालेल्या बापानेही तिला ‘तू मुलगी आहेस म्हणून.’ अशा धाकाच्या आणि दरडावणीच्या भाषेत कधी फटकारलं नसेल असं समजू या. तिला पुरेसा अवकाश दिला असेल, तिच्या निवडीला किंमत दिली असेल आणि आम्ही म्हणू तेच शिक्षण-काम-मित्र-मैत्रीण-लग्न-पैसा असा धोशा लावला नसेल असंही समजून चालू. अशा पाश्र्वभूमीवर तुझा जन्म म्हणजे आनंदाचा झरा अगदी सहजपणे खळाळू शकेल.
 ज्या जगात या वर्षी तू प्रवेश करते आहेस ते कसं आहे हे तुझ्या आईला एव्हाना पुष्कळसं कळून येतं आहे आणि ती धास्तावली आहे. असंख्य भेगांनी चिरफाळलेल्या या समाजात आपली नक्की जागा कुठली ते तिलाही नीटसं उमजलेलं नाही. ती वाढली आहे खरी मोकळेपणानं आणि तिच्या आईनं प्रसंगी गोंधळून का होईना, पण उपलब्ध करून दिलेल्या जबाबदारीच्या स्वातंत्र्यात. तरीही सध्या जे आजूबाजूला घडताना ती पाहते आहे त्यामुळे अनेक प्रश्नही तिच्या मनात उभे राहिले आहेत. उदाहरणार्थ, नावा-गावाने सुरू होणारी ओळख एकेकाला धर्म-जाती-जमातीच्या सुटय़ा सुटय़ा संकुचित कळपात ढकलतेय की काय अशी भीती तिला असेल तर अगदी साहजिक आहे. शिवाय केवळ वयाने वाढलेले असे सत्ताधीश पुरुष कुठ-कुठल्या पुराणकाळातून उपसलेल्या रीती-रिवाजांना पुन्हा एकदा नव्याने परजून तिच्यावर हुकमत गाजवण्याची धमकी देऊ  लागलेत, हेही तिला घाबरवून टाकत असेल अशीही शक्यता आहे. तिच्या आईनं लढून मिळवलेला अवकाश, प्रत्यक्ष आणि विचारांचा, नकळत संकोचत चालला आहे की काय, त्यासोबत असुरक्षेची भीतीही दाटत राहिली आहे का, अशीही शंका असेल.
म्हणून कदाचित तुझ्या जन्माने ती गोंधळून जाईल. तिच्या आईच्या लक्षात आलं आहे की, तिला स्वत:ला शिक्षण-काम-आयुष्य यात मिळालेल्या सवलतींमागे कुणा-कुणाचे झगडे आहेत. बायांचे आणि पुरुषांचेही. तुझी आई तिला केव्हाच मागे टाकून गेली. एका रीतीने तिला बऱ्याच गोष्टी आयत्या मिळाल्या, असं तिची आई तिला बजावून सांगत आली आहे. पण त्यापुढे जाऊन बदलत्या काळानं आणि नव्या युगाच्या आयुधांनी तिला केवढी मदत केली. पाहता-पाहता तिनं तर जगच हातात आणलेलं. ते कसं हे तुला जन्मानंतरच्या काही क्षणात तुझा फोटो काढला जाईल आणि जगाच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या मित्रमंडळींना क्षणार्धात पाठवला जाईल तेव्हा दिसेलच. या तंत्रज्ञानाद्वारेच तिचं माहितीक्षेत्र वाढलं, पोच अफाट झाली आणि सारं विश्व जणू खुलं झालं. तिच्या आईला काही ते नीटसं समजून घेता आलंच असं नाही. ‘चंगळवाद’, ‘जागतिकीकरण’, ‘सांस्कृतिक मूल्यांची घसरण’ अशा अनेक संकल्पना तिच्या डोक्यात तिच्या आईनं आणि बापानंही, शिवाय भोवतालच्या समाजानंदेखील घातल्या होत्या ना. पण तुझी आई धीटपणे तरून गेली. मात्र सगळ्याच तिच्या मैत्रिणी सोबत राहिल्यात असं नाही. शिवाय मैत्रिणींपलीकडे एका अभावग्रस्त परिस्थितीत जगणाऱ्या अनेक बाया-मुली होत्याच. अजूनही आहेतच. पण जगाला सहजपणे जवळ आणू शकलेली तुझी आई आजची सक्षम तरुणी तिनं तिच्या पद्धतीनं लढाई अंगावर घेतली आणि आत्ताशी कुठे ही सुरुवात आहे. आता तू येते आहेस. आनंदासोबत धास्ती असली तरी तू तिच्याही पुढे जाशील. जावेस अशी अपेक्षा. तुझं नाव राहो आणि ‘आड -नाव’ गळून जावो, तुझ्या निवडीसाठी विज्ञानाचे रस्ते खुले असोत, बदललेले आणि पुसून टाकलेले इतिहास तुला अभ्यासाला नसोत, जगभर काय चाललं आहे हे तुला सतत समजत राहो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सारखं सारखं मागे वळून पाहण्याची सक्ती तुझ्यावर न होता पुढे भविष्यात नजर लावण्याची आस तुझ्यात येवो. त्याकरता तुझी आई आणि तिची आईदेखील निर्धारानं विवेकवादाचे धडे गिरवून तुझ्या शिकण्याची मोकळी वाट अटीतटीनं सांभाळत राहोत. त्याकरताच मनापासून अनेक शुभेच्छा.