सरिता आवाड – wsarita.awad1@gmail.com 

आसावरी कुलकर्णी आणि अनिल यार्दी गेली सहा र्वष लग्नाशिवायचं सहजीवन आनंदानं जगताहेत. लग्नांच्या कटू अनुभवामुळे त्यावरचा विश्वास उडालेल्या आसावरी यांच्या सहजीवनाच्या निर्णयाला अनिल यांची समंजस साथ मिळालीच, पण त्याहीपेक्षा नातेवाईक, शेजारी यांनीही कधी सहजपणे तर कधी हळूहळू का होईना, त्यांच्या नात्याचा स्वीकार के ला. इतका की त्यांच्या या आनंदी नात्याचा हेवा वाटून आधी विरोध करणाऱ्या जाऊबाईंनीही अखेर माझ्यासाठीही एखादा मित्र बघ की, म्हणून सांगितलं. लग्नाच्या बंधनात तुम्ही असा किंवा नसा, सहजीवनासाठी महत्त्वाची असते ती तुमच्यातली समंजस परिपक्वता..

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट

पुण्यातल्या सुखवस्तू भागातली मध्यमवर्गीय सोसायटी. हा भाग अनोळखी असल्यानं काहीशा भिरभिरत्या नजरेनं इमारतीत शिरले. शिरता शिरता पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून डोकावून एका उतारवयाकडे झुकलेल्या बाईंनी माझं जोरदार स्वागत केलं. मी अंदाज केला, याच आसावरी कुलकर्णी असणार. आसावरी कुलकर्णी आणि अनिल यार्दी यांच्याशी माझी ही पहिलीच भेट. असं काय खास होतं त्यात? उतारवयातलं चारचौघांसारखं दिसणारं जोडपं. पण दिसतं तसं नसतं ना! ते होतं, गेली सहा र्वष सहजीवनात (‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये) राहाणारं जोडपं. मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. ‘लिव्ह इन’चा त्यांचा अनुभव ऐकायचा होता. आणि खरंच तासाभरासाठी गेलेली मी चांगली अडीच तास गप्पांमध्ये बुडून गेले. या गप्पांमधून लक्षात आली ती आसावरी आणि अनिल यांची  विश्वासाच्या आधारावर परिपक्व होत गेलेली कहाणी..

आसावरी ‘एल.आय.सी.’मध्ये नोकरी करत होत्या. १९७४ मध्ये त्यांचं लग्न झालं, पुढच्याच वर्षी मुलगाही झाला आणि त्यांना त्यांच्या वैवाहिक नात्यामधला विसंवाद त्रास द्यायला लागला. आसावरींचं वेगळेपण असं, की त्यांनी हा विसंवाद दडपून टाकला नाही. या बंधनातून बाहेर पडायचा त्यांनी ठाम निर्णय घेतला. मात्र त्यांच्या पतीनं मुलाचा ताबा स्वत:कडेच ठेवणार, अशी अट घातली. आसावरींचा निर्णय पक्का होता. मुलाला पतीकडेच ठेवून परस्परसंमतीनं त्यांनी घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे घटस्फोटानंतरही तिचे पती तिच्याकडे येत. कालांतरानं पतीनं दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीलासुद्धा ते आसावरी यांच्याकडे घेऊन येत. मुलगाही अधूनमधून भेटायचा. आसावरींनीही पुनर्विवाह केला. पण पतीचं १९९७ मध्ये निधन झालं. शेजारीच राहाणाऱ्या जावेच्या मुलांना आसावरींनी लळा लावला होता. पुढे मुलं मोठी झाली, दूरदेशी गेली. जाऊबाईही दुसरीकडे मोठय़ा जागेत राहायला गेल्या. आसावरी निवृत्त झाल्या आणि ‘हॅपी सीनियर्स’ या पुण्यातल्या मंडळाची त्यांना माहिती मिळाली. एकटं राहाणाऱ्या ज्येष्ठांसाठी ‘लिव्ह इन’चा पर्याय मांडणारे माधव दामले (‘हॅपी सीनियर्स’ या मंडळाचे प्रवर्तक) यांचा लेख त्यांच्या वाचनात आला. त्यांना हा पर्याय खूपच भावला आणि त्यांनी मंडळाशी संपर्क साधला.

अनिल यार्दी यांची कहाणी या मानानं सरळ. त्यांच्या एकुलत्या एक लेकीचं लग्न झालं आणि २०१३ मध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालं. यार्दी हे विद्युत अभियंता. त्यांचा व्यवसाय सुरू होता, पण पत्नीच्या निधनानंतर त्यांना एकटेपणा जाचायला लागला. त्यांनीही ‘हॅपी सीनियर्स’शी संपर्क साधला. ‘हॅपी सीनियर्स’च्या माध्यमातून आसावरी आणि अनिल यार्दी भेटले. नंतर भेटत राहिले. आपल्या आवडीनिवडी जुळतायत, आपल्या वाटय़ाला आलेल्या आयुष्याचा मजेत स्वीकार करायची वृत्ती जुळतेय, असं त्यांच्या लक्षात आलं. सहजीवनाचा विचार त्यांच्या मनात रुजायला लागला, पण दोघांनीही हा विचार प्रत्यक्षात आणण्याची मुळीच घाई केली नाही. आसावरींनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना हा विचार सांगितला.  जाऊबाई सोडून इतर सर्वानी या विचाराचं स्वागतच केलं. ‘‘तू असं काही केलंस तर आपले संबंध संपतील,’’ असं जाऊबाईंनी सांगितलं होतं. पण त्यांच्याशी सतत संवाद साधत आसावरींनी त्यांचं मत काहीसं अनुकूल केलं. आपले वकील, सी.ए., डॉक्टर, यांच्याशीही आपल्या मनातलं बोलून त्यांची मतं आजमावली. त्यांचा पाठिंबा मिळाला. त्यांच्या ‘एल.आय.सी.’तल्या मैत्रिणी एका लग्नाच्या निमित्तानं भेटल्या. त्यांनाही आसावरींनी आपल्या मनातला ‘लिव्ह इन’मध्ये राहाण्याचा मानस सांगितला. मैत्रिणींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, आसावरी यांनी आता त्यांच्या लग्न झालेल्या लेकाकडे जावं. पण लेकाच्या संसाराची घडी बसलेली असताना त्यात आपण जाणं हे आसावरींना पटत नव्हतं. मैत्रिणींनाही नंतर ते पटलंच.

इकडे यार्दीनीसुद्धा आपल्या निकटवर्तीयांच्या मतांची चाचपणी करायला सुरुवात केली. त्यांचे बहुतेक नातलग त्यांच्या पत्नीच्या माहेरचे होते. त्यांना ‘लिव्ह इन’चा विचार सांगितला. या नातलगांनी अगदी मनापासून या विचाराला पाठिंबा दिला. अपवाद फक्त त्यांच्या एकुलत्या एक लेकीचा. तिला मात्र वडिलांच्या आयुष्यात दुसरी कोणी येणं मुळीच सहन होत नव्हतं. मग जावयाने लेकीची समजूत घातली. एक दिवस यार्दी आसावरींना घेऊन जावयाच्या घरी जाऊन धडकले. आसावरींना प्रत्यक्ष भेटल्यावर लेकीचा विरोध हळूहळू मावळला. आता या दोघींची चांगली दोस्ती झालीय. आसावरी गमतीत तिला विचारतात,  ‘‘का गं तेव्हा इतका विरोध केलास? मी काय बाबांना फसवेन असं वाटलं का?’’ त्यावर लेक म्हणते, ‘‘छे. छे. माझे बाबा मुळीच फसणार नाहीत. पण आई जाऊन एक वर्ष होतंय तर लगेच असा विचार त्यांनी करणं मला झेपत नव्हतं.’’ आता लेकीला आसावरीमुळे माहेर मिळालंय. मी गेले त्याच्या काही दिवस आधी लेक, जावई, नात आसावरी आणि यार्दीच्या घरी मजेत राहून गेले होते.

पण ही झाली पुढची गोष्ट. ‘लिव्ह इन’मध्ये राहाण्याबद्दलची चर्चा, भेटीगाठी सात-आठ महिने चालल्या होत्या. मग ‘लिव्ह इन’मध्ये राहायचं ठरलं. यार्दीच्या व्यवसायाच्या दृष्टीनं आसावरी यांचं घर त्यांना सोयीचं होतं. म्हणून त्यांनी आसावरी यांच्याकडे राहायचं ठरलं.  पण लग्न करायचं की प्रत्यक्ष एकत्र राहायलाच सुरुवात करायची, याची चर्चा होत होती. आसावरींच्या बाबतीत लग्नाचा अनुभव फारसा आनंददायक नव्हता. त्यामुळे ‘लिव्ह इन’मध्येच राहाण्यावर त्या ठाम होत्या. यार्दी मात्र लग्न करावं, अशा मताचे होते. मी त्यांना विचारलं, ‘‘का आग्रह होता तुमचा लग्नाचा?’’ यावर मिश्कील हसून ते म्हणाले, ‘‘ मग.. ही पळून गेली तर?’’ यावर उठलेल्या हास्याच्या लकेरीकडे दुर्लक्ष करून आसावरी म्हणाल्या, ‘‘मी अगदी ठाम होते ‘लिव्ह इन’वर. भूतकाळात अनुभवलेल्या लग्नाच्या चक्रात मला परत अडकायचं नव्हतं.’’ एकत्र राहायला सुरुवात करायची ठरल्यावर आसावरींच्या भावानं त्यांना सांगितलं, की तुम्ही दोघं एक करार लिहून काढा. आर्थिक बाबी, घरकामाचं वाटप, वगैरे गोष्टी स्पष्ट करा. पण आसावरी आणि यार्दी यांनी तसा करार केला नाही. एकमेकांच्या समजूतदारपणावर विश्वास ठेवायचं ठरवलं.

यार्दीचं आसावरींच्या घरी राहायला येण्याचं नक्की झालं. आसावरी यांनी घरी काम करणाऱ्या बाईंना सांगितलं, ‘‘उद्यापासून एक गृहस्थ इथे राहायला येणार आहेत. त्यामुळे तुमचं काम वाढेल. त्याचे पैसे मी देईन.’’ हे ऐकून बाई दचकल्याच. म्हणाल्या, ‘‘त्यापेक्षा तुम्ही दोघं लांब कुठे तरी राहायला जा. म्हणजे काही प्रश्न नाही.’’ यावर शांतपणे आसावरींनी दिलेलं उत्तर मला फारच आवडलं. आसावरींनी सांगितलं, ‘‘हे घर माझं आहे. माझ्या इच्छेनुसार ते इथे राहाणार आहेत. आम्ही चुकीचं काहीही करत नाही. तेव्हा माझ्याकडे काम करायचं की नाही हे तुम्ही ठरवा.’’ असं ठाम आणि स्पष्टपणे सांगितल्यावर मात्र त्या बाईंचा कोणताच आक्षेप नव्हता. यार्दी राहायला आले. आसावरीनं सोसायटीतल्या सर्वाशी यार्दीची ओळख करून दिली. लग्न झाल्याची खोटी बतावणी अजिबात केली नाही. विशेष म्हणजे यार्दीचं सर्वानी स्वागतच केलं.

आता हे सगळं सहा र्वष जुनं झालंय. यार्दी आसावरींच्या घरात छानपैकी रुळलेत. ‘लिव्ह इन’चा विचार ऐकताच आत्महत्या करायला निघालेल्या जाऊबाई आता आसावरींकडे येतात जातात. ‘करोना’च्या काळात मोठय़ा घरात एकटं राहून त्या कंटाळल्या. हे दोघं त्यांच्याकडे जाऊन आले. तेव्हा त्याच आसावरींना एकीकडे घेऊन म्हणाल्या, ‘‘मला पण शोध की छानसा मित्र!’’ आता मात्र चकित होण्याची वेळ आली आसावरींवर!

तर सहा र्वष भुर्रकन उडून गेली आहेत. या दोघांना लांब लांब प्रवास करायला आवडतं. नाटकं, चांगले चित्रपट ते आवर्जून पाहातात. असं सगळं मजेत चाललं आहे. विशेष म्हणजे काही बाबतीत आसावरींनी शिस्तही पाळली आहे. उदाहरणार्थ, रोज हिशोब टिपून ठेवायची जुनी सवय त्यांनी सोडलेली नाही. आता त्यात कुणी पैसे खर्च केले, हेही त्या लिहून ठेवतात. खर्चाचं वाटप समान होईल अशी काळजी घेतात. कधी कधी खटकेही उडतात. आसावरी यांचं मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे वरचेवर जाणं यार्दीना रुचत नाही. एकदा वैतागून ते म्हणाले, ‘‘थांब, एकत्र राहायचा मी फेरविचार करतो.’’ आसावरींनी सांगितलं, ‘‘करा की खुशाल. शेवटी काय विचार झाला ते सांगा म्हणजे झालं!’’ यार्दीच्या शांत आणि मिश्कील चेहऱ्यावर त्यांचा विचार स्पष्ट दिसत होता.

गप्पा संपता संपता एक गंभीर प्रश्न या दोघांनी उपस्थित केला. त्याचं असं झालं, की ऑक्टोबरमध्ये या दोघांना ‘करोना’ झाला. दोघंही एकाच रुग्णालयात दाखल झाले. आसावरी यांच्या लेकानं, यार्दीच्या लेकीनं, त्यांची काळजी घेतली. न मागता आर्थिक मदतसुद्धा केली. शेजारी राहाणाऱ्या अश्विननं भरपूर धावपळ केली. बरं झाल्यावर यार्दीनी डॉक्टरांना विचारलं, की आम्ही बरे झालो हे छान झालं. पण आमच्यापैकी कुणाची तब्येत बिघडली असती तर जबाबदार म्हणून तुम्ही कुणाची सही घेतली असती? डॉक्टरांना त्यांच्या ‘लिव्ह इन’ची कल्पना होती. ते म्हणाले, ‘‘जबाबदार म्हणून तुम्हाला एकमेकांसाठी सही करता आली नसती. आम्हाला तुमच्या मुलांच्या सह्य़ा घ्याव्या लागल्या असत्या.’’ याचा अर्थ वैद्यकीय नियमांच्या अवकाशात अजून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता नाही. वैद्यकीय विमा घेतला तरी त्यात विवाहित जोडीदाराला समाविष्ट करता येतं, पण ‘लिव्ह इन’मधल्या जोडीदाराला वैद्यकीय विम्याचा फायदा देता येत नाही. अशा जोडप्यांची संख्या वाढली तर हेही नियम कदाचित बदलतील.

गप्पांच्या जोडीला यार्दीनी मस्त ग्रीन टी बनवून दिला. त्याचा आस्वाद घेऊन मला चांगलंच ताजतवानं वाटलं. त्यापेक्षाही सूर जुळलेलं ते आनंदी जोडपं पाहून मी उल्हसित झाले. आसावरी यांच्यात ऋजुता आणि ठामपणा याचा अनोखा संगम आहे. यार्दीचा शांत आणि व्यवहारी स्वभाव ठळकपणे जाणवतो. हे रसायन मस्तच जमून आलंय. रंगलेल्या गप्पा कशाबशा आवरल्या. मी आसावरी आणि यार्दीचा निरोप घेतला. बाहेर दिवेलागण झाली होती.. गप्पांची चव मात्र जिभेवरच तशीच रेंगाळत राहिली होती..