संस्कृतमध्ये पदवीधर असणाऱ्या आशाताई कुलकर्णी आज ७२ व्या वर्षीही ‘आशिदा’ या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगसमूहाचं व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळताहेत. पतीच्या उद्योगात हातभार लावत शून्यातून कोटी रुपये निर्माण करत आदर्शवत ठरलेल्या आशाताईंविषयी..
‘लांब राहिले तरच नाती टिकतात.’ ‘मराठी बॉस आणि ती पण एक बाई, नको रे बाबा.’‘घरातली सगळी डोकी एकाच व्यवसायात म्हणजे आनंदच.’ अशा घट्ट समजुतींना (!) आरपार छेद देत ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स’ हा उद्योगसमूह ठाण्यातील वागळे इस्टेट भागात चहुअंगांनी बहरतोय. या विशाल परिवाराच्या प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या यशस्विनीचं नाव आहे, आशालता मनोहर कुलकर्णी.
६० कोटीं रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या ‘आशिदा’ची आर्थिक सूत्र सांभाळणाऱ्या ७२ वर्षीय आशाताईंची शैक्षणिक पाश्र्वभूमी मात्र ‘संस्कृत घेऊन बीए’ आहे. पण लग्न झालं आणि त्यांच्या आयुष्याला एक अनोखं वळण लागलं. त्याचं श्रेय पती कै. मनोहर तथा भाऊ कुलकर्णी यांना देताना त्या सांगतात, ‘मला भाऊंसारखा कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असणारा जोडीदार लाभल्यानेच लग्नाआधी उद्योगविश्वाशी सुतराम संबंध नसलेली मी इतक्या मोठय़ा कंपनीची महाप्रबंधक बनले.’
खानदेशातील अंमळनेर हे त्यांचं माहेर. माहेरचं नाव आशालता नाईक. त्यांचे आजोबा म्हणजे, ‘सावळाराम मास्तर’ अनेकांचे आध्यात्मिक गुरू होते. त्या काळी त्यांनी अनेक उत्तमोत्तम ग्रंथ जमवून अंमळनेरला आध्यात्मिक पुस्तकांचं वाचनालय काढलं होतं. आज हे दुर्मीळ ग्रंथ पुणे विद्यापीठाच्या ताब्यात आहेत. लहान वयात अभ्यास करताना आशाताईंनी खेळाची आवडही जपली. राज्य पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धा गाजवल्या. दिवस असे फुलपाखरासारखे उडत-बागडत असतानाच त्यांचं लग्न ठरलं आणि आयुष्य वेगळी आव्हानं घेत समोर ठाकलं.
भाऊंच्या घरची परिस्थिती गरिबीची. कष्टानेच त्यांनी इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. लग्न जमलं तेव्हा ते नोकरी करत होते. पण त्यांना स्वत:चा उद्योग सुरू करायचाच होता. या गोष्टीची कल्पना त्यांनी तेव्हाच आशाताईंना दिली होती. त्यांचे ते शब्द होते. ‘आपल्याला फक्त आपला संसार करायचा नाही तर मोठी कंपनी काढून अनेकांचे संसार उभे करायचे आहेत. त्या दृष्टीने तू मनाची तयारी कर. आपल्या उद्योगात तुलाही काम करावे लागेल.’
आशाताई म्हणाल्या, ‘त्यांचे बोलणे ऐकून मी हबकलेच. माझा विषय संस्कृत. अकाउंट्सचा गंध नाही. मग त्यांना अपेक्षित असणारं हिशेबाचं काम. मी कशी करणार होते? पण माझं मन मला म्हणालं, ‘तुझं लग्न एका भावी उद्योजकाबरोबर लागलंय. त्यांना सर्वार्थाने साथ देताना, ‘आधी हाताला चटके..’ ही ओळ तू कायम लक्षात ठेव.’ मनाचा पक्का निश्चय केल्यामुळे माहेरचं लाडाकोडाचं जीवन मागे टाकून, श्रम, कष्ट यांचा स्वीकार केल्यानेच त्यांचा पुढचा प्रवास सुसह्य़ झाला.
लग्नानंतर आशाताई ठाणे पूर्वेला सिंधी कॅम्प वसाहतीत एका चाळीत जेमतेम २५० ते ३०० स्क्वे. फुटांच्या छोटय़ाशा घरात राहायला आल्या. या टीचभर जागेत त्या स्वत:, भाऊ, सासू-सासरे, दोन दीर, एक नणंद व शिक्षणासाठी आलेला त्यांचा धाकटा भाऊ श्रीकृष्ण नाईक असे ८ जण राहत होते. त्यात पुढे २ मुलांची भर पडली आणि एवढय़ा सगळ्यांची जबाबदारी अंगावर असताना, लग्नानंतर ५ वर्षांनी म्हणजे १९७० मध्ये भाऊंमधील उद्योजकाने नोकरी सोडून स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
परिस्थिती अत्यंत बिकट होती. हातातोंडाचा मेळ जमण्यासाठी आशाताईंनी काही काळ कल्याणच्या एका शाळेत नोकरीही केली. पण नवऱ्याच्या कर्तबगारीवर त्यांचा अतूट विश्वास होता, त्यामुळे आर्थिक चणचण असूनही घरातील सुख-शांतीला कधीही तडा गेला नाही. तसंच घराला समजूतदारपणाचा वारसा असल्याने प्रत्येकाने आपल्यापरीने कष्टांचा वाटा उचलला आणि ‘ते’ दिवस निभावून गेले. याच छोटय़ाशा घरातून भाऊंनी आपला मेव्हणा श्रीकृष्ण याला हाताशी धरून कामाला सुरुवात केली. सुरुवातीला हे प्रत्येक कंपनीच्या दारात जाऊन त्यांच्याकडे यंत्र दुरुस्तीचं काम आहे का, ते विचारून त्यानुसार दुरुस्ती करून द्यायचे. या संशोधन वृत्तीतून त्यांनी स्वत:ची अशी वैशिष्टय़पूर्ण उत्पादनं तयार केली. त्यातील पहिलं होतं, ‘इमर्जन्सी टय़ूब’. आशाताई म्हणाल्या, ‘सुरुवातीला ऑर्डर्सचं प्रमाण खूप कमी होतं. रात्री सगळीजणं झोपल्यावर एका कोपऱ्यात भाऊ, श्रीकृष्ण आणि एक इंजिनीअर यांचे काम चाले. नंतर दिवसभर वणवण फिरून विक्री. प्रारंभिक वेगवेगळ्या अनुभवातून ‘शहाणपणा’ आल्यावर भाऊंनी वेगवेगळी उत्पादनं बनवण्याचा सपाटा लावला. त्यापैकी ‘सॉइल रेझिस्टिव्हिटी मीटर’ या यंत्राच्या अनेक उपयोगांपैकी एक होता ‘भूगर्भातील पाण्याचा शोध घेणे.’ त्याचबरोबर इमारती बांधताना कॉलममधील सळया किती मजबूत आहेत ते मोजण्यासाठी त्यांनी एक उपकरण तयार केलं. कॅडबरी कंपनीसाठी भाऊंनी एक मेटल डिटेक्टर बनवला होता. त्यामुळे बाहेरील अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा किंचितसा तुकडा जरी आतील चॉकलेटमध्ये राहिला असला, तरी ते लक्षात येत असे. उत्पादनांची संख्या वाढत होती, तसं आशाताईंचं कामही वाढत गेलं. सुरुवातीला ‘पैसे किती आले आणि किती गेले’ एवढय़ा दोन कॉलममध्येच हिशेब लिहिणाऱ्या आशाताईंनी भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू बँकेची कामे, कर्जव्यवहार, पगार, देणी-घेणी, टॅक्स आदी कामं आत्मसात केली आणि आपल्या मेहेनतीवर, कष्टांवर त्या कंपनीच्या वित्त संचालक बनल्या. आजही सकाळी १० ते दुपारी २ या वेळात कंपनीच्या दैनंदिन कारभारात त्यांचं कडक लक्ष असतं.
आशाताईंकडे अकाउंट्सची जबाबदारी असली, तरी कंपनीच्या इतर सर्व अंगांची त्यांना व्यवस्थित माहिती आहे. याचं कारण कंपनी लहान असताना बाइंडिंगपासून पॅकेजिंगपर्यंत पडेल ती सर्व कामं त्यांनी केली. त्याचप्रमाणे अकाउंट्स लिहिण्याच्या पद्धतीतील अनेक बदलही त्यांनी अभ्यास करून समजून घेतले, म्हणूनच आज टॅली सॉफ्टवेअरवर त्या लीलया काम करत आहेत. या कामातील त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाचं एक उदाहरण, त्यांच्या सी.ए. असलेल्या सुनेने- अपर्णाने सांगितले. ती म्हणाली, ‘एकदा कुठल्याशा टॅक्सचा भरणा करताना खात्यातील शिल्लक रकमेविषयी त्यांना शंका आली. ‘सर्व बरोबर आहे, मी बघितलंय,’ असं सांगत होते तरी त्यांनी राहिलेली एक ‘एंट्री’ शोधून काढलीच आणि मला दाखवली.’ कधी-कधी अनुभव ज्ञानावर मात करतो तो असा.
भाऊंनी कल्पकतेनं, पत्नी आशा, आई आणि वडील (दादा) यांच्या नावातील आद्याक्षरे घेऊन दिलेलं ‘आशिदा’ हे नाव नंतर भाग्योदय बरोबर घेऊनच आलं. गुणवत्ता, सचोटी आणि विश्वासार्हता यांचं प्रतीक बनलं. म्हणूनच आशाताईंचे दुसरे दीर जे डोंबिवलीला एक प्रथितयश डॉक्टर आहेत, त्यांनीही आपल्या दवाखान्याला ‘आशिदा क्लिनिक’ असं नाव दिलंय. एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या ‘आशिदा आर्ट’ आणि ‘आशिदा प्रकाशन’ अशा व्यवसायामुळे ‘आशिदा’ या वटवृक्षाची मुळं लांबवर पसरत चालली आहेत.
‘आशिदा’ कंपनीचा विस्तार जसा वाढत गेला, तशा कामाच्या जागाही बदलल्या. घरातून प्रथम पुंजानी इस्टेटमधील गाळय़ात आणि त्यानंतर वागळे इस्टेट भागात कंपनी मोठी होत गेली. आज चार मजल्यांच्या तीन इमारतीत ‘आशिदा’चं काम चालतं. शिवाय चौथा भूखंडही विकसनासाठी तयार आहेच. १९९४ साली ‘आशिदा’ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आणि संपूर्ण जबाबदारी स्वत: भाऊ, आशाताई, श्रीकृष्ण नाईक, सुनील कुलकर्णी, सुजय आणि सुयश कुलकर्णी या सहा संचालकांमध्ये विभागली. त्याचबरोबर भाऊंनी आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याला कंपनीत सामावून घेतलं. आज आशाताईंच्या सासर-माहेरच्या गोतावळ्यातील एकूण १३ सदस्य कंपनीत कार्यरत आहेत. त्यात आठ स्त्रिया आहेत. त्यातल्या प्रत्येकाने स्वत:ला सिद्ध केल्यावरच योग्य ती जबाबदारी प्रत्येकाला देण्यात आलीय. व्यवसाय आणि संसार, मुलंबाळं हा तोल सांभाळण्यासाठी आशाताईंनी सुनांना एक मंत्र दिलाय. तो म्हणजे दिवसातून मुलांच्या वयाच्या निम्मे तास बिझनेससाठी द्यायचे. उदा. मूल जर महिन्याचं असेल तर दिवसातला अर्धा तास, चार वर्षांचं झालं की दोन तास. याप्रमाणे मुलं १८ वर्षांचं झालं की पूर्ण ८ तास कंपनीसाठी द्यायचे. या सुवर्णमध्यामुळे ‘आशिदा’ परिवारातील लेकी-सुना समाधानी आहेत. त्यांनी अभिमानाने सांगितलं, की ‘आशिदा’ची परदेशात जेव्हा अनेक प्रदर्शने भरतात, तेव्हा त्यांच्या सुनाच मार्केटिंगसाठी समर्थपणे उभ्या असतात.
खरं तर आशाताईंची मुलंबाळं शब्दाची व्याख्या खूपच विस्तारलेली आहे. ‘आशिदा’मध्ये काम करणारा प्रत्येक पुरुष त्यांचा मुलगा आणि प्रत्येक स्त्री त्यांची लेक आहे. संपूर्ण ‘आशिदा’ परिवारालाच त्यांनी प्रेमाच्या रेशीमगाठीत बांधलंय. कंपनीच्या सर्वोच्चपदी विराजमान झालेल्यांना तिथं भाऊ आणि वहिनी म्हणून संबोधलं जातं. त्यावरून तिथल्या कौटुंबिक जिव्हाळ्याची कल्पना येते. मोठय़ा वहिनी, धाकटय़ा वहिनी, सुनीलभाऊ, मुळेकाका.. अशी इथली नामावळी.
भाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या मुलांचं बालपण सुसंस्कारी झालं पाहिजे, यावर आशाताईंचा कटाक्ष होता. मोठा मुलगा सुजयने सांगितलं की ‘धंद्यातील सचोटी व निष्ठा हाच यशाचा पाया आहे हे आम्ही आई व भाऊंकडून शिकलो. त्याचप्रमाणे ‘वज्रादपी कठोराणि मृदुनि कुसुमादपि..’ हे सूत्र लक्षात ठेवून परिस्थिती हाताळण्याचं कसब हीदेखील आईनेच दिलेली शिदोरी. तिच्याच पुण्याईने आम्हा भावांना अमेरिकेत ‘आय ट्रीपल ई’ या इलेक्ट्रॉनिक्समधील बलाढय़ कंपनीच्या सेमिनारमध्ये पेपर वाचण्याची संधी मिळाली.
२०१० साली भाऊंची साथ कायमची सुटल्यानंतर आशाताईंनी सामाजिक संस्थांशी असलेले संबंध अधिक दृढ केले. भाऊंच्या पैशांचा ट्रस्ट करून अनेक गरजूंना मदतीचा हात दिला, देत आहेत. आज नवी नवी आव्हानं झेलत ‘आशिदा’ची घोडदौड फक्त भारतातच नव्हे, तर सौदी अरेबिया, दुबई, मलेशिया, अफगाणिस्तान, इटली, इंग्लंड, चीन.. अशा अनेक देशांत सुरू आहे. गेल्या वर्षी कंपनीच्या ‘पॉवर सिस्टीम प्रोटेक्शन रिले’ या एकाच उत्पादनाच्या निर्यातीचा गेल्या वर्षांचा आकडा २० कोटी रुपयांचा आहे.
‘आशिदा’ कंपनी हे एक पवित्र मंदिरच आहे. विशेषत: भाऊ बसायचे ती खोली ‘आशिदा’ परिवाराने देवघरासारखी जपलीय. या देवघरात प्रवेश करताना पायातील जोडे आपोआप निघतात आणि मनात भक्तिभाव दाटून येतो. तिथल्या देवाने ४४-४५ वर्षांपूर्वी आशाताईंना दिलेला शब्द आज खरा ठरलाय.. ‘आज तुझ्याकडे काय आहे माहीत नाही, परंतु एक वेळ अशी येईल की तू कोटी कोटी रुपयांच्या चेकवर सह्य़ा करशील..’