एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे. एकटेपणात कोणीच आपल्याबरोबर नाही याची खंत असते. तर एकांतात माझ्याबरोबर मी आणि माझ्या सर्व अंत:प्रेरणा आहेत, याची जाणीव माणसाला आत्मविश्वास देत असते.
याजगात जी माणसे कर्तृत्वाने मोठी झाली त्यांच्या जीवनाची एकांत आणि लोकांत अशी दोन महत्त्वाची रूपे होती. एकांतात रमल्यामुळे त्यांना जवळून समाजदर्शन घडले आणि त्यांच्या जाणिवा समृद्ध झाल्या. त्यातून त्यांना आपल्या कार्याची एक निश्चित दिशा मिळाली. या मोठय़ा माणसांना केवळ समाजदर्शन पुरेसे वाटत नव्हते. त्यांना आत्मदर्शनाचीही तेवढीच ओढ लागलेली होती. दुसऱ्याशी बोलणे सोपे असते, पण स्वत:शी बोलणे आणि स्वत:ला समजून घेणे खरोखरच अवघड असते. ‘जाणावे आपणाशी आपण’ या समर्थ वचनाला अनुसरून आत्मशोधासाठी एकांताला जवळ करणारी खूप मोठी माणसे या जगात होऊन गेली.
एकांत म्हणजे एकटेपणा नव्हे. एकटेपणात कोणीच आपल्याबरोबर नाही याची खंत मनाला सतावत असते. तसे एकांताचे नसते. माझ्याबरोबर मी आणि माझ्या सर्व अंत:प्रेरणा आहेत, याची जाणीव माणसाला एकांतात आत्मविश्वास देत असते.  “Be yourself, transform yourself and transcend yourself” असा संदेश देणारे महायोगी अरिवद म्हणत, “Remain quiet, open yourself and call for divine.”   स्वत:पर्यंतच्या आत पोहोचण्यासाठी एकांताच्या रूपाने वाटय़ाला येणारी शांतताही तेवढीच आवश्यक असते. आपल्या आयुष्यात सगळीच दाने आपल्या मनाप्रमाणेच पडतील असे नाही. सुख-दु:खाच्या लाटा-लहरी उसळतच असतात. त्याचे अनेकविध भावतरंग आपल्या मन:पटलावर उमटत असतात. आपल्या दैनंदिन जीवन व्यवहारात, आचार, उच्चार आणि विचारात अनेक प्रमाद आपल्याकडून घडत असतात. पण आपले काही चुकते आहे, हे मानायला माणूस तयार नसतो. आपल्या हातून घडलेल्या अशा प्रमादांचे चिंतन एकांतात करता येते. आपल्या आयुष्याचा हिशेब मांडण्यासाठी कोणतेही सूत्र उपयोगी पडत नाही. आपणच आपल्या आयुष्यातली गणिते सोडविण्यासाठी जीवनात सुसूत्रता कशी आणता येईल, याची रूपरेषा तयार करायची असते. त्यासाठी एकांत हे नितांतसुंदर असे विचारपर्यटन स्थळ आहे.
भगवान बुद्ध म्हणत, ‘‘शब्द उच्चारण्यापूर्वी आपण त्यांचे स्वामी असतो. उच्चारलेले शब्द आपले स्वामी होतात’’ याची प्रचीती आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वारंवार येते.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यानानंतर शब्दमुक्ती आणि एकांत अनुभवत. व्याख्यानापूर्वीही ते फारसे कुणाला भेटत नसत. फारसे बोलत नसत. ते म्हणत, ‘‘ज्ञान संपादनाच्या वाचन, मनन, लेखन आणि चिंतन या चार महत्त्वाच्या पायऱ्या असल्या तरी यातली एकेक पायरी एकांताला सोबत घेऊन आपण चढत राहिलो, तर माणसाचा उत्कर्ष झपाटय़ाने होईल. एकांत हीच माझ्या वक्तृत्वाची उत्थानभूमी आहे.’’
एकांत आणि एकाग्रता ही मूल्ये आहेत. जयाशी एकांत मानवला। सर्व काही सुचे त्याला॥ असे समर्थ रामदास सांगतात. काळ सारावा चिंतने। एकांतवासी गंगास्नाने॥ अशी जगद्गुरू तुकोबारायांची भूमिका होती. या जगात महापुरुषांना घडलेली स्फुरणे, ज्यांना आपण ‘दर्शन’ म्हणतो, ती एकांताच्याच साक्षीने घडली. त्यामुळेच ते दार्शनिक या पदापर्यंत जाऊन पोहोचले. महात्मा गांधी आठवडय़ातून एक दिवस मौन पाळत आणि एकांताच्या आश्रयाला राहत. अनेक ऋषीमुनींच्या जीवनाचा एकांत हा अविभाज्य भाग असतो. ‘विपश्यना’ या बुद्धप्रणीत साधनतंत्रात अनेक दिवस मौन पाळावे लागते. मौनामुळे बोलणे अर्थपूर्ण होते. एकांतामुळे व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ आणि विचारी होते.
माणसांना कधी वातावरणापासून तर कधी माणसांपासून एकांत हवा असतो. तो मिळू देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. पण याचे भान अनेकांना नसते. अन्यथा भल्या पहाटे आणि मध्यरात्री फोन करण्याचे प्रकार घडले नसते. एखाद्या माणसाने एकांताला जवळ केले की अनेकांना प्रेमाचे पाझर फुटतात. ‘एकटेच का बसलात? काही समस्या आहेत का? या ना चारचौघांत!’ असे उद्गार ऐकायला मिळतात. वास्तविक पाहता लोकांचा असा दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्याचे एकांताचे सुख हिरावून घेण्यासारखे आहे. शेवटी ज्याचे त्याचे प्रश्न ज्याचे त्याला सोडवायचे असतात. अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे कधीकधी एकांतात मिळू शकतात. पण त्यासाठी एकांत वाटय़ाला येणे जरुरीचे आहे. एखाद्या अपयशाने अथवा प्रसंगाने एखाद्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले असेल तर त्याच्या एकांताचा भंग करणे हे सामाजिक कार्य ठरू शकेल. पण साधकांच्या, सर्जनशील व्यक्तींच्या आणि विचारवंतांच्या वाटय़ाला आलेल्या एकांताचा भंग होणारा नाही, याचे भान समाजाने ठेवणे आवश्यक आहे.
दिवसभर घरासाठी झटणारी पत्नी किंवा आई, अंगण फुलवून टाकणारी मुले, ज्ञानदान करणारे शिक्षक, सतत श्रवणभक्ती करणारे विद्यार्थी, सूर आणि स्वरांच्या जगात रमणारा गायक. शब्दांचा वर्षांव करणारा वक्ता या सर्वाच्या वाटय़ाला एकांत काही क्षण का होईना येणे आवश्यक आहे.
आज एकूणच जीवनाचे जे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे एकांताचे सुख मिळणे अवघड होऊन बसले आहे. भल्या पहाटे उठून सिटी बस, लोकलच्या वेळा पाळत, तर कधी स्वत:च्या वाहनातून तरी वेळेवर पोहोचू की नाही याची चिंता करीत माणसे उद्योगाला जात असतात. या धांदलीतही मनात विचारांची चक्रे सुरू असतात. प्रचंड गर्दी, गर्दीइतकाच धूर आणि सतत येणारे चित्रविचित्र आवाज यामुळे एक प्रकारची अस्वस्थता जाणवत असते. सतत मोबाइल वाजत असतो. एसएमएस येत असतात. दिवसभराचा वेळ उद्योगाच्या ठिकाणी जातो. दमून भागून माणसे घरी येतात तेव्हा दूरचित्रवाणी नावाच्या दैत्याने घराचा ताबा घेतलेला असतो. माणसे विवश होतात. आहे ते पाहण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्या गलक्यातच जेवण होते. दुसऱ्या दिवशी लवकर जायचे असते, त्यामुळे निद्रिस्त होण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय उरत नाही. ही सर्व माणसे एकांताला भुकेलेली असतात. पण हे सुख इच्छा असूनही त्यांच्या वाटय़ाला येत नाही.
एकांत ही गोष्ट मागून मिळत नाही. प्रसंगी ती कौशल्याने मिळवावी लागते. घरातील व्यक्तींनी स्थानबदल करावा. घरात एखादा निवांत कोपरा असावा. जिथे पुस्तकांच्या सान्निध्यात एकांत अनुभवता यावा. वक्त्यांनी आणि लेखकांनी चहापानाचा कार्यक्रम आटोपता घेऊन मार्गस्थ व्हावे. तासभर शिकवणाऱ्या शिक्षकांना काही क्षणांच्या उसंतीनंतर विद्यार्थ्यांनी शंकासमाधानासाठी भेटावे. विद्यार्थ्यांच्या दोन तासांत काही क्षणांचे अंतर असावे. पती-पत्नींचे भावविश्व एकमेकांशी कितीही एकरूप झालेले असले तरी प्रत्येकाचे स्वतंत्र असे विश्व असते, ते जपण्यासाठी उभयतांच्या वाटय़ाला थोडासा एकांत लाभावा अशी योजना करावी. दैनंदिन जीवनाचा एक भाग म्हणून या गोष्टी सर्वानी स्वीकारल्या तर सर्वानाच काही क्षण एकांताशी मत्री करता येईल. महात्म्यांना एकांत का प्रिय होता, याचे उत्तर मिळेल. आत्मशोध घेता येईल. ‘अखंड एकांत सेवावा। ही समर्थाची धारणा का होती?’ हेही समजेल.
ध्यान आणि एकांत यांचाही खूप जवळचा संबंध आहे. योगप्रकार आणि एकांत यांचेही असेच आहे. जिथे जिथे खोलवर जायचे आहे, सत्त्वयुक्त असे काही अनुभवायचे आहे. त्याचा एकांताशी जवळचा संबंध आहे. मानवी जीवनाची गूढता उकलण्यासाठी एकांताच्या गुहेत शिरणे आवश्यक आहे.
कोणी जे. कृष्णमूर्तीना संदेश मागितला तर ते म्हणत, ‘‘माझ्याकडे संदेश नाही. जे काही आहे ते तुमच्याच ठिकाणी आहे. मी फक्त अंगुलीनिर्देश केला. तुम्हीच जग आहात. तुमच्यात प्रथम परिवर्तन करा, मग जग बदलेल.’’
प्रभावी ध्यानाविषयी बोलताना जे. कृष्णमूर्ती म्हणत, “Please listen you are the world. Truth must be discovered a new from moment to moment. Do not approch the crisis of our times with formulas and systems. The choiceless awarness at every moment and in all the circumstances of life is the only effective meditation.”एकांताच्या सरोवरातच उत्कर्षांचे प्रतििबब दिसू शकते. म्हणून एकांतसुखही अनुभवायला हवे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!