News Flash

गद्धेपंचविशी : चित्तचक्षुचमत्कारिक काळ

कॉलेजात ‘आर्टस्’ला जायचं की ‘सायन्स’ला हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला.

प्रभा गणोरकर prabhaganorkar@gmail.com

‘‘माझी ‘गद्धेपंचविशी’ खऱ्या पंचविशीच्या बरीच आधी सुरू झाली. एकीकडे वेगळ्या गावी स्वतंत्र राहाणं, काम करून पैसे मिळवणं, प्रतिभावान व्यक्तींचं समृद्ध करणारं सान्निध्य लाभणं, हे अनुभवत होते, पण त्याच वेळी परक्यांकडून आत्मसन्मानाच्या चिंध्या होण्याचेही प्रसंगही घडत होते. बेकारीचा, नैराश्यानं वेढणारा काळही आला. पण प्रतिभावंत स्नेह्य़ांनी मला खचू दिलं नाही. आपल्या ‘नको त्या’ ठरणाऱ्या स्वभावविशेषांची पुरती ओळख होण्याचा आणि साहित्याच्या अथांग समुद्रात विहरत समृद्ध होण्याचाही काळ माझ्या गद्धेपंचविशीचाच होता.’’

‘गद्धेपंचविशी’ या अफलातून  शब्दसंहतीचा अर्थ हा शब्द शोधून काढणाऱ्याला अभिप्रेत असावा तसा, पंचविशीतल्या तारुण्याच्या सळसळत्या काळातला गाढवपणा असा घेतला, तर माझी गद्धेपंचविशी ही विशीच्या आधीच सुरू झाली आणि पंचविशीनंतरच्या काळातही गद्धेचाळिशी, गद्धेपन्नाशी, गद्धेपंचाहत्तरी अशा सुधारून वाढवलेल्या तिच्या आवृत्त्या निघत राहिल्या. परंतु तूर्त संपादकांना अभिप्रेत असलेल्या काळाबाबत बोलायचं आहे.

या चित्तचक्षुचमत्कारिक काळाची सुरुवात झाली ती मी चौदाव्या वर्षी आमच्या शिरजगाव बंड नामक खेडय़ातल्या शिवाजी हायस्कूलमधून पहिल्या वर्गात ‘एसएससी’ उत्तीर्ण झाले तिथपासून. १९५९ मध्ये मी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्री युनिव्हर्सिटीच्या वर्गात प्रवेश घेतला. इतरांपेक्षा दोन वर्ष आधीच. कारण वडिलांनी माझं नाव शाळेत घातलं ते त्या काळच्या पद्धतीप्रमाणे सातव्या वर्षी पहिल्या वर्गात घालण्याऐवजी एकदम तिसऱ्या वर्गात. आमच्या वेळी अकरावी मॅट्रिकऐवजी दहावी एसएससी अशी परीक्षा सुरू झाली होती. कॉलेजात ‘आर्टस्’ला जायचं की ‘सायन्स’ला हा निर्णय त्यांनी माझ्यावर सोपवला. डॉक्टर होण्यासाठी बेडूक कापावे लागत असल्यानं मी सायन्स घेणं साफ नाकारलं आणि लहानपणापासून आवडणारा संगीत हा मुख्य विषय, मराठी वाङ्मय आणि भूगोल हे दोन इतर विषय निवडले. पहिल्या वर्षी आईच्या आग्रहामुळे मी मामांकडे राहिले, पण दुसऱ्या वर्षी माझ्या वडिलांनी, त्यांना मी काका म्हणत असे, मला खापर्डे बगीचा या भागात एक खोली घेऊन दिली. चार भांडीकुंडी, एक स्टोव्ह, पलंग, गादी आणि पाचवीपासूनची प्रिय सायकल अशा सामग्रीनिशी मी खोलीवर राहू लागले. मुलीला शहरात एकटी ठेवणं, सायकलवरून कॉलेजात पाठवणं, असे त्या काळाच्या मानानं धाडसी निर्णय काकांनी बिनदिक्कत घेतले. कारण त्यांनी मला लहानपणापासून मुलग्यासारखंच वाढवलं होतं. शाळेतल्या एका मुलाला सांगून सायकल शिकवली, दरवर्षी उन्हाळ्यात अमरावतीला ‘श्रीकृष्ण ट्रान्सपोर्ट’च्या बसमध्ये बसवून आठ तासांचा प्रवास निर्भयपणे करायला लावला, गाणं शिकायला नागपूरला धनंजय पुजारींकडे ठेवलं, नाटक, वक्तृत्व स्पर्धा, कविसंमेलनं यांत भाग घ्यायला प्रोत्साहन दिलं.

त्या वेळी अमरावतीच्या खापर्डे बगिच्यात अ‍ॅड. हिरुरकर, राजवाडे, रावळे, ‘दैनिक हिंदुस्थान’चे संस्थापक संपादक बाळासाहेब मराठे अशी शहरातली मातबर मंडळी राहात. काकांनी साऱ्यांशी माझी ओळख करून दिली आणि त्यांना माझ्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. या वेळी आमच्या कुटुंबावर एक अनपेक्षित संकट कोसळलं होतं. आपली सोळा एकर सुपीक जमीन काकांनी एका जवळच्या मित्राला वाहायला दिली आणि ते स्वत: अमरावतीला कुठल्या तरी कारखान्याचे मॅनेजर म्हणून काम करू लागले. तीन-चार वर्षांनी हे इंजिनीअरिंगचं फॅड सोडून गावात राहून शेती करायचं त्यांनी ठरवलं. यंत्राची हौस म्हणून गावातली पहिली पिठाची गिरणी सुरू केली. शेताची मशागत करण्यासाठी गडी शेतात गेले तेव्हा त्यांच्या त्या मित्रानं यांना हाकलून लावलं आणि ‘कसेल त्याची जमीन’ या कुळकायद्याचा फायदा घेऊन शेत परत करायला नकार दिला. काकांच्या वकील मित्रानं त्यांना कोर्ट केस लढवण्याचा सल्ला दिला आणि जिंकण्याचं आश्वासन दिलं. केस वषार्र्नुवर्ष चालली. हळूहळू उरलेली शेतीवाडी, आजी-आईचे दागिने विकटिक करून काका अगदी पूर्ण खंक झाले. हे सारं समजण्याचं माझं वय सुरू झालं होतं. त्यामुळे एकटीनं खोली घेऊन मोकाट राहाणं सुरू झाल्यावर मी शिकवण्या करायला सुरुवात केली. चौथीतल्या दोन मुली आणि सातवी पास होण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या एक नर्सबाई यांना मी शोधून काढलं. त्यांच्या शिकवण्यांतून माझं घरभाडं सुटू लागलं.

एके दिवशी बाळासाहेब मराठे ‘हिंदुस्थान’च्या कचेरीत बसलेले असताना रस्त्यानं जाणाऱ्या मला बोलावून त्यांनी सांगितलं, की विदर्भ महाविद्यालयातल्या नातूबाईंनी ‘वाचक पाहिजे’ अशी जाहिरात दिली आहे; तू जाऊन त्यांना भेट. त्याप्रमाणे मी बाईंना भेटले. त्यांना वाचून दाखवलं आणि त्यांच्याकडचं माझं काम सुरू झालं. पुढली पाच वर्ष मी नियमितपणे बाईंना वाचून दाखवण्याचं काम केलं. त्यांच्याबरोबर असंख्य कथा, कादंबऱ्या, प्राचीन काव्य, लेख, असं विविध वाचन होत राहिलं. नातूबाई आणि त्यांचे पती दि. य. देशपांडे यांनी मला आपल्या कुटुंबात सामावून घेतलं.

विदर्भ महाविद्यालयात त्या वेळी ख्यातनाम प्राध्यापक होते. संगीतासाठी प्रा. नवसाळकर आणि प्रा. मनोहर कासलीकर हे ख्यातनाम गायक, मराठीला प्रा. पेशकार सर आणि नातूबाई. रा. ग. जाधव काही महिनेच राहिले, पण वामन चोरघडे यांच्या ‘खार’ कथेवर त्यांनी घेतलेला तास अजून आठवतो. मृदूभाषी उपाध्ये सरांनी भूगोल सोपाच करून टाकला. पुढे शंकर वैद्य मुंबईहून आले. तेव्हा कथासंग्रहाची मुद्रणप्रत तयार करताना त्यांनी माझं शुद्धलेखन आणि अक्षर सुधारून घेतलं. त्यांच्या शिकवण्यांमुळे मला कवितेची आवड निर्माण झाली.

बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर मी आसुसून वाचले आणि तशा कविता लिहिल्या. वैद्यांनी त्यांपैकी माझ्या काही कविता ‘सत्यकथे’कडे पाठवल्या. १९६३ मध्ये ‘सत्यकथे’त पहिली कविता छापून आली. गावातल्या साहित्यिक वर्तुळात एकदम गवगवाच झाला. या काळात वाचनाचा नाद लागल्यानं पुस्तकांनी खचून भरलेल्या ग्रंथालयातून मी रोज गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर ओळीनं वाचून काढले. शिवाय नातूबाईंमुळे वामन मल्हार जोशी, मामा वरेरकर, चि. त्र्यं. खानोलकर, जी. ए. कु लकर्णी असे भारदस्त लेखक वाचले गेले, त्यावर चर्चा होत गेल्या. कॉलेजात काव्यस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होत. त्यांत मी भाग घेत असे. कॉलेजकडे सायकलनं जातायेता सुरेश भट मधूनमधून आणि मधुकर केचे रोजच भेटत. ‘ललित’चा पहिला अंक भटांनी मला खोलीवर आणून दिला होता.  पुसदच्या साहित्य संमेलनात काव्यवाचनासाठी केचे यांनी माझं नाव सुचवलं. तिथे माझी निर्मला देशपांडेशी मत्री झाली. ती पुढे शेवटपर्यंत टिकली. गावात कविसंमेलनं नेहमी होत. कविभूषण खापडर्य़ाच्या वाडय़ाच्या गच्चीवर कोजागरीला कविसंमेलन असे. एकदा गावातल्या जोशी हॉलमध्ये कवी अनिल, वि. द. घाटे, सुरेश भट, मधुकर केचे असे त्या काळचे ख्यातनाम कवी कवितावाचनासाठी निमंत्रित केले गेले. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसून कविता वाचायची संधी मिळाली ती भटांमुळे.

अमरावती हे त्या काळी सांस्कृतिकदृष्टय़ा अतिशय समृद्ध शहर होतं. गायनाच्या मफली होत. नगर वाचनालय, जोशी हॉल इथं फर्डे वक्ते  निमंत्रित असत. बाबासाहेब पुरंदरे यांची शिवकालावरील व्याख्यानमाला, शिवाजीराव भोसल्यांची तुफान गर्दीची व्याख्यानं मी ‘जोशी हॉल’मध्ये ऐकली. गणेशोत्सवात कविसंमेलनं आवर्जून होत. गावात चित्रपट वितरक खूप असल्यानं उत्कृष्ट चित्रपट आधी लागत. गुरुदत्तचे, राज कपूरचे खूप चित्रपट मी पाहिले. ‘नायगारा’, ‘सायको’ असे इंग्रजी चित्रपट ‘गोपाल टॉकीज’मध्ये लागत आणि ते पाहून रात्री परतताना भीती वाटत नसे. त्यामुळे स्वतंत्रपणे, निर्भयपणे, कुणाचीही भीती न बाळगता, बेदरकारपणे जगण्याची सवय लागली. कॉलेजात मला विजय पागे, मुकुंद सराफ, सुधा व पुष्पा जोशी, अशा खूप मित्रमत्रिणी मिळाल्या. माझी आत्या कॉलेजच्या आवारातल्या मोठय़ा बंगल्यात राहात असे. तिचे यजमान बाबूराव क्षीरसागर हे  विदर्भ महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. त्यांचं घर आधाराला होतं. शिवाय शांताराम पटवर्धन हे काकांचे मित्र, सुनेत्रा आणि शामराव ओक, ताई व नाना जोशी हे पुष्पाचे आईवडील.. या साऱ्यांनी मला एकटं वाटू दिलं नाही आणि उपाशी राहू दिलं नाही.

पाहाता पाहाता हे मुक्तपणे जगण्याचे दिवस संपले. ‘एम.ए.’ची परीक्षा झाल्यावर आतापर्यंत भेटलेल्या चांगुलपणावर डोळे मिटून विश्वास ठेवत मी नोकरीसाठी जाहिराती पाहायला सुरुवात केली. १९६५च्या जूनमध्ये मी एका लहान गावातल्या खासगी कॉलेजात अर्ज केला. खोली घेऊन एकटीनं राहाणं सुरू झालं. आणि प्रथमच समाज नावाच्या अदृश्य तत्त्वाची दृष्टी जाणवली. त्या लहान गावात मुलांना शिकवायला आलेली मी एक बाई होते. आतापर्यंत अंगवळणी पडलेलं वागणं इथं चालणार नव्हतं. ‘लोक काय म्हणतील’ या वाक्यातले लोक सतत माझ्याकडे पाहात होते. सर्वाची माझ्यावर नजर होती आणि माझं तिकडे लक्ष नव्हतं. हसणं, खिदळणं, थट्टामस्करी, सिनेमे पाहाणं, दूर फिरायला जाणं, हे गावाच्या संस्कृतीत बसत नव्हतं. साहजिकच ही बाई लोकांच्या नजरेत खुपू लागली. दिवाळीच्या सुट्टीवरून परत आल्याच्या दिवशी नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचं पत्र माझ्या हाती आलं. हा अनुभव मला एकदा नव्हे चारदा आला. जूनमध्ये मी रुजू होई, कॉलेजातल्या पहिल्या-दुसऱ्या वर्गातल्या उत्सुक मुलांना माझा आवडता विषय शिकवण्याचा आनंद घेण्यात काही दिवस जात आणि दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालयाकडून निरोपाचं पत्र येई. याचं कारण मला कळत नसे. प्रत्येक वेळी काका त्या गावी जाऊन माझं सामान आवरून येत असत. पण त्यांनी मला एका शब्दानंही दोष दिला नाही.

या कठीण काळात मला आधार देणाऱ्यांना मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी मला आपल्या घरी तर ठेवून घेतलंच, पण माझ्या आत्मसन्मानाला धक्का लागू दिला नाही. बाई माडखोलकर यांच्याकडचा काळ, बाई, भाऊराव (ग. त्र्यं. माडखोलकर) आणि लेखक, वक्ता सुनील सुभेदार यांच्यामुळे फार आनंदात गेला. भाऊरावांच्या कादंबऱ्या, राजीव, हर्ष आणि श्याम या मुलांचा बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचा खजिना हे सारं वेळ विसरायला लावणारं होतं. त्यांच्याकडेच माझी इंदुताई शेवडय़ांशी ओळख झाली. इंदुताईंनी मला कवी अनिलांची ओळख करून दिली. त्या आकाशवाणीत अधिकारी होत्या. मला त्यांनी उत्कृष्ट इंग्रजी कादंबऱ्यांचा परिचय करून देण्याचा प्रकल्पच दिला. एका बेकारीच्या काळात त्यांनी मला त्यांच्याकडे राहायलाच नेलं. त्या वेळी त्यांच्या कथेवरच्या प्रबंधाची मुद्रणप्रत करून देणं आणि दादा शेवडय़ांबरोबर गप्पा मारणं यात वेळ जाई.

गावोगावचं पाणी चाखण्यात आलेले अनुभव कवितेत प्रकट होऊ लागले. ते ‘सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धनांना समकालीन स्त्रियांच्या कवितांतील अनुभवांपेक्षा वेगळे वाटल्यानं त्यांनी त्या कविता सत्यकथेत प्रकाशित केल्या. या काळात भेटलेले चित्रकार संभाजी कदम हा एक अपूर्व योगायोग होता. ज्येष्ठ लेखिका मालती बेडेकर ऊर्फ  विभावरी शिरुरकरांवर प्रबंध लिहिण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या घरी राहाताना जे.जे.चं विश्व, संगीताच्या मफली, चित्रांची प्रदर्शनं आणि कदमांचं सकाळ-संध्याकाळचं पेटीवादन हे सारं आतून निवविणारं होतं. हा सारा बेकारीचा काळ फार खचवणारा ठरला असता, पण उलट त्यांचा स्नेह सर्वप्रकारे समृद्ध करणारा, नराश्य विसरायला लावणारा आणि उमेद वाढवणारा ठरला.

या दरम्यानचे दोन योगायोग केवळ अद्भुत होते. नोकरीसाठीच्या मुलाखतीला जाण्यासाठी थोडा वेळ होता म्हणून मी कथाकार प्रभाकर सिरास यांच्याकडे गेले होते. तेथे त्याच मुलाखतीसाठी आलेले वसंत आबाजी डहाके भेटले. मी त्यांना ‘योगभ्रष्ट’ या दीर्घ कवितेमुळे आणि ते मला माझ्या गावोगावी पसरलेल्या ‘कीर्ती’मुळे ओळखत होते. ही भेट त्या दिवसापुरतीच राहिली नाही. अर्थात त्या मुलाखतीत आम्ही दोघंही नापास झालो, पण पुन्हा जिद्दीनं नव्या गावी नोकरी घेतली. या भिरभिरत्या काळात नातूबाईंना भेटण्याची हिंमत मला झाली नव्हती. पण त्यांचं माझ्याकडे दुरून लक्ष होतं. नव्या गावी एक दिवस अचानक त्यांचं दोन ओळींचं पत्र आलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं. विदर्भ महाविद्यालयात प्राध्यापकाची जागा असल्याचं त्यांनी कळवलं होतं. यथावकाश सर्व सोपस्कार पार पडून मी माझ्या अत्यंत आवडत्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे रीतसर लोकसेवा आयोगाची मुलाखत झाली. ती घेणारे होते देवीसिंह चौहान आणि म. वा. धोंड.

मात्र डहाक्यांचा उमेदवारीचा काळ तोपर्यंत संपला नव्हता. हिंगणघाटची त्यांची नोकरी पगाराचं आश्वासन देणारी, असून नसल्यासारखीच होती. ते मिळेल ती गाडी पकडून अमरावतीला येत आणि अनिश्चित काळपर्यंत आमच्या घरी मुक्काम करीत. त्या वेळी मी माझ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या बहिणीसह एक घर थाटलं होतं. ज्या घरात आम्ही आजही राहातो आहोत. त्या माझ्या घरी माझं काव्यलेखन जोरात सुरू होतं. त्यात आम्ही दोघांनी पुस्तकांवर लिहिणं, सुरेश भट यांच्या साप्ताहिकात लिहिणं हे उद्योग सुरू केले. मी वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीप्रमाणे पुस्तकांचा फडशा पाडणं सुरू ठेवलं. वसंतनं ‘योगभ्रष्ट’ची संहिता तयार करणं सुरू केलं होतं.

त्या वेळी मनोरंजनाचं दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. रस्त्यापलीकडे बानुबाकोडे या तरुणानं लायब्ररी सुरू केली होती. तो घरपोच मासिके  आणून देत असे. तर राजकमल चौकात अवधानी या तरुणानं भाडय़ानं रेकॉर्डस् देण्याचं दुकान उघडलं होतं. त्यामुळे पुस्तकं  वाचणं आणि विविध प्रकारची गाणी ऐकणं हा आमच्यासाठी त्या काळातला आनंदाचा ठेवा होता. शिवाय गावात येणारा प्रत्येक पाहुणा आमचं घर शोधत येई. त्यात  दुर्गाबाई भागवत, कवी ग्रेस, ना. धों. महानोर, अशोक केळकर, मुकुल शिवपुत्र, सत्यशील देशपांडे अशी अनेक प्रिय माणसं असत. म. ना. वानखेडे, गंगाधर पानतावणे काही निमित्तानं आले की पायधूळ झाडत. सुरेश भट, कथाकार प्रभाकर सिरास गावातच होते. आमचं एकत्रित आयुष्य खूप छान चालू होतं, हळूहळू सर्व मित्रमंडळींच्या प्रेमळ आग्रहामुळे आम्ही, मी आणि वसंतनं लग्नासाठी मान तुकवली.

‘गद्धेपंचविशी’च्या आधीची ‘गद्धेविशी’ हा माझ्या सत्त्वपरीक्षेचा काळ होता. ज्याला गौरी देशपांडे प्रवाहपतित म्हणते तसं आयुष्य घालवणं सुरू होतं. सर्व प्रकारचे टक्केटोणपे या काळात मी खाल्ले. माझा काही दोष नसताना परक्यांनी माझ्या आत्मसन्मानाच्या चिंध्या करण्याचा हा काळ होता. हळूहळू माझे सर्व स्वभावविशेष मला कळून चुकले. विचार न करता कसंही वाहावत जाणं, स्वत:ला तोषीस लावत जीव तोडून लोकांची कामं करणं, मूर्खाच्या रांगेत पहिला नंबर येईल इतका अव्यवहारीपणा आणि लोक ज्याला कधीही क्षमा करीत नाहीत असा भाबडेपणा, इतरांचं मूळ रूप, अंतस्थ हेतू न कळणं आणि कुणावरही पूर्ण विश्वास टाकणं, धोरणीपणाचा अभाव, दुसऱ्याला प्रत्याघाताची सणक येईल असा स्पष्टवक्तेपणा दाखवणं आणि कुणीही यावं नि कोपरानं खणावं असं मऊ, भुसभुशीत असणं हे माझे गुणविशेष या काळात अगदी उफाळून आले. आणि पुढेही ते तसेच राहिले.

माझ्या गद्धेपंचविशीचा शुभारंभ झाला त्या वेळी वसंतनं माझ्यासोबत राहाणं सुरू केलं होतं आणि नंतर १९७२ मध्ये मला पूर्ण समजून उमजून माझ्याशी लग्न केलं. या सर्व काळात मिळवलेल्या भांडवलाचा आमच्या सहजीवनासाठी मला परोपरीनं उपयोग करता आला. याच काळात एक व्यक्ती म्हणून आणि साहित्यिक म्हणून अनुभवांची, कलाप्रेमाची जी समृद्धी लागते ती मला मिळवता आली आणि तिच्यामुळेच पुढचा काळ अतिशय आनंदात घालवता आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2021 1:01 am

Web Title: author and poet prabha ganorkar life journey zws 70
Next Stories
1 व्यर्थ चिंता नको रे : महासाथीला पुरून उरताना..
2 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आव्हान की संधी?
3 निरोप असा दहावीचा घेता!
Just Now!
X