News Flash

अवघे पाऊणशे वयमान : जगलेल्या क्षणांतला आनंद

कोण कुठला गंगाराम गवाणकर मी.. कोकणातल्या माडबनासारख्या गावात बहुधा ऐंशी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला

(संग्रहित छायाचित्र)

गंगाराम गवाणकर  

‘‘सध्या मी एक चित्रपट आणि दोन नाटकं लिहितोय. म्हातारपण ही एक वयाची स्थिती आहे. ती कधी ना कधी तरी येणारच, हे समजून घेणं गरजेचं आहे. ऐंशी वर्षांचा असूनही माझं म्हातारपण अजून यायचं आहे. मला नातवंडं आहेत, मी आजोबा आहे, पण अजून म्हातारा नाही. जोवर माझ्या मनातलं मूल जिवंत आहे, तोवर मी म्हातारा नाही. जगलेल्या प्रत्येक क्षणातला आनंद मी उपभोगतो आहे..’’

वय वगैरे गोष्टी आकडेमोड करणाऱ्यांसाठी ठीक असतात. आयुष्य भरभरून जगणाऱ्या लोकांचे हिशेब हे आकडय़ांत नसतात तर ते जगलेल्या क्षणांमधून निर्माण झालेल्या आनंदाचे असतात. त्यांच्या आयुष्याच्या डोहात आनंदाचे तरंग उमलतात. माझ्या आयुष्यात आता फक्त आनंदाचे तरंग आहेत.

कोण कुठला गंगाराम गवाणकर मी.. कोकणातल्या माडबनासारख्या गावात बहुधा ऐंशी वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. (बहुधा एवढय़ाचसाठी, की शाळेत माझं जन्मवर्ष १९३९ असं नोंदवलं गेलं आहे.) व्हर्नाक्युलर फायनल, म्हणजे त्यावेळची सातवीची महत्त्वाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. ‘दारिद्रय़’ या शब्दालाही लाज वाटावी, असं आमचं दारिद्रय़ होतं. आई गावात आणि वडील मुंबईत. माझ्या आत्याबरोबर मी मुंबईत आलो. ‘हा कोण आहे? इथं का आला?’ असा वडिलांना प्रश्न पडला. तिथपासून ते आतापर्यंत जगत राहिलो. आला क्षण आनंदानं भोगला. कशाबद्दल कधीही तक्रार केली नाही. हा स्वभाव आला कुठून? माझ्यात चित्रकारी कोणी रुजवली? बोटांत लेखणी देऊन माझ्या हातून विक्रमी नाटकं कोणी प्रसवली? नाही सांगता येत. लोक जेव्हा रडगाणं गातात ना, तेव्हा मला अतिशय राग येतो. पांडुरंगानं दिलेलं आयुष्य स्वीकारा ना! साने गुरुजी सांगत, ते वाक्य मी माझ्या आयुष्याचा धडा बनवलं. ते सांगत, ‘तुम्ही स्वत:ला दु:खी समजता ना, मग मागे वळून पाहा. दु:खितांची एक मोठी रांग दिसेल.’

मुंबईत आल्यावर सातवी-आठवीतला मी स्मशानातही राहत होतो. वडिलांबरोबर पत्र्याच्या घरात राहताना डोकं आत गेलं तर पाय बाहेर राहायचे आणि उंदीर पाय कुरतडून जायचे. आज त्या काळाकडे मागे वळून पाहिलं तर जाणवतं, की आजचं माडबनातलं वन रूम किचनचं माझं स्वत:चं तांबडय़ा चिऱ्याचं घर व त्याची उभारणी, माझ्या तिन्ही मुलांची शिक्षणं, त्यांचं सुशेगाद चाललेलं आयुष्य, त्यांनी उभी केलेली तीन-तीन घरं, ही त्या कुरतडल्या गेलेल्या पायांचीच देन आहे. कुरतडलेल्या पायांना सांधता-सांधता आयुष्यही सांधता आलं, अजून काय हवं?

संत-महात्मे तर आपल्यात वास करून असतात, मग आपण काही केलं तर ‘ही त्यांचीच कृती’ असं मानायला लागलं, तर अहंकाराच्या पाकोळ्या दूर जातात. बाबा आमटे म्हणतात, ‘प्रभूच्या या जगात प्रत्येक गोष्ट टाकाऊ नाही, तर कामाची आहे.’ त्या गोष्टींना टिकाऊपण देणं हे आपलं काम. मी ते करत आलोय. किती टिकेल हे माहीत नाही पण प्रयत्न तर केलाय. हे प्रयत्न करताना मी जोखीम उचलत राहिलो. जोखीम घेतल्याशिवाय जखम होत नाही आणि जखम झाल्याशिवाय वेदनेची भाषा कळत नाही. बालपणापासून वेदनांच्या डोहात तरंगत आलोय, त्यामुळे माझ्या कलाकृतींना वेदनेचा व्यत्यास असणारा विनोद उपजतच लाभत गेला. त्यातून आनंदाचा परिमळ सर्वत्र पसरवण्याचा उद्योग काही प्रमाणात मला जमला असेल, इतकंच.

माझी पंचाहत्तरी स्नेह्य़ांनी अतिशय जोरदार केली. मजा आली. मालवणी भाषेत लिहीत राहिलो होतो, त्यामुळे बालपणीची सय जात नव्हती. २०१७ च्या डिसेंबरमध्ये मग मनात ठरवलंच, चला, आपल्या गावात जाऊ या परत. जुन्या गवतानं शाकारलेल्या घराला पक्कं बनवू या. जे-जे हातून नकळत घडत गेलं, त्याच्या स्मरणखुणा वेळोवेळी मिळत गेल्या.

सातवी झाल्यावर अर्ध्या चड्डीत, अर्ध्या सदऱ्यात आणि बोटीच्या अर्ध्या तिकिटात मुंबईला गेलेलो मी भिंतीभर स्मृतिचिन्हं घेऊन माडबनात परतलो. मला लहान-मोठं भावंड नाही, माझ्या जन्मानंतर झालेली एक-दोघं जगली नाहीत. आईच्या पान्ह्य़ाचा मी एकटा वाटेकरी होतो. वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत तिच्या अंगावर पीत होतो, त्या पान्ह्य़ानंच मला पंचाहत्तरीनंतर गावात परत बोलावलं. मला दोन नातवंडं आहेत. मोठय़ाला मुलगा आहे, तर धाकटय़ाला मुलगी. मधल्यानं लग्न केलं नाही. धाकटय़ाची मुलगी हुशार आहे. दरवर्षी ढीगभर मेडल्स, ट्रॉफीज् जिंकून आणते. माडबनाकडे ट्रक भरून स्मृतिचिन्हं नेताना लबाड नात म्हणते कशी, ‘‘आजोबा, मी तुमच्यापेक्षा जास्त ट्रॉफीज् मिळवून दाखवीन.’’ ऐंशीतल्या आजोबाला दुसरं काय हवं असतं? मी तिला म्हणालो, ‘‘मग तुझ्या ट्रॉफीसाठी आपण आणखी एक घर बांधू.’’

माझे गावातले कोणीही सवंगडी आज हयात नाहीत. पण त्या सवंगडय़ांबरोबर ज्या ज्या जागी जात असे तेथे आज मी नेहमी जातो. तिथं लहान मुलं खेळत असतात. त्या लहानांत मी माझे सवंगडी पाहतो. खूप मजा येतो. त्यांच्याबरोबर खाडीतले मासे गळ टाकून काढतो. गळ पाण्यात टाकून शांतपणे मासा गळाला लागायची वाट पाहात बसायची गंमत वेगळी असते. वाट पाहता-पाहता अचानक एखादा मासा गळाला लागला, की मी पाण्याबाहेर व तो पाण्याच्या आत, एकमेकांशी झुंज द्यायला लागतो. पाण्यात असेतोवर तो मासा त्याच्या प्रांतात असतो, तिथं त्याची ताकद असते, त्या ताकदीशी खेळण्याची गंमत काही औरच! दुसऱ्याच्या सामथ्र्यिबदूपर्यंत जाऊन तिथं त्याच्याशी झुंजायचं. मग मासा वीतभर असो किंवा फूटभर. झुंजीची गंमत न्यारी. नव्या सहस्रकाचं स्वागत मी हार्ट-अ‍ॅटॅकनं केलं. मी साठीत होतो. सारे जण म्हणायला लागले, ‘‘गवाणकारांनु, आता जरा सांभाळून.’’ पण आता तर मी यमाच्या राज्याजवळ आलो होतो. त्यामुळे त्याच्याबरोबर झुंज घेण्याची गंमत मी ‘एन्जॉय’ केली.

पंच्याहत्तरी झाली आणि नंतर दोन-तीन वर्षांनी म्हणजे २०१७ च्या ३१ डिसेंबरला शिरीष पै काव्यकट्टय़ावर मी अध्यक्ष म्हणून गेलो. रात्री पै यांच्या घरात आम्ही काही स्नेही जेवायला जमलो. आचार्य अत्र्यांचा वावर जिथे होता त्या ठिकाणी मी आलो होतो, त्याचा विलक्षण आनंद भोगत होतो. अचानक माझ्या उजव्या पायाला मुंग्या आल्यासारखं मला जाणवलं. मी अशोक मुळ्ये यांना म्हणालो, ‘‘काही तरी गडबड वाटतेय. पाय उचलता येत नाही.’’ तो शनिवार होता. दुसऱ्या दिवशी रविवार. पण मित्रांनी काही खटपट केली, रविवार असूनही माझ्या डोक्याचा एम.आर.आय. काढला गेला. त्याचं झालं काय की, मी आणि बायको, आम्ही दोघेच दहिसरच्या घरी होतो. माझा एक मित्र घरी येऊन मला घेऊन जाणार होता. पत्नीला मी काहीही सांगितलं नव्हतं. मी तिच्यासाठी व मित्रासाठी कसेबसे पाय फरफटवत कांदे-पोहे बनवून ठेवले होते. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं लिहिताना जाणवलं, की आपल्याला अर्धागवायूचा झटका आलाय. तसाच घरी आलो. मित्राची बायको परिचारिका होती. तिनं जबाबदारी उचलली. दुसऱ्या दिवसापासून अ‍ॅक्युपंक्चरचे उपचार सुरू केले. पाठीवर सुयांची वेणी आणि डोक्यावर केसांचा अंबाडा वसायचा. अ‍ॅक्युपंक्चर करणाऱ्यांसाठीही मी कांदेपोहे बनवून ठेवायचो. फराह नावाची मुलगी यायची. तिनं माझ्याकडून पैसे घेतले नाहीत. मला म्हणायची, ‘‘मी पैशांसाठी नाही तर तुमच्या कांदे-पोह्य़ांसाठी येते.’’ या उपचारांनी आठवडाभरात मला चालतं केलं. या काळात कोणी तरी मला काठी आणून दिली व वापरा म्हणाले. मी मुळीच वापरली नाही ती काठी. कोपऱ्यात ठेवून दिली. आता ती मला व मी तिला, दोघंही एकमेकांना वाकुल्या दाखवतो.

या काळात मला एक गोष्ट कळली, आपला डॉक्टर आपणच व्हायचं. आयुष्यभर आपण आपल्या शरीरावर कळत-नकळत किती तरी अन्याय करतो. त्याचा सूड नंतर आपली इंद्रियं घेतात. त्यामुळे ती इंद्रियं आता नीट सांभाळायला हवीत. आज तुम्ही कदाचित पाऊणशे वयाचे नसाल, पण उद्या होणार आहात. आत्ताच तुमच्या इंद्रियांची काळजी घ्यायला सुरुवात करा, नंतर ती तुमची काळजी घेतील. मी ही काळजी योगाच्या माध्यमातून घेतो.

पहाटे जाग आली की उठतो. किती वाजता उठायचं ते नक्की नसतं पण पहाटे जाग येते. तशी वयानुसार झोपही कमी होतेच. ही रात्री कमी झालेली झोप मी दुपारी भरून काढतो. यावरून आठवलं, मी यशवंत देवांकडे जात असे. ते योगासनं करायचे. दुपारी त्यांना पाच मिनिटं झोपायची सवय होती. दुपारी गप्पा मारता-मारता ते म्हणत, ‘‘मी पाच मिनिटं डुलकी काढतो.’’ मग ते स्वत:च्या डोळ्यांवरून हलकेच हात फिरवत, लहान बाळाला जोजवल्यासारखा आणि झोपून जात. बरोबर पाच मिनिटांनी ते जागे होत व ताजेतवाने दिसत. योगानं त्यांना ते साध्य झालं होतं. मी तसा प्रयत्न करत राहतो. डॉ. प्रभा मांडलेकर ही माझी डॉक्टर मला सांगते, ‘‘या वयात दोन पिटी महत्त्वाच्या, एक व्यायामाची ‘पी. टी.’ आणि दुसरी कुळथाची पिठी!’’

सध्या मी एक चित्रपट आणि दोन नाटकं लिहितोय. त्यातला एक दीर्घाक नुकताच एका दिवाळी अंकात आलाय. यातलं दुसरं नाटक म्हणजे मी मलाच दिलेलं आव्हान आहे. नाटकाचे दोन्ही अंक एकाच खडकावर घडतात. त्यात दोनच पात्रं आहेत. पाहू या कसं जमतंय ते.. आणखी एक नाटक मी लिहिलंय, त्याला निर्माता शोधतोय. या नाटकाचा विषय जरा वेगळाच आहे. म्हणजे माझी तीन सुपरहिट नाटकं- ‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’ आणि ‘वन रूम किचन’. या तिन्ही नाटकांतली पात्रं एका कारणानं एकत्र येतात, एकमेकांना भेटतात आणि मग एक धमाल उडते.. असं काही ना काही चालू असतं.

एक सांगू का? म्हातारपण ही एक वयाची स्थिती आहे. ती कधी ना कधी तरी येणारच, ते समजून घेणं गरजेचं आहे. माझं म्हातारपण अजून यायचं आहे. मला नातवंडं आहेत, मी आजोबा आहे पण अजून म्हातारा नाही. जोवर माझ्या मनातलं मूल जिवंत आहे, तोवर मी म्हातारा नाही. आणि खरंच सांगू? ते मूल मरेल ना तेव्हा हा गंगाराम गवाणकरही नसेल. वयानुसार माझा वेगळा खाऊ मला मिळतो. तो खाऊ म्हणजे औषधांच्या गोळ्यांचा. मी इमानेइतबारे तो खाऊ खातो. त्यावर तर माझं उर्वरित आयुष्य ठीकठाक जाणार आहे ना! मला तीन मुलगे आहेत. मोठा तुषार, तो ‘हिताची’ कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक आहे. मधल्या मकरंदनं ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये ग्राफिक डिझायिनगचं शिक्षण घेतलं. त्याच्याबरोबर नालासोपाऱ्याला माझी पत्नी राहते. धाकटा स्वप्निल हा संगीत क्षेत्रात पुढे गेलाय. त्यानं लंडनला जाऊन ‘स्टाफ नोटेशन’ची पदवी घेतली आहे आणि तो संगीत शिकवतो. त्याची मुलगी व मोठय़ाचा मुलगा, दोघेही एकाच शाळेत आहेत. मी मात्र भटकत राहतो. या घरातून त्या घरात, या गावातून त्या गावात. माझं मन आता कोकणात रमतं. सणक आली की मी कोकणाकडे धाव घेतो व माडबनात राहतो. आमच्या गावात दोन वाडय़ा आहेत गवाणकरांच्या. खालील वाडी आणि वरील वाडी. मी वरच्या वाडीत राहतो. आमच्या माडबनात अजून खूप सुधारणा व्हायला हव्यात, अद्यापही ते सत्तरच्या दशकात आहे. सुधारेल कधी तरी. तुका खरां वाटुचा नाय, पण दोन दोन दिवस हातांत पेपर धरत नाय. कारण तो येतच नाही तिथं. पण माझ्या या गावात मधु मंगेश कर्णिक, दिलीप पांढरपट्टे यांच्यापासून सारे येऊन गेलेत.

मध्यंतरी एप्रिल महिन्यात, जवळच्या कुठल्या तरी गावात भीमराव पांचाळे आले होते. माझं गाव जवळच आहे आणि मी तिथं आहे, म्हणून ते माडबनात संध्याकाळच्या सुमारास आले. त्यांना चहा वगैरे देऊन आम्ही समुद्रावर गेलो. संध्याकाळची वेळ. सूर्य अस्ताला चाललेला होता. हवा उष्ण होती पण वातावरण काव्यमय होतं.

अचानक भीमराव म्हणाले, ‘‘ही मारव्याची वेळ..’’ आणि ते त्या समुद्रकिनाऱ्यावर मारवा गाऊ लागले. मी मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागलो. एप्रिलच्या उन्हाचे विस्तवी चटके त्या क्षणी दविबदू वाटू लागले. मनात विचार आला, समुद्राची गाज सुंदर की भीमरावचं गाणं सुंदर..! असे अनेक मोहक क्षण आयुष्याचं गाणं करून टाकतात. अशा मोहक क्षणांना आठवणींच्या साठवणीत गोठवता आलं पाहिजे. बस और क्या चाहिये?

शब्दांकन : प्रा. नितीन आरेकर

nitinarekar@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2019 12:54 am

Web Title: author gangaram gavankar chaturang avaghe paunshe vayaman abn 97
Next Stories
1 आरोग्यम् धनसंपदा : पित्तविकारावरील आहारोपचार
2 तळ ढवळताना : मरम ना कोउ जाना
3 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : परकी माती आपलीशी
Just Now!
X