नीलिमा किराणे neelima.kirane1@gmail.com
घटस्फोटांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, हे वारंवार ऐकायला मिळणं ही त्याभोवतीची नकारात्मक भावना मिटत असल्याची खूण असली तरी त्याचे वर्षांनुवर्षं चालणारे खटले हे काही समंजसपणाचं लक्षण नाही. आजही घटस्फोट म्हटला की भांडणं, संताप, आरोप-प्रत्यारोप, सूड, केविलवाणेपणा हेच अनेकांच्या बाबतीत पाहायला मिळतं. अनेक वर्षांच्या एकमेकांना समजून घेण्याच्या प्रयत्नांनंतर एका क्षणी नवरा-बायको म्हणून यापुढे आपलं पटणार नाही ही आत्मसाक्षात्काराची जाणीव झाल्यावर, साहिर लुधियानवी यांच्या शब्दांत, ‘उसे इक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा’ म्हणत त्या नात्यातून बाहेर पडणं हेच प्रगल्भ आणि परिपक्वतेचं लक्षण ठरू शकतं.. 

अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांच्या घटस्फोटाबद्दल अजूनही प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर एखाद्या जोडप्यानं एकत्र राहावं की विभक्त व्हावं ही त्यांची अत्यंत वैयक्तिक बाब; पण सेलिब्रिटींबद्दल चर्चा होणंही स्वाभाविक. ‘बातमी ऐकून धक्का बसला’ इथपासून ‘काय हे! शोभतं का?’ इथपर्यंत अनेक प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. ‘आम्ही ज्यांना आदर्श जोडपं मानत होतो त्यांचंही ‘असं’ झाल्यावर लग्नसंस्थेवरचाच विश्वास उडतो,’ अशीही एकाची टोकाची प्रतिक्रियाही होती. (जसं काही ‘आम्हाला आदर्श मान’ असं आमीरनंच सांगितलं होतं!) यातून घटस्फोट या विषयाबद्दलचे आपल्या समाजमनाचे अनेक कंगोरे दिसले.

Loksabha Election 2024 Hema Malini Ravi Kishan Harish Rawat working in fields
हेमा मालिनींकडून शेतात खुरपणी तर रवी किशन चहाच्या टपरीवर; मतांसाठी कोण काय काय करतंय?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

विभक्त होण्याच्या निर्णयाविषयी एका कार्यक्रमादरम्यान बोलणाऱ्या आमीर-किरणच्या समंजस वागण्यावर एकानं लिहिलं होतं, ‘एकमेकांबद्दल इतकी आपुलकी असेल तर घटस्फोटाची गरजच काय होती असा प्रश्न पडतो,’ ही प्रतिक्रिया वाचल्यावर वाटलं की घटस्फोट या शब्दासोबत भांडणं, संताप,

आरोप-प्रत्यारोप, सूड, केविलवाणेपणा हेच असलं पाहिजे का? समंजसपणा हा शब्द असू शकत नाही का? प्रत्येकाच्या काही वैयक्तिक गरजा, कारणं असू शकतात, हे मान्यच करायचं नाही का? त्यामुळे घटस्फोट या शब्दासोबत जोडलेली भीती, घटस्फोटानंतरची परिस्थिती व मानसिकता याविषयी विशेषकरून जाणवलेल्या काही गोष्टी आणि उभयतांच्या समंजस वागण्यामुळे सोपं झालेलं पुढचं आयुष्य, याबद्दल समुपदेशक म्हणून काम करताना आलेले काही अनुभव सांगावेसे वाटतात.

गैरसमज, अपेक्षाभंग, अहंकार, आदी कारणांमुळे अनेक जोडप्यांमध्ये भांडणं होतात, घटस्फोटाची भाषाही होते, पण तरी एकत्र राहाण्याची इच्छा असेल, तर सुसंवादाचा प्रयत्न शक्य असतो. मात्र जेव्हा एखाद्या जोडप्याला खरोखरच घटस्फोट घ्यावासा वाटतो, तेव्हा काही महत्त्वाच्या विषयांबाबत दोघांमध्ये गंभीर मतभेद आहेत हे उघड असतं. टोकाचे अपेक्षाभंग होतात, कारण एकासाठी जे अत्यंत महत्त्वाचं असतं ते दुसऱ्याला अतिशय क्षुल्लक वाटू शकतं. किं वा विवाहबाह्य़ संबंध, सततचा संशय यांमुळे एकमेकांबद्दलचा आदर किंवा विश्वास संपलेला असतो. तरुणपणी प्रेमाच्या नादात असताना स्वभावातल्या फरकांकडे दुर्लक्ष होतं किंवा दोघांपैकी एकजण जास्त परिपक्व झाला आणि  दुसरा विचाराने अप्रगल्भच राहिला तरीही विचारांमध्ये मतभेद होत राहातात. कारणं काहीही असोत, मुद्दा हा आहे, की एकत्र राहाण्यातला आनंद संपलेला असतो. नाजूक भावना विझून नातं इतकं विटलेलं असतं, की यापुढे मनं जुळणं दूर, दोघांमधलं भावनिक अंतर वाढतच जाणार हे लक्षात येतं. काही घरांमध्ये अहंकार, हट्ट, सूडाची भावना टोकाला पोहोचून घर म्हणजे दारूगोळ्याचं कोठार बनतं. ‘मुलांसाठी एकत्र राहातोय’ म्हणणाऱ्यांच्या सततच्या भांडणामुळे मुलांना घरातच जास्त असुरक्षित वाटत असतं. अशा टप्प्यावर कोणाचं चूक?, कोण बरोबर?, हा मुद्दाच उरलेला नसतो. नातं दुरुस्त होण्यापलीकडे मोडलेलं आहे एवढंच ‘सत्य’ असतं. तरीही अनेक जोडपी नाइलाजानं एकत्र राहाताना दिसतात.

आर्थिक कारणांमुळे किंवा काही अपरिहार्य परिस्थितीमुळे विभक्त होणं ज्यांना परवडणार नसतं, त्यांना असं ना तसं जुळवून घेऊन एकत्र राहावंच लागतं. पण जिथे दोघंही कमावताहेत, सुबत्ता आहे, डोक्यावर पक्कं घर आहे, तिथेही विभक्त होण्याचा विचार का करता येत नाही? मन मारत, घुसमटत, खेचत, एकमेकांना शब्दांनी ओरबाडत एकत्र का राहातात लोक? सतत घुसमट होऊन मग टोकाचे ‘मूड स्विंग’ होतात, मुलांवर चिडचिड के ली जाते, कामात लक्ष लागत नाही,कुणाशी पटत नाही, करिअरवर परिणाम होतो. मग लोकांना टाळणं किंवा सगळं झाकून खोटं आनंदी वागणं, असं काहीतरी घडतं. त्या ताणातून येणाऱ्या नैराश्यावरचे उपचारही अनेकांना घ्यावे लागतात, त्यांना शांतपणे घटस्फोटाचा निर्णय का घेता येत नसावा?

याचं महत्त्वाचं एक कारण म्हणजे आपल्याकडे ‘घटस्फोट’ या शब्दाकडे एक भयंकर गोष्ट, एखादा कलंक म्हणूनच आजही पाहिलं जातं. ‘लोक काय म्हणतील?’ या मुख्य सामाजिक मानदंडाच्या भोवती इतक्या असंख्य भीतींचा चक्रव्यूह उभा करण्यात आला आहे, की वेगळा विचार के ला तर त्यातून कधीच बाहेर पडणार नाही, अशी मानसिकता तयार झाली आहे. समाजाची, नातलगांची भीती, एकटं राहायची भीती, न्यायालयाची पायरी चढण्याची भीती, निर्णयाच्या परिणामांची भीती, बदलाची भीती, ‘एकटय़ा बाईला जग त्रास देतं’ या आणि अशा प्रकारच्या गृहीतकांची भीती, ऐकीव कथांची तर प्रचंड भीती, इतक्या वर्षांच्या संसाराचा ‘कम्फर्ट झोन’ तोडण्याची भीती, ‘आपल्यामुळे घर मोडलं’ हा शिक्का बसण्याची भीती, ‘आपण पती-पत्नी म्हणून, आई-बाप म्हणून कमी पडलो’ ही भीती.. अशा अनंत भीतींपुढे घटस्फोट खरोखरच आवश्यक असला तरी सहजासहजी तो घेण्याचं पाऊल पुढे टाकवत नाही. याशिवाय घटस्फोट घेतल्यावर त्यातून होणाऱ्या फायद्याचाही विचार करायला हवा, हे कुणी सांगितलेलंच नसतं.

मात्र काळाबरोबर तरुणांच्या मानसिकतेत काहीसा बदल होताना दिसतो आहे.  नव्या पिढीला पूर्वीच्या पिढीसारखी घटस्फोटाची आतून भीती नसते. त्यांच्यासाठी तो ‘कलंक’ असत नाही. आर्थिक स्वातंत्र्य असतं. त्यामुळे थोडंफार धाडस करून विभक्त होण्याचा निर्णय ते घेतातही, पण तरीही त्यांच्यावरचा ताण कमी नसतो. कारण अनेकदा मागची पिढी त्यांच्या पाठीशी उभी असते खरी, पण भीतीचा चक्रव्यूह, आदर्शवाद आणि संस्कार यांचं ‘भयंकरीकरण’ सोबत घेऊनच. ‘तुमच्या पिढीला कुणाशी जुळवून घेता येत नाही. लग्न म्हटलं, की तडजोड करावीच लागते, तू हट्टी आहेस, एकटं राहाणं अवघड असतं, लगेच स्थळं बघायला लाग,’ या एकतर्फी संवादाशिवाय घरात दुसरा संवाद नसतो. त्यामुळे नव्या पिढीचा आत्मविश्वास खच्ची होतो.

या पार्श्वभूमीवर, आपल्या मुलांना समजून घेणं म्हणजे नेमकं काय असतं याचं एक उदाहरण आठवतं. हर्षदाला आत्मकेंद्री नवऱ्याकडून सन्मानाची वागणूक कधीच मिळाली नव्हती. क्वचित तो हातही उचलायचा. त्याच्या अशा अवताराला तिचे सासू-सासरेही घाबरून असायचे. त्यामुळे त्यांची मदत नव्हती. एके दिवशी अति झाल्यावर मात्र हर्षदा माहेरी परतली. घरचे पाठीशी उभे राहिले, न्यायालयाची प्रक्रिया सुरू झाली. पण हर्षदा घराबाहेर पडत नाही, लोक प्रश्न विचारतील या भीतीनं ती नातलगांनाही टाळतेय, असं तिच्या बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी एके दिवशी सर्व जवळच्या नातलग आणि इष्टमित्रांना घरी बोलावलं आणि जाहीरपणे सांगितलं, की ‘अमुक कारणामुळे हर्षदा कायमची घरी परत आली आहे. न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर आताच मला विचारा. पण कृपया यापुढे, ‘तुमच्या दोघांत काय घडलं?’ अशासारखे प्रश्न विचारून तिला त्रास देऊ नका. आता तिला सर्व शक्ती स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठी वापरायची आहे. जमल्यास तिथे मदत करा.’ हर्षदाच्या माहेरी असण्याभोवतीचं गूढ वलय बाबांनी असं तोडल्यामुळे जादू घडली. हर्षदा मोकळी झालीच, शिवाय सर्वाच्या आधारामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. जगणं सोपं झालं.

आजकाल ‘विवाहित पण विभक्त’ राहाणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण आपल्याकडे लक्षणीयरीत्या वाढलं आहे. त्यातही अनेकदा मागच्या पिढीच्या मानसिकतेचाच प्रभाव जाणवतो.  यात समुपदेशक म्हणून वारंवार बघायला मिळणारे काही प्रसंग सांगावेसे वाटतात. काहीतरी कारणानं नवऱ्याशी भांडून रागाच्या भरात मुलगी माहेरी निघून येते. गैरसमज मिटून त्यांचं जुळावं, या सदिच्छेनं होणारी दोन्ही कुटुंबाची ‘बैठक’ म्हणजे ‘कोणाचं चुकलं?’ याचाच निवाडा असतो. आपापल्या मुलांची बाजू घेताना मोठय़ांचे मानापमान मध्ये येतात, चांगलीच जुंपते आणि सगळंच तुटतं. मग न्यायालयाच्या फे ऱ्या, वकील, पोटगी टाळण्यासाठी/ मिळवण्यासाठी कायदेशीर कोलांटउडय़ा आणि वर्षांनुवर्ष प्रलंबित खटले ही गावांकडची वस्तुस्थिती. तर डॉलरमध्ये कमावणाऱ्या ‘एनआरआय’ मुलाशी लग्न करून नंतर त्याच्याशी किंवा परदेशातल्या वातावरणाशी न जमल्यामुळे मुली देशात परत येतात, काही जणी ‘आता त्याला धडाच शिकवते’ म्हणून ‘कौटुंबिक हिंसाचार कायद्या’खाली कोटी रुपयांमध्ये दावे लावतात, ही एक नवी शहरी वस्तुस्थिती आहे. खरं तर कुठलंही नातं बिघडण्यात बहुतांशवेळा दोघांचाही थोडा थोडा वाटा असतोच. पण आपापल्या मुलांची बाजू घेऊन भांडणाऱ्या पालकांच्या प्रभावाखालीच मुलंही विचार करतात. या ‘पेटून’ भांडत राहाण्यात आपलीच ऐन तारुण्याची आठ-दहा वर्ष वाया गेली, हे लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. दुर्दैवानं त्याचंही खापर जोडीदार आणि त्यांच्या घरच्यांवर फोडलं जातं. त्रयस्थपणे प्रामाणिक, समंजस विचार अजूनही जमत नाही असंच बघायला मिळतं.

मात्र अशा अनुभवांकडे नव्यानं डोळसपणे बघितलं तर वेगळा अनुभव मिळू शकतो. सुमेधा आणि सारंगचं नातं आटत आटत ठक्क कोरडं- ‘डेड रीलेशन’ झालं होतं. घरी  येणाऱ्या पाहुण्यालादेखील पाच मिनिटांत हे लक्षात येऊन घुसमटायला व्हायचं. समोर कुणीही असो, या दोघांमध्ये देवाणघेवाण फक्त विषारी फूत्कारांची व्हायची. दोघांनाही चांगल्या नोकऱ्या होत्या, मूल नव्हतं, तरीही विभक्त होण्याची भीती वाटायची. अखेरीस हिंमत करून घटस्फोट घेतल्यावर दोघांनाही सुटल्यासारखं वाटलं. एकटेपणाच्या अडचणी दोघांनाही सारख्याच होत्या. जेवणखाण, घरकाम यांसाठी माणसं होती, पण रोजच्या रिकाम्या वेळेचं काय करायचं? मित्रमैत्रिणी असले तरी कितीदा जाणार? एकेकटेच राहात असल्यानं दोघांकडेही त्यांचे त्यांचे परगावचे नातलग राहायला यायचे किंवा मित्र जमायचे. सुरुवातीला त्यांची सोबत वाटली, पण नंतर लोक आपलं घर गृहीत धरताहेत, आपला फायदा घेताहेत, असं लक्षात येऊ लागलं. एकदा योगायोगानं सुमेधा आणि सारंग अचानक एकमेकांसमोर आले आणि दोघांनाही चक्क जवळचं कुणीतरी भेटल्यासारखं ‘बरं’ वाटलं. गप्पा झाल्या. हे अनपेक्षित कसं घडलं? आता एकत्र राहात नसल्यामुळे रोजचे वादाचे मुद्दे संपले होते. नातं नसल्यामुळे अपेक्षा नव्हत्या. काही काळ गेल्यामुळे वाईट आठवणी मागे पडल्या होत्या. नातं दुरावण्यात आपलाही वाटा होता, हे उमजून मनातला कडवटपणा कमी झाला होता. आज त्यांना नव्यानं समजलं होतं, की एवढय़ा वर्षांच्या सहवासामुळे असलेली एकमेकांच्या आवडीनिवडीची जाण आणि त्यामुळे असणारा ‘कम्फर्ट झोन’ अजूनही आतमध्ये तसाच होता. हे अनोखं आत्मभान आल्यावर त्यांची नव्यानं मैत्री झाली. या नव्या नात्यात ओळख होती, आपुलकी होती; पण सक्ती नव्हती, गृहीत धरणं नव्हतं. आपलं नातं पुढे असं सुंदर वळण घेऊ शकेल हे घटस्फोटाच्या वेळी त्यांच्या स्वप्नातही नव्हतं.

असंच एक उदाहरण निमिष आणि राधिकाचं. त्यांचा सहमतीनं घटस्फोट झाला. त्यांना नातं नकोसं असलं तरी नऊ वर्षांच्या त्यांच्या मुलाला- ऋग्वेदला आईच हवी, हे समजण्याइतका समंजसपणा निमिषकडे होता. तसंच मुलाला बाबा आणि आजीपासून तोडायचं नाही, ही समज राधिकालाही होती. त्यामुळे मुलाचा ताबा राधिकाकडे असला तरी ऋग्वेदचं त्याच्या बाबाच्या घरी जाणंयेणं होतं. ऋग्वेद नव्या पाळणाघरातही रमला. पण कधीकधी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी राधिकाला कामासाठी बाहेर जावं लागायचं तेव्हा प्रश्न यायचा. राधिकाचं माहेर दूर होतं. ती एखाद्या मैत्रिणीकडे ऋग्वेदला ठेवायची. हे समजल्यावर, ‘अशा वेळी ऋग्वेदला आईकडे ठेवत जा. त्याचा आणि आजीचा आतापर्यंत तयार झालेला ‘कम्फर्ट झोन’ आपण मोडायला नको.’ असं निमिषनं तिला सुचवलं. राधिकाला ते पटलं. ही आजी बडबडी आणि टोमणे मारणारी असल्यामुळे आजी त्याच्या मनात काहीतरी भरवेल अशी राधिकाच्या माहेरच्यांना चिंता होती. एकदा न राहावून तिनं ऋग्वेदला विचारलंच, ‘‘ते दोघं माझ्याबद्दल वाईट बोलतात का रे?’’

‘‘आजी बोलतेच गं, पण ती काय, सगळ्यांबद्दलच बोलत असते. मी लक्षच देत नाही.’’ मुलामध्येही परिपक्वता असू शकते ते आपण विसरलो हे जाणवून राधिकाला हसू आलं आणि हायसंही वाटलं. ‘‘बाबा एकदोनदा म्हणाला, ‘तुझी आई हट्टी आहे. तिला हे झेपणार आहे का?’ पण मी त्याला सांगितलं, की तू आईबद्दल मला काही सांगू नकोस. आणि आई, तू पण मला बाबाबद्दल काही सांगू नकोस बरं का. तुमचं भांडण असलं तरी मला तुम्ही दोघंही आवडता.’’ या छोटय़ाला इतकी समज आहे आणि ‘तुमचं तुम्ही बघा, मला तुम्ही दोघंही आवडता’ इतक्या सहजपणे त्यानं त्याच्यापुरता तो प्रश्न सोडवलाय म्हटल्यावर राधिकाच्या चिंताच मिटल्या. आणखी एक उदाहरण, मिलिंद आणि वरदा विभक्त झाल्यावर छोटय़ा इशितासह वरदा नव्या जागी राहायला आली. नव्या सोसायटीतल्या इशिताच्या छोटय़ा मित्रमंडळानं ‘तुझे बाबा कुठे आहेत?’ असं विचारल्यावर इशिता अवघडली. तिला हे नवीन वातावरण, जागा आश्वासक वाटणं महत्त्वाचं होतं हे वरदाच्या लक्षात आलं. वरदा त्यासंदर्भात मिलिंदशी फोनवर बोलली आणि तिनं सुचवल्याप्रमाणे मिलिंदनं एकदा या सर्व बच्चेकंपनीला गाडीतून नेऊन आइस्क्रीम खाऊ घातलं.

मिलिंदशी एकदा ओळख झाल्यावर ‘इशिताचा बाबा कुठे आहे?’ हा प्रश्न कायमचा संपला.

अलीकडे वाढलेली अवघड जागची दुखणी म्हणजे दोघांपैकी एकाची ‘शारीरिक दुर्बलता.’ अशावेळी अनेकदा घटस्फोट टाळला जातो कारण त्यावरची चर्चा नको वाटते, परंतु काल्पनिक भीतींमध्ये अडकण्यापेक्षा गोष्टी आहेत तशा घेतल्या, की प्रश्न सोपे होतात. आधी म्हटलं तसं, कल्पनेनं ‘भयंकरीकरण’ करण्याची सवय आपल्याला नकळत्या वयात लागलेली असते. पण सुलभीकरण करण्याची सवय जाणीवपूर्वक लावता येऊ शकतेच. आपल्या घरची परिस्थिती, सर्वाचे स्वभाव लक्षात घेऊन जमेल तसं, जमेल तेवढं भीती आणि शंकांमधून बाहेर पडता आलं तर आपल्याला योग्य, समंजस मार्ग सापडू शकतो. फक्त थोडा विश्वास हवा, स्वत:वर, जोडीदारावर आणि मुलांच्या समजूतदारपणावरसुद्धा. ५० वर्षांपूर्वीच्या मानसिकतेतून आलेली जुन्या पिढीची मतं तरुणांनी तशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा तारतम्य वापरलं, समोर येईल त्यास मोकळेपणानं प्रतिसाद दिला, निरीक्षण करून आपले निष्कर्ष स्वतंत्रपणे काढले, तर घटस्फोट हा कलंक नसेल. तो प्रसंगी एक गरजेचा आणि समंजस निर्णय असू शकेल.  आयुष्यात आपल्याला काय हवंय?, जोडिदारावर सूड की तारुण्याचे दिवस?, आपली बालिश भांडणं की मुलांना मिळणारं आनंदी वातावरण?  हे आपणच ठरवायचं असतं. आनंदी राहाण्याची इच्छा हा गुन्हा नव्हे, उलट तो प्रत्येकाचा हक्क आहे. हे मान्य असेल तर प्रामाणिकपणे जोडीदार आणि मुलांचा विचार करून आपापला नवा, समंजस रस्ता बांधला जाऊ शकतो. हे सोपं नाहीच; पण कुठून तरी  सुरुवात करायलाच हवी ना?

प्रसिद्ध व्यक्तींचे घटस्फोट हा अनेकांच्या ‘गॉसिप’चा विषय होतो. पण या गॉसिपच्या पलीकडे जाऊन घटस्फोट या विषयावर चिंतन करण्याचं आणि नवं काही शोधण्याचं हे एक निमित्त ठरू शके ल. घटस्फोटाचा विनाकारण बाऊ न करणं ही या प्रक्रियेची पहिली पायरी. अशा विनाताण वातावरणाचा जोडप्यांमधील निखळ मित्रत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी कदाचित उपयोगच होईल.

शेवटी, आपल्याला मिळालेलं हे आयुष्य कसं घालवायचं हे प्रत्येकाचं प्रत्येकानंच ठरवायला हवं. वाद, चिडचिड हवी की आनंद, समाधान ही प्रत्येकाची निवड असू शकते. त्यासाठी काही गोष्टी स्वीकारायच्या, काही सोडायच्या असतात आणि ते आपल्याच हातात असतं. लिओ टॉलस्टॉयचं एक वाक्य  सगळ्यांनी अंगीकारावं असंच आहे,

If you want to be happy, be.