डॉ. शुभा थत्ते

आमचा ‘त्रिदल गट’ हा स्किझोफ्रेनिया या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांचं, शुभार्थीचं अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर आहे. तिथे गेल्यावर ज्या मायेने, प्रेमाने ते माझं स्वागत करतात, नवीन कपडा घातला असल्यास आवर्जून दाखवतात, त्यांचं दुखलंखुपलं शेअर करतात, ते पाहून मी भारावून जाते. त्यांची काहीही चूक, दोष नसताना त्यांच्या पदरात पडलेला स्किझोफ्रेनियासारखा आजार! त्याचा त्रास सुसह्य़ करण्यासाठी त्यांना मदत करणं, त्यांच्या कुटुंबाच्या दु:खावर फुंकर घालणं हे काम मला नेहमीच जवळचं वाटलं आहे.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

खरंच की किती अंतर चालून आले मी आयुष्यात! ७८ वर्ष म्हणजे खूपच झाली नाही? मला माझ्या नातवाच्या आठ वर्षांपूर्वीच्या उद्गारांची आठवण झाली. त्याचा चौथा-पाचवा वाढदिवस असेल. मला म्हणाला, ‘‘आजू, तू किती वर्षांची झालीस? मी म्हटलं, ‘‘झाले की ७० वर्षांची!’’ तो निरागस अचंब्याने म्हणाला, ‘‘म्हणजे १ पासून सुरुवात करून?’’

तेव्हा वाटलं, हे वयाचे आकडे फारच सापेक्ष आणि फसवे असतात. आता आरशात स्वत:कडे पाहताना, चेहऱ्याची ठेवण, हातावरच्या पिंपळपानाच्या जाळीसारख्या सुरकुत्या पाहताना मजा वाटते आणि जाणवतं की अरे, आपण खरंच म्हातारे झालो की. तो हळूहळू होत राहणारा बदल असल्याने जाणवत नाही, पण पूर्वीचे फोटो पाहताना मात्र आपण किती बदललो हे लक्षात येतं. पण हे झालं बाह्य़रूप, मनामध्ये मात्र आपण सात-आठ वर्षांचे असतानाची परकर-पोलका घालून ठिक्कर खेळणारी मुलगी, मत्रिणींबरोबर सिनेमाला जाण्याचा हट्ट  करणारी १४-१५ वर्षांची बंडखोर किशोरी, प्रेमात पडल्यावर होऊ घातलेल्या नवऱ्याबरोबर घरी काही तरी बहाणा सांगून फिरायला गेलेली तरुणी, पहिल्या बाळाच्या जन्मानंतर मनात दाटलेला वात्सल्याचा गहिवर जोडीदाराबरोबर शेअर करणारी, नव्याने आई झालेली, प्रमदा ही सर्व रूपं आजही मनाच्या आरशात दिसत असतात. मग नक्की कोण म्हातारं झालं म्हणायचं? आजही रस्त्यावर ‘बरफका गोला’ची गाडी दिसली की मी तो खाते. मुंबईबाहेर गेल्यावर वाटेत चिंचेचं झाड दिसलं तर (मला उतरून दगड मारून पाडणं शक्य नसल्याने)ड्रायव्हरला चिंचांचे दोन आकडे आणायला सांगते.

माझं पदव्युत्तर शिक्षण झाल्यावर १९७१ मध्ये लगेच मी के.ई.एम. रुग्णालयातील मानसोपचार विभागात ‘चिकित्सा मानसशास्त्रज्ञ’ म्हणून नोकरी करू लागले. २५ वर्ष तिथे काम केल्याने ते माझं दुसरं घर आहे. त्यामुळे तेथील त्या वेळचे सहकारी व दर वर्षी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आपला मानसोपचारतज्ज्ञाचा व्यवसाय मुंबईतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत. ते जवळजवळ सर्व जण माझ्या संपर्कात आहेत व आमचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

१९९० मध्ये आनंद (डॉ. आनंद नाडकर्णी) आणि मी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या उत्साही सहकाऱ्यांसह ‘आय.पी.एच.’ (इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ) ही संस्था सुरू केली व आज आमचं ६०-६५ जणांचं कुटुंब आहे. आनंदसारखा कल्पक व दिशादर्शी नेता असल्याने आमची झपाटय़ाने प्रगती झाली. आम्ही गमतीने आय.पी.एच.ला ‘फेविकॉलका जोड’ म्हणतो, कारण इकडे आलेला सहकारी इथेच चिकटून जातो. आमच्या कुटुंबाचा एक भाग बनतो. इथल्या २५ ते ४५ वयाच्या सहकाऱ्यांबरोबर काम करताना, शिकवताना व शिकताना मानसिक आनंद, बौद्धिक ऊर्जा मिळते आणि तरुणाईचा स्पर्शही होतो. त्यामुळे काही वेगळ्या प्रकारची समस्या घेऊन एखादी व्यक्ती आली, नेटवर एखादा अभ्यासपूर्ण लेख मिळाला तर आजही कधी एकदा आय.पी.एच. मधल्या सहकाऱ्यांना ती गोष्ट सांगते असं होतं. एखाद्या छोटय़ा मुलीला नवीन बाहुली मिळाली तर कधी एकदा मत्रिणींना दाखवीन असं होतं, अगदी त्याच उत्साहाने!

माझ्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेकांच्या बहुतांशी समस्या त्यांच्या विचारातील विकल्पांमुळे किंवा आधी घेतलेल्या निर्णयांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे होणाऱ्या भावनिक विस्फोटामुळे असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना मिळणाऱ्या समाधानापेक्षा अधिक समाधान आमच्या ‘त्रिदल’च्या ‘शुभार्थी’बरोबर काम करताना मिळतं. आमचा ‘त्रिदल गट’ हा ‘स्किझोफ्रेनिया’ या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांचं, ‘शुभार्थी’चं अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर आहे. तिथे गेल्यावर ज्या मायेने, प्रेमाने ते माझं स्वागत करतात, नवीन कपडा घातला असल्यास आवर्जून दाखवतात, त्यांचं दुखलंखुपलं शेअर करतात, ते पाहून मी भारावून जाते. त्यांची काहीही चूक, दोष नसताना त्यांच्या पदरात पडलेला स्किझोफ्रेनियासारखा आजार! त्याचा त्रास सुसह्य़ करण्यासाठी त्यांना मदत करणं, त्यांच्या कुटुंबाच्या दु:खावर फुंकर घालणं हे काम मला नेहमीच जवळचं वाटलं आहे.

व्यक्तिगत आयुष्यात अडचणी व समस्या येणं साहजिकच आहे. माझी मोठी मुलगी दीड वर्षांची असताना तिला नखशिखांत देवी आल्या. मुंबईत १९६४ च्या डिसेंबरमध्ये देवीची मोठी साथ आली होती. (ज्यात गीता बाली ही अभिनेत्री मरण पावली) माझ्या वयाच्या तेविसाव्या वर्षी तिच्या यातना व त्यातून बाहेर पडायचा दोन वर्षांचा अवधी खूप कठीण होता. त्याप्रमाणे माझ्या धाकटय़ा मुलीला जन्मत: पायात व्यंग होतं (एक पाय चार इंचांनी आखूड होता) त्यामुळे तिच्या वयाच्या २१ ते २४ वर्ष या काळात १३ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, पण त्या दिव्याला ती हसतमुखाने सामोरी गेली. त्याआधी माझ्या वयाच्या ४७ व्या वर्षी माझा नवरा परदेशी कामासाठी गेला असताना तिथेच त्याचं अकस्मात निधन झालं. या घटनेला महिना होत नाही तो त्याच्या व्यवसायातील त्याने घेतलेल्या प्रचंड कर्जाचा डोंगर माझ्यावर आला, अगदी घरावर चिकटवलेला जप्तीचा कागदही! पण या सर्वात माझ्या दोन्ही मुली, माझा त्या वेळी शाळेत जाणारा मुलगा, आम्ही सर्व जण खूप जवळ आलो. त्या घटनेने आम्हा सर्वानाच खूप खंबीर व सहृदय  केलं. माझ्याकडे समुपदेशनाला येणाऱ्या साहाय्यार्थीच्या भावना समजून घेण्यात हे सहसंवेदन (एम्पथी) उपयुक्त असतं व आपणही ‘दुखभरे दिन बिते रे भय्या, अब सुख आयो रे ..’ म्हणत पुढे जातो.

यंदाच्या जानेवारीपर्यंत माझं काम रोज सकाळी १० ते रात्री ९-९.३० पर्यंत चालत असे. आठवडय़ातून २-३ दिवस आय.पी.एच. व आठवडय़ात सुमारे २० ते २२ माझं निदान-चाचण्या व समुपदेशनाचे लोक. पण फेब्रुवारी महिन्यात माझे डॉक्टर मित्र मिलिंद पाटील यांनी मला ३-४ आठवडे पूर्ण झोपून राहण्याची सक्त ताकीद (सक्तमजुरी) दिली व एक दागिनाही बहाल केला. कंबरपट्टा (ठिसूळ हाडांमुळे मणका जपण्यासाठी) त्या दागिन्याआधी माझ्याकडे दोन दृश्य दागिने होतेच. पायाच्या अर्धा डझन शस्त्रक्रिया झाल्याने मिळालेला रत्नदंड (काठी) व कर्णफुले (कानाचे मशीन) याशिवाय अदृश्य दागिना म्हणजे गुडघ्यातील ‘लाख’ मोलाच्या वाटय़ा! पण या सर्वाशी मी छान दोस्ती केली आहे कारण त्यांच्यामुळे माझे आयुष्य सुकर झाले आहे.

याशिवाय माझा गेल्या २४ वर्षांपासूनचा मित्र आहे माझा संगणक. तो माझी सर्व कामे चुटकीसरशी करून टाकतो. माझ्या आधीपासून गचाळ असलेल्या व आता संधिवातामुळे अधिकच गचाळ झालेल्या अक्षराचा प्रश्न त्याने कधीच सोडवला आहे. पण त्यासोबत सर्वात छान घालवत असलेला वेळ म्हणजे रात्री उशिरापर्यंत यू-ट्यूब व जगभरच्या वेगवेगळ्या संकेतस्थळांवरील लघुपट पाहणे व त्यातील उपयुक्त लिंक्सचा संग्रह करणे. वर उल्लेख केलेल्या आमच्या ‘त्रिदल’च्या शुभार्थीना आम्ही दर महिन्यातला एक दिवस

३-४ लघुपट दाखवून, विचार करायला लावून, बोलतं करतो. आमच्या ‘सप्तसोपान’ या दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनमेंदूसंवर्धन केंद्रामध्ये महिन्याचं एक सत्र निवडक लघुपट दाखवून त्यांची चर्चा करण्याचं असतं. सर्वासाठी खुल्या असलेल्या ‘मनतरंग फिल्म कट्टय़ा’वरही दर महिन्याला आम्ही त्यातील लघुपट दाखवतो. चित्रपटांशी असलेला माझा दोस्ताना फार लहानपणापासून आहे त्याचं कारण माझे वडील गोविंद घाणेकर हे मराठी चित्रपट दिग्दर्शक होते. भारतात जाहिरातपटांचं रोपटं लावण्याचं पायाभूत काम वडिलांनी १९५५-५६ पासून केलं.

प्रो. किशोर फडके १९६० पासून माझे शिक्षक होते, पण १९८७-८८ च्या सुमारास त्यांनी माझी ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’ या विषयाची ओळख करून दिली. ते या विषयातील आशिया खंडातील ‘बाप’! त्या ज्ञानाने माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. आज या विषयाच्या कार्यशाळा मी व आनंद गेली १५ वर्ष, बरोबर व स्वतंत्रपणे घेत आहोत. या शिक्षणाचे लाभार्थी जेव्हा त्यांच्या आयुष्याला या विचारांमुळे वळण मिळालं म्हणून कळवतात तेव्हा आमच्या कष्टांचं चीज होतं.

एक खंत आहे की, आनंदसारखा पट्टीचा लेखक गेली ३० वर्ष सहवासात असताना व मलाही थोडंफार लिखाणाचं अंग असताना माझ्या हातून आजपर्यंत अगदी फुटकळ लिखाण झालं आणि अगदी डोक्यावर आल्यावर (उदा. हा लेख!)तसं अर्धवट लिहिलेलं लिखाणही माझ्या संगणकात धूळ खात पडलेलं आहे, पण बैठक मारून लिहायचं ठरवलं तर इतर काही ‘इंटरेस्टिंग’ मला खुणावत राहतं व लिखाण मागे पडतं. बघू या, ‘रात अभी बाकी है.’ दुसरी खंत अशी, आम्हा सहा भावंडांत मी सर्वात मोठी व माझ्या पाठीवरील तीन भाऊ माझ्यापेक्षा दीड-दोन वर्षांनी लहान. त्यामुळे लहानपणी आमच्या चौघांचं नातं खूप घट्ट, पण आज ते तिघेही हयात नाहीत. मला वाटतं हे हुळहुळणारं दु:ख सुनीताबाईंनी त्यांच्या लेखनात सुरेख शब्दांकित केलं होतं. आपल्याच आयुष्यात वाढलेली, आपल्या आठवणींना दाद देणारी माणसं या वयात पांगलेली असतात. बिन आवाजाच्या पावलांनी हळुवारपणे येणाऱ्या अशा आठवणींकडे बोट दाखवावं तर त्यातील अर्थ, संदर्भ जाणणारे कोणीच आजूबाजूला नसतं. आता माझी धाकटी बहीण व भाऊ आहेत, पण ते दोघे माझ्यापेक्षा १७ आणि २० वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे ते नातं भावंडांसारखं नाही तर आई-मुलांसारखं आहे.

माझी लहान मुलगी १५-२० मिनिटांच्या अंतरावर भांडुप येथे तिचा नवरा व मुलासह राहते. मोठी मुलगी माझी ‘सख्खी शेजारी’, शेजारच्या फ्लॅटमध्ये तिचा नवरा, दोन मुलगे व सून यांच्यासह राहते. तीसुद्धा उच्च न्यायालयातील तिच्या वकिली पेशात व्यस्त असते. माझं भरगच्च टाइमटेबल व फुल डायरी बघून ती गमतीने म्हणतेही, ‘‘आईला भेटायचं म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायला हवी!’’ अर्थात हा सर्व दिनक्रम दर वर्षी डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास बराचसा बदलतो, कारण या वेळी माझा लहान मुलगा सिडनीहून भारतात ३-४ आठवडय़ांसाठी येतो. त्या वेळी त्याच्याबरोबर वेळ घालवणं हा मोठय़ाच आनंदाचा भाग असतो.

माझा दैव, नशीब, ग्रह-तारे यांवर कधीच विश्वास नव्हता व नाही म्हणून मी स्वत:ला नशीबवान वगैरे म्हणत नाही. माझं कुटुंब व त्या परिघापलीकडचं विस्तारित. आमची संस्था आय.पी.एच., माझे विद्यार्थी, साहाय्यार्थी या सर्वानी माझ्यावर केलेली माया, भरभरून दिलेला आनंद हीच माझ्या आयुष्यातली कमाई, पुढील वाटेवरील शिदोरी व शेवटच्या श्वासापर्यत काम करत राहण्यासाठी असलेली ऊर्जा!

thatteshubha@gmail.com

chaturang@expressindia.com